डॉ. उज्ज्वला दळवी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
प्रतिकारशक्तीला कार्यरत तर करायचंय, पण त्या शक्तीचा धुमाकूळ नकोय.. यासाठी स्टेरॉइडचं प्रमाण आणि कालावधी महत्त्वाचा..
‘‘तो मनजीत फार फुगलाय. भोपळय़ाला शेवग्याच्या शेंगांचे हातपाय लावून वर बटाटय़ाचं डोकं ठेवल्यासारखा दिसतोय.’’
‘‘त्याचा किडनी-ट्रान्सप्लांट झालाय. स्टेरॉइड्स घेतोय. म्हणून जाडा झालाय बिचारा.’’
‘‘स्टेरॉइड्स! बापरे! किती भयानक!’’
स्टेरॉइड्सबद्दल लोकांच्या मनात भयगंड असतो. त्यांना प्रत्यारोपणापेक्षाही स्टेरॉइड्स अधिक भयानक वाटतात.
पण आपल्या शरीरातच कित्येक वेगवेगळी स्टेरॉइड्स बनतात आणि अनेक महत्त्वाची कामं करतात. स्टेरिऑस म्हणजे घट्ट आणि कोले म्हणजे पित्त. म्हणून पित्तखडय़ांत घट्ट झालेल्या पदार्थाला कोले-स्टेरॉल हे नाव मिळालं. मग त्याच्यासारखी रासायनिक रचना असणारे सगळे पदार्थ स्टेरॉइड्स झाले. जननग्रंथींमध्ये बनणारी, स्त्रीत्व किंवा पौरुष फुलवणारी हॉर्मोन्स, त्वचेखाली जन्मून लिव्हर-किडनीच्या संस्कारांनी कामसू बनणारं ड-जीवनसत्त्व आणि लिव्हरमधून स्रवणारी पित्ताम्लं ही सगळी स्टेरॉइड्सच आहेत.
गाजावाजा होतो तो कॉर्टिकोस्टेरॉइड्सचा. दोन्ही किडन्यांच्या डोक्यावर माकडाच्या पिल्लासारख्या बिलगून बसलेल्या, चिमुकल्या अॅड-रीनल ग्रंथींतून अनेक स्टेरॉइड्स स्रवतात. त्यांच्यातलं एक बडं धेंड रक्तातलं सोडियम आणि पाणी वाढवतं, आवश्यक रक्तदाब टिकवून ठेवतं.
पण बागुलबुवा-स्टेरॉइड आहे ते दुसरं बडं प्रस्थ, ग्लूकोकॉर्टिकॉइड. त्याचं मुख्य काम म्हणजे प्रतिकारशक्तीला वचकात ठेवणं. ताणतणावांशी सामना करताना शरीराला अधिक रसद लागते. ती पुरवायला ते मुकादम-स्टेरॉइड रक्तातली साखर, प्रथिनं, स्निग्धाम्लं वाढवतं. सगळं शरीर युद्धसज्ज होतं. एका गळवाशी लढाई असली तरी ताप येतो, अंग दुखतं. मात्र, मुकादम-स्टेरॉईडमुळे लढाई गळवापुरतीच मर्यादित रहाते. ते झपाटलेल्या लढाऊ पेशींना वेळीच निवृत्त करतं. शस्त्रास्त्रं बाद करतं. परकीयांचा पराभव झाल्याझाल्या लढाई तिथेच थांबते.
दुसऱ्या काही स्टेरॉइड्सचाही बोलबाला असतो. बेन जॉन्सन या कॅनेडियन धावपटूच्या तपासणीत त्याच्या रक्तात स्टेरॉईड्सचा अंश सापडला. त्याला ऑलिम्पिक स्पर्धेतून बाद केलं गेलं. त्याने घेतली ती स्टेरॉइड्स वेगळी. ती आपल्या शरीरात बनत नाहीत. पौरुषाची लक्षणं वाढवणाऱ्या टेस्टोस्टेरॉन नावाच्या हॉर्मोनचे ते कृत्रिम अवतार होते. त्यांना ‘पौष्टिक (अॅनाबॉलिक) स्टेरॉइड्स’ म्हणतात. त्यांच्यामुळे स्नायू बलदंड व्हायला मदत होते. जागतिक स्पर्धात त्यांना मनाई आहे. जिममधली मुलंमुली ते सर्रास घेतात. त्यांच्यामुळे मुली केसाळ होतात. लिव्हरमध्ये टय़ूमर होतात. फार चिडाचीड होते. पौगंडावस्थेतल्या मुलांची वाढही खुंटते. तशी त्रासदायक औषधं घेण्यापेक्षा प्रामाणिकपणे मेहनत करून स्नायू कमावणं अधिक चांगलं.
मांसासाठी जोपासलेल्या प्राण्यांचा आकार वाढवायला त्यांनाही ‘पौष्टिक स्टेरॉइड्स’ देतात. युरोपमध्ये तशा मांसाला बंदी आहे. इतर प्रगत देशांत अल्पकाळ टिकणाऱ्या ‘पौष्टिक स्टेरॉइड्स’च्या वापराला परवानगी आहे. त्यांचा मानवी आरोग्याला धोका राहात नाही.
प्रतिकारशक्तीला वचकात ठेवणारं मुकादम-स्टेरॉइड शरीरात बनतं. त्याच्यासाठी रोजचे आदेश मेंदूतळींच्या एका केंद्राकडून निघतात. वाटेत एक जंक्शन पार करून ते किडनीवरच्या ग्रंथींपर्यंत पोहोचतात. तिथे रोज पहाटे, साखरझोपेत २० मिलिग्रॅम स्टेरॉइडचा घाणा निघतो. रक्तातली प्रथिनं त्याचं शरीरभर वाटप करतात. त्याशिवाय कुठल्याही ताणतणावाच्या परिस्थितीत स्टेरॉइडचे ताजे दीडदोनशे मिलिग्रॅमपर्यंतचे घाणे निघतात.
कधीकधी प्रतिकारशक्तीला फारच चेव येतो. मूळ लढाईच्या जागी तर घनघोर रणकंदन होतंच शिवाय लढाऊ पेशी आणि शस्त्रास्त्रं आप-पर-भाव विसरून दूरदूरच्या आप्तस्वकीयांवर चढाई करतात. ती थांबवायला अंगभूत स्टेरॉइड्स कमी पडतात. मग तसं रणकंदन हाताबाहेर जातं. ऱ्हुमॅटॉइड आथ्र्रायटिस, सिस्टेमिक लूपस, क्रोन्स डिसीझ वगैरेंसारखे चेंगट आत्मप्रतिकारक (ऑटोइम्यून) आजार होतात. तशा सर्वव्यापी युद्धाला आळा घालायला डॉक्टर बाहेरून कृत्रिम मुकादम-स्टेरॉइड्स देतात.
खेळाडूचा सांधा दुखावला तर तिथेही प्रतिकारकशक्तीची हाणामारी नुकसान वाढवते. सांध्यात स्टेरॉइडचं इंजेक्शन देऊन हाणामारी थांबवली की इजा कमी होते. मैदानात राहाता येतं.
दमा, श्वास रोधणारे इतर चेंगट आजार, जीवघेणी अॅलर्जी वगैरेंमध्ये जंतू-विषाणूंमुळे, प्रदूषणामुळे किंवा अॅलर्जीमुळे सुरू झालेलं युद्ध हाताबाहेर जातं. श्वासनलिकेत, फुप्फुसांत सूज येते. श्वसनाची वाट चिंबते. श्वासाश्वासाशी निकराची झुंज देऊन रुग्ण थकतो. तिथे मुकादम-स्टेरॉइडचा फवारा (इन्हेलर) नेमक्या जागी काम करून सूज उतरवतो, चिंबलेली वाट उघडतो.
कोविडच्या गंभीर बाधेमुळे वायुकोशांच्या अस्तराला सूज येते. कार्बन-डायॉक्साईडची, प्राणवायूची देवाणघेवाण थांबते. स्टेरॉइड्स वेळीच दिली तर सूज उतरते. जीव वाचू शकतो.
जंतू-विषाणूंची फार मोठी लागण झाली की रक्तवाहिन्यांत तुंबळ युद्ध सुरू होतं. वाहिन्या शिथिल होतात, रक्तदाब खालावतो. एकेक अवयव निकामी होत जातो. स्टेरॉइड्स निर्माण करायची शरीराची क्षमताच घटते. युद्धविराम घडवायला बाहेरून स्टेरॉईड्स द्यावी लागतात.
अवयव प्रत्यारोपणानंतर परक्या अवयवाशी झुंजायला सरसावलेल्या प्रतिकारशक्तीला मवाळ करायला मोठय़ा प्रमाणात स्टेरॉइड्स द्यावी लागतात. किंवा गंभीर आत्मप्रतिकारी आजारात सलग कित्येक महिने स्टेरॉइड्स द्यावी लागतात.
मनजीतला तर वर्षभर स्टेरॉइड्सचा मोठा डोस घ्यावा लागला. जंतूलागण, अगदी सर्दीपडसंसुद्धा होऊ नये म्हणून लग्न-मुंजी, मित्रभेटी टाळाव्या लागल्या. स्टेरॉइडमुळे सुरुवातीला मन हर्षोत्फुल्ल झालं, बकासुरी भूक लागली, वजन वाढलं. मग चेहरा गोल, लालसर झाला, पोट मोठं झालं. स्नायू खंगले, हातपायांच्या काडय़ा झाल्या. रक्तदाब आणि रक्तातली साखर वाढली. हाडं ठिसूळ झाली. जळजळ वाढली. स्टेरॉइडच्याच दीर्घकालीन परिणामामुळे मनजीत हळूहळू निराश, चिडचिडा होत गेला.
लोकांनी ‘जाडा’, ‘लठ्ठ’ म्हटलं म्हणून चिडून त्याने एक दिवस सगळी औषधं बंद केली. भूक मेली. अंग ठणकू लागलं. रक्तातलं सोडियम, साखर एकदम कमी झाली. रक्तदाब कोसळला. उभं राहिल्यावर अंधारी आली. नवी किडनी सुजली, तिचं काम थांबलं. डॉक्टरांनी पूर्वीपेक्षा मोठय़ा प्रमाणात औषधं सुरू केली. नशिबाने नवी किडनी वाचली.
दीर्घकाळ मोठय़ा प्रमाणात बाहेरून दिलेल्या स्टेरॉईडचा किडनीजवळच्या ग्रंथींच्या स्रावांवर परिणाम होतो. तीन आठवडय़ांपेक्षा अधिक काळ आयती स्टेरॉईड्स बाहेरून येत राहिली की मेंदूतलं केंद्र आळसावतं. सगळं काम बाहेरच्या स्टेरॉइडवर सोपवून ते सुट्टी घेतं. आजाराला आराम पडला म्हणून बाहेरून स्टेरॉइड घ्यायचं एकाएकी थांबवलं तर प्रतिकारशक्तीला घातलेला लगाम निघतो. ती बेफाम उधळते. आजार पूर्वीहून अधिक जोमाने बळावतो. मनजीतला भोवला तसा इतरही गोंधळ होतो. म्हणून दीर्घकाळ स्टेरॉइड्स घेतल्यावर जर ती बंद करायची असली तर त्यांचा डोस हळूहळू कमीकमी करत आणावा लागतो. तो पूर्ण बंद व्हायला महिना-दोन महिने लागू शकतात. तोपर्यंत मेंदूच्या केंद्राचा आळस गेलेला असतो.
कधीकधी जंतूलागण, रक्तस्राव वगैरे कारणांमुळे किडनीवरच्या ग्रंथी कामातून जातात. दोन्ही बडय़ा स्टेरॉइड्सचा तुटवडा होतो. रक्तातली साखर, सोडियम, रक्तदाब कोसळतात. जीव जाऊ शकतो. तेव्हा मात्र त्या दोघांचाही बाहेरून कायमचा रतीब घालावा लागतो.
गंगूमामींना संधिवातासाठी स्टेरॉइड्स चालू होती. त्या स्टेरॉइड कार्ड गळय़ातच घालत. त्याच्यात त्यांच्या आजाराची आणि औषधाची माहिती होती. त्यांना कोविड झाला तेव्हा हॉस्पिटलमध्ये त्या कार्डामुळे डॉक्टरांना ती माहिती कळली. स्टेरॉइड्स एकाएकी बंद होण्याचा अनर्थ टाळला.
स्टेरॉईड्सचे दुष्परिणाम लक्षात ठेवणं आवश्यक आहे. सगुणाबाईंना डॉक्टरांनी दम्यासाठी आठवडाभरच स्टेरॉईड्स दिली होती. त्यांनी आपल्याआपणच ती नंतरही चालूच ठेवली. प्रतिकारशक्ती क्षीण झाली. त्यांना बुरशीमुळे होणारा घातक न्यूमोनिया झाला. दुपारी उन्हात पोहून रम्याच्या चेहऱ्यावर डाग पडले. त्यांना स्टेरॉईड-क्रीमने आराम वाटला. पोहणं आणि क्रीम लावणं चालूच राहिलं. त्वचा पातळ झाली आणि चेहऱ्यावर रक्तवाहिन्यांची विद्रूप नक्षी उमटली.
स्टेरॉइड हे उपकारक भूत आहे. गोळय़ा-मलम-फवारा कुठल्याही प्रकारचं स्टेरॉइड कारणाशिवाय घेतलं तर ते मानगुटीवर बसतं, प्रतिकारशक्तीला दाबून ठेवतं. भलभलते जंतुसंसर्ग होतात. इतर दुष्परिणामही भोवतात. उगाचच त्याच्या वाटेला जाऊच नये. पण डॉक्टरांनी योग्य कारणासाठी, योग्य प्रमाणात दिलेलं स्टेरॉइड वश होतं, मित्र-भूत म्हणून काम करतं. प्रतिकारशक्तीला हवा तेवढाच लगाम घालून दुर्धर आजारांवर मात करतं. दमा-पोटदुखी-सांधेदुखीने हैराण झालेल्यांचं जगणं सुसह्य करायला, त्यांना चारचौघांसारखं जगायला मदत करतं. त्याला नाकारायचं पाप करू नये. त्याला एकाएकी दूर सारायचं महत्पाप तर मुळीच करू नये.
लेखिका वैद्यकीय व्यवसायातून निवृत्त आहेत.
ujjwalahd9@gmail.com