‘गरिबांचा डॉक्टर’ ही उपाधी मिळवण्याचा आणि टिकविण्याचा काळ आता सरला आहे. कमालीच्या व्यावसायिक बनलेल्या आरोग्य क्षेत्रात सेवाभावी वृत्ती जपणारे मोजकेच त्यास अपवाद. त्यापैकी एक म्हणजे डॉ. जफरुल्ला चौधरी. त्यांचे नुकतेच निधन झाले. स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबात २७ डिसेंबर १९४१ रोजी जन्मलेल्या जफरुल्ला यांचे बालपण कोलकात्यात गेले. तिथेच त्यांचे प्राथमिक शिक्षणही झाले. पण, वैद्यकीय पदवी त्यांनी १९६४ मध्ये ढाका वैद्यकीय महाविद्यालयातून घेतली. महाविद्यालयीन जीवनात त्यांच्यावर डाव्या राजकीय विचारसरणीचा प्रभाव होता. पण, वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी इंग्लंड गाठले. १९६५ ते १९७१ पर्यंत त्यांनी लंडनमध्ये व्हॅस्कुलर सर्जन म्हणून प्रशिक्षण घेतले. मात्र, अंतिम परीक्षा न देताच बांगलादेश मुक्ती संग्रामात सहभागासाठी ते मायदेशी परतले. मुक्तिलढय़ातील जखमी, निर्वासितांवर उपचारासाठी त्यांनी पाच डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी आणि काही महिला स्वयंसेवकांच्या मदतीने ४८० खाटांचे पहिले खुले रुग्णालय त्रिपुरातील मेलाघर येथे सुरू केले.
बांगलादेशच्या निर्मितीनंतर हे खुले रुग्णालय ढाका येथे गोनोशास्थ (गणस्वास्थ्य) केंद्र या नावाने सुरू झाले. अल्पदरात दर्जेदार वैद्यकीय उपचार करणे, हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट होते. त्याच वर्षी संस्थेने गरिबांसाठी आरोग्य विमा योजना सुरू केली. देशभरात ७ रुग्णालये आणि ५० उपकेंद्रे उभारून आपला कार्यविस्तार केला. कालांतराने या संस्थेने लोकाभिमुख आरोग्य व्यवस्थेबरोबरच, महिला सक्षमीकरण, आपत्ती व्यवस्थापन, शिक्षण, कृषी आदी क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी केली.
त्यांना बांगलादेशच्या राष्ट्रीय औषध धोरणाचे जनक मानले जाते. त्यांनी १९८२ मध्ये तयार केलेल्या धोरणाच्या आधारावरच देशाच्या आरोग्य व्यवस्थेचा इमला आज उभा आहे. गरिबांच्या आरोग्यविषयक गरजांच्या आधारे तयार केलेले हे आशियातील पहिले समग्र औषध धोरण मानले जाते. बांगलादेश मेडिकल असोसिएशनचा या धोरणाला विरोध असण्यामागे बडय़ा औषध कंपन्याचे ‘टॉनिक’ होते. अनेकदा डॉ. जफरुल्ला यांच्यासह त्यांच्या रुग्णालयांवर हल्लेही झाले. तरीही ते डगमगले नाहीत. अखेर सरकारला हे लोकाभिमुख धोरण स्वीकारावे लागले. डॉ. जफरुल्ला यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार (१९८५) आणि राइट लाइव्हलीहुड पुरस्कार (१९९२) हे त्यापैकी आंतरराष्ट्रीय बांगलादेशचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या शॉधिनोता (स्वाधीनता) पुरस्काराने त्यांना १९७७ मध्ये गौरविण्यात आले.
गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. करोनाची लागण झाल्यानंतर त्यांचा मूत्रिपड आणि यकृताचा आजार बळावला होता. अखेर ११ एप्रिलला बांगलादेशचा हा योद्धा निवर्तला. बांगलादेशच्या निर्मितीनंतरही परदेशात न जाता इथेच राहावे असे का वाटले, असा प्रश्न मध्यंतरी त्यांना एका मुलाखतकाराने विचारला होता. ‘आमच्या बचावासाठी पाकिस्तानी लष्कराचा अत्याचार सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना विपन्नावस्थेत सोडून कसे जाणार’, असे त्यांचे उत्तर होते. आता डॉ. जफरुल्ला हे जगच सोडून गेले आहेत.. रुग्णसेवेची प्रेरणा मागे ठेवून.