महाराष्ट्रातील सदाचारी समाजसुधारकांनी वंचितांसाठी शिक्षण संस्था, वसतिगृहे, अनाथाश्रम, रुग्णालये उभारली, ती आज स्थापनेची शतकोत्तर वाटचाल करत आहेत. अशांपैकी डॉ. ग. श्री. खैर एक होत. ते अनाथ विद्यार्थिगृहात शिकले. त्या वसतिगृहास त्यांनी आपले जीवन समर्पित केले नि आपले नि संस्थेचे ‘अनाथत्व’ संपुष्टात आणले. डॉ. ग. श्री. खैर यांनी ‘सदाचार चिंतनी’ (भाग- १ ते ५)ची रचना केली. पहिल्या भागाच्या सलग तीन आवृत्ती प्रकाशित कराव्या लागल्या. हे यश पाहून त्यांनी १९६८ मध्ये ‘सदाचार चिंतनी’ (भाग- २)ची रचना केली. तेव्हा त्याचे उत्स्फूर्त स्वागत करत तर्कतीर्थांनी ‘नवभारत’ मासिकाच्या ऑक्टोबर, १९६८ च्या अंकात या ग्रंथाची प्रशंसा केली.

‘सदाचार चिंतनी’चे लेखन डॉ. ग. श्री. खैर यांचे अनुभवसंचित होय. संस्कार देण्याचा, रुजविण्याचा हेतू या लेखनामागे होता ते त्यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले आहे. हे लेखन पाश्चात्त्य देश पाहिल्यानंतर केलेले असल्याने देश नि मनुष्यबळ विकासाची तळमळ त्यामागे आहे. या ग्रंथात त्यांनी जीवनाची तीन व्रते व श्रद्धा वर्णिल्या आहेत. पैकी तीन व्रते, पुढील होत – (१) दुसरा माणूस माझ्याशी बरे-वाईट कसेही वागो, माझा धर्म चांगले वागण्याचा आहे. (२) आपले विचार प्रगतिशील, गतिमान राहिले पाहिजेत. बुद्धी व विचार गंजू द्यायचे नाहीत. (३) सर्वांच्या विचाराने काम करणे. तीन श्रद्धा अशा होत्या – (१) स्थितप्रज्ञता, (२) चांगुलपणा, (३) विधायक कार्य. तर्कतीर्थांनी आपल्या या ग्रंथ परीक्षणात या व्रत आणि श्रद्धांचे वर्णन ‘असिधाराव्रत’ असे केले आहे. डॉ. खैर यांनी आपल्या ग्रंथांमध्ये या व्रत श्रद्धांचे विवरण विविध दृष्टांतांद्वारे केले आहे.

तर्कतीर्थांनी या पुस्तक परिचयात लिहिले की, ‘सदाचार-चिंतनी’त विवेकपूर्ण सामाजिक जीवन जगण्याकरिता आवश्यक असलेल्या सिद्धांताची चर्चा केली आहे. माणसाने स्वत:स जन्मभर विद्यार्थी समजून आत्मपरीक्षण करून व्यक्तिमत्त्वाचा विकास करीत कसे राहावे याबद्दलचे विचार यात माडंले आहेत. माणसाने समाजसुधारणेच्या कार्याचा प्रारंभ स्वत:च्या सुधारणेपासून करावा, अशा व्यक्तिप्रधान दृष्टिकोनातून बरेचसे विवेचन केले आहे. भारतीयांच्या राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, औद्योगिक, प्रापंचिक वा वैयक्तिक जीवनावर अनेक स्फुट विचार यात सांगितले आहेत.

लेखक बुद्धिवादी असूनही ‘भवद्गीता’ व ‘गणेशगीता’ यांवर श्रद्धा आहे हे (९२) ‘गीतेने बनविलेला माझा मन:पिंड’ (९३) ‘गणेश, उपासना आणि बुद्धिविकास’ या चिंतनी वाचल्यावरून ध्यानात येईल. गीतेतील अवतारवाद, पुनर्जन्मवाद हे बुद्धिवादाच्या कक्षेत कसे येतात? बुद्धिवादी श्रद्धेशी ‘गणेशगीता’ व ‘भगवद्गीता’ विसंगत ठरते. ही संक्रमणकालातील मनाची घडण आहे, असे यावरून म्हणता येईल. सुबोध भाषाशैली, विवेकयुक्त विवेचन, सदाचारविषयक सुश्लिष्ट विवरण हे या चिंतनीचे गुण प्रशंसास्पद होत, यात शंका नाही.

वरील तर्कतीर्थकृत परीक्षण वाचत असताना माझ्या लक्षात येते की, ‘साधना साप्ताहिक’ला दिलेल्या एका मुलाखतीत संत तुलसीदासांचा दोहा देऊन समजावले होतं की, ‘‘गरिबाचे कण्हणेदेखील वाया जात नाही. ज्या लोखंडाने बैलाची मान कापली जाते, त्या मेलेल्या बैलाच्या कातडीपासून जो घिसाड्याचा भाता तयार होतो, त्या भात्यात लोखंड वितळण्याची नाही तर त्याचे भस्म करण्याची ताकद असते. मला याउलट विधायक दृष्टांत आठवतो, तो असा की, साने गुरुजींचा ‘पत्री’ काव्यसंग्रह अनाथ विद्यार्थिगृह प्रकाशनने १९३५ ला प्रकाशित केला. त्यातील देशभक्तीपर रचना लक्षात घेऊन ब्रिटिशांनी बंदी घातली. अनाथ विद्यार्थिगृह प्रकाशनास मोठा तोटा सहन करावा लागला. प्रायश्चित्त म्हणून या संस्थेस साने गुरुजींनी अल्प मानधनावर ‘श्यामची आई’चे अधिकार बहाल केले, तेव्हापासून आजचे पुणे विद्यार्थिगृह ‘श्यामची आई’ अव्याहत छापते आहे. साने गुरुजी स्मृती संग्रहालय उभारत असताना ‘श्यामची आई’ची भाषांतरे शोधत पुणे विद्यार्थिगृह प्रकाशनाच्या मुद्रणालयात पोहोचलो होतो. तत्कालीन व्यवस्थापक शेटे सांगत होते की, मुद्रणालयाच्या यंत्रांवर त्या वेळी चढविलेला फार्मा आम्ही अजून उतरविलेला नाही. पुणे विद्यार्थिगृह चालविण्यात ‘श्यामची आई’चा सिंहाचा वाटा आहे. ज्या दिवशी साने गुरुजींनी हे पुस्तक या संस्थेस कायमचे दिले, त्या दिवशी ते प्रचंड अस्वस्थ होते. मित्रास करुण स्वरात म्हणाले की, ‘‘आज मी आई विकून आलो.’’ पुढे ते नि:शब्द होते.

drsklawate@gmail.com