बहुराष्ट्रीय कंपन्यांचे आधिपत्य करताना दृष्टिकोनही बहुराष्ट्रीय असणे आवश्यक असते. बहुराष्ट्रीय दृष्टिकोन हा देशातीत, धर्मातीत, वंशातीत, वर्णातीत असतो. अशा कंपन्यांच्या परिचालनात मूलत: रोकडा नफा अभिप्रेत असतो हे नाकारता येत नाही. पण ग्राहकच जेथे विविधरूपी आहे, अशा व्यासपीठावर एका ग्राहकाची भलामण करताना, दुसऱ्याची निर्भर्त्सना करता येत नाही. हे साधे तत्त्व उत्साही नवउद्यमी इलॉन मस्क यांना मान्य नसावे. स्पेस एक्स आणि टेस्ला या कंपन्यांच्या माध्यमातून आधुनिक उद्योग व तंत्रज्ञान जगतात ‘विध्वंसक’ म्हणून स्वत:च स्वत:ची पाठ थोपटवून घेणाऱ्या या गृहस्थाने ट्विटर या समाजमाध्यम कंपनीचा ताबा घेतल्यानंतर मानसिकता मात्र बहुतांश उच्छृंखल समाजमाध्यमींना साजेशी दाखवलेली आहे. ट्विटरचे ‘एक्स’ असे नवीन बारसे केल्यानंतर या कंपनीच्या हेतूंविषयीच शंका उपस्थित होण्याचे प्रसंग अनेक आले. मस्क यांच्याआधीचे या कंपनीचे प्रभारी बहुधा बाजारपेठा आणि नफ्याविषयीच्या आकलनात कमी पडले असतील. पण समाजमाध्यम कंपनीचे परिचालक म्हणून त्यांनी योग्य तितके आणि तेव्हा भान दाखवले होते. तीच बाब ‘मेटा’कर्ता मार्क झकरबर्गविषयी सांगता येईल. गूगल, मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांचे प्रभारीही काही पथ्ये पाळतात. इलॉन मस्क यांना हे मान्य नसावे. त्यामुळेच त्यांच्या व्यासपीठाचा वापर जेव्हा यहुदीविरोधी गरळ ओकण्यासाठी सरसकट केला जातो, तेव्हा त्यांना व्यक्त वा सुप्त पाठिंबा देण्यापर्यंत मस्क यांची मजल जाते. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे मस्क यांनाही आहे आणि ‘एक्स’ हे तर यांच्या मालकीचेच व्यासपीठ आहे, तेव्हा त्यात गैर काय असा प्रश्न यानिमित्ताने काही जण उपस्थित करतील. मुद्दा मालकीचा वा स्वातंत्र्याचा नाही. मुद्दा एखादे साधन जबाबदारीने वापरण्याचा आहे. शिवाय वादग्रस्त बाबींमध्ये उद्योजकालाही उद्यमी तटस्थता दाखवावी लागते. तशी ती न दाखवल्यामुळे काही श्वेत वर्चस्ववादी सध्या सरसकट एक्सच्या माध्यमातून यहुदींविरोधात प्रचार करत आहेत. या उद्योगात खुद्द मस्कदेखील उतरले आहेत. हे प्रकरण काय आहे, याचा वेध प्रथम घ्यावा लागेल.
हेही वाचा >>> अन्वयार्थ : अर्जेटिनात ‘ट्रम्प अवतार’!
युरोप आणि अमेरिकेमध्ये मोठय़ा प्रमाणात स्थलांतरितांचा ओघ सुरू आहे. या स्थलांतरामुळे पाश्चिमात्य संस्कृतीचा ऱ्हास होत असून, गोऱ्यांच्या नोकऱ्या आणि वस्त्या बळकावण्याचाच हा कट आहे. या कटाला यहुदींचा पाठिंबा असल्याचा सिद्धान्त सध्या अमेरिका आणि आणखी काही श्वेतबहुल देशांमध्ये कडव्या उजव्या विचारसरणीच्या व्यासपीठांवर चर्चिला जातो. स्थलांतरित आणि निर्वासितांविरोधात वक्तव्ये करणे हा नवा प्रकार नाही. या सर्व प्रगत देशांमध्ये काही गटांत स्थलांतरितांविरोधात आकस नक्की दिसून येतो. परंतु काही बाबतीत यहुदी आणि इस्रायलला लक्ष्य करताना, त्याला व्यापक आंतरराष्ट्रीय कटाचा चुकीचा दाखला दिला जातो. हल्ली तर इस्रायलच्या गाझावरील हल्ल्याचा संदर्भही जोडला जातो. यहुदी हे सगळयांच्याच विरोधात असतात. मुस्लिमांच्या आणि गोऱ्या ख्रिस्तींच्याही, असा काहींचा सूर आहे. या स्वरूपाच्या चर्चा आणि लघुसंदेश समाजमाध्यमांवर अलीकडे मोठया प्रमाणात प्रसृत होत असतात, याकडे अमेरिकेतील विचारपत्रांनी लक्ष वेधले आहे. याच स्वरूपाच्या एका संदेशावर मस्क यांनी सहमतीची मुद्रा उमटवली. असे संदेश काही वेळा थेट नाझीवादाचेही समर्थन करताना आढळून आले आहेत. त्याची गंभीर दखल घेऊन अॅपल, मायक्रोसॉफ्ट, आयबीएम, एनबीसी युनिव्हर्सल यांनी एक्सवर जाहिराती प्रसारित करणे थांबवले आहे. या जाहिराती अनेकदा विद्वेषपूर्ण, विखारी लघुसंदेशांच्या सान्निध्यात दाखवल्या जातात असे ‘मीडिया मॅटर्स फॉर अमेरिका’ या संघटनेने दाखवून दिले. त्यामुळे खबरदारी म्हणून या कंपन्यांनी जाहिरातीच बंद केल्या. त्यावर संतप्त झालेले मस्क यांनीच मीडिया मॅटर्सवरच दावा ठोकला. पुढील वर्षी अमेरिकेत अध्यक्षीय निवडणूक आहे. अनेक प्रकारच्या व्यापक आणि विखारी ध्रुवीकरणाचा हा कालखंड असणार आहे. गौर वर्चस्ववादी हा डोनाल्ड ट्रम्पकेंद्री रिपब्लिकन नेतृत्वाचा मोठा मतदार आहे. तर मोठया प्रमाणात यहुदींचा पाठिंबा अलीकडच्या काळात डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूने झुकलेला आढळून येतो. त्यामुळे या लढाईत काय स्वरूपाची चिखलफेक होईल याचा अंदाज लावता येतो. पण या प्रकारच्या संदेशवहनाला आळा घालण्याचे भान आणि इच्छाशक्ती इलॉन मस्क यांच्यामध्ये दिसून येत नाही. त्यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर पहिले महत्त्वाचे काम कोणते केले, तर ट्रम्प यांचे खाते पुनस्र्थापित करणे! तेव्हा यहुदीविरोधी मतप्रदर्शनास सहमती दर्शवण्याची मस्क यांची ही कृती शेवटची नसेल. त्यांच्या या कृतीचा व्हाइट हाऊसने नि:संदिग्ध शब्दांत निषेध केला. हे कदाचित मस्क यांच्या हातात आयते कोलीतच ठरण्याची शक्यता अधिक!