अमृतांशु नेरुरकर (‘चिप’-उद्योगात कार्यरत असलेले तज्ज्ञ)
रशियाचा स्पुटनिक उपग्रह (ऑक्टोबर १९५७) आणि युरी गागारिनची अंतराळभरारी (एप्रिल १९६१) यांवर मात करण्यासाठी अमेरिकेनं काय केलं?
पन्नासच्या दशकाच्या अंतापर्यंत सेमीकंडक्टर चिप क्षेत्र जरी बाल्यावस्थेतच असलं तरीही त्यात बरीच उलथापालथ झाली होती. बेल लॅब्सने ‘ट्रान्झिस्टर’चा शोध लावला होता. विविध ट्रान्झिस्टर्सचं एकत्रीकरण करून किल्बी आणि नॉईस यांनी समांतरपणे ‘इंटिग्रेटेड सर्किट’ची (आयसी) निर्मिती केली होती. एका बाजूला टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स तर दुसऱ्या बाजूला नॉईस आणि सहकाऱ्यांनी स्थापन केलेली फेअरचाइल्ड सेमीकंडक्टर या दोन्ही अमेरिकी कंपन्या चिपनिर्मितीच्या अभियांत्रिकी प्रक्रियेत गुंतल्या होत्या. निर्वात नलिकेपेक्षा सेमीकंडक्टर चिप ही कार्यक्षमता, सुटसुटीतपणा, देखभाल, टिकाऊपणा अशा सर्वच मानकांवर किती तरी पटीने श्रेष्ठ उत्पादन आहे याबाबतीत कोणाचंच दुमत नसलं तरीही चिप उद्योगाच्या वेगवान वाटचालीसाठी महत्त्वाच्या असलेल्या दोन गोष्टी अजूनही अनुत्तरितच होत्या.
चिपचं किफायतशीर पद्धतीनं मोठया प्रमाणावर उत्पादन कसं करायचं हा पहिला प्रश्न! चिपनिर्मितीचा खर्च एवढा अवाढव्य होता की कमी प्रमाणात चिपचं उत्पादन हा आतबट्टयाचा व्यवहार ठरला असता आणि असं असताना कोणतीही कंपनी अशा धंद्यात उतरणं आणि उतरली तरी फार काळपर्यंत टिकणं कठीणच होतं. अमेरिकी शासनाचा नवउद्यमींना पािठबा असला तरीही एकंदरच अमेरिकेचा भांडवलशाहीवर दृढ विश्वास असल्यानं सरकारी अनुदान, करकपात अशा पद्धतीची शासकीय मदत मिळण्याची शक्यता दुरापास्त होती. अशा वेळेला चिपचं उत्पादन सातत्यपूर्ण आणि मोठया प्रमाणात करण्याशिवाय पर्याय नव्हता.
हेही वाचा >>> संविधानभान : संविधानाची प्राणप्रतिष्ठा
दुसऱ्या बाजूला जरी प्रचंड संख्येनं चिपचं उत्पादन केलं गेलं तरी अशा मोठया प्रमाणावर निर्मिल्या गेलेल्या चिपची खरेदी कोण करणार हा यापुढचा प्रश्न. सेमीकंडक्टर पदार्थामागील भौतिकी विज्ञानच एवढं नवं होतं की त्यापासून बनलेल्या चिपचा योग्य वापर करण्यासाठी कोणतंही उत्पादन बाजारात उपलब्ध नव्हतं. आणि अर्थशास्त्राच्या नियमानुसार जर एखाद्या पदार्थाला विशेष मागणीच नसेल तर त्याचं उत्पादन, वितरण आणि पुरवठा करण्यासाठी कोणतीही संस्था किंवा कंपनी तयार होण्याची शक्यताच नव्हती. म्हणजेच या क्षेत्रापुढचे हे दोनही यक्षप्रश्न कोंबडी आधी की अंडं या प्रश्नासारखे एकमेकांत गुंतलेले होते.
पन्नासच्या दशकाच्या अंतापर्यंत अमेरिकेत चिप उद्योग अनिश्चिततेच्या गर्तेत अडकला होता. सेमीकंडक्टर विज्ञान पुढे जात होतं पण चिपचा योग्य वापर नक्की कशासाठी करायचा हे पुरेसं स्पष्ट होत नव्हतं. अशा वेळेला अत्यंत अनपेक्षितपणे अमेरिका व रशिया या तत्कालीन महासत्तांमध्ये सुरू असलेलं शीतयुद्ध चिप उद्योगाच्या मदतीला धावून आलं.
४ ऑक्टोबर १९५७ रोजी सोव्हिएत रशियाने आपला ‘स्पुटनिक’ हा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केला. तशी १८००० मैल अशा प्रचंड वेगानं पृथ्वीप्रदक्षिणा करणाऱ्या या लहानशा उपकरणानं अमेरिकी शासन, लष्कर व अमेरिकेची अंतराळ विज्ञान संस्था ‘नासा’ या सर्वांचीच झोप उडवली. हा उपग्रह रशियानं आपल्यावर पाळत ठेवण्यासाठी बनवला आहे याची अमेरिकी सरकार व समाज या दोघांनाही खात्री पटू लागली. चारच वर्षांनी, १२ एप्रिल १९६१ रोजी रशियानं अंतराळक्षेत्रात आणखी एक शिखर पादाक्रांत केलं; जेव्हा रशियन अंतराळवीर युरी गागारिन यानं पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करून अंतराळात जाणारा पहिला मानव म्हणून नाव मिळवलं. तंत्रज्ञानात आपण रशियाच्या लक्षणीयरीत्या मागे पडत आहोत याची जाणीव अमेरिकी नेतृत्वाला प्रकर्षांने व्हायला लागली.
रशियावर कुरघोडी करण्यासाठी आणि अमेरिकी प्रसारमाध्यमं व समाजाकडून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून यानंतर वर्षभरातच १९६२ साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडींनी, साठचे दशक संपायच्या आतच अमेरिकी माणूस चंद्रावर पाऊल ठेवेल अशी घोषणा केली. तर नासाने या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी ‘अपोलो मिशन’ची सुरुवात केली. पण पृथ्वीवरून अंतराळवीरांना घेऊन चंद्र गाठण्यासाठी अंतराळयानाला अत्यंत जटिल अशी गणितीय प्रारूपं व समीकरणं प्रचंड मोठया संख्येनं सोडवायला लागणार होती. इतकी गणनक्षमता असणारं तंत्रज्ञान नासाकडे निश्चितच उपलब्ध नव्हतं. इथेच बॉब नॉईस आणि गॉर्डन मूर या फेअरचाइल्ड सेमीकंडक्टरच्या प्रवर्तकांना चिप तंत्रज्ञान मोठया प्रमाणात आणि बराच काळपर्यंत खरेदी करू शकेल असा संभाव्य ग्राहक दिसला.
हेही वाचा >>>लालकिल्ला : भाजपच्या निवडणूक प्रचाराची रंगीत तालीम
मानवाला चंद्रावर पाठवून अंतराळ तंत्रज्ञानाच्या शर्यतीत अमेरिकेला रशियाच्या चार पावलं पुढे नेण्यासाठी सरकारनं नासावर निधीची खैरात केली होती. नासानं या मिशनसाठी लागणाऱ्या संगणकाची निर्मिती करण्याचं काम ‘एमआयटी इंस्ट्रुमेंटेशन लॅब’ या इलेक्ट्रॉनिक व संगणकीय संशोधन क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेकडे सोपवलं होतं. एमआयटी लॅबच्या तंत्रज्ञांनी अंतराळयानाच्या संगणकासाठी निर्वात नलिका वापरण्याचा पर्याय आधीच रद्दबातल ठरवला होता. निर्वात नलिकांमुळे संगणक अवजड तर झाला असताच पण त्याची जागेची आणि विजेची भूक भागवणं अंतराळयानासाठी अशक्यकोटीतील गोष्ट होती. अशानं अपोलो यानाला चंद्रावर पोहोचणं तर सोडाच पण पृथ्वीच्या वातावरणाला छेदणंही शक्य झालं नसतं.
फेअरचाइल्ड सेमीकंडक्टर ही तेव्हा खरं तर एक नवउद्यमी कंपनी (‘स्टार्ट-अप’) होती. तिच्या सहसंस्थापकांनी नुकताच तिशीत प्रवेश केला होता तर कंपनीत नोकरी करणाऱ्या अभियंत्यांचं सरासरी वय केवळ पंचवीस – सव्वीसच्या जवळपास होतं. असल्या नवथर कंपनीवर वा तिच्या उत्पादनावर नासा, एमआयटी लॅबसारख्या बलाढय संस्था त्यांच्या सर्वात गुंतागुंतीच्या प्रकल्पासाठी कशा काय विसंबून राहू शकणार! पण गुणवत्ताधारित व्यवस्थेसाठी ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेनं याही वेळेला निवडीचे निकष पूर्णत: वस्तुनिष्ठ ठेवले.
फेअरचाइल्डची ‘मायक्रोलॉजिक’ चिप तेव्हा नुकतीच बाजारात आली होती व इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून त्या चिपच्या कार्यक्षमतेबद्दल सकारात्मक परीक्षणं लिहून येत होती. त्याचबरोबर कंपनीच्या लहान आकारामुळे ती नासा किंवा एमआयटीसारख्या संभाव्य मोठया ग्राहकाला उत्तम प्रतिसाद देईल अशी खात्री या संस्थांच्या नेतृत्वाला वाटत होती. जेव्हा एमआयटी लॅबकडून फेअरचाइल्डला तिच्या चिपसंदर्भात चर्चेसाठी निमंत्रण आलं तेव्हा नॉईसनं या संधीचं सोनं करून एमआयटीच्या तंत्रज्ञांसमोर अत्यंत प्रभावी सादरीकरण केलं. मायक्रोलॉजिक चिपच्या वापरामुळे संगणकाचा आकार व वजन तर कमी होईलच पण चालवण्यासाठी वीजही निर्वात नलिकेच्या तुलनेत अत्यंत कमी लागेल हे नॉईसनं ठासून सांगितलं.
अंतराळयानाला चंद्रावर जाण्यासाठी त्यातल्या संगणकाला अनेक दिवस अविरतपणे काम करणं भाग होतं. अगदी एका सेकंदासाठीदेखील संगणक बंद पडणं किंवा एखादी गणनक्रिया योग्यरीत्या पार न पडणं हेही या मोहिमेच्या अपयशाला कारणीभूत ठरलं असतं. मायक्रोलॉजिक चिपच्या अथकपणे काम करत राहण्याच्या क्षमतेसंदर्भात एमआयटी तंत्रज्ञांच्या सर्व प्रश्नांचं यथायोग्य निराकरण नॉईसनं केलं. अखेरीस फेअरचाइल्डची ही चिप अपोलो यानाच्या संगणकासाठी सर्वोत्कृष्ट पर्याय आहे हे एमआयटी तंत्रज्ञांच्या गळी उतरवण्यात नॉईस यशस्वी झाला.. त्यानं एमआयटीकडून मायक्रोलॉजिक चिपचं एक भलं मोठं आणि दीर्घकाळासाठी चालू राहणारं असं कंत्राट आपल्या पदरी पाडून घेतलं.
आणि म्हणतात ना ‘द रेस्ट इज हिस्टरी’! नासा आणि एमआयटी यांनी दिलेल्या या एका कंत्राटाने फेअरचाइल्ड सेमीकंडक्टर या स्टार्ट-अपचं इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील एका मुख्य प्रवाहामधल्या कंपनीमध्ये रूपांतर झालं. पन्नासच्या घरात असलेली कंपनीतील अभियंत्यांची संख्या हजारावर पोहोचली तर महसूल जवळपास चाळीस पटींनी (५ लाख डॉलरवरून थेट २१० लाख डॉलर) वाढला. आणि हे सर्व परिवर्तन एमआयटीशी करार अंतिम झाल्यापासून केवळ दोन वर्षांत घडलं होतं.
फेअरचाइल्डपासून प्रेरणा घेत पुढे टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स (टीआय) ही चिपउद्योगातील आद्य कंपनीदेखील अमेरिका व रशियात सुरू असलेल्या शीतयुद्धाची लाभार्थी ठरली. फरक एवढाच होता की टीआयनं आपलं लक्ष अंतराळविज्ञानाऐवजी अमेरिकी लष्करावर (विशेषत: हवाई दलावर) केंद्रित केले. त्यावेळेस अमेरिकी हवाई दलाला आपल्या ‘मिनिट-मॅन’ क्षेपणास्त्राची अचूकता वाढवण्यासाठी अधिक गणनक्षमता करू शकणाऱ्या व वजनाला हलक्या अशा तंत्रज्ञानाची गरज होती. हवाई दलाची ही गरज टीआयसाठी सुवर्णसंधी ठरली. एका क्षेपणास्त्राकरिता म्हणून सुरू झालेली ही सेमीकंडक्टर चिपची गरज पुढे एवढी वाढली की साठच्या दशकाच्या मध्यावर अमेरिकी हवाई दल चिपचा सर्वात मोठा ग्राहक ठरलं. १९६५ मध्ये जगभरात विक्री झालेल्या चिपमध्ये तब्बल ६० टक्के वाटा हा एकटया अमेरिकी हवाई दलाचा होता. शीतयुद्धाचा कालखंड जागतिक स्थैर्यासाठी कितीही तणावपूर्ण असला तरीही सेमीकंडक्टर चिपउद्योगासाठी मात्र भरभराटीचा होता असं खात्रीनं म्हणता येईल.
amrutaunshu@gmail.com