सन १९२० चा काळ… न्यूयॉर्क वाचनालयाच्या बाहेर मेघांनी भरून गेलेल्या आभाळाकडे पाहत एक तरुण कार्ल मार्क्स आणि जॉन ड्यूई यांचे तत्त्वज्ञान अभ्यासत होता. त्याला वाटले हा सभोवताल काय आणि इतिहास काय… सर्वत्रच निराशेचे सावट दाटले आहे. आसपास निरखून पाहिल्यावर त्याला जाणवले की भोवतालच्या गगनचुंबी इमारती, धडधडत जाणाऱ्या रेल्वेगाड्या आणि अव्याहतपणे भोंगा वाजवणारे कारखाने हे उद्याच्या जगाचा, समतेचा, प्रगतीच्या आशेचा किरणही असू शकतील!

हा तरुण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. ते जरी कायदा आणि अर्थशास्त्राचे तज्ज्ञ असले तरी त्यांनी ओळखले होते की विज्ञान हे केवळ वाफेच्या, विजेच्या शक्तीपुरते नसून शतकांच्या शोषणापासून मुक्तीचा राजमार्ग आहे. तरुण आंबेडकर विद्यार्थीदशेत विशेषत: युरोपमधील कैक वर्षांची सामंतवादी सामाजिक उतरंड तांत्रिक प्रगतीमुळे कशी कोलमडू लागली, याचे प्रत्यक्ष साक्षीदार होते. वैज्ञानिक तर्कशक्ती केवळ प्रयोगशाळेपुरती मर्यादित न ठेवता औद्याोगिकीकरण, गुणवत्ताधारित शिक्षण आणि संवैधानिक हमीद्वारे जातिव्यवस्थेच्या निर्मूलनाची मागणी करण्यापर्यंत डॉ. आंबेडकरांनी आपल्या वैज्ञानिक दृष्टीचा पाया विस्तारला. त्यांचा दृष्टिकोन नैसर्गिक विज्ञानाच्या पद्धतशीर चौकटीला सामाजिक शास्त्राच्या नैतिक बाजूशी जोडतो. या दोन विज्ञानांचा समन्वय साधत, आंबेडकरांनी ‘प्रगती’ची पुनर्व्याख्या केली : अशा एका समाजाची निर्मिती जिथे केवळ उद्देशविहीन यांत्रिक धडधड प्रगतीची दिशा ठरवणार नाही तर तंत्रज्ञान, भौतिक आणि नैतिक विकासाद्वारे तर्काधिष्ठित सामाजिक न्यायाची स्थापना करेल.

गांधी विरुद्ध आंबेडकर

गांधी आणि नेहरू हे विज्ञान-तंत्रज्ञानाचे दोन प्रवाह होते. गांधीजींच्या मतानुसार यंत्रे ही आत्मा नसलेली साधने आहेत ज्याच्यामुळे भावनारहित, मुर्दाड समाजाची पायाभरणी होईल. ग्रामोद्याोग आणि कुटिरोद्याोग यांच्या विकासातून मानवी श्रमावर आधारित व्यवस्थेवर त्यांचा विश्वास होता. तर नेहरूंचा मार्ग आधुनिकीकरणाकडे जाणारा, यांत्रिकीकरणाच्या ताकदीवर भरवसा ठेवणारा होता. गुलामीने पिचलेल्या भारताला दारिद्र्याच्या शापातून मुक्त करण्याची ताकद औद्याोगिकीकरण आणि यांत्रिकीकरण यांच्यात आहे, असा विश्वास नेहरूंना होता. आंबेडकरांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा बारकाईने विचार करून नेहरूंच्या उदारमतवादी धोरणावर विश्वास ठेवला. मात्र त्यांच्यासाठी ही वैज्ञानिक प्रगती भारतातील मागासलेल्या लोकांच्या हालअपेष्टा दूर करण्यासाठी हातभार लावणारी होती. कारण व्यवसायाच्या विभागणीतून निर्माण झालेली वर्णव्यवस्था, त्यातून आलेली जातिव्यवस्था यांमुळेच बहुजनांच्या भौतिक प्रगतीचा मार्ग कायमस्वरूपी खुंटला होता. या दास्याच्या शृंखला तोडण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान व्यवसायाधारित जात व्यवस्था मोडून काढण्यात मोलाची भूमिका बजावेल, अशी आंबेडकरांना आशा होती.

जरी गांधींचा यांत्रिकीकरणाला विरोध हा कामगारांच्या पिळवणुकीचे विदारक चित्र लक्षात घेऊन समर्थनीय असला तरी आंबेडकरांच्या मते, गांधींनी यांत्रिकीकरण हा मुख्य मुद्दा असे समजण्यात चूक केली आहे. त्यांच्या मते वर्गव्यवस्था ही यांत्रिकीकरणाच्या आधीपासून आहे ती बहुजनांचे रक्त शोषित आहे. यंत्र नव्हे तर चुकीची सामाजिक व्यवस्था या दुर्दशेस कारणीभूत आहे. त्यांनी स्पष्ट केले की माणसाला कष्टापासून मुक्त करण्यासाठी आणि विकासासाठी वेळ मिळवून देण्यासाठी यंत्रे आवश्यक आहेत. ‘पशू आणि माणसामध्ये फरक करणारी गोष्ट म्हणजे संस्कृती. पशूंसाठी संस्कृती शक्य नाही, परंतु प्रत्येक व्यक्तीसाठी संस्कृतीपूर्ण जीवन जगणे आवश्यक आहे. केवळ शारीरिक गरजा पूर्ण करण्यापेक्षा अर्थपूर्ण असे मनाचे संवर्धन करणे हे संस्कृतीचे मूलतत्त्व आहे.’ गांधींचा ‘निसर्गाकडे चला’ हा नारा म्हणजे नग्नता, दारिद्र्य, आणि बहुसंख्यांच्या अज्ञानाकडे परत जाण्याचा संदेश आहे.

आजही हाताने मैला साफ करणाऱ्यांमध्ये ६७ टक्के कामगार अनुसूचित जातीचे असून गेल्या २० वर्षांत या किळसवाण्या कामामध्ये १०६४ कामगारांचा अधिकृतरीत्या जीव गेला. शासनाचा मैलासफाईसाठी ‘रोबो’ पुरविण्याचा निर्णय आंबेडकरांच्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीची साक्ष आहे. समाजाच्या व्यापक विकासासाठी सकारात्मक विवाद होणे गरजेचे होते. त्यामुळे एक योग्य तर दुसरा निरुपयोगी हा युक्तिवाद व्यर्थ आहे.

तंत्रज्ञानाची नैतिकता

तंत्रज्ञान आणि हिंसा यांचे विश्लेषण करताना आंबेडकरांनी १९१८ मध्ये पहिल्या महायुद्धाच्या शेवटी बर्ट्रांड रसेल यांच्या ‘प्रिन्सिपल्स ऑफ सोशल रीकन्स्ट्रक्शन’ या युद्धविरोधी पुस्तकाचे विश्लेषण करताना तंत्रज्ञानातून निर्माण होणाऱ्या बळाला सकारात्मकपणे वापरण्याची गरज व्यक्त केली. १९४३ मध्ये महायुद्धादरम्यान रेडिओवर केलेल्या भाषणात, ‘दुसरे महायुद्ध हे स्वातंत्र्य, समता व बंधुता यांवर आधारित नवीन जागतिक व्यवस्था निर्माण करण्याचा संघर्ष आहे’ असे प्रतिपादन केले. गांधीवादी किंवा समाजवादी विचारसरणीच्या विपरीत, डॉ. आंबेडकर हे शहरीकरण /औद्याोगिकीकरणाचे समर्थक होते. त्यांच्या मते, कमी उत्पादकता आणि अतिरिक्त कामगार यांमुळे निर्माण झालेल्या कृषी समस्येचे दीर्घकालीन उत्तर म्हणजे औद्याोगिकीकरण होय. तसेच, आधुनिक उद्याोगधंदे व्यावसायिक गतिशीलता आणि आर्थिक स्वातंत्र्यास वाव देऊन जातव्यवस्था मोडून काढतात. त्यांच्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान ही केवळ तटस्थ साधने नसून जातीवाद आणि फॅसिझम उद्ध्वस्त करणारी आणि तर्क व न्यायाच्या तत्त्वांवर समाजाची पुनर्रचना करण्याची राजकीय साधने आहेत. त्यांच्या दृष्टीने, कारखाने आणि राज्यघटना हे दोन्ही तितकेच महत्त्वाचे होते- एक वस्तूंची निर्मिती करून भौतिक गरजा भागवितात, तर दुसरी नागरिक घडवत असते.

आंबेडकरांचे योगदान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४२-४६ दरम्यान व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडळात श्रममंत्री म्हणून औद्याोगिकीकरण आणि तांत्रिक शिक्षणावर भर दिला. १९४४ मध्ये तांत्रिक प्रशिक्षण सल्लागार समितीसमोर त्यांनी सांगितले की, ‘तांत्रिक शिक्षणाशिवाय भविष्यातील विकास योजना अपूर्ण आहे… केवळ विज्ञानात प्रावीण्य मिळवलेले राष्ट्रच उच्च जीवनस्तर टिकवू शकते.’ आंबेडकरांनी कृषी संकटावर मात करण्यासाठी औद्याोगिकीकरणाचे समर्थन केले. त्यांच्या मते, यामुळे कामगारांना अतिरिक्त रोजगार मिळेल, भांडवली वस्तूंचे उत्पादन वाढेल आणि उत्पादकता सुधारेल. त्यांनी दामोदर, भाक्रा-नांगल, हिराकुड, शोन यांसारखे बहुउद्देशीय नदीप्रकल्प विकसित करण्याचे सुचवले, ज्यात सिंचन, पूरनियंत्रण आणि जलविद्याुत निर्मितीचा समावेश होता. यासाठी त्यांनी केंद्रीय जलमार्ग, सिंचन आणि नौकानयन आयोग तसेच केंद्रीय तांत्रिक विद्याुत मंडळाची स्थापना केली. विजेच्या वितरणासाठी केंद्रीकृत पॉवर ग्रिडची कल्पना मांडून १९४८ मध्ये विद्याुत पुरवठा कायदा मंजूर करण्यात आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. तांत्रिक शिक्षणाच्या प्रसारासाठी आंबेडकरांनी १९४२ मध्ये ‘अनुसूचित जातींच्या तक्रारींवरील निवेदन’ व्हाइसरॉयला सादर केले. यात त्यांनी स्पष्ट केले की विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे महागडे अभ्यासक्रम मागास वर्गाला वंचित ठेवतात. त्यांनी शासनाने शिष्यवृत्ती आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत अशी मागणी केली. १९५२ च्या निवडणूक जाहीरनाम्यात त्यांच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्षाने औद्याोगिक विस्ताराला अग्रक्रम दिला.

वैज्ञानिक कारणमीमांसेचे तंत्र

या भौतिक योगदानापलीकडे बाबासाहेबांचे योगदान होते ते भारतामध्ये वैज्ञानिक पद्धतीने कारणीमीमांसा विकसित करण्याचे! देवभोळ्या समाजात जातिव्यवस्था ही ईश्वरनिर्मित गोष्ट आहे हा समज हजारो वर्षे रुजला होता; त्याची चिरफाड करण्याचे काम त्यांनी ‘अॅनिहिलेशन ऑफ कास्ट’ या ग्रंथात केले. काहीतरी भव्यदिव्य निर्मिती झाली की त्याचा संबंध देव आणि दैवाशी जोडून चिकित्सक दृष्टिकोन गुंडाळून ठेवायचा किंवा रूढ व्यवस्थेकडून तो ठेवायला लावायचा हा भारतीय व्यवस्थेचा आवडता खेळ! त्यातूनच ईश्वरी राजवट, राजा हा ईश्वरी अंश, अजीवशास्त्रीय जन्म वगैरे मिथके नागरीकरणाच्या सुरुवातीपासून प्रसवली जातात. याउलट डॉ. आंबेडकरांनी विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून माणसाला माणूस म्हणून आणि जातिव्यवस्था हा वर्चस्वाचा संघर्ष म्हणून पाहायला शिकविले. डॉ. आंबेडकर हा सूर्य होता प्रज्ञेचा, ज्ञानाचा, चिकित्सेचा, अस्मितेचा आणि संघर्षाचा… आपण प्रयत्न करू त्यापासून प्रेरणा घेऊन किमान काजवा बनण्याचा… अन्यथा मिथकांच्या आणि अंधभक्तीच्या या मयसभेत सूर्य म्हणून ऊर बडविणाऱ्या कंदिलाखाली चिलट होऊन भस्म होणे अटळ आहे.

पंकज फणसे

तंत्रज्ञान आणि राजकारण यांच्या अंत:संबंधाचे विद्यापीठीय संशोधक

phanasepankaj@gmail.com