अभिजीत ताम्हणे
छोट्यामोठ्या २०८ रेखाटनं आणि रंगचित्रांचं प्रदर्शन, त्यासोबत पुठ्ठाबांधणीचा (हार्डबाउंड) १२० पानी कॅटलॉग, त्यात सर्व चित्रांच्या प्रतिमा आणि या चित्रांसंदर्भात ‘जेएनयू’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ इथले प्राध्यापक आणि केम्ब्रिज, स्टॅन्फर्ड विद्यापीठातल्या संशोधक-अभ्यासकांनी लिहिलेले चार लेख… यातून तरी लक्षात येतं की हे प्रदर्शन निराळं आहे किंवा ते गांभीर्यानं भरवलं गेलेलं चित्रप्रदर्शन आहे. विक्रांत भिसे याच्या चित्रांचं हे प्रदर्शन दिल्लीच्या ‘मुख्य प्रवाहातल्या’ आणि मोठ्या कलादालनात गेले काही आठवडे भरलं आहे आणि त्यानिमित्तानं ‘दलित कला’ हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
‘दलित साहित्य’ हा शब्दप्रयोग मराठीत १९५८ पासून आहे आणि ‘दलित लिटरेचर’ म्हणून भारतानंच नव्हे तर जगानंही तो स्वीकारला आहे. जगातल्या अव्वल विद्यापीठांच्या यादीत वरचा क्रमांक मिळवणाऱ्या अनेक विद्यापीठांत ‘दलित स्टडीज’ विभाग असणं आता नित्याचं आहे. त्यामुळे १९७० च्या दशकापर्यंत दलित साहित्य हा शब्दप्रयोगच नाकारण्याचे जे प्रयत्न होत होते आणि ‘चांगलं साहित्य आणि वाईट साहित्य असे दोनच प्रकार असतात – दलित साहित्य अशी वेगळी चूल कशाला’ वगैरे युक्तिवाद त्यासाठी केले जात होते, ते आता पूर्णत: निष्प्रभ ठरलेले आहेत. कारण दलित साहित्य म्हणजे सर्वच शोषित समाजघटकांचा आवाज ठरणारं कोणतंही साहित्य, अशी व्यापक व्याख्या फक्त व्यवहारातच नाही तर साहित्यसमीक्षेच्या अभ्यासातही मान्य झालेली आहे. संकल्पनेच्या पातळीवर हीच व्याख्या अभिव्यक्तीच्या सर्व प्रकारांना लागू पडणार, हे उघड आहे. त्याच अर्थानं दृश्यकलेच्या प्रांतात ‘दलित कला’ हा शब्दप्रयोग रुळला आहे. आजही काही जणांना तो मान्य नसला, तरीही तो स्थिरावून विस्तारतो आहे.
हेही वाचा >>> बुकबातमी : ऑस्करमध्ये रोआल्ड डाल…
यासाठी बरीच वर्षं जावी लागली. मुळात कलाकृतींची विभागणी (कॅटेगरायझेशन या अर्थानं) फक्त शैलीनुसारच मान्य करण्याची सवय सुधारून, शैलीसोबतच कलाकृतीमागच्या विचारानुसार विभागणीसुद्धा होऊ शकते, हे मान्य करण्यासाठी काही वर्षं गेली. सवि सावरकर हे दिल्लीस्थित चित्रकार आणि कला-अध्यापक १९८० च्या दशकात एक्स्प्रेशनिस्ट म्हणावी अशी शैली वापरून, अस्पृश्यतेच्या इतिहासाबद्दलची चित्रं रंगवायचे. त्यांच्या कलेला त्या वेळच्या कलेतिहासकार गीता कपूर आणि समीक्षक नियती शिंदे यांनी ‘दलित आर्ट’ म्हणून मान्य केलं. गीता कपूर यांच्या कोणत्याही अभ्यासावर डावेपणाचा आरोप केला की तो अभ्यासच नाकारता येईल असा त्याही वेळी काही जणांचा समज होता, तो खोटा ठरला. मात्र : (१) दलित समाजातून आलेल्या प्रत्येक चित्रकारानं केलेल्या कलाकृतींकडे दलित कला म्हणून पाहायचं का? आणि (२) चित्रकार रूढ चित्रशैलीच वापरत आहेत आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे रूढ संकेतांच्या बाहेर त्यांची चित्रं जात नाहीयेत, मग त्यांच्या कलेला ‘दलित कला’ असं म्हणणं हे उसनं अवसान ठरेल का? हे दोन प्रश्न पुढल्या काळात महत्त्वाचे ठरले.
आदिवासी कलेत जमातविशिष्ट शैली असू शकतात आणि ‘आमची भाषा समजून घ्या’ असं आदिवासी कलेचं म्हणणं असू शकतं. रा. रं. बोराडे यांच्या नंतरच्या पिढीतल्या दलित साहित्यानं दलितांच्या घरांतली, मनांतली भाषा पुस्तकात आणली. पण दलित कलेनं मात्र ‘तुमची भाषा फक्त तुमची नाही. त्याच भाषेत आम्ही आमचे मुद्दे मांडणार आहोत’ अशी भूमिका घेतली.
संजीव सोनपिंपरे यांच्या स्केचबुकांमध्ये १९९० च्या दशकापासून मुंबईच्या गरिबांची स्थिती टिपण्याची आस जाणवायची. श्रमिकांच्या छायाचित्रांवर आधारलेल्या कलाकृती ते एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला करू लागले आणि गेल्या दशकभरात तर त्यांच्या कलाकृती थेट राजकीय आशय मांडताहेत. सर्वहारांना केंद्रस्थानी मानणाऱ्या समाजविचाराची परंपरा शोधण्याचं काम संजीव सोनपिंपरेंच्या कलाकृतींनी केलेलं आहे. त्यांच्या नंतरच्या प्रभाकर पाचपुते यांचं अनुभवविश्व कोळसाखाणी आणि कपाशीची शेतं यांच्या पूर्व विदर्भातलं, तर अमोल पाटील यांचं मुंबईच्या बीडीडी चाळीतलं. ‘क्लार्क हाउस’ या मुंबईतल्या संस्थेचा आधार पाचपुते आणि पाटील यांना उमेदवारीच्या काळात मिळाला. या तिघांचीच नावं इथं नमूद करण्याचं कारण म्हणजे, दलित कलेचा विस्तारता परीघ या तिघांच्याही कलाकृतींतून स्पष्ट झालेला आहे. आणखीही चित्रकार होते, आहेत. पण संजीव सोनपिंपरे यांनी मांडलेला ‘केवळ एका समाजगटाच्या जगण्याशी निगडित कलाकृती केल्या, म्हणजे झाली दलित कला असं आहे का? दलितकेंद्री विचार मांडणारे ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’सारखे ग्रंथ किंवा खुद्द राज्यघटना यांच्या मनन-चिंतनातून झालेल्या कलाकृतीही दलित कलाच म्हणायला हव्या’ हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. तो समजून घेण्यासाठी, राजश्री गुडी यांनी दोन वर्षांपूर्वी दलित कवितांवर आधारित केलेल्या ‘परफॉर्मन्स’चं उदाहरण देता येईल.
हेही वाचा >>> बुकमार्क: अर्थपूर्ण दीर्घायुष्यासाठी..
विक्रांत भिसे हा यानंतर आलेला चित्रकार. तिशीतला हा चित्रकार विक्रोळीत वाढला, डोंबिवलीत त्यानं संसार थाटला. या सर्व काळात मराठीभाषक, मुंबईकर, मध्यम आणि निम्न मध्यमवर्गीय यांचं जगणं पाहण्याची संधी त्याला मिळालीच पण दलित चळवळ तो जवळून पाहू शकला, कारण वडील ‘दलित पँथर’ला मानणारे होते. हा स्वत:चा इतिहास विक्रांत भिसेने लपवला तर नाहीच, पण या भूतकाळानं केलेले संस्कार हाच आपल्या कलेचाही गाभा आहे आणि कलाकृतीत तो विचारपूर्वक मांडावा लागेल, हे विक्रांतनं ओळखलं. आकारांशी आणि रेषांशी खेळणं हा सर्वच चित्रकारांच्या आत्मानंदाचा भाग. त्या वाटेनं विक्रांत गेला आहेच पण जर लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर चित्राला ‘विषय’ हवा आणि तो विषय मीच का मांडतोय, हेही स्पष्ट असावं, हे त्याला लवकर उमगलं. ललित कला अकादमीच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांमध्ये विक्रांत भिसेची निवड सुमारे पाच वर्षांपूर्वी झाली (पण पुरस्कार सोहळा झालाच नाही, हा नाकर्तेपणा कुणाचा याचा शोध जिज्ञासूंनी घ्यावा), त्याहीआधी ‘जहांगीर आर्ट गॅलरी’तलं त्याचं प्रदर्शन लक्षवेधी ठरलं होतं. त्यानंतर मात्र विक्रांत वर्णनचित्रं करू लागला. डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यांशी विविध प्रकारे दिसणारं समाजाचं नातं, ‘महापरिनिर्वाण दिना’ला दिसणारा दादर परिसर, शिस्तबद्ध ‘समता सैनिक दल’, शाहीनबागेतलं आंदोलन, यांची ही चित्रं ठसठशीतपणे एखादा विषय मांडणारी होती. मात्र या प्रदर्शनातलं विक्रांतचं ‘क्वेस्ट फॉर जस्टिस’ हे महा-चित्र (४० फूट रुंद) तसंच ‘रायझिंग प्रोटेस्ट’ आणि ‘नामांतर : स्ट्रगल ऑफ ट्रान्सफॉर्मेशन’ ही चित्रं निराळी आहेत- वंचित/शोषितांचं ‘जिणं’ मांडणारी विक्रांतची छोटी ड्रॉइंग्ज एकीकडे, तर रंगनिवड/ मानवाकृतींची मांडणी यांतून सुधीर पटवर्धनांसारखी समाजनिरीक्षणाच्या वाटेवरून चालणारी त्याची वर्णनचित्रं दुसरीकडे- यांच्या मधला मार्ग ही तीन मोठी चित्रं घेतात. पण म्हणून हीच यापुढे विक्रांतची चित्रपद्धत असेल, असंही नाही. उलट विक्रांतच्या या प्रदर्शनातून ‘‘शैली’ची चर्चा थांबवून आपण निरनिराळ्या प्रकारे आशय समजून घेऊ या,’ असा आग्रह दिसतो. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तीन, चार निरनिराळ्या चित्रपद्धती वापराव्या लागल्या तरी बेहत्तर, असा चंग बांधलेलं हे प्रदर्शन लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या दलित कलेचं होतं. ते दिल्लीपुरतं न राहता निराळ्या स्वरूपात अन्यत्रही भरावं, तर हा आशय खरोखरच अधिक जणांपर्यंत पोहोचेल.
abhijit.tamhane@expressindia.com