एखादी सजीव व्यक्ती असावी अशी बाजारपेठ. तिला भावभावना असतात. ती प्रतिक्रिया देते. ती प्रतिक्रिया द्यायला घाबरत नाही, ही महत्त्वाची बाब. आणि दुसरं म्हणजे बाजारपेठ ही व्यक्ती/पक्षनिरपेक्ष असते. तिचा संबंध असतो तो घटनांशी.
आपल्या लक्षात येत नाही आणि अर्थात आलं तरी आपण मान्य करत नाही असं सत्य म्हणजे राजकारण आणि त्या राजकारणानं व्यापलेला आपल्या आयुष्याचा मोठा भाग. पाण्यात तरंगणाऱ्या हिमखंडासारखं हे. पाण्यावर अगदीच थोडा भाग दिसतो. त्यापेक्षा किमान तिप्पट भाग पाण्याखाली असतो. आपलं आणि राजकारण, समाजकारण यांचं नातं हे असं आहे. गंमत अशी की अनेकांना आपल्या राजकीय आवडीनिवडी झाकून ठेवायच्या असतात. म्हणजे चारचौघांत त्या उघड करायच्या नसतात. आणि आजकाल तर घराघरांतच दुभंग असतो. नको त्या विषयावर मत व्यक्त करायला लागून नको तो प्रसंग निर्माण होऊ नये म्हणून मग हल्ली अनेक कुटुंबांत सणसमारंभांत ‘ग्लोबल वॉर्मिंग’ इत्यादी विषयांवर चर्चा होते. ऑस्कर वाइल्ड म्हणाले होते ‘‘हवामानावर गप्पा मारणं ही कल्पनाशून्यतेची परिसीमा.’’ आता तर या ‘कल्पनाशून्यां’नीच आसमंत भरलाय. घरात दूरचित्रवाणीवरच्या वृत्तवाहिन्यांपर्यंत हा दुभंग पोहोचला होता. याची कबुली एकदा खुद्द ट्विंकल खन्ना हिच्यासारख्या कलाकार तसेच लेखिकेने दिली होती. (ट्विंकल यांचा परिचय अक्षय कुमार यांची पत्नी यापेक्षा डिंपल कपाडिया यांची कन्या असा करून देण्यात अधिक रसरशीतपणा आहे. असो.) ‘‘घरात अक्षय रिपब्लिक टीव्ही बघतो आणि मी एनडीटीव्ही’’, असं त्यांनी कबूल केलं होतं. (आता त्या काय पाहात असतील हा प्रश्नच आहे) यामुळे आंबा कसा खाल्ला जावा या गूढ ज्ञानास त्या कदाचित मुकल्या असतील. असो. मुद्दा तो नाही.
तर फारच कमी जण आपल्या राजकीय आवडीनिवडी खुलेपणाने व्यक्त करतात; हा आहे. त्यात कलाकार, उद्योजक, खेळाडू हे फट्टू नंबर एक. नासिरजी, दीपिका पदुकोण, परेश रावल, राजीव बजाज, नीरज चोप्रा असे काही मोजके अपवाद. बाकी बरेच जण ‘‘राजकारण हा आपला प्रांत नाही’’, या लबाड युक्तिवादाच्या दुलईत स्वत:ला सुरक्षित ठेवत असतात. हा वर्ग चित्रपट, क्रिकेट अशा पापभीरू विषयांवर भरभरून बोलतो तेव्हा प्रश्न पडतो की असे असेल तर मग चित्रपट वा क्रिकेट हा यांचा प्रांत कधी झाला? पण या सगळ्याच्या पलीकडे एक मोठा घटक आहे.
बाजारपेठ. एखादी सजीव व्यक्ती असावी अशी बाजारपेठ. तिला भावभावना असतात. ती प्रतिक्रिया देते. व्यक्त होते. तिला येणाऱ्या घटनांची चाहूल लागते. ती ताक मागायला जाताना अजिबात भांडं लपवत नाही. आपल्याला जे वाटतं ते व्यक्त करते. म्हणजे २००४ साली जेव्हा अटलबिहारी वाजपेयी सरकारचा अनपेक्षित पराभव झाला, त्या वेळी बाजारपेठ घाबरून मटकन बसलीच. मग ते बाजारपेठेचं घाबरणं पाहून ए. बी. बर्धन यांच्यासारखा नेता म्हणाला होता…भाडमे गया सेन्सेक्स. पण तसा तो काही गेला नाही. सतत वाढत वाढत राहिला. अनेक मध्यमवर्गीय, लहान-मोठ्या गुंतवणूकदारांचे हजारांचे लाख आणि लाखांचे कोटी याच बाजारानं करून दिले. संकटाची चाहूल लागली की बाजार अंग आकसून घेतो. ही संकटं कधी काल्पनिक असतात तर कधी खरी! पण बाजारपेठ प्रतिक्रिया द्यायला घाबरत नाही, ही महत्त्वाची बाब. आणि दुसरं म्हणजे बाजारपेठ ही व्यक्ती/पक्षनिरपेक्ष असते. तिचा संबंध असतो तो घटनांशी. त्या घटना कोणामुळे घडतायत, कोण जबाबदार आहे वगैरे सूक्ष्म तपशिलात बाजारपेठ लक्ष घालत नाही. तर ही अशी बाजारपेठ गेले तीन-चार आठवडे काहीशी वेगळी वागतेय.
हेही वाचा >>> भूगोलाचा इतिहास : दंतकथा बनलेला इंजिनीअर
बाजारपेठेतल्या अनेक नव्यांची मालकी ज्याच्याकडे आहे त्या अमेरिकेनं बाजारपेठेची संवेदनशीलता मोजण्याचा एक नवाच निर्देशांक काढला. १९९३ साली. अमेरिकेतल्या शिकागोतल्या भांडवली बाजारात ‘स्टँडर्ड अँड पुअर’ (एसअँडपी) ही जागतिक निर्देशांक कंपनी या नव्या निर्देशांकांची जनक. त्याचं नाव ‘व्होलॅटिलिटी इंडेक्स’ ( VIX). म्हणजे चंचलता निर्देशांक म्हणता येईल याला. युद्ध, नैसर्गिक आपत्ती वगैरेंच्या काळात बाजारपेठ अस्थिर होते. ही अस्थिरता जशी काही अपेक्षित घटनांमुळे निर्माण होऊ शकते तशीच ती अनपेक्षित घटनांमुळेही तयार होऊ शकते. तर या अनिश्चिततेचं मोजमाप करण्याचा प्रयत्न या चंचलता निर्देशांकानुसार होतो. तिकडे हा प्रकार यशस्वी झाल्यामुळे जगातल्या अनेक भांडवली बाजारांनी आपापल्या बाजारांत असा निर्देशांक सादर केला. याचा प्रसार लक्षात घेत ‘शिकागो बोर्ड ऑप्शन एक्स्चेंज’नं VIX या आद्याक्षरांच्या निर्देशांकांची बौद्धिक मालकीच घेऊन टाकली. आता जगातल्या अनेक बाजारांना शिकागो एक्स्चेंजच्या परवानगीने ‘VIX’ हा निर्देशांक वापरता येतो.
साहजिकच भारतीय भांडवली बाजारातही तो अलीकडे चलनात आहे. अमेरिका, युरोपादी बाजारांच्या तुलनेत आपली भांडवली बाजारपेठ अगदी तशी कोवळीच म्हणायची आकारानं. पण प्रत्येक तरुण पिढी आधीच्या पिढीपेक्षा तंत्रज्ञानात अधिक प्रगत असते. त्यामुळे अमेरिकेच्या तुलनेत आपली बाजारपेठ लहान असली तरी तिनेही हा चंचल निर्देशांक सहज आत्मसात केलाय.
तर गेले काही आठवडे भारतीय बाजारातला हा चंचल निर्देशांक घसघशीतपणे वाढू लागलाय, ही यातली महत्त्वाची घटना आहे. आगामी ३० दिवसांत काही महत्त्वाची उलथापालथ होणार असेल तर त्याच्या अनुषंगाने हा निर्देशांक निश्चित केला जातो. युद्धसदृश स्थिती किंवा तत्सम काही झालं देशात की एक प्रकारची अस्थिरता निर्माण होते. ती किती आहे किंवा काय हे या निर्देशांकावरनं कळतं आणि मग गुंतवणूकदार त्या त्याप्रमाणे ‘पोझिशन’ घेतात. एक बड्या आंतरराष्ट्रीय बँकेत काम करणारा मित्र तर म्हणाला… हल्ली आम्ही सेन्सेक्सपेक्षा या चंचल निर्देशांकावर नजर ठेवून आहोत. त्याला विचारलं काय कारण या निर्देशांकात वाढ होण्याचं? तर त्याचं उत्तर सरळ होतं: निवडणुकीत काय होईल याबाबत संभ्रम असणं.
आता ‘चारसो पार’च्या घोषणा ऐकून, छापून, छापलेलं वाचून, व्हॉट्सप फॉरवर्ड करकरून त्याबाबत इतकं मन बनलं असेल अनेकांचं तर निवडणुकीच्या निकालाबाबत संभ्रम काय, असा प्रश्न. एका बाजूला निकालाबाबत काही चर्चाच नको, सगळं काही ठरल्याप्रमाणे होणार अशी धारणा असलेला एक वर्ग. निश्चिंत. हा वर्ग निश्चिंत राहू शकतो, त्याला तसं राहणं परवडतंही. याचं कारण या वर्गाची जी काही गुंतवणूक आहे ती भावनिक. या भावनिक गरजा तशा मर्यादित आणि पुरवायला सोप्या. अमुक नेता ‘‘आपल्यातला’’ आणि ‘‘त्यांना’’ सरळ करणारा इतकं दिसलं तरी या वर्गाला तृप्त वाटतं. त्यात त्यानं ‘‘त्यांच्या’’ देशात घरमे घुसके मारेंगे… वगैरे आरोळी ठोकली तर मग पाहायलाच नको. ‘आनंद पोटात माईना…’, अशी अवस्था. आणि दुसरीकडे हा वर्ग चंचल निर्देशांक काढणारा. या वर्गाची भावनिक गुंतवणूक असेल/नसेल… नसण्याचीच शक्यता अधिक. कारण या वर्गाला भावनेशी काही देणंघेणं नसतं. ताळेबंदात नफा किती हे भावनेपेक्षा जास्त महत्त्वाचं असं हा वर्ग मानतो. त्यामुळे या वर्गाची गुंतवणूक वट्ट पैशात असते. त्या वर्गाला जर वातावरणात राजकारणामुळे चंचलता आहे असं वाटत असेल तर तो मुद्दा जरूर दखलपात्र ठरतो.
म्हणून मग या चंचल निर्देशांकावर प्रकाशझोत. मे महिन्यापासून या निर्देशांकात चक्क ५३ टक्क्यांनी वाढ होऊन तो २० चा टप्पा ओलांडून पुढे गेलाय. याआधी २०१९ च्या निवडणुकांच्या आधीही तो २८ टक्क्यांपर्यंत गेला होता. पण बालाकोट वगैरे झालं आणि मग राजकीय अस्थिरताच मिटली. या वेळी अजून निवडणुकांच्या तीनेक फेऱ्या व्हायच्या आहेत. तेव्हा तोपर्यंत ही चंचलताही वाढणार का, ही हुरहुर गुंतवणूकदारांत आहे. त्यात परदेशी गुंतवणूकदारांनी आपल्या बाजारातून गेल्या काही दिवसांत १८ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची गुंतवणूक काढून घेतलीय. ती का?
आपल्याकडे ‘‘जे न देखे रवी, ते देखे कवी’’ असं म्हणतात. यातनं कवी आता काढून टाकायला काही हरकत नाही. त्यांना तसं काही फारसं दिसत नाही आता आणि हल्ली कवी फारसं पाहू नये असं काही पाहातही नाही. तेव्हा आता ‘जे न देखे कवी, ते देखे बेपारी’, असं म्हणणं योग्य. राजकीय विश्लेषक वगैरेंपेक्षा या व्यापारी वर्गाला काही वेगळं जाणवतंय का? चंचल निर्देशांकांचं बिथरणं पाहून उगाच शंका येते, इतकंच.
girish.kuber@expressindia.com
@girishkuber