अमेरिकेचे माजी आणि इच्छुक अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयोवा राज्यातील रिपब्लिकन पक्षांतर्गत मेळाव्यात (कॉकस) अध्यक्षपदासाठी पसंतीचा उमेदवार म्हणून विक्रमी मते मिळवली आणि प्रमुख प्रतिस्पर्ध्याचा दारुण पराभव केला. उणे २० तापमान, हिमवादळे अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रिपब्लिकन पक्षाच्या नोंदणीकृत मतदारांनी अध्यक्षपद उमेदवारीसाठी ट्रम्प यांच्या पारडयात भरभरून मते टाकली. अमेरिकेच्या अध्यक्षपद निडणुकीच्या प्रदीर्घ चक्राचा आयोवा कॉकस म्हणजे खरे तर पहिलाच टप्पा. या कॉकसच्या निकालातून बहुतेकदा अध्यक्षपदाचे अंतिम उमेदवार कोण असतील, याचा अंदाज लावला जातो. आयोवा जिंकणारेच अध्यक्षपदावर विराजमान होतात, असे नाही. खुद्द ट्रम्प २०१६ मध्ये आयोवा कॉकसमध्ये टेड क्रूझ यांच्याकडून पराभूत झाले होते. अर्थात अध्यक्षीय निवडणुकीत मात्र २०१६ आणि २०२० अशा दोन्ही वेळेस आयोवाच्या मतदारांची पसंती डोनाल्ड ट्रम्पनाच होती. अलीकडच्या काळात रोनाल्ड रीगन, जॉर्ज बुश थोरले आणि जॉर्ज बुश धाकटे असे तिघेच आयोवा जिंकून व्हाइट हाऊसपर्यंत जाऊ शकले. तर २००८ ते २०१६ या काळात आयोवा कॉकसमध्ये जेत्या ठरलेल्या रिपब्लिकन नेत्यांना त्या पक्षाकडून अध्यक्षपद निवडणूक उमेदवारी मिळली नव्हती. पण आयोवातून कौल नाही तरी कल समजून येतो. यंदा ‘ट्रम्पवापसी’ची जी हुरहुर लागून राहिली आहे, तिची चाहूलच जणू या निवडणुकीतून मिळाली.
हेही वाचा >>> चतु:सूत्र : नव्या सामाजिकतेची पायाभरणी
डोनाल्ड ट्रम्प यांना आयोवातील नोंदणीकृत मतदारांपैकी जवळपास ५० टक्क्यांहून अधिक मतदारांनी पहिली पसंती दिली. रिपब्लिकन पक्षात ‘ट्रम्प विरुद्ध इतर’ हा मामला किती एकतर्फी आहे, याची काहीशी झलक यानिमित्ताने पाहावयास मिळाली. कारण गेल्या वर्षांच्या सुरुवातीस ट्रम्प यांचे प्रबळ प्रतिस्पर्धी मानले गेलेले रॉन डेसान्टिस २१ टक्के मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर, तर आणखी एक प्रतिस्पर्धी निकी हॅली या १९ टक्के मतांसह तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या. ट्रम्प यांच्याच धोरणांना अधिक भडकपणे मांडणारे भारतीय वंशाचे विवेक रामस्वामी हे तर चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. आयोवा आणि एकंदरीतच अमेरिकेतील राजकीय वाऱ्यांची दिशा पाहून या रामस्वामींनी थेट अध्यक्षीय उमेदवार लढतीतूनच माघार घेत असल्याचे जाहीर करून टाकले. शोभेचे दैवतच पुजले जात असताना पूजेच्या वेगळया दैवताची गरज राहात नाही, हे रामस्वामींनी बहुधा ताडले असावे. आता ते ट्रम्प यांचे परमभक्त बनले असून, त्यांच्या बाजूने प्रचारही करणार आहेत.
हेही वाचा >>> पहिली बाजू : ‘नेहरूवादा’ऐवजी आता कल्याणवाद!
कॉकस आणि प्रायमरीज किंवा पक्षांतर्गत निवडणुकांचा हा माहौल अमेरिकेमध्ये जानेवारी ते मार्चदरम्यान राहतो. ट्रम्प यांच्या आयोवा विजयाची माध्यमांकडून दखल घेतली जात असताना, डेमोक्रॅटिक पक्षातील सामसूम अस्वस्थ करणारी ठरते. रिपब्लिकन पक्षाप्रमाणेच डेमोक्रॅटिक पक्षाचीही पंचाईत अशी, की अध्यक्ष जो बायडेन यांना सक्षम असा प्रतिस्पर्धीच पक्षात निर्माण होऊ शकलेला नाही. वयोवृद्ध बायडेन यांच्यात ट्रम्प यांना सामोरे जाण्याइतपत ऊर्जा शिल्लक आहे, याविषयी पक्षातीलच अनेकांना खात्री वाटत नाही. खरे तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने चलनवाढ वगळता इतर काही निर्देशांक आश्वासक दिसून आले आहेत. परंतु हेदेखील मतदारांपर्यंत सक्षमपणे मांडण्याची कुवत बायडेन यांच्यात नाही, असे त्यांच्या सहकाऱ्यांना वाटू लागले आहे. रिपब्लिकन पक्षामध्ये ट्रम्प वगळता इतरांमध्ये दुसऱ्या स्थानावर राहण्याची चढाओढ सुरू आहे, जी ट्रम्प यांच्या पथ्यावर पडेल. त्यांचे विरोधक विभागले गेले, तर उमेदवारीची माळ विनासायास त्यांच्या गळयात पडेल. सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्याची ऊर्मी आणि ऊर्जा ट्रम्प बाळगून आहेत आणि पक्षाला काय वाटते याची त्यांना फारशी फिकीर नाही. ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ ही मोहीम त्यांनी पुनरुज्जीवित केली आहे आणि तिला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. स्थलांतरित विरोध, आत्मकेंद्री आणि बेफिकीर परराष्ट्र धोरण, लोकशाही मूल्यांविषयीची तुच्छता हे मुद्दे अजूनही चलनात आहेत आणि ते निर्णायक ठरतील याविषयी ट्रम्प आश्वस्त आहेत. अमेरिकी संविधानाविरोधात उठाव केल्याप्रकरणी ज्या अध्यक्षाविरोधात देशभर कज्जे सुरू आहेत, तो उजळ माथ्याने लोकांमध्ये जातो आणि तुफान लोकप्रिय ठरतो हे आयोवाच्या निमित्ताने पुन्हा दिसून आले.