क्रिकेट विश्वचषक १९९२मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड या उपान्त्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेस विजयासाठी १२ चेंडूंमध्ये २२ धावा हे समीकरण पावसाच्या व्यत्ययानंतर १ चेंडूमध्ये २२ धावा असे एकाच वेळी हास्यास्पद आणि क्रूर बनले. अर्थातच दक्षिण आफ्रिकेने तो सामना गमावला. पण या निमित्ताने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पावसाच्या व्यत्ययानंतर सुधारित लक्ष्य निर्धारणासाठी प्रमाणित गणिती पद्धतीच्या अभावाचा मुद्दा अधोरेखित झाला. ती स्पर्धा झाली ऑस्ट्रेलियात. त्याच वर्षी इंग्लंडमधील शेफील्ड येथे रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीची एक परिषद झाली. तीत ‘खराब हवामानात समन्यायी निकाल’ या बिरुदाखाली एक लघु टिपण सादर झाले. त्या टिपणाचे लेखक होते फ्रँक डकवर्थ.
हेही वाचा >>> चांदनी चौकातून : गणंगभणंग गळाले!
डकवर्थ यांनी हे टिपण ऑस्ट्रेलियातील त्या सामन्यातील हास्यास्पद निकालापासून प्रेरित होऊनच लिहिले. डकवर्थ हे सांख्यिकीतज्ज्ञ होते. तसेच क्रिकेटप्रेमीही होते. डकवर्थ यांच्या सादरीकरणानंतर टोनी लुइस या इंग्लंडमधील आणखी एका सांख्यिकीतज्ज्ञाने त्यांच्याशी संपर्क साधला. दोघांनी मिळून जे सूत्र तयार केले, ते ‘डकवर्थ-लुइस मेथड’ या नावाने प्रसिद्धी पावले. १९९९मध्ये इंग्लंड-झिम्बाब्वे मालिकेत ते पहिल्यांदा वापरले गेले. पुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) त्याचा अधिकृत स्वीकार केला. फ्रँक डकवर्थ हे रूढार्थाने सांख्यिकीतज्ज्ञ नव्हेत. त्यांनी भौतिकशास्त्रात पदवी घेतली आणि पुढे लिव्हरपूल विद्यापीठातून धातुशास्त्रात पीएच.डी. पूर्ण केली. पण अणुऊर्जा क्षेत्रात गणिती शास्त्रज्ञ म्हणून काम करत असताना संख्याशास्त्रीय गुंतागुंतीच्या विश्वात त्यांनी मुशाफिरी केली. इंग्लिश क्रिकेटमध्ये पावसाचा व्यत्यय अनेकदा येतो. त्यामुळे १९८०च्या दशकातच डकवर्थ यांनी या विषयात आकडेमोड सुरू केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदिवसीय प्रकाराची भरभराट १९८० आणि १९९०च्या दशकांत झाली. पावसामुळे असे सामने निर्धारित षटकांपेक्षा कमी वेळेत संपण्याचे प्रकार वाढू लागले. पहिल्या संघाने ५० षटके खेळून काढली, मग पावसाने २५ षटकेच दुसऱ्या संघाच्या वाट्याला आली, तरी दहा गडी हाताशी असल्यामुळे ही परिस्थिती दुसऱ्या संघास अधिक अनुकूल. दुसऱ्या (ऑस्ट्रेलियातील) पद्धतीत सर्वाधिक उत्पादक षटकांचे सूत्र वापरले गेले, जे पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघासाठी अनुकूल. डकवर्थ आणि लुइस यांनी या समस्यांमध्ये सुवर्णमध्य साधला. पावसामुळे व्यत्यय आल्यास सुधारित लक्ष्य निर्धारित करताना सरासरीबरोबरच हाताशी असलेल्या गड्यांचाही (विकेट्स) विचार करणारे सूत्र डकवर्थ आणि लुइस यांनी विकसित केले. गणिती समस्येवर गणिती तोडगाच हवा, हे डकवर्थ यांचे मत. या जोडगोळीतील लुइस २०२०मध्ये गेले. परवा डकवर्थही निवर्तले. पण त्यांची क्रिकेटवरील छाप हाती चेंडू वा बॅट न घेताही अमीट राहील.