गेली अनेक वर्षं पत्रकारितेतली उच्च पदं भूषवलेल्या आणि स्वत:ला आंबेडकरवादी मानणाऱ्या दिलीप मंडल यांनी ९ जानेवारीपासून अशा आशयाच्या पोस्ट केल्या की, ‘‘फातिमा शेख नावाची कुणीही व्यक्ती अस्तित्वात नव्हती. मीच ही काल्पनिक स्त्री निर्माण केल्यामुळे तिच्या व्यक्तिरेखेचा डोलारा उभा राहिला. मी हा कबुलीजबाब दिल्यामुळे तिचं अस्तित्व नष्ट होईल. गतकाल हा बनवता येतो, मोडता येतो. याचं उदाहरण म्हणून माझ्या कर्तृत्वाचा अभ्यास माध्यमतज्ज्ञांनी करायला हवा.’’ मंडल हे अनेक वर्षं उजव्या राजकारणावर प्रखर टीका करत असत. २०२२ मध्ये त्यांनीच फातिमा शेख यांना न्याय मिळावा असा लेखही लिहिला होता. गेल्या वर्षी माहिती आणि प्रसारण मंत्रालयात वरिष्ठ सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती झाली तेव्हापासून त्यांनी अनेक वैचारिक कोलांटउड्या मारल्या आहेत.स्वत:च्या धादांत खोटेपणाची कबुली देणाऱ्या या माणसावर टीका होण्याऐवजी सत्यशोधक समाजाचा विचार मानणाऱ्या आणि एकूणच पुरोगामी मानल्या गेलेल्या लोकांवर समाजमाध्यमांतून टीकेची झोड उठली. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी महाराष्ट्रीय माणसांना आधुनिकतेकडे नेलं. या सहकाऱ्यांच्या अनेक नावांमध्ये फातिमा शेख यांचंही नाव साधारण १९९० पासून संशोधकीय लिखाणात दिसू लागलं. १९८८ मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळानं प्रकाशित केलेल्या सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मयात सावित्रीबाईंनी नायगावमधून जोतिरावांना १८५६ मध्ये लिहिलेलं पत्र उद्धृृत केलेलं आहे. त्यात ‘मी परिपूर्ण दुरुस्त होताच पुण्यास येईन. काळजीत असू नये. फातिमास त्रास पडत असेल पण ती कुरकुर करणार नाही. अस्तु.’ असं लिहिलं आहे. या वाक्यावरून आपल्याला हे समजतं की सावित्रीबाईंची फातिमा नावाची कुणी विश्वासू सहकारी असावी, की जिच्या खांद्यावर सावित्रीबाई आपल्या अनुपस्थितीत बरीच जबाबदारी देऊ शकत होत्या. महात्मा फुले यांना वडिलांनी घर सोडायला लावल्यानंतर आपल्या घरी आश्रय देणारे त्यांचे मित्र उस्मान शेख यांची फातिमा ही बहीण असावी अशा तर्कानुसार अनेक देश-विदेशातल्या लेखकांनी फातिमाचं आडनाव शेख असल्याचे उल्लेख केले. तेच नाव रूढ झालं.

हेही वाचा : तळटीपा : आत्मलुब्धांचं वर्गचरित्र!

फुले दाम्पत्याला शैक्षणिक कार्यात मदत करणारी स्त्री ही शिक्षिका असणार या तर्कानुसार त्या शिक्षिका असल्याचेही उल्लेख केले गेले. सिंथिया फरार यांच्या देखरेखीखाली सावित्रीबाईंनी शिक्षणशास्त्राचं प्रमाणपत्र मिळवलं. त्यांच्यासोबतच फातिमा यांनीदेखील हे शिक्षण घेतल्याचा तर्क रूढ झाला. बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातही या आशयाचा सचित्र धडा समाविष्ट केला गेला.या सगळ्याच्या मुळाशी असणाऱ्या ‘सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मया’च्या अस्सलपणा आणि विश्वासार्हतेबाबत अनेक अभ्यासकांनी १९८०च्या दशकातच प्रश्न उपस्थित केले होते. परंतु शासकीय संस्थेकडून हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर ते बरेचसे शमले. पण आता मंडल यांच्या विधानांमुळे सत्य, असत्य आणि विश्वासार्हता हे मुद्दे ऐरणीवर आले. फातिमा या काल्पनिक व्यक्तीचं गुणगान करणारे लोक सावित्रीबाईंच्या थोरवीला झाकोळून टाकतील अशी भीती व्यक्त केली गेली. शिवाय या काल्पनिक स्त्रीची भलावण करणाऱ्या लोकांनी आणखीनही खोट्या व्यक्तींचे डोलारे उभे केले असणार असा या टीकेचा रोख होता. इथे खुद्द टीका करणाऱ्यांच्या विश्वासार्हतेबाबत काही बोलणं हा व्यक्तिगत हल्ला ठरेल, त्यामुळे तो मुद्दा बाजूला ठेवू. उपलब्ध पुरावे पाहता बहुसंख्य माणसांनी फातिमाबींच्या व्यक्तिरेखेबाबत डोळस चौकशी न करता सश्रद्धपणा दाखवला हे मान्य करावं लागेल. चिकित्सा हा आधुनिक विचारांचा पाया असताना या व्यक्तिरेखेच्या बाबतीत पुरेशी चिकित्सा केली गेली नाही. धर्मनिरपेक्षतेच्या मूल्याला साजेशा ठरणाऱ्या या कथनाच्या बाबतीत अधिक चिकित्सकपणा करणं गरजेचं होतं. ९ जानेवारी रोजी फातिमाबींची जयंती साजरी केली जाऊ लागली, तेव्हा प्रा. हरी नरके यांनी असा संशोधकीय चिकित्सेचा विचार करून फातिमाबींच्या जयंतीदिनाबाबत तसे प्रश्न तीन-चार वर्षांपूर्वीच उपस्थित केले होते. जयंतीच्या संयोजकांनी या तारखेची नक्की माहिती उपलब्ध नसल्याने सावित्रीबाई आणि जिजाऊंच्या जयंतीच्या मधला दिवस प्रतीकात्मक महत्त्व देण्यासाठी निवडला असल्याचं लगेच स्पष्टही केलं होतं. आपल्या देशात ऐतिहासिक नोंदींच्या अभावी सामान्यांचे आणि थोरांचेही जन्मदिवस माहीत नसतात. त्यामुळे असा जन्मदिवस दिला जाणं ही गोष्ट नवीन नाही. फातिमाबींच्या जन्मदिवसाबाबत इतकी प्रामाणिक कबुली बऱ्याच दिवसांपूर्वीच दिलेली असताना यावर्षी ९ जानेवारीला फातिमा शेख ही व्यक्तीच काल्पनिक असल्याची घोषणा अचानक आलेली नाही. गेल्या काही वर्षांपासून फातिमा आणि मुक्ता साळवे या फुले दाम्पत्याच्या शैक्षणिक कार्याशी जोडलेल्या दोन समर्थ स्त्रियांच्या अस्तित्वाबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. मुक्ता साळवेंनी लिहिलेला ‘मांगमहारांच्या दु:खाविषयी निबंध’ हा मिशनरी लोकांच्या ‘ज्ञानोदय’ या वृत्तपत्रात १८५५ मध्ये प्रकाशित झाला होता. हेही अंक राज्य मराठी विकास संस्थेने प्रकाशित केले आहेत. तरीही त्यांचं आडनाव साळवे असल्याचे पुरावे नाहीत, त्यांच्या अस्तित्वाचे पुरावे नाहीत असे आक्षेप घेतले गेले. परंतु लहूजी साळवे यांच्या कुटुंबातील मुक्ता साळवेंनी पुढे पुण्यातल्या सरकारी शाळेत मुख्याध्यापक पद भूषवलं आणि त्यांचा पुणे मातंग समाजाने योग्य तो गौरव केला. याबाबतचे पुरावे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इतिहास विभागात एमए करणाऱ्या ओम बोडले या चिकाटीच्या संशोधकाने शोधले. २०२३ मध्ये ते प्रकाशितही केले. त्यामुळे या दिव्यामधून मुक्ता साळवेंचं नाव तावूनसुलाखून निघालं. इतिहासाची वाटचाल थांबत नसते. पुढे कुणाला कदाचित फातिमाबींच्या व्यक्तिमत्त्वाची माहिती मिळू शकेल. आपण भाबडेपणाची सोयिस्कर वाट सोडून आत्मचिकित्सा करण्याची गरज वर नोंदवलेली आहेच. पण त्यामुळे शंकासुरांच्या शंका निरागस ठरत नाहीत. त्यांचा खरा रोख आहे तो सत्यशोधक आणि एकूणच पुरोगामी चळवळींच्या स्वरूपावर. या चळवळी काही विशिष्ट जातींच्या पुरत्या मर्यादित आहेत, किंबहुना त्यात मुस्लीम आणि बहुजन समाजातले सगळे लोक सामील नाहीत हे दाखवण्यासाठी ही वगळणुकीची धडपड आहे. पण इतिहास सांगतो की, सावित्रीबाई फुले आणि जोतिरावांच्या अंगीकृत कार्यात अनेक मुस्लीम व्यक्तींनी सक्रिय सहभाग घेतल्याचे सबळ पुरावे आहेत.

हेही वाचा : काळाचे गणित : सरकती संक्रांत

जोतिरावांचं शिक्षण वडिलांनी थांबवलं, तेव्हा मुन्शी गफ्फार बेग यांनी वडिलांची समजूत काढून त्यांचं शिक्षण पुन्हा सुरू केलं. १८७४ साली जेव्हा फुले दाम्पत्यानं एका आंतरजातीय विवाहासाठी पुढाकार घेतला, तेव्हा मीठगंज पेठेतल्या मोमीन मंडळींनी इतर सत्यशोधकांच्या बरोबरीनं हा आंतरजातीय विवाह निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी खूप मदत केली हे सत्यशोधक समाजाच्या रिपोर्टात कृतज्ञतेनं नोंदवलेलं आहे. ‘दीनबंधु’ या वृत्तपत्राच्या अनेक अंकांमध्ये मुस्लीम माणसं सत्यशोधकांच्या सभांना हजर असल्याचे पुरावे आहेत. ‘मुंबई वैभव’ या वृत्तपत्रानुसार १८९३ मधल्या मुंबईतल्या हिंदू-मुस्लीम दंग्यानंतर शांततेसाठी आनंदमेळावा भरवण्याकामी नारायण मेघाजी लोखंडेंच्या बरोबरीनं मुस्लीम समाजातील मुंबई हायकोर्टाचे सॉलिसिटर मिर्झा हुसेन खान, अमलदार सरदार मीर जाफर अली, दाऊदभाई मूसाभाई, जे. पी., शेठ फकीर अहमद अशा अनेकांनी हातभार लावला होता. सत्यशोधक चळवळीत हिंदूंमधल्या विविध जातींसोबतच मुस्लिमांचाही सहभाग असल्याने तिच्या बहुसांस्कृतिकतेचे असंख्य पुरावे उपलब्ध आहेत. हा देश बहुसांस्कृतिक पद्धतीनं जगत आला आहे. त्याबाबत शंका उभ्या करून या पद्धतीला आव्हानं दिली जाणं हे नवीन नाही. त्या आव्हानांचा सामना सत्याच्या भक्कम अधिष्ठानावर पाय रोवूनच करता येईल. दखनी कवी वली औरंगाबादी (१६८३-१७३०) म्हणतो-‘है नक्श किनारी का तेरे जामे के ऊपर, ऐ हिन्द के बाके। दामन कूं तेरे हाथ लगा कौन सकेगा, नै जोर नै ताकत। हे हिन्द, तुझ्या वस्त्राच्या काठांवर सुंदर नक्षी आहे. तुझ्या पदराला हात घालायची शक्ती कुणात आहे? कुणाकडेही तितकी शक्ती, तितका जोर नाही. मग फातिमा शेख यांच्या अस्तित्वाबाबत वादंग का उठतो? तर या बाबतीत ऐतिहासिक स्मृतीची मोडतोड केली गेली आहे हे कारण स्पष्टच आहे. आधी एकतर काही माणसांच्या त्या त्या वेळच्या आकांक्षांना सोयिस्कर ठरेल अशा पद्धतीनं एक मिथक घडवलं गेलं. आणि आतादेखील व्यक्तींच्या सध्याच्या महत्त्वाकांक्षेला सोयीचं पडेल अशा पद्धतीनं ते मिथक मोडण्याची तारांबळ केली जात आहे. हे सरळसरळ स्मृतींवरून केलं जाणारं राजकारण आहे. वैचारिक भूमिकांच्या दोनही टोकांवरच्या श्रद्धाळू भक्तजनांनी जरासं थांबून विचार केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीची थोरवी मान्य करणं हे धोकादायक असतं हा धडा यानिमित्तानं घेता येईल.

shraddhakumbhojkar@gmail.com

Story img Loader