मंगळवेढय़ातील शेतकऱ्यांनी काढला शिरोळमध्ये द्राक्ष शेतीचा विमा
दत्ता जाधव
पुणे : मंगळवेढा तालुक्यातील सलगरे गावातील शेतकऱ्यांनी केलेल्या उपद्व्यापामुळे विमा कंपनी आणि कृषी खातेही चक्रावले आहे. त्यांनी शिरोळमधील जमीन भाडेकराराने घेतल्याचे दाखवून तिथे द्राक्ष शेतीवर विमा काढला आहे. मूळ मालक या सर्व घडामोडींविषयी अंधारात आहेत.ऊस शेतीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या शिरोळ (जि. कोल्हापूर) तालुक्यातील आलास या गावातील ३६ शेतकऱ्यांनी द्राक्ष पिकाचा विमा काढल्याचे समोर आल्यानंतर विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांचेही डोळे पांढरे होण्याची वेळ आली. प्रत्यक्षात शेतीत ऊस होता. प्रत्यक्षात तलाठी आणि कृषी साहाय्यकांनी तपासणी केली असता तिथे द्राक्षपिके नव्हे, तर ऊस असल्याचे दिसून आले. संबंधित बोगस शेतकऱ्यांपैकी काहींनी आपण मूळ शेतकरी असल्याचे तर काहींनी ती भाडेकराराने घेतल्याची कागदपत्रे सादर केली होती. हे सर्व बोगस शेतकरी मंगळवेढय़ातील असल्याचे समोर आले आहे.
सांगलीच्या जतमधील शिवानंद नागाप्पा निला या शेतकऱ्याला संशय आल्यानंतर माहितीच्या अधिकाराखाली आपल्या शेताची पीक विम्याबाबतची माहिती मागविली होती. प्रत्यक्षात शेतीत काहीच नसताना त्यांच्या शेतीत शावरासिद्ध दुधगी यांनी लिंबाची बाग असल्याचे दाखवून २०२१पासून पीक विम्याचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. तपासणीनंतर लबाडी उजेडात आल्यानंतर त्यांनी १ लाख ५८ हजारांची रक्कम विमा कंपनीला परत केली आहे. त्यांनी भाडेकराराने जमीन घेतल्याचे दाखवून डाळिंब, द्राक्षे आणि लिंबू पिकाचा विमा काढून विमा रक्कम परस्पर हडप केली आहे. ती विमा रक्कम सुमारे ३२ लाखांच्या घरात आहे. जमीन भाडेकराराने घेतल्याचे दाखवून ही फसवणूक केली आहे.
शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर या गावात असा प्रकार झाला आहे. संशय आल्यानंतर पीक विमा कंपनीकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे. अंतिम अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. – जालिंदर पांगरे, अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी, सांगली.