महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर प्रशासनाची घडी बसविणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांच्या फळीतील एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी शरद काळे हे काळाच्या पडद्याआड गेले. त्या काळात राज्यकर्त्यांचे चुकत असल्यास ती बाब निदर्शनास आणून देण्याची धमक सनदी अधिकाऱ्यांमध्ये होती. अधिकाऱ्यांचा सल्ला राज्यकर्ते गांभीर्याने घेत असत. तरुण वयातच एखाद्या मंत्र्याचे सचिवपद भूषविल्यावर अधिकाऱ्यांची काम करण्याची मानसिकता बदलते आणि त्यांच्यात होयबा अधिक निर्माण होतो. पण माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण किंवा गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचे सचिव म्हणून काम केल्यावरही काळे नियमावर बोट ठेवून काम करण्यासाठी शेवटपर्यंत प्रसिद्ध होते. पुण्यातील नू.म.वि. शाळेचे विद्यार्थी असलेले काळे यांनी १९५५ मध्ये तेव्हाच्या मॅट्रिक परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक मिळवला होता. सनदी सेवेत प्रवेश करण्याचे स्वप्न बाळगूनच काळे यांनी तशी तयारी केली आणि १९६३ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. सनदी अधिकाऱ्यांच्या कारकीर्दीत जिल्हाधिकारीपद हे अत्यंत महत्त्वाचे असते. पण डॉ. माधवराव गोडबोले आणि शरद काळे हे दोघेही तरुण वयात केंद्राच्या सेवेत प्रतिनियुक्तीवर गेल्याने या दोन्ही मराठी अधिकाऱ्यांनी कधीच जिल्हाधिकारीपद भूषविले नव्हते.
यशवंतराव चव्हाण यांचे सचिव असताना दिल्लीत अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, असे काळे नेहमी सांगत असत. उद्योग सचिवपदी असताना उद्योग वाढीबरोबरच, शेतकऱ्यांना जोडधंदा कसा देता येईल याचा विचार करून त्यांनी विविध योजना राबविल्या. तुतीची लागवड केल्यास त्याचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होईल यासाठी त्यांनी विविध राज्यांना भेटी दिल्या होत्या. काळे यांचे एक वैशिष्टय़ म्हणजे ते विभागातील अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करीत वा त्यांच्याशी संवाद साधत असत. काळे यांची कारकीर्द गाजली ती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून. १९९१ ते १९९५ या काळात आयुक्तपद भूषविताना त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. पाण्याचा निचरा करण्याकरिता ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाची योजना त्यांच्याच काळातील, पण दुर्दैवाने ती अजूनही पूर्ण होऊ शकलेली नाही. गो. रा. खैरनार यांनी अनधिकृत बांधकामांच्या विरोधात हातोडा उगारला असता आयुक्त म्हणून काळे त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. त्या वेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांनी नाके मुरडली होती. हेच खैरनार नंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर आरोप करू लागले, उपोषणाचा पवित्रा घेऊ लागले तेव्हा कारवाईची मागणी होऊ लागली. काळे यांनी लगेच निर्णय घेतला नाही. पण खैरनार यांचा वारू चौफेर उधळला गेला तेव्हा निलंबनाची कारवाई करीत बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, असा संदेश दिला. निवृत्तीनंतर यशवंतराव चव्हाण केंद्र आणि एशियाटिक सोसायटी या संस्थांत ते सक्रिय होते. मुंबईच्या वैभवांपैकी एक असलेल्या एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष असताना दुर्मीळ ग्रंथसंपदेच्या डिजिटायझेशनचे काम त्यांनी पुढाकार घेऊन सुरू केले. राज्य आणि मुंबईच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या काळे यांच्या निधनाने एका चांगल्या निवृत्त सनदी अधिकाऱ्याला मुकलो आहोत.