हसतमुख, जगन्मित्र शिल्पकार ही प्रतिमा उत्तम पाचारणे यांनी कलाक्षेत्रातील संस्थांमध्ये उच्चपदी राहूनही जपली होती. ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’चे अध्यक्षपद त्यांना तीनदा मिळाले; तर दिल्लीच्या ‘ललित कला अकादमी’च्या प्रमुखपदी त्यांना मे २०१८ मध्ये नेमण्यात आले. ललित कला अकादमीवर पाचारणे असतानाच्या त्या तीन वर्षांत महाराष्ट्र जणू, आपल्या राज्यात या केंद्रीय स्वायत्त संस्थेचे प्रादेशिक केंद्र नसल्याची खंत विसरून गेला होता. अर्थात या अकादमीवरील त्यांच्या कार्यकाळातील अखेरचे किमान वर्षभर तरी ‘करोना’काळातच गेले, पण तेव्हाही वेबिनारद्वारे, दूरसंपर्काद्वारे उत्तम पाचारणे विविध उपक्रमांत सहभागी होत होते. १९९० च्या दशकातील त्यांच्या ब्राँझ-शिल्पांमध्ये, आकाराचा (‘फॉर्म’चा) एखाद्या बाजूने विस्तार होत असताना दुसऱ्या बाजूचा समतोल आणि सर्व बाजूंची झळाळी कायम ठेवण्याची काळजी घेतलेली दिसे. तोच समतोल, ती झळाळी त्यांनी सार्वजनिक जीवनातही जपली होती. त्यामुळेच दिल्लीत गेले तरी महाराष्ट्रातील कलावंतांबद्दल, तरुणांबद्दल ते नेहमीच स्वागतशील राहिले. तरुण कलावंतांना संधी देताना सामाजिक समतोलही त्यांनी जपला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : मोहिनी गिरी

वार्षिक ‘राष्ट्रीय कला प्रदर्शन’ आणि त्याला जोडून भरणारा ‘कला मेळा’ यांना २०१९ मध्ये पाचारणे यांनी मुंबईत आणले. अवघ्या ६७ वर्षी, तेही आजारानंतर पाचारणे जातील, असे कुणालाही वाटू नये इतका उत्साह त्यांच्यात दिसे. पण अखेर अप्रिय बातमी २६ डिसेंबरच्या सकाळी आली. अहमदनगर जिल्ह्यातून सुरू झालेला पाचारणे यांचा जीवनप्रवास अखेर पुणे, दिल्लीमार्गे त्यांच्या कर्मभूमीत- मुंबईत-  संपला. पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयातून त्यांनी कलाशिक्षक पदविका घेतली होती. त्यानंतर तीन वर्षे मुंबईत राहून ‘जी. डी. आर्ट’ ही (त्या वेळी पदवीची सोयच नसल्याने) पदविका त्यांनी मिळवली. या विद्यार्थिदशेतही त्यांनी ‘जहांगीर आर्ट गॅलरी’त कलाकृती मांडल्या होत्या, अशी नोंद आहे. पण तेव्हा पाचारणे चित्रेही करत होते की शिल्पे, याची माहिती फार कमी जणांना असावी. चित्रांचे एक प्रदर्शन त्यांनी २००५ मध्ये भरवले होते म्हणतात, पण १९८३ मध्ये दिल्लीत रोशन अल्काझींच्या ‘आर्ट हेरिटेज’ कलादालनात क्रिशन खन्ना, ध्रुव मिस्त्री, सूर्य प्रकाश आदींसह एका प्रदर्शनात समावेश झाल्यापासून पाचारणे शिल्पकार म्हणूनच ओळखले गेले.

१९८४ मध्ये- थोर शिल्पकार पिलू पोचखानवाला हयात असताना, त्यांच्यातर्फे ‘राष्ट्रीय कला शिष्यवृत्ती’ पाचारणे यांना मिळाली. नंतरच्या काळात पाचारणे यांच्या शिल्पांवर पोचखानवाला, दाविएरवाला या मुंबईकर शिल्पकारांप्रमाणे आधुनिकतावादी आकृतिबंधांचा प्रभाव दिसतो. संगमरवरी शिल्पांमध्ये पाचारणे गोलाई आणत आणि या दगडाच्या अंगभूत गुळगुळीत पोताला महत्त्व देत, तर धातुशिल्पांमध्ये तोल आणि धातूचा चमकदारपणा ही वैशिष्टय़े पाळून ते काम करत. अलीकडल्या काळात त्यांची प्रदर्शने कमी झाली होती. त्यांच्या कामाचे सिंहावलोकनी प्रदर्शन भरण्याआधीच- आणि ‘ललित कला अकादमीच्या महाराष्ट्र प्रादेशिक केंद्रा’चा पाठपुरावा अर्ध्यावर सोडून ते निवर्तले.