कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर राहून कचऱ्यातील मांसाचे अवशेष खाऊन भूक भागवणारा पक्षी म्हणजे करकोचा. त्याला इंग्रजीत ‘ग्रेटर अॅडज्युटंट’ असेही म्हटले जाते. खऱ्या अर्थाने तो पर्यावरणाचा रक्षक, पण उपासमारीमुळे हाच पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. प्रामुख्याने आसाममध्ये आढळणारी ही प्रजाती. तेथील स्थानिक भाषेत त्याला ‘हरगिला’ असेही म्हणतात. याच ‘हरगिला’ पक्ष्याच्या संवर्धनाची चळवळ राबवून त्याविषयी जनमानसात जागरूकता निर्माण करणाऱ्या डॉ. पूर्णिमादेवी बर्मन यांना ‘टाइम’ मासिकाने ‘वुमन ऑफ द इअर’ म्हणून गौरवान्वित केले आहे.

आसाममधील डॉ. पूर्णिमादेवी बर्मन या मूळच्या प्राणिशास्त्राच्या अभ्यासक. पदव्युत्तर शिक्षण घेताना त्यांनी ‘आरण्यक’ या स्वयंसेवी संस्थेत काम केले. कामरूप जिल्ह्यात हरगिलाचा अभ्यास करून त्यांनी पीएच.डी. मिळवली. २००७ साली हरगिलांचा अधिवास असलेले एक मोठे झाड तोडले गेले. त्यावेळी पूर्णिमादेवी धावत गेल्या आणि झाड तोडणाऱ्यांना त्यांनी रोखले. त्यावर झाडे तोडणाऱ्यांनी त्यांना दिलेले स्पष्टीकरण अजब आणि संतापजनक होते. हरगिला पक्षी अपशकुनी आहे. तो आजार पसरवतो, अशी सबब देण्यात आली. त्याच वेळी त्यांनी या पक्ष्याच्या बचावासाठी ‘हरगिला आर्मी’ ही महिलांची फौज उभी केली. या आर्मीतील महिलांची संख्या २० हजारांच्या घरात आहे. या आर्मीचे काम सुरू झाले त्यावेळी आसाममध्ये या पक्ष्याची संख्या अवघी ४५० इतकीच होती. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या यादीत लुप्तप्राय पक्ष्यांच्या यादीत तो होता. हरगिला आर्मीच्या प्रयत्नांमुळे दीड दशकातच ही संख्या १८००च्या पुढे गेली. या आर्मीच्या महिला हरगिलाची घरटी शोधतात. सुगरणी ज्याप्रमाणे खोपा सांभाळतात, तशीच त्या जपतात. पिल्लांची काळजी घेतात. ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील गुवाहाटी, मोरिगाव, नगाव जिल्ह्यांतील यशानंतर आर्मीने बिहारमधील भागलपूर जिल्ह्याकडे लक्ष वळवले. भारतात या दोनच टापूत हरगिलांचे प्रजनन होते. कंबोडिया हा जगात केवळ तिसरा टापू आहे आणि तिथेही ही आर्मी पोहोचली.

ग्रीन ऑस्कर म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध ‘व्हिटले पुरस्कार’ ब्रिटनची राजकुमारी अॅन हिच्या हस्ते पूर्णिमादेवींना प्रदान करण्यात आला. भारतात राष्ट्रपतींकडून नारीशक्ती पुरस्कार देण्यात आला. पुढे या पक्ष्यांचे संवर्धन लोकसंस्कृतीत पाझरले. पॅशनला फॅशनची जोड मिळाली. आसामी महिलांचे पारंपरिक विणकाम कौशल्य मदतीस आले. कुरूप व बेढब म्हणून हिणवल्या गेलेल्या हरगिलाचे सौंदर्य आता लोकांना जाणवू लागले. टी शर्ट, साड्या, शाली, दुपट्टे व बेडशिटवर तो विणला गेला. आता हरगिला ब्रँडचे स्टॉर्क टी शर्ट, स्टॉर्क स्टोल, साड्या तसेच न्हिनो स्टोलदेखील ऑनलाइन मिळतात. लोकगीतांमध्ये मोरासारखाच हरगिला उमटला. पिल्लांच्या बारश्याचे सोहोळे साजरे होऊ लागले. घरट्यांवर आनंदाची तोरणे सजली. कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर राहून, मृत जनावरांच्या पोटातील घटक, कचऱ्यातील मांसाचे अवशेष खाऊन भूक भागवणारा हरगिला हा खरेतर स्वच्छतादूत. ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांच्या गणवेशावर तो शोभून दिसत होता. कोलकाता महापालिकेच्या बोधचिन्हावरही तो होता. मात्र, नंतर या पक्ष्याची उपासमार सुरू झाली आणि त्याला अपशकुनी मानण्यापर्यंत लोकांची मजल गेली. मात्र, डॉ. पूर्णिमादेवी बर्मन यांनी त्याची ही ओळख पालटली आणि या करकोच्यानेच डॉ. पूर्णिमादेवी यांना मानाचे स्थान मिळवून दिले.

Story img Loader