अख्ख्या १९७५ या सालाचे उत्खनन केल्यास काय सापडते? त्या वर्षाच्या २५ जूनपासून आणीबाणी लागल्याचा इतिहास जसा गोंदला गेला, तसा इतर अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक संदर्भांचा गुंतासमुच्चय हाती लागतो. या सालाच्या आगेमागे हिंदी आणि मराठी प्रकाशनविश्वात लगदी साहित्याने व्यवसायाचा परमोच्चबिंदू गाठला होता. त्याचे तात्कालिक कारण म्हणजे, जेम्स हेडली चेस आणि इयन फ्लेमिंग यांच्या कादंबऱ्यांच्या मूळ आणि अनुवादित कादंबऱ्यांचा सुळसुळाट वाढला होता. हिंदीमध्ये ओमप्रकाश शर्मा, वेदप्रकाश कंबोज, परशुराम शर्मा, सुरेंद्र मोहन पाठक यांच्या वेगवान कथानकांची पॉकेट बुक्स देशभरातील रेल्वे स्थानकांवरल्या पुस्तक-ठेल्यांतून विक्रीचे विक्रम रचत होती. मराठीत गुरुनाथ नाईक (गरुड कथा), शरश्चंद्र वाळिंबे (इंद्रजीत), दिवाकर नेमाडे (आकिंचन), एस.एम. काशिकर (नाइटकिंग) असे नायक वाचकप्रिय होत होते… या काळातील इंग्रजी, हिंदी, मराठी पल्प फिक्शनमधील साम्य हे त्यांच्या ‘अँग्री यंग मॅन’ नायकांत होते.

तस्करी हा मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर चालणारा मुख्य उद्याोग होता. त्या वेळी त्याला ‘दांडचोरी’ हा शब्द रूढ होता. श्री. दा. पानवलकर यांच्या कथांतून तो शब्द ओझरताच वापरला गेला. पण भानू शिरधनकर यांच्या ‘कस्टमला झुकांडी’ या पुस्तकात द. ग. मुगवे या कस्टम अधिकाऱ्याने केलेल्या दांडचोरांवरच्या कारवाया ग्रथित झाल्या आहेत. याच वर्षात श्रीकांत सिनकर यांचे गुन्हेगारी लेखन (मनोहर कहानियाँ आणि सत्यकथा या हिंदी मासिकांतले) हा देशातील सर्वाधिक मानधनाचा ऐवज मानला जात होता. या सर्वांची वाचनझलक जरी घेतली तरी १९७५ साली सलीम-जावेद यांच्या सिनेमातील देमार फॉर्म्युला लक्षात येऊ शकेल. पोलिसी कारवायांनी किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नायकांना लोकप्रिय बनविणारे (दीवार, शोले) हे वर्ष होते.

पण नेमका याच वर्षात विनोदभोळा अमोल पालेकरही ‘छोटीसी बात’मधून लोकांनी डोक्यावर घेतला. प्रेमगीतांनी लदलेल्या आणि प्रेमरोगाचे दुष्परिणाम दाखवून देणाऱ्या ‘ज्यूली’ चित्रपटाचा जन्मही याच वर्षातला. गोड-गुलाबी ‘खेल खेल में’, लाडी-गोडीचे वाकडे-तिकडे नृत्य करीत ‘रुक जाना ओ जाना हमसे दो बातें’ गाणाऱ्या देव आनंदचा ‘वॉरंट’ही त्याच वर्षातला. ‘जमीर’, ‘चोरी मेरा काम’, ‘जख्मे’, ‘धर्मात्मा’, ‘काला सोना’ आदी ‘ढिशूम ढिशूम’ हे आवाज हाणामारीत वापरणारे चित्रपट या वर्षात गाजले.

‘दीवार’मधील पीटरच्या गोदामात घुसून त्याला आतून स्वत: टाळे लावत, पीटरच्या पंटर्सना तुडवत तुडवत एका ठिकाणी पराभूत पदाजवळ पोहोचणारा विजय (अमिताभ बच्चन) आपल्या गळ्यावर रोखलेल्या दोऱ्या अर्धा डझन माणसांसह उलथवून लावताना काश्मीर ते कन्याकुमारीच्या प्रेक्षकांना टाळ्या पिटण्यासाठी भाग पाडत होता. पुढल्या दीड-दोन दशकांत या प्रेक्षकांना या चित्रपटाने फक्त आणि फक्त अमिताभ बच्चनला मोठे करण्याचा उद्देश देऊन टाकला होता. अॅण्टीहीरो वगैरेच्याही पुढला- नैतिक अपेक्षांच्या पलीकडला नायक उभारून त्याला महानायक करणारा फॉर्म्युला ‘दीवार’ने १९७५ मध्ये दिला.

पण तरीही या सर्व गल्लाभरू किंवा ‘सुपरड्युपर हीट’ चित्रपटांच्या वर्षात सर्वाधिक कमाई केली ती भलत्याच चित्रपटाने. २५ लाख रुपये इतक्या कमी बजेटवर बहुतांशी चित्रनगरीत चित्रित झालेल्या आणि अनोळखी कलाकार-गायक असलेल्या ‘जय संतोषी माँ’ या चित्रपटाने पाच कोटी इतकी थक्क करणारी कमाई केली होती. उषा मंगेशकर यांचे अखिल भारताने सर्वाधिक ऐकलेले गाणे ‘मै तो आरती उतारू रे संतोषी माता की’ हे आहे. जे आजही नवरात्रातील कर्ण्यावरचे पसंत गाणे आहे. धार्मिक पुस्तके आणि लोककथांना घेऊन तयार केलेल्या या चित्रपटातील कानन कौशल, भारत भूषण, अनिता गुहा हेच काय ते ओळखीचे चेहरे. बाकी यातल्या चमत्कार, पूजाअर्चा गीते यांनी तिकीटबारीवर धुमाकूळ घातला. शुक्रवारी उपवास करणारा पंथ देशभरात तयार झाला आणि ‘संतोषी माता’चे भक्त उत्तरोत्तर वाढत गेले. या चित्रपटाची आजच्या आधुनिक युगातील यूट्यूबवरची प्रेक्षकसंख्या पाहिली तरी दशलक्षांच्या आकडेवारीतच दिसते. इतक्या वैविध्यपूर्ण तसेच चित्रपटसृष्टीसह समाजावर परिणाम करणारे चित्रपट १९७५ या सालात प्रदर्शित झाले. त्यांच्या कथा, गाणी, संवाद, अभिनय यांचा ठसा पुसता येणे अशक्य. एकाच वेळी ‘देमार’ आणि ‘देव्हार’पटांचे असे वर्ष हिंदी चित्रसृष्टीत पुन्हा अवतरू शकत नाही, म्हणूनच या चित्रपटांच्या पन्नाशीच्या दुव्यासह अर्थसंकल्प साजरा करण्याचा आजचा अट्टहास.

Story img Loader