दिल्लीतील चाणक्याच्या कार्यालयात सुरू झालेल्या गुप्त बैठकीतील वातावरण तणावपूर्ण होते. ‘हा मस्क समजतो काय स्वत:ला? ‘ग्रोक’च्या माध्यमातून आंतरजालात डाव्यांनी करून ठेवलेला तद्दन खोटा इतिहास समोर आणून याला आपली बदनामीच करायची आहे. ट्रम्पमुळे उगीच आपण याला आपला समजू लागलो होतो. आता बस्स झाले. याला धडा शिकवायलाच हवा’ भक्तांवर नियंत्रण ठेवून असलेल्या ‘अखिल भारतीय कुजबुज संघटने’चे प्रमुख तावातावाने बोलून खाली बसले तशी तणावात आणखी वाढ झाली.

खास बैठकीला म्हणून बोलावण्यात आलेले काही ज्येष्ठ भक्त ‘ग्रोक’कडून झरझर येणारी उत्तरे वाचून आणखी अस्वस्थ होत पाण्याचा ग्लास रिता करत होते. तेवढ्यात चाणक्यांचे उजवे हात म्हणून ओळखले जाणारे एक ज्येष्ठ बोलू लागले. ‘हे बघा. हा मस्क अमेरिकन आहे. आपल्या देशातला असता तर पाच मिनिटांत सुतासारखा सरळ केला असता. इथे द्विराष्ट्रीय संबंधांचा मुद्दा येतो. त्यामुळे जपून पावले टाकावी लागतील.’ यावर आणखी एक भक्त खवळले. ‘या ‘ग्रोक’मुळे रोज आपली फजिती होतेय त्याचे काय? पुरोगाम्यांना तर आयतेच कोलीत मिळाले. या चॅटबॉटवर सरकारने तातडीने बंदी घालायलाच हवी. आपण इतिहास बदलण्यासाठी एवढे कष्ट उपसतोय आणि हा त्यावर पाणी फेरतोय.’ त्यावर अध्यक्ष म्हणाले. ‘घाई नको. एक्सला पर्याय म्हणून आपण ‘कू’ आणले. विश्वगुरूंनी जाहिरात करूनही ते चालले नाही. आपले हनुमान नावाचे चॅटबॉट तयार होतेय पण त्याला वेळ आहे. तोवर यातून मार्ग काढू. तुम्ही मला दहा मिनिटे द्या. मी चाणक्यांना भेटून येतो.’

अल्पकाळासाठी बैठक तहकूब होताच सारे पुन्हा ‘ग्रोक’मध्ये व्यग्र झाले. अध्यक्ष परतल्यावर त्यांनी जाहीर केले. ‘वरिष्ठांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतले आहे. ट्रम्प व मस्कशी बोलणी सुरू झाली असून इथे फोनवरच मला चर्चेचे तपशील कळतील व ते मी तुम्हाला सांगेन. तोवर तुम्ही डाव्यांच्या नावाने बोेटे मोडत पुरोगाम्यांवर तुटून पडा.’ हा संदेश क्षणात सर्वदूर पसरताच देशभरातील भक्त कामाला लागले. प्रतिवादात खंड पडता कामा नये या परिवाराच्या शिकवणीची आठवण साऱ्यांना झाली. तेवढ्यात अध्यक्षांचा फोन खणाणला. दहा मिनिटांनी तो ठेवल्यावर ते म्हणाले. ‘ग्रोककडून अपेक्षित- म्हणजे गांधी, नेहरूंनी इंग्रजांची माफी मागितली, धार्मिक तेढ निर्माण करणारे हे दोघेच. अशी उत्तरे हवी असतील तर आंतरजालातील सर्व माहिती बदलणे गरजेचे. त्यासाठी पाच लाख ओळी आपण लिहून देण्याची तयारी दर्शवली पण अमेरिका दर शंभर ओळींवर एक हजार डॉलर कर मागतेय. अशाने दहा वर्षांतील गंगाजळी रिती होईल. यातून मार्ग कसा काढायचा हा प्रश्न वरिष्ठांना पडलाय.’ हे ऐकताच साऱ्यांचे हातपाय गळाले. माहिती पसरवण्याच्या नादात तिचा साठा करून ती जगभर उपलब्ध होईल अशी यंत्रणा निर्माण करण्यात आपण अपयशी ठरलो, याची जाणीव झाली पण उघड बोलण्याचे धारिष्ट्य कुणात नव्हते. तेवढ्यात मागे बसलेला एक भक्त ओरडला. ‘सापडला तोडगा’ तसे सारे त्याच्याकडे बघू लागले. तो म्हणाला. ‘जो त्रास आपल्याला होतोय तोच ट्रम्पनाही होतोय. त्यांच्याविषयीसुद्धा बदनामीकारक उत्तरे ‘ग्रोक’कडून मिळतात. तेव्हा खऱ्या इतिहासाच्या आपल्या पाच लाख ओळींसोबत त्यांच्याही तेवढ्याच ओळी तयार करून देऊ म्हणजे कराचा प्रश्न मिटला.’ हे ऐकताच सारे आनंदाने नाचू लागले. मग अध्यक्षांनी त्याला सोबत घेत थेट वरिष्ठांकडे धाव घेतली.

Story img Loader