‘आज रात्री या जेवायला बंगल्यावर. आणि वेषांतर वगैरे करून येण्याची काही गरज नाही. कळू द्या त्यांना आपण भेटलो व खलबते केली म्हणून.’ पलीकडून एकनाथरावांनी हो म्हणताच दादांनी फोन ठेवला. भाषणापासून वंचित ठेवण्याच्या या डावपेचाला आज मात द्यायचीच असे मनाशी ठरवत दादांनी खानसाम्याला जरा तिखट भाज्या तयार करण्याच्या सूचना दिल्या. ठरल्याप्रमाणे रात्री दहाच्या सुमारास एकनाथराव आल्यावर दोघांमध्ये भोजनकक्षात चर्चा सुरू झाली. ‘जेव्हा जेव्हा दिल्लीचे पाहुणे व त्यातल्या त्यात चाणक्य राज्यात येतात तेव्हा आपल्याला डावलले जाते. शिवाय एखाद्या महापुरुषाची जयंती वा पुण्यतिथी असली की तोच प्रकार घडतो. हे जाणीवपूर्वक केले जाते यावर माझा विश्वास आता बसू लागलाय’ एकनाथरावांनी सुरुवात करताच दादांची कळी खुलली.
मग एक तळलेली हिरवी मिरची तोंडात टाकत ते म्हणाले. ‘आपल्या दोघांचेही स्वतंत्र पक्ष आहेत. आपण आपापल्या पक्षाचे नेते आहोत. आपल्याही पाठीशी आमदार व मंत्री आहेत. पण अशा रीतीने बोलण्याची संधी नाकारली की त्यातून सर्वत्र चुकीचा संदेश जातो. राजशिष्टाचाराच्या नावाखाली हा डावलण्याचा प्रकार यापुढे तरी खपवून घ्यायचा नाही म्हणजे नाही.’ यावर खूश होत एकनाथराव म्हणाले. ‘दादा एवढाच त्याचा अर्थ नाही. डावलण्याची चर्चा करणारी माध्यमे अजूनही आपल्या दोघात ‘सीएम मटेरियल’ आहे हेच अप्रत्यक्षपणे सूचित करतात. त्यामुळे भविष्यात हा डावलण्याचा डाव उधळून कसा लावायचा ते सांगा.’ मग जेवताजेवता दोघेही विचार करू लागले. मध्येच हातातला घास तसाच ठेवत एकनाथराव म्हणाले. ‘कार्यक्रमाला जायच्या आधी सहायकामार्फत संचालनकर्त्याकडे आधी चौकशी करून घ्यायची. भाषणाच्या यादीत नाव नसेल तर व्यासपीठावर न जाता मुद्दाम समोर बसायचे. मग त्याची चर्चा सुरू होताच देवाभाऊ या म्हणून आग्रह करतील. नंतर नाईलाजाने त्यांना भाषणाची संधी द्यावी लागेल.’ हे ऐकून दादा हसत म्हणाले. ‘हो, हे तर करूच पण ते नागपूरकर लई हुशार आहेत. पुढच्यावेळी ते भाषणाच्या यादीत नाव ठेवतील व ऐनवेळी शिष्टाचार वा तत्सम कारण देत डावलतील. आजकाल संचालनकर्तेही त्यांचेच असतात.’ यावर पुन्हा दोघेही विचारमग्न झाले. दादा काहीच बोलत नाही हे बघून मग एकनाथराव बोलले. ‘व्यासपीठावरच अशी काही फसगत होतेय हे लक्षात येताच दादा तुम्ही थेट बोलायला उठायचे. माईकचा ताबा घेत संचालनकर्ता आमचे नाव घेण्यास कदाचित विसरला असेल असे म्हणत थेट भाषणाला सुरुवात करायची. हे तुमच्या स्वभावाला साजेसे. तुमचे आटोपले की लगेच आता एकनाथराव बोलतील असे तुम्हीच जाहीर करून टाकायचे. यातून सरकारमध्ये समन्वय नाही असे चित्र दिसेल तर दिसू द्या. देत बसतील ते देवाभाऊ माध्यमांना उत्तरे.’ हे ऐकणारे एकनाथराव फारच दुखावलेले आहेत याची जाणीव दादांना झाली.
हीच वेळ आहे यांना पदरात घेण्याची. दोघांनी एकत्र येऊन हा उधळण्याचा कार्यक्रम राबवला तर सध्या हवेत असलेल्या मोठ्या पक्षाला सहज जमिनीवर आणता येईल. तरीही डावलण्याचा प्रकार सुरूच राहिला तर जयंती व पुण्यतिथीचे कार्यक्रम मुद्दाम दोन्ही पक्षातर्फे आयोजित करून शह देता येईल हे लक्षात येताच दादा ताटावरून उठले. ‘ठरले तर मग, मी उद्या जाहीर करून टाकतो प्रत्येक कार्यक्रमात आम्ही दोन दोन मिनिटे बोलणार म्हणून. बघू काय प्रतिक्रिया येते समोरून.’ मग दोघेही बंगल्याच्या बाहेर आले तेव्हा पहाटेचे चार वाजले होते. दोन मिनिटाच्या भाषणासाठी सहा तासाचा खल करून तोडगा काढला म्हणून दोघांच्याही चेहऱ्यावर समाधान पसरले होते.