गेल्या वर्षी तुर्कीये किंवा तुर्कस्तानात अध्यक्ष रिसेप तय्यिब एर्दोगान यांच्या जस्टिस अँड डेव्हलपमेंट पक्षाला (एकेपी) तेथील प्रमुख विरोधी रिपब्लिकन पार्टी रिपब्लिकन पीपल्स पक्षाने (सीएचपी) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनपेक्षित धक्का दिला. या पक्षाचे नेते होते इस्तंबूल शहराचे महापौर इकरेम इमामोग्लू. इमामोग्लू तुर्कस्तानात विशेषत: शहरी भागांमध्ये आणि तरुण वर्गात अतिशय लोकप्रिय आहेत. या लोकप्रियतेची दखल घेऊनच त्यांच्या पक्षाने तुर्कस्तानच्या आगामी अध्यक्षीय निवडणुकीसाठी इमामोग्लू यांना उमेदवारी दिली. ही निवडणूक होत आहे २०२८ मध्ये. ती लढवण्यास विद्यामान, सर्वशक्तिमान अध्यक्ष एर्दोगान कायद्याने पात्र नसतील, कारण अध्यक्षपदाचे दोनच कार्यकाळ तेथे घटनासंमत आहेत. तरीदेखील घटनाच बदलली किंवा तेथील पार्लमेंटने मुदतपूर्व निवडणूक घेतली तर एर्दोगान पुन्हा उभे राहू शकतात. कारण घटनेमध्ये ‘दोन पूर्ण टर्म’ असा उल्लेख आहे. ही पळवाट घेण्याच्या दृष्टीने एर्दोगान यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत असेच यातून दिसते. खरे तर त्यांना याची काय गरज आहे? जवळपास २२ वर्षे एर्दोगान तुर्कस्तानमध्ये सत्ता उपभोगत आहेत.

२००३ ते २०१७ या काळात पंतप्रधान म्हणून आणि नंतर घटनादुरुस्तीपश्चात अध्यक्ष म्हणून. पण सत्तेवर राहिल्यानंतर उत्तरोत्तर ते सत्तेला अधिकच चटावल्यागत झाले. तुर्कस्तान हा खरे तर युरोपीय लोकशाही विचारसरणीचा प्रभाव असलेला इस्लामी देश. एर्दोगान यांच्या प्रदीर्घ अमलात लोकशाही विचार आक्रसले नि आक्रमक राष्ट्रवाद व इस्लामवाद हे त्यांना अधिक जवळचे वाटू लागले. त्यातून एकाधिकारशाही, असहिष्णुता, विरोधकांची वाट्टेल त्या मार्गाने आणि कारणांनी गळचेपी हेही ओघाने आलेच. तुर्कस्तानात म्हणायला निवडणुका घेतल्या जातात. पण त्या आपण आणि आपल्या पक्षानेच जिंकायला हव्यात याविषयी एर्दोगान विलक्षण दक्ष असतात. भीषण चलनवाढ, बेरोजगारी, भूकंपाने उद्ध्वस्त केलेली अर्थव्यवस्था इत्यादी समस्या उग्र असताना, एर्दोगान यांना आंतरराष्ट्रीय राजकारणातही चमकायला आवडते. युक्रेन युद्धात मध्यस्थी करण्याच्या नावाने ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचीच तळी उचलून धरतात. परवडत नसतानाही ड्रोन आणि लढाऊ विमानांच्या निर्मितीचा सोस धरतात. सीरियामध्ये यादवी होऊन तो देश विस्कळीत होत आहे हे दिसताच तेथील कुर्दिश बंडखोरांविरोधात लष्करी कारवाईचा आग्रह धरतात.

अशा वरकरणी शक्तिमान आणि महत्त्वाकांक्षी नेत्यांचा एक ठळक अवगुण म्हणजे, यांना लोकशाही मार्गाने निवडून येणे मान्य असते. पण लोकशाहीच्याच व्यवस्थेत निवडणुकीतील पराभव अजिबात झेपत नाही! ट्रम्प, पुतिन, बोल्सेनारो, एर्दोगान अशी ही यादी वाढत चाललेली आहे. एक राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून इकरेम इमामोग्लू यांची एर्दोगान यांना धास्ती वाटावी हे रास्तच. हे इमामोग्लू २०१९पासून तुर्कस्तानातील सर्वांत मोठे आणि प्रसिद्ध शहर इस्तंबूलचे महापौर आहेत. तरी त्यांच्या ‘सीएचपी’ने खरी कमाल दाखवली, ती गेल्या वर्षी. त्या वेळी ३६ प्रांतांमध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये या पक्षाची कामगिरी उत्साहवर्धक होती. राजधानी अंकारा आणि इस्तंबूलसह एझ्मीर, अंताल्या, बुर्सा या तुर्कस्तानातील पाच सर्वांत मोठ्या शहरांमध्ये एर्दोगान यांच्या उमेदवारांचा पराभव करून सीएचपीचे महापौर निवडून आले.

२०२८मधील निवडणुकीसाठी एर्दोगान यांनी उत्तराधिकारी जाहीर केलेला नाही. तो प्रश्न सीएचपीसमोर नाही. अध्यक्षपदासाठी पक्षांतर्गत निवडणूक जाहीर झाली आणि लगेचच १९ मार्च रोजी त्यांना महापालिकेत भ्रष्टाचार आणि दहशतवादास समर्थन दिल्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आली. चार दिवसांनी त्यांचे महापौरपद रद्द करण्यात आले आणि त्यांना तुरुंगात धाडण्यात आले. त्याच दिवशी पक्षांतर्गत निवडणुकीत इमामोग्लू यांनी दणदणीत विजय मिळवला. ते अध्यक्षीय निवडणूक लढवू शकतात. पण तत्पूर्वी त्यांच्यावरील गुन्हे सिद्ध झाले, तर मात्र त्यांची उमेदवारी बाद ठरेल. त्यांना वाटेतून बाहेर काढण्यासाठीच हा बनाव रचल्याची जाणीव तुर्की जनतेला आहे. त्यामुळे रमादानच्या काळात इस्तंबूलमध्ये विविध विद्यापीठांतील विद्यार्थी रात्रीच्या वेळी निदर्शने करत आहेत. निदर्शनांचे हे लोण तुर्कस्तानभर पसरले आहे. ही निदर्शने अभूतपूर्व असल्याचे विश्लेषक सांगतात. जवळपास १४०० निदर्शकांना अटक करण्यात आली. पण या रेट्यासमोर निभाव लागेल का अशी शंका एर्दोगान यांना येऊ लागली आहे. निदर्शक ‘तुर्कां’समोर राजकारणातील हा ‘अर्क’ पाणचट ठरणार याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.