सन २०१४ मधला २३ ऑगस्टचा रविवार. वसंत कुंज परिसरातील संजयवन या निवांत उपवनातून, तेव्हा ७६ वर्षांच्या असलेल्या डॉ. मोहिनी गिरी फेरफटका मारत होत्या. कोलाहल ऐकला म्हणून त्या दिशेने जाऊन पाहातात तर एका मुलीला घेरून तिचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करणारे काही तरुण. त्यांना गिरी यांनी हटकले. मुलीला आपल्या बाजूला घेऊन त्या छेड काढणाऱ्यांना समजावू लागल्या. रस्त्यावरून जाणाऱ्या एका पोलिसी जीपलाही त्यांनी हात केला, पण न थांबता जीप झरकन निघून गेली. मग मात्र तरुण निर्ढावले. डॉ. मोहिनी गिरी यांना धक्काबुक्की करून मुलीला या तरुणांनी पुन्हा ताब्यात घेतले आणि गिरी यांना वाटेला लावले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> अन्वयार्थ: केवळ राजकीय सूड उगवण्यासाठी?

‘या घटनेची तक्रारही अद्याप पोलिसांनी नोंदवलेली नाही’ असे तीन दिवसांनंतर निष्पन्न झाले! सन १९७१ पासून स्त्रियांसाठी सक्रिय कार्य करणाऱ्या, स्त्रियांना न्याय मिळावा यासाठी सतत सजग असणाऱ्या- त्याचसाठी २००७ मध्ये ‘पद्मभूषण’च्या मानकरी ठरलेल्या मोहिनी गिरींना २०१४ मध्येच जाणीव झाली असेल की, पंचाहत्तरी ओलांडली म्हणून काही ‘अमृतकाल’ सुरू होत नाही! अर्थात,केवळ कायद्यांनी स्त्रियांच्या आयुष्यात काही फरक पडत नसतो, हे गृहीत धरूनच डॉ. गिरींसारख्या अनेकींना काम करावे लागले, लागते. डॉ. गिरी तर १९९५ ते ९८ या काळात राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. ‘आखा तीज’च्या दिवशी सर्रास होणाऱ्या बालविवाहांना चाप लावण्याचे प्रयत्न झाले ते त्यांच्या या कारकीर्दीपासून. ‘गिल्ड ऑफ सव्‍‌र्हिस’ ही ब्रिटिश काळापासूनची समाजसेवी संस्था त्यांनी १९७० च्या दशकापासून चालवली, तिच्या प्रमुखपदी त्या प्रदीर्घ काळ राहिल्या. ‘‘पुरुषांच्या मानसिकतेत  फरक पडल्याशिवाय महिलांची सामाजिक स्थिती सुधारणार नाही. स्त्रियांसारखे पुरुषांचेही स्वयंसहायता गट स्थापण्याचे काम आम्ही अलीकडे (२००७) याच हेतूने सुरू केले’’ – हे उत्साहाने सांगणाऱ्या कार्यकर्तीची प्रयोगशीलता त्यांच्याकडे होती. या उत्साहाला अनुभवाची जोड होतीच, पण अभ्यासाचीही होती. सन १९३८ मध्ये लखनऊत जन्मलेल्या मोहिनी यांनी इतिहासाच्या पदव्युत्तर शिक्षणानंतर  अध्यापन केले, लखनऊ विद्यापीठात ‘स्त्री अभ्यास शाखे’ची स्थापना त्यांनी केली होती. एकारलेल्या स्त्रीवादाने काही होणार नाही, याची जाण त्यांना होती आणि महिलांइतकेच काम बालकांसाठी, वार्धक्याच्या प्रश्नांवर केले पाहिजे, याचे भानही होते. या महिला- बालके- वृद्ध या तीन दिशांचा विचार एकत्र आल्यास पुरुषांना ‘सुधारता’ येईल, असे त्यांचे मत होते. ‘कन्या’, ‘डिप्राइव्हड् देवीज’, ‘मंत्राज फॉर पॉझिटिव्ह एजिंग’ ही त्यांनी लिहिलेली पुस्तके. मात्र अधिक लिखाण त्यांच्या हातून व्हावयास हवे होते, त्याआधीच- १९ डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fact about padma bhushan awardee dr mohini giri life zws