काळय़ा-पांढऱ्या व राखाडी चित्रवाणी संचांच्या जमान्यात एक छापील जाहिरात होती- ‘वृत्तनिवेदिकेच्या पापण्या जर स्पष्ट दिसत असतील, तर नक्कीच तो सॉलिडेअर!’ – याच मराठी शब्दांतील त्या जाहिरातीत टीव्हीमध्ये दिसणाऱ्या गीतांजली अय्यर यांचे छायाचित्र छापलेले असे. पण त्यांचेच का? ‘दूरदर्शन’ – त्यातही ‘डीडी नॅशनल’ हीच एकमेव देशव्यापी चित्रवाणी वृतवाहिनी असतानाच्या त्या काळात हिंदी बातम्यांमुळे सर्वपरिचित झालेल्या सलमा सुलताना, मंजरी जोशी-सहाय, शोभना जगदीश, अविनाश कौर सरीन किंवा इंग्रजी बातम्या देणाऱ्या रीनी सायमन- खन्ना, नीती रविन्द्रन, कोमल जी. बी. सिंग यांचे का नाही? पुरुष वृत्तनिवेदकांपैकी तेजेश्वर सिंग, शम्मी नारंग, जे. व्ही. रमण यांचे का नाही? याचे उत्तर कदाचित या साऱ्याच वृत्तनिवेदकांचे चेहरे पुन्हा ज्यांना आठवतील, त्यांना माहीत असेल.. गीतांजली अय्यर यांचेच डोळे त्या सर्वापेक्षा टपोरे-रेखीव होते, त्यांच्या पापण्याही सुबक होत्याच. शिवाय, रीनी सायमन यांच्या बॉयकटपेक्षा गीतांजली अय्यर यांचे केस थोडे मोठे होते..
.. हे इतके तपशीलवार स्मरणरंजन गीतांजली अय्यर यांच्या निधनवार्तेनंतरच झाले. त्यांच्या केशरचनेचीही आठवण अनेकांनी काढली. अर्थातच वृत्तनिवेदकांना आवाज आणि बातम्यांची समज आवश्यक असते, याचे भान त्या काळानेच दूरदर्शनच्या ‘दर्शकां’ना दिलेले होते. गीतांजली अय्यर यांचे खणखणीत इंग्रजी उच्चार, बातमीचे कमीअधिक गांभीर्य जोखणारा त्यांच्या आवाजाचा पोत, एखादी सौम्य बातमी सांगताना किंवा बातम्यांच्या अखेरीस ‘गुडनाइट’ म्हणताना मान किंचित कलती करून डोळय़ांची क्षणिक उघडमिट करण्याची त्यांची शालीन पद्धत.. हे सारेच १९८० च्या दशकात बातम्या चित्रवाणीवर असूनही ज्यांना ‘ऐकाव्या’च लागल्या, अशा अनेकांना आठवत असेल! ‘ये तस्वीरें हम आपको दिखा रहे है’ असे किंचाळणारी अँकरमंडळी तेव्हा नव्हती. आकाशवाणीवर जशा बातम्या ऐकवतात तशाच दूरदर्शनवर ऐकवल्या जात, त्यामुळे वृत्तनिवेदकांचे चेहरेच दिसत राहात.. लक्षात राहात!
गीतांजली अय्यर यांना हिंदीसुद्धा बरे बोलता येते, हे श्रीधर क्षीरसागरांच्या ‘खानदान’ या चित्रवाणी मालिकेतील त्यांच्या छोटेखानी भूमिकेमुळे तत्कालीन प्रेक्षकांना समजले. निधनानंतर ज्या बातम्या आल्या, त्यातून आणखीही काही समजले.. जन्म कोलकात्याचा, इंग्रजीतून एमएपर्यंतचे शिक्षणही त्याच शहरात आणि ‘स्वामिनॉमिक्स’ हा स्तंभ लिहिणारे पत्रकार स्वामिनाथन एस. अंकलेशरिया अय्यर यांच्याशी विवाहानंतर १९७६ पासून ‘दूरदर्शन’मध्ये. अशा-जंत्रीला उजळा मिळाला तो या निधनवार्तामधून. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा‘मधील कमी कालावधीचा पदविका अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला होता, ‘वल्र्ड वाइल्डलाइफ फंड’ तसेच अन्य काही संस्थांसाठी त्या सदिच्छादूत म्हणून काम करत होत्या, आदी माहितीही त्यात होती.
पण हे चरित्र- तपशील गीतांजली अय्यर यांच्यासह कुणाही तत्कालीन वृत्तनिवेदकांबाबत महत्त्वाचे ठरतात का? की शालीन- सभ्यपणे चित्रवाणी बातम्या देणाऱ्या काळाचा आणखी एक दुवा हरपल्याची रुखरुख त्यापेक्षा मोठी असते?