डॉ. उज्ज्वला दळवी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

औषधं महाग का असतात, याचं उत्तर बऱ्याच अंशी ती बाजारात येण्यापूर्वीच्या चाचण्यांत दडलेलं असतं. एक औषध किती कसोटय़ांवर तपासलं जातं याविषयी..

अलीकडची इंग्रजी औषधं फार महाग असतात. सर्वसामान्यांना परवडत नाहीत. का इतकी महाग असतात ती औषधं? ती औषधं, आधुनिक वैद्यकशास्त्रातले इतर उपाय, मानसोपचार किंवा शस्त्रक्रियासुद्धा वैद्यकीय चाचण्यांच्या कठोर कसोटय़ांतून तावून सुलाखून पार पडलेल्या असतात. त्यांचे दोष त्यांच्या गुणांच्या तुलनेत फार कमी असतात हे संख्याशास्त्राच्या निकषांनी सिद्ध झालेलं असतं.

गेल्या तीन शतकांत त्या कसोटय़ा अधिकाधिक कठोर झाल्या आहेत. स्कव्र्ही हा रोग अलीकडे दिसतही नाही. पण कोलंबसाच्या जहाजावर आणि अमेरिकेतल्या वसाहतीत त्याने धुमाकूळ घातला होता. अठराव्या शतकातल्या लांब पल्ल्याच्या सागरसफरींत सुमारे ८० टक्के खलाशी स्कव्र्हीने मरणोन्मुख होत. १७४७ साली स्कॉटिश बोटीवरच्या लिंड नावाच्या डॉक्टरने बारा स्कव्र्हीग्रस्त खलाशांचे दोन- दोनचे सहा गट केले. नेहमीच्या आहाराशिवाय एका गटाला सौम्य सल्फ्युरिक आम्लाचं पाणी, दुसऱ्याला सफरचंदाची दारू, तिसऱ्याला व्हिनेगर, चौथ्याला समुद्राचं पाणी, पाचव्याला रेचक काढा आणि सहाव्याला संत्री, लिंबं असं त्याने औषध म्हणून सहा दिवस दिलं. सहाव्या दिवशी बाकीचे गट आजारीच होते, पण संत्री-लिंबंवाला गट बरा होऊन कामाला लागला होता. उपचारांच्या तुलनात्मक अभ्यासाची सुरुवात झाली, ती अशी.

एडवर्ड जेनर नावाच्या ब्रिटिश डॉक्टरचे मानवजातीवर उदंड उपकार आहेत. त्याने देवीची लस शोधून काढली. ‘गवळणींच्या हातांना गायीच्या आचळावरच्या फोडांची लस लागून फोड आले की देवी येत नाहीत,’ या निरीक्षणाची शहानिशा करायला त्याने गवळणीच्या फोडांतली लस माळय़ाच्या मुलाला टोचली. त्याआधी एका ब्रिटिश शेतकऱ्याने आपल्या समस्त कुटुंबाला तशीच गायदेवीची लस टोचली होती. पण जेनरने १७९६ मध्ये शास्त्रशुद्ध प्रयोग केला. माळय़ाच्या मुलाला गाईच्या देवीचे फोड येऊन गेल्यावर काही दिवसांनी त्याने त्याला मानवी देवीच्या फोडांतली घातक लस टोचली. मुलाला देवी आल्या नाहीत. जेनरने तोच प्रयोग एकूण २३ माणसांवर केला. त्यांच्यात त्याचा तान्हा मुलगाही होता. त्या तेवीसकशी खटाटोपाची ब्रिटिश सरकारने दखल घेतली. लशीला राजमान्यता मिळाली. निरीक्षण, त्याचा प्रयोग, प्रयोगाच्या यशाला अवघड आव्हान आणि त्याच्यावर मात अशा कसोटीमालिकेचा नवा पायंडा जेनरने पाडला.

त्यानंतर नव्या लशी आल्या. त्यांचा फायदा समाजातल्या सर्व स्तरांना सारखाच झाला. पण मग जीवनसत्त्वांच्या गोळीचा परिणाम बघायला प्रयोग झाले. सुखवस्तू लोकांचा रोजचा आहार चौरस, सकस होता. त्यात सगळी जीवनसत्त्वं होतीच. त्यांना वेगळय़ा गोळीची गरजच नव्हती. त्यांना त्या गोळीचा फायदा झाला नाही. नंतर रोज फक्त मीठ-भाकरी खाणाऱ्या गरिबांवर तोच प्रयोग केला. त्यांना फारच फायदा झाला. नव्या उपचारांचे प्रयोग करताना हे ध्यानात ठेवायला हवं. प्रयोग करून घ्यायला स्वेच्छेने पुढे सरसावणारे, प्रयोगेच्छुक लोक समाजाच्या सर्व स्तरांतून, वेगवेगळय़ा पोटविभागांतून यायला हवेत. त्यांची सरसकट निवड व्हायला हवी.

काही लोकांना, ‘मी नवं औषध घेतलं’ या भावनेचाच फायदा होतो. कधीकधी संशोधकाच्या मनाने आधीपासूनच एखाद्या औषधाला झुकतं माप दिलेलं असतं. त्या मनोभूमिकांचा प्रयोगावर परिणाम होतो. चुकीचे निष्कर्ष निघतात. म्हणून प्रयोगेच्छुकांचे दोन गट करतात. त्या दोन्ही गटांत सगळे स्तर-वय-विभाग समसमान प्रमाणात असतात. एका गटाला नवं औषध आणि दुसऱ्याला जुनं औषध किंवा औषध नसलेली बिनकामाची गोळी (निरौषधी) देतात. कुठल्या गटाला काय मिळालं ते औषध घेणाऱ्यांना माहीत नसतं (आंधळा प्रयोग-ब्लाइंड ट्रायल).

अलीकडे प्रयोगाची आखणी करणारे लोक संशोधकांहून वेगळे असतात. कुठलं औषध कुणाला दिलं हे ते संशोधकांनाही कळू देत नाहीत. (दुहेरी आंधळा प्रयोग-डबल ब्लाइंड ट्रायल). तसे सगळे निकष फक्त औषधांनाच लागू नसतात. श्रवणयंत्रासारखा उपचार, रक्तदाब यंत्रासारखं आयुध किंवा कोविडच्या आरटीपीसीआरसारखं नवं चाचणी तंत्र, अभिनव शस्त्रक्रिया अशा सगळय़ांना तशी कठोर निकषांची आंधळी कोशिंबीर खेळावी लागते. नव्या शल्यक्रियांच्या चाचण्यांत दुहेरी गुप्तता पाळण्यासाठी फक्त चामडीपुरतीच कापाकापी, शिवाशिवी करून चक्क लुटुपुटुची शस्त्रक्रियाही करतात!
१९२० साली सर रॉबर्ट फिशर यांनी कुठल्याही नव्या प्रयोगासाठी तशा पद्धतशीर आखणीची शिस्त घालून दिली. १९४७ मध्ये तशा शिस्तीत क्षयाच्या औषधाची, स्ट्रेप्टोमायसिनची कठोर चाचणी पार पडली. तेव्हापासून अनेक देशांच्या औषध नियंत्रक विभागांनी ती शिस्त सक्तीची केली.

अलीकडे नवी औषधं प्रयोगशाळेत, संगणकाच्या मदतीने शोधली, बनवली जातात. तेही काम सोपं नसतं. मूळ आजारात निर्माण होणाऱ्या रासायनिक त्रुटी किंवा कोविडसारख्या विषाणूची रासायनिक रचना समजून घेऊन त्या रासायनिक समस्येवर नेमका इलाज करणारं नवं रसायन, नवा रेणू हुडकून काढावा लागतो. प्रयोगशाळेत प्राण्यांच्या आणि माणसांच्याही पेशींचे पुंज जोपासलेले असतात. त्यांच्यावर आणि मग उंदीर, सशांसारख्या प्राण्यांवर सुरुवातीचे प्रयोग होतात. निवडलेल्या रसायनांमधली कित्येक त्या प्रयोगांमध्येच हरतात. तिथे सारं क्षेमकुशल झालं तरच माणसांवरच्या चाचण्या सुरू होतात.

अशी सगळी उस्तवार करून जी निरीक्षणं नोंदली जातात त्यांना संख्याशास्त्राला सामोरं जावं लागतं. ‘नवा उपचार केला नसता तरी बरं वाटलं असतं का? तशी शक्यता किती मोठी होती?’ अशा अनेक प्रश्नांची चाळणी लावली जाते. ‘नव्या उपचारांमुळेच बरं वाटलं’ हे वादातीत सिद्ध व्हावं लागतं. हा सगळा खटाटोप प्रत्येक नव्या उपचारासाठी तीनदा करतात.

नवा उपचार घातक नाही ना? हे पहिल्या फेरीत, ३०-४० लोकांवरच्या प्रयोगांतून ठरतं. त्या फेरीचे प्रयोग कसलाही आजार नसलेल्या, धडधाकट प्रयोगेच्छुकांवर करतात.

दुसऱ्या फेरीत ३००-४०० रुग्णांवर प्रयोग करतात. एका गटावर जुने प्रस्थापित उपचार करतात. दुसऱ्या गटाला नवे उपचार मिळतात. त्यांच्या तुलनेवरून नव्या उपचारांनी खरोखरच अधिक गुण येतो की नाही ते ठरतं.

तिसरी फेरी महत्त्वाची. हजार-दोन हजार लोकांवर केलेल्या प्रयोगांवरून औषधाचा आखूडदोषी, बहुगुणीपणा पक्का ठरतो. नवी उपचार पद्धती बाजारात यायला लायक आहे की नाही, ते शिक्कामोर्तब त्या फेरीच्या निकालावर अवलंबून असतं. मोठय़ा प्रमाणात उपचार देणं कंपनीला परवडणार आहे की नाही तेही समजतं.

कधीकधी तर एकाच महत्त्वाच्या उपचार पद्धतीसाठी तशाच खटाटोपाच्या तीन फेऱ्या तीन-चार वेगवेगळय़ा मातब्बर विद्यापीठांत सुरू असतात. एका ठिकाणी जे अनुमान आलं तेच सगळय़ा ठिकाणी येणं आवश्यक असतं. तसं झालं तरच त्या उपचारांना मान्यता मिळते. या सगळय़ा प्रक्रियेत त्या उपचाराचे बारीकसारीक, अगदी क्वचित होणारेसुद्धा जे जे दुष्परिणाम दिसतात ते ते सगळे जाहीरपणे, त्या उपचारांबरोबरच्या माहितीत आवर्जून सांगितले जातात. काही वेळा एकाच उपचाराच्या चाचण्या जगातल्या अनेक देशांत संगनमताने चालतात. त्या सगळय़ांतून, लाखो लोकांवरच्या प्रयोगांतून मिळालेली माहिती एकत्रित करून संख्याशास्त्राचे तज्ज्ञ तिचं महाविश्लेषण करतात.

तशा कठोर शास्त्रपरीक्षेत शेकडो औषधं बाद होतात. साधारण १० हजारांपैकी एखाद-दुसरं औषध प्रयोगशाळेपासून बाजारापर्यंतचा प्रवास यशस्वीपणे करू शकतं. पण त्या बाद झालेल्या औषधांवरही भरपूर खर्च झालेला असतो. त्यामुळे बाजारात पोहोचणाऱ्या औषधाची किंमत वाढत जाते. भारतात त्या सगळय़ा प्रक्रियेवर दिल्लीच्या औषध-नियंत्रक विभागाची आणि त्याच्या प्रादेशिक प्रतिनिधींची बारीक नजर असते.

इतकं झाल्यावर तो औषधोपचार किंवा चाचणी तंत्र बाजारात येतं. त्यानंतरही औषध-नियंत्रक विभागाचे प्रतिनिधी त्याच्यावर नजर ठेवून असतात. कुठे त्याचे नवे दुष्परिणाम दिसून आले तर तेसुद्धा जाहीर तर केले जातातच, पण ते गंभीर असले तर औषध बाजारातून मागे घेतलं जातं. गेल्या दशकात ई-मर्क आणि फायझर कंपन्यांनी सेलेकॉक्सिब नावाचं औषध दुष्परिणामांमुळे मागे घेतलं. गेल्या तीस वर्षांत सुमारे ५०० औषधांनी बाजारातून माघार घेतली आहे.

सगळे आधुनिक उपचार तशा कसोटय़ांच्या दिव्यातून जातात. हल्लीच समजून-शिकून केलेल्या ध्यानालासुद्धा शास्त्रज्ञांनी ते निकष लावले. ध्यानाचे गुण नव्या प्रतिमातंत्रातून सिद्ध झाले. आपल्या आयुर्वेदात, युनानी, चिनी शास्त्रांत औषधांचा खजिना आहे. त्यांच्यातली रत्नं या वैज्ञानिक कसोटय़ांतून पार पडली तर नव्या झळाळीने जगासमोर येतील. सगळय़ा मानवजातीचं भलं होईल.