मराठी साहित्य महामंडळाची रीतसर परवानगी न घेताच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत सत्कार करण्यात आला. हा सत्कार राजकीय स्वरूपाचा होता, त्याचा मराठी साहित्याशी काहीही संबंध नव्हता. दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे हे खरे परंतु या संमेलनानिमित्ताने शिंदे सत्कार का केला गेला, असा प्रश्न निर्माण होत आहे. एकनाथ शिंदेंना महादजी शिंदेंच्या नावे पुरस्कार दिला वा इतर कोणाच्याही नावे पुरस्कार दिला हा महत्त्वाचा मुद्दा नाही. शिंदेंचा सत्कार दिल्लीत कशासाठी केला गेला? त्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमलनाचे व्यासपीठ का वापरले गेले? शिंदेंचा सत्कार त्यांच्या साताऱ्यामध्येही करता आला असता; तिथेही त्यांना महादजी शिंदे पुरस्कार देता आला असता आणि तो कधीही देता आला असता. मग, सत्काराचा प्रपंच दिल्लीत करण्यामागे कोणाचे राजकीय हितसंबंध होते आणि दिल्लीत होणाऱ्या संमेलनाचे आयोजक असलेल्या ‘सरहद संस्थे’ने स्वत:चा राजकीय वापर का होऊ दिला, तसेच, साहित्य महामंडळाची परवानगी नसेल तर त्यांचा अधिकारावर गदा आणून बेमालूमपणे हा सत्कार सोहळा का घडवून आणला गेला, असे प्रश्न विचारले जात आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी या सत्काराच्या निमित्ताने आपापले राजकारण साधल्याची चर्चा अद्यापही थांबलेली नाही. उलट, त्यानंतरच्या चार-पाच दिवसांतील दिल्लीतील घडामोडींमुळे त्यात अधिक भर पडल्याचे दिसले.

राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला प्रचंड जागा मिळाल्या, शिवाय संघाचा दबाबही असेल, त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद पुन्हा डावलणे शक्य झाले नाही. परिणामी, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होता आले नाही. मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागल्याची सल त्यांच्या मनातून गेलेली नाही हे उघडच आहे. शासकीय कारभारामध्ये ते पूर्वीइतके सक्रिय झालेले नाहीत असे सांगितले जाते. मुख्यमंत्रीपद नसल्याची बाब त्यांना अजून स्वीकारता आलेली नाही, असे महायुतीतील काही नेत्यांचे म्हणणे आहे. मन अस्वस्थ असेल, नाराज असेल तर शिंदे साताऱ्याला गावी जाऊन राहतात. अधूनमधून ते गावी गेलेले दिसले. पण याचा अर्थ शिंदेंनी विद्यामान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हार मानली असे नव्हे. शिंदे लढवय्ये असल्यामुळे ते उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानणारे नाहीत. ते वेगवेगळ्या पद्धतीने शक्तिप्रदर्शन करत राहातील आणि राजकीय विरोधकांना स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करून देत राहातील. दिल्लीतील त्यांचा सत्कार हा त्याचाच भाग असल्याचे मानले जात आहे.

वेळ साधली!

राज्यामध्ये शिंदे हे महायुतीचे सरकार अस्थिर करू शकत नाहीत. म्हणून त्यांची भाजपसाठी उपयुक्तता संपली असे नव्हे. केंद्रातील मोदी सरकार ‘एनडीए’तील घटक पक्षांची मदत घेऊन चालवावे लागते. ‘एनडीए’च्या खासदारांची संख्या वाढवणे भाजपला क्रमप्राप्त आहे. महाराष्ट्रातून शिवसेना-ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गट अशा दोन गटांतील खासदार गळाला लागतात का, याची चाचपणी भाजप करणार नाही किंवा त्यांनी केली नसेलच असे ठामपणे कोणी सांगू शकणार नाही. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात शरद पवारांच्या गटातील खासदारांबाबत संशयाचे वातावरण निर्माण केले गेले होते. हे खासदार अजित पवार गटात जाण्यास उत्सुक असल्याची चर्चा होती. दिल्लीमधूनच कोणीतरी फोनाफोनी करत होते असे म्हणतात. पण अशी कोणतीही फोनाफोनी आमच्याकडून केली गेली नाही, असे अजित पवार गटातील सुनील तटकरे व प्रफुल पटेल या दोन्ही विश्वासू नेत्यांनी स्पष्ट केले होते. यावेळी, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात ठाकरे गटाच्या खासदारांबाबत अशीच चर्चा सुरू झाली. ठाकरे गटाचे खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या राजकीय गप्पा सुरू झाल्यानंतर या खासदारांवर पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देण्याची वेळ आली. शिंदेंच्या सत्काराला नव्या महाराष्ट्र सदनामध्ये ठाकरे गटाचे संजय दिना पाटील होते. हे पाटील अरविंद सावंत यांच्या घरी झालेल्या पत्रकार परिषदेला उपस्थित न राहता कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये झालेल्या राहुल गांधी, संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेला मात्र हजर होते. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री आणि शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या स्नेहभोजनाला ठाकरे गटाचे संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वाघचौरे गेले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे दिल्लीत येऊन दाखल झाले. त्यांनी या खासदारांना बजावून सांगितले की, विचारल्याशिवाय शिंदे गटातील खासदारांच्या भोजनांना जाऊ नका. आदित्य ठाकरेंच्या दिल्लीवारीमुळे ठाकरे गटातील खासदारांच्या निष्ठेबाबत विनाकारण संशय बळावला. आणि या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान शिंदेंचा दिल्लीत सत्कार झाला. राजकारणात स्वत:चे महत्त्व वाढवायचे असेल तर वेळ अचूक साधावी लागते, शिंदेंनी ती साधली असे म्हणता येऊ शकते!

नजिकच्या भविष्यात शिंदेंपुढे तीन पर्याय असू शकतात. देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मान्य करून पुढील पाच वर्षे उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानणे. दुसरा पर्याय ठाकरे गटातील खासदार आपल्या गटात आणून ‘एनडीए’ची ताकद वाढवणे, त्याद्वारे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासमोर आपले राजकीय वजन वाढवणे आणि तिसरा पर्याय; थेट भाजपमध्ये विलीन होणे. त्यापैकी पहिला पर्याय शिंदेंना मान्य होणार नाही. तिसरा पर्याय तातडीने अमलात आणता येणार नाही. त्यामुळे दुसऱ्या पर्यायाचा शिंदेंना अधिक गांभीर्याने विचार करता येऊ शकतो. तसे झाले तर राज्यात फडणवीस यांच्यासमोरील आव्हानही त्यांना कायम ठेवता येऊ शकेल. केंद्रात भाजपच्या नेतृत्वालाही शिंदेंना सांभाळून घ्यावे लागेल. म्हणूनच शिंदेंनी दिल्लीतील सत्काराचा राजकीय लाभासाठी अत्यंत शिताफीने उपयोग करून घेतला असे म्हणता येऊ शकेल. शिंदेंचा सत्कार शरद पवारांनी केल्यामुळे भुवया उंचावल्या गेल्या. गद्दारांचा सत्कार पवार कसे करू शकतात, अशी आगपाखड ठाकरे गटातील नेत्यांनी केली. पवार असे का वागले, याचे उत्तर कोणालाही देता येणार नाही. पण काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने अनौपचारिक गप्पांमध्ये पवारांवर मार्मिक टिप्पणी केली. त्यातून कदाचित कोणी अर्थ काढू शकेल. या ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने प्रश्न विचारला की, महाविकास आघाडीसाठी राज्यातील विधानसभा निवडणूक कुठे फिरली? त्यावर त्यांनी स्वत:च उत्तर दिले. ते म्हणाले, शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ही माझी शेवटची निवडणूक आहे अशी घोषणा केली. या घोषणेमुळे वातावरण फिरले, पवारांकडील नेते-कार्यकर्ते यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला. त्याचा फायदा अजित पवार गटाला मिळाला, त्यांचे आमदार अधिक संख्येने निवडून आले!… शरद पवारांनी अजित पवारांना सढळ हाताने यांना मदत केली असा काँग्रेस नेत्याच्या म्हणण्याचा अर्थ निघू शकतो. शिंदे सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, शरद पवारांची गुगली भल्याभल्यांना कळत नाही. पण, त्यांनी मला कधी गुगली टाकली नाही. म्हणजे पवारांनी शिंदेंनाही सढळ हाताने मदत केली असा अर्थ कोणी काढू शकतो. लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान पवार आणि शिंदे यांच्या जवळिकीबद्दल बोलले गेले होते. या दोन नेत्यांच्या घनिष्ठतेमुळे महाविकास आघाडीतील ठाकरे गट एकटा पडल्याचे चित्र निर्माण झाले. शिवाय, महायुतीतील आपले महत्त्व शिंदे कमी होऊ देत नाहीत. दिल्लीमध्ये भाजपच्या नेतृत्वाशी थेट संपर्क असून तिथे आपले वजन अजूनही कायम असल्याचे दाखवण्यात शिंदे यशस्वी झाले आहेत. त्यामुळेही कदाचित उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यातील भेटीगाठी वाढलेल्या असू शकतात असे मानण्याची संधी असू शकते.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत. पण याच संमेलनाच्या व्यासपीठावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार केला गेला. हा सत्कार म्हणजे शिंदेंचे दिल्लीतील शक्तिप्रदर्शन होते असे म्हणता येऊ शकेल आणि त्याचा रोख अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात होता असे कोणी म्हटले तर त्यात तथ्य नव्हतेच असे कदाचित म्हणता येणार नाही. अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या व्यासपीठावरून राजकीय भूमिका पूर्वीही ठामपणे घेतल्या गेल्या आहेत. तशी भूमिका घेण्यास कोणाचा आक्षेपही असू नये. संमेलनात राजकीय वादही झाले होते, ते पुढेही होत राहतील. पण, या वेळी संमेलनाच्या व्यासपीठाचा वापर राज्यातील महायुतीतील सत्तास्पर्धेसाठी केला गेला. राजकीय पक्षांची अंतर्गत कुस्ती कदाचित पहिल्यांदाच संमेलनाच्या आखाड्यात झाली असावी. राज्यात शिंदे विरुद्ध फडणवीस हा रंगलेला सामना दिल्लीत खेळला गेल्याचे तमाम मराठी साहित्य रसिकांनी पाहिले. असा योग विरळाच!

Story img Loader