तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी २७ जानेवारी, १९८७ रोजी ८७ व्या वर्षात पदार्पण केले. त्या दरम्यान महाबळेश्वर येथे प्रकाशन परिषद झाली होती. ‘लोकसत्ता’चे तत्कालीन संपादक माधव गडकरी या परिषदेचे प्रमुख पाहुणे होते. महाबळेश्वरची परिषद आटोपून परतीच्या प्रवासात त्यांनी वाईला थांबून तर्कतीर्थांशी संवाद साधला. मुलाखतीचा विषय होता ‘बुद्धिवाद’. भारतासारख्या देव, दैव, नशीब, इ. गोष्टींवर विश्वास ठेवणाऱ्या देशातील बहुसंख्याक समाजाचे प्रबोधन करून त्यास इहवादी बनविण्याच्या उद्देशाने घेतलेली ही मुलाखत त्या वेळी चर्चेचा विषय ठरली. नंतर मुलाखतींवर आधारित पत्रव्यवहार दीर्घकाळ होत राहिला.
या मुलाखतीत माधव गडकरी यांनी तर्कतीर्थांना प्रथमच थेट प्रश्न विचारून विषयाची कोंडी फोडली. ‘देव मानता का’, या प्रश्नाचे ‘नाही’ असे नि:संदिग्ध उत्तर देऊन तर्कतीर्थांनी आपण प्रखर बुद्धिवादी असल्याचे स्पष्ट केले. इतकेच नव्हे तर आपण देऊळ, मंदिरात कधी भक्तीचा भाग म्हणून जात नाही. गेलोच तर मंदिर, मूर्तींची शिल्पकला अभ्यासायला जातो, हे स्पष्ट केले. इतकेच नव्हे तर दैव, नशीब, इ. गोष्टींवर आपला विश्वास नाही, हेही ते स्पष्ट करतात.
विज्ञान, प्रयोगवादी निकषांवर जे ‘सत्य’ म्हणून उतरत नाही, ते आपण स्वीकारत नसल्याचे त्यांनी नि:संशय मान्य केले आहे. ईश्वर असता तर माणूस संकटग्रस्त, विषम कसा राहिला असता, असा प्रतिप्रश्न ते करतात. बुद्धीला अगम्य असे काही आहे का? योगायोग, नियती या गोष्टीपण तर्कतीर्थ निखालसपणे अमान्य करतात. त्यांचे खंडन करतात. विज्ञान, शास्त्रादी कसोटीवर जे सिद्ध होत नाही, त्यावर विश्वास ठेवू नये, असेही समजावतात. आपण पंचांग, मुहूर्त मानत नसल्याचेही त्यांनी या मुलाखतीत सांगितले आहे. मानवी आचार, व्यवहार, इ.चे तर्कतीर्थांचे विवेचन तर्क व बुद्धीवर आधारलेले असते. हे ही मुलाखत वाचताना लक्षात येते.
मुलाखतीच्या दुसऱ्या भागात नैतिक सदाचरण हा सुखाचा नि आनंदप्राप्तीचा मार्ग सांगितला गेला आहे. माणसाच्या नैतिक जीवनाला दोन आधार असतात. (१) गरज आणि (२) सत्याचे मूल्य. करुणा, कर्तव्य, इ. मूल्यांचे मानवी जीवनात असाधारण महत्त्व असते. त्यापोटी काही गोष्टी जीवनात होत राहतात आणि कराव्याही लागतात. (संगोपन, पुनर्वसन, इ.) अशा प्रसंगी हतबलता येते. तेथेही श्रद्धाशरण न होता माणसाने कार्यकारण मीमांसा तत्त्वाचा अवलंब करीत बुद्धिवादी राहिले पाहिजे. परलोक भयापेक्षा इहलोक सामर्थ्य, विश्वास आपले जीवन अधिक सुसह्य करतो, असे तर्कतीर्थांनी येथे सोदाहरण स्पष्ट केले आहे. त्यासाठी शिक्षण हे वरदायी तत्त्व असल्याचे तर्कतीर्थ स्वीकारतात. माता ही पहिली शिक्षिका असल्याचे तर्कतीर्थांनी या मुलाखतीत म्हटले आहे. जग संकटमुक्त करायचे असेल, तर समाज विज्ञाननिष्ठ, बुद्धिवादी झाला पाहिजे, असे ते बजावतात.
भारतात राज्यकर्ते मतपेटीच्या मोहापोटी राज्यघटनेतील धर्मांतीतता तत्त्वास तिलांजली देत असल्याचे स्पष्ट करत तर्कतीर्थांनी या मुलाखतीत सांगितले आहे की, धर्माचरण ही व्यक्तिगत नि खासगी गोष्ट होय. त्याचे प्रकटीकरण सार्वजनिक ठिकाणी व सरकारी कार्यालयांत वा लोकप्रतिनिधींनी करता कामा नये, हेही त्यांनी ठामपणे स्पष्ट केले आहे. कर्मकांडमुक्ती हा त्यावरचा रामबाण उपाय असल्याचे तर्कतीर्थ सांगतात. व्यापार, शिक्षण आणि सांस्कृतिक जीवन या तीन क्षेत्रांत इहवादी विचारसरणीची अंमलबजावणी आवश्यकच नसून, अनिवार्य असल्याचे त्यांनी मुलाखतीत म्हटले आहे. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माला इहवादाची जोड दिली, त्यांनाच देव बनविणे हा बुद्धिवादाचा पराभव होय, हे सांगण्यास ते विसरत नाहीत. सदर मुलाखत स्पष्टोक्तीचे ठळक उदाहरण होय.
बुद्धिप्रामाण्यवाद ही विचार पद्धती जशी आहे, तशी ती जीवन जगण्याची एक आचारसंहिताही आहे. सत्याला सामोरे जात ज्याला प्रमाण, पुरावा नाही ते नाकारत जगणं यात अपेक्षित असतं. असं जगणं म्हणजे बऱ्याचदा प्रवाहाविरुद्ध पोहणं असतं. अशा प्रतिबद्धतेतूनच परंपरेच्या शृंखला तोडता येतात, अन्यथा नाही. drsklawate@gmail.com