गिरीश कुबेर
९२ वर्षीय जॉर्ज सोरोस यांचा कोणताही राजकीय पक्ष नाही. तरीही, सोरोस यांच्यामुळे आपल्या मार्गात बाधा आली असं मानणारे नेते अनेक आहेत..
डोनाल्ड ट्रम्प यांचा तो न्यायालयातला प्रसंग जगभरात अनेकांनी थेट प्रक्षेपणात अनुभवला. न भूतो न भविष्यति असंच होतं ते. अमेरिकेच्या माजी अध्यक्षाला असं सामान्य आरोपीसारखं वागवलं जाताना पाहून अनेकांच्या डोळय़ांचं पारणं फिटलं असेल. एरवी ट्रम्प यांचा काय तोरा असतो. नर कोंबडय़ांच्या असतो तसा तुरा डोक्यावर असल्यासारखं त्यांचं वागणं असतं. तशीच नर कोंबडय़ासारखीच मान वळवतात ते. पण न्यायालयात आरोपीसारखं उभं राहायची वेळ आली आणि ट्रम्प यांचे रुंद खांदे एकदम त्या भारानं वाकले. नंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले ते.. बायडेन यांच्या अध्यक्षतेखाली अमेरिका कशी रसातळाला चाललीये वगैरे. पण तितकं तर त्यांनी बोलायलाच हवं. पण खरी गंमत ही नाही!
तर ट्रम्प यांच्यावर जी काही कारवाई झाली, त्यांच्यावर आरोपी म्हणून उभं राहायची वेळ आली यासाठी ट्रम्प यांच्या वकिलानं कोणाला बोल लावलेत?
जॉर्ज सोरोस यांना. ‘‘मला शिक्षा करायला हवी अशी इच्छा प्रकट करणाऱ्या सरकारी वकिलाची निवड थेट सोरोस यांनी केली’’, असा थेट आरोप ट्रम्प यांनी केला. या वेळी पहिल्यांदाच ट्रम्प हे सोरोस यांच्याविरोधात काही बोललेत असं नाही. याआधीही अध्यक्षपदी असताना त्यांनी सरकारसमोरील आव्हानांसाठी सोरोस यांना जबाबदार धरलं होतं. ट्रम्प यांच्या काळात स्थलांतरितांचा मुद्दा बराच गाजला. शेजारच्या मेक्सिकोतून चोरटय़ा मार्गाने अमेरिकेत येऊ पाहणाऱ्या स्थलांतरितांना अत्यंत वाईट वागणूक दिली म्हणून ट्रम्प सरकारवर टीकेची झोड उठली होती. तर त्याही वेळी ट्रम्प यांनी त्या वादाचे पाप सोरोस यांच्या माथ्यावर फोडण्याचे प्रयत्न केले. ‘‘ट्रकमधून भरभरून मेक्सिकन स्थलांतरित अमेरिकेत यावेत यासाठी सोरोस पैसे खर्च करतायत’’, असा त्यांचा आरोप होता. अमेरिकेच्या या स्थलांतरितसंदर्भातील वादाच्या मागेही सोरोसच आहेत असा ट्रम्प यांचा वहीम होता. आताही तेच. ताज्या कारवाईचे कारण सोरोस आहेत, असं ट्रम्प यांचं म्हणणं.
पाठोपाठ उद्याचे ट्रम्प म्हणून ओळखले जातात ते फ्लोरिडा राज्याचे गव्हर्नर रॉन डि’सँटिस यांनीदेखील ट्रम्प यांच्यावरील कारवाईसाठी सोरोस यांनाच बोल लावले. हे डि’सँटिस पुढच्या वर्षी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकांत रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्या अर्थी ते ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी आहेत. पण तरीही ट्रम्प आणि ते यांच्यात सोरोस यांच्या क्षमतेबाबत एकवाक्यता दिसते.
तसे हे दोघेही कर्मठ. सनातनी विचारांचे. या सनातन्यांचं एक बरं असतं. स्वत: ही मंडळी अत्यंत उच्च दर्जाचं आधुनिक आयुष्य जगतात. (खरं तर ट्रम्प यांचा संदर्भ असल्यानं भोगतात असं म्हणणं योग्य ठरलं असतं. पण अर्थाचा अनर्थही होण्याचा धोका होता त्यात. असो) आणि तरीही हे आपल्या अनुयायांना (की भक्तांना?) परंपरा, साधेपणा, संस्कृती महत्ता इत्यादी इत्यादींचे धडे देत असतात. अमेरिकेत तर सध्याचा रिपब्लिकन पक्ष बराचसा असा दुटप्पी आहे. त्यामुळे या सगळय़ांनी ट्रम्प यांच्यावरच्या कारवाईसाठी सरसकट सोरोस यांनाच बोल लावले. पण यात ट्रम्प, डि’सँटिस हेच काही अपवाद आहेत असं नाही. माजी अध्यक्ष धाकले जॉर्ज (डब्ल्यू.) बुश हेदेखील याच पक्षाचे. ट्रम्प यांच्यापेक्षा जरा बरे म्हणायचे. पण जराच. अनेक बाबतीत ट्रम्प यांच्यासारखेच ‘विद्वान’. तर त्यांनीही आपल्या अध्यक्षीय काळात सोरोस यांना काही कारणांसाठी जबाबदार धरलं होतं. विशेषत: फेरनिवडणुकीत आपणाविरोधात सोरोस यांनी कटकारस्थानं केल्याचा आरोप धाकल्या बुश यांनी केला होता.
याआधी १९९७ साली आपल्या आशियातल्या मलेशिया या देशानंही त्यांच्या आर्थिक विवंचनांसाठी सोरोस यांना जबाबदार धरलं होतं. त्यावेळचे मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहमद यांनी मलेशियासमोरच्या आर्थिक संकटामागे सोरोस यांचा हात असल्याचा जाहीर आरोप केला. योगायोगाने त्या वेळी दोघेही हाँगकाँगमध्ये होते. आर्थिक परिषदेत त्यांचा सहभाग होता. त्यात बोलताना मोहमद यांनी मलेशियातील चलन व्यापाऱ्यांवर (करन्सी ट्रेडर्स) टीकेचे आसूड ओढले. या चलन व्यापाऱ्यांना सोरोस यांची फूस असल्याचं मोहमद यांचं म्हणणं होतं.
त्याला काही आधार होता, सोरोस यांच्याविरोधात काही पुरावे होते असं काही नाही.
पण तरीही आपली सर्व संकटं ही सोरोस यांचीच करणी यावर ते ठाम होते.
तिकडे युरोपातल्या हंगेरीतही असंच. वास्तविक सोरोस हे मूळचे हंगेरीचे. यहुदी धर्मीय. युरोपातल्या अनेक देशांत यहुदी धर्मीयांनी हिटलरच्या काळात देशत्याग केला आणि हे सर्व जीव वाचवण्यासाठी आणि नशीब अजमावण्यासाठी इंग्लंड, अमेरिकेत आले. सोरोस हे अशांतील एक. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस सोरोस समजायला लागतं अशा वयाचे होते. पौगंडावस्था सोडून तारुण्यात पदार्पण होतं त्या वयात सोरोस यांना हिटलरने यहुद्यांवर केलेले अत्याचार पाहावे लागले. हंगेरी, पोलंड अशा अनेक देशांतल्या यहुदी धर्मीयांचे या काळात हालहाल झाले. असं काही अनुभवायला मिळालेले आणि मुख्य म्हणजे स्थलांतरित होऊन जीव वाचवू शकलेले अनेक जण उत्तरायुष्यात राष्ट्रवाद या भावनेचा तिटकारा करू लागतात. कडवा राष्ट्रवाद हे फॅसिझमच्या मार्गावरचं पहिलं पाऊल असतं, असं ते मानतात. विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन हे त्याचं असंच उदाहरण. सोरोस यांच्यावर आइन्स्टाईनचा प्रभाव किती हे कळायला मार्ग नाही; पण ते त्यांच्याप्रमाणे राष्ट्रवाद या भावनेचा तिटकारा करू लागले हे मात्र निश्चित. उदारमतवाद, लोकशाही ही सोरोस यांनी कायम समर्थन केलेली मूल्यं ठरली. आपल्या आर्थिक उलाढालीतून कमावलेल्या प्रचंड श्रीमंतीतला काही वाटा त्यांनी आपल्या कर्मभूमीत आणि अन्यत्रही लोकशाही मूल्यं रुजवण्याच्या सांघिक प्रयत्नांवर खर्च करायला सुरुवात केली.
हीच बाब नेमकी त्यांच्या जन्मभूमीतल्या विद्यमान राज्यकर्त्यांला आवडली नाही. हा राज्यकर्ता म्हणजे पंतप्रधान व्हिक्टर ओर्बान. हंगेरीचे हे पंतप्रधान राष्ट्रवादी आहेत. म्हणजे ‘उजवेपणा’ आलाच. टर्कीचे अध्यक्ष रिसेप एर्दोगान यांच्याप्रमाणे युरोपात उजवं वळण घेतलेला हंगेरी हा एक देश.
हे ओर्बानबाबा देशभक्त असल्याने त्यांना विरोध करणारे हे आपोआप देशविरोधी, राष्ट्रद्रोही ठरायला लागलेत. अशा मंडळींच्या नेतृत्वाखालील अन्य देशांप्रमाणे हंगेरीच्या लोकशाहीची तशी गळचेपीच होतीये. ओर्बान यांच्यामुळे त्यांच्या विचार-समर्थकांत देशप्रेमाच्या लाटांवर लाटा येत असल्याने त्यासमोर कोणी टिकतच नाही, अशी स्थिती. तशा अनेक लाटांमधली एक लाट मात्र एका मोठय़ा खडकावर आदळली.
जॉर्ज सोरोस हे त्या खडकाचं नाव. जॉर्ज सोरोस हे अमेरिकेप्रमाणे हंगेरीतही स्थलांतरितांच्या घुसखोरीचा कट करतायत, असा त्यांचा आरोप. त्या मागचं कारण अर्थातच सोरोस यांचा सहिष्णू लोकशाहीचा आग्रह. तो ते मिळेल त्या व्यासपीठावर व्यक्त करतात. खऱ्या लोकशाहीवाद्यांना आर्थिक मदत करतात. इतकंच. सोरोस काही प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणांगणात उतरून लोकशाहीविरोधी राजकीय पक्षांशी झटापट करतात असं नाही. फक्त लोकशाही विचारांना त्यांचा सैद्धान्तिक आणि त्यांच्या न्यासाचा कृतिशील पाठिंबा असतो.
पण ओर्बानसारख्या नेत्यांना हेच तर नको असतं. खऱ्या लोकशाहीपेक्षा लोकशाहीचा केवळ आभास निर्माण करून त्यावर या मंडळींचं भागत असेल आणि मुख्य म्हणजे त्यांचे नागरिक त्यावर समाधानी असतील तर इतरांना तक्रार करायचं कारण काय? ओर्बान यांनाही असंच वाटत असावं. सोरोस हे जरा जास्तच लोकशाहीवादी आहेत आणि त्यांची मतं आपल्याला टोचतायत असं लक्षात आल्यावर या ओर्बानबाबांनी काय केलं? आपल्या देशात ‘सोरोस-बंदी’ घालण्याचा निर्णय घेतला. हंगेरीत त्यामुळे २०१८ पासून ‘सोरोस रोखा’ असा कायदाच अस्तित्वात आला.
सोरोस आता जवळपास ९२ वर्षांचे आहेत. त्यांचा काही राजकीय पक्ष वगैरे आहे असं नाही. पण तरी ते अनेक देशांतल्या वयानं त्यांच्यापेक्षा किती तरी लहान नेत्यांना खलनायक वाटतात.
डोनाल्ड ट्रम्प, धाकले जॉर्ज बुश, महातीर मोहमद, व्हिक्टर ओर्बान आणि..
सोरोस यांच्या चमत्कारिक कथांत अलीकडेच एक भर पडायला आणि ट्रम्प यांनीही सोरोस यांना बोल लावायला एकच गाठ पडली.
काही काही योगायोग किती बोलके असतात!
girish.kuber@expressindia.com
@girishkuber