आधी प्रयागराजच्या न्यायदेवेश्वरांनी पीडितेची कुंडली सादर करण्याचा दिलेला आदेश व आता गांधीनगरच्या न्यायकर्त्यांनी पीडितेला मनुस्मृती वाचण्याच्या सल्ल्याने पक्षाच्या न्यायिक सेलचे प्रमुख खुशीत होते. कनिष्ठ स्तरावरच्या न्यायकर्त्यांमध्ये परिवाराने केलेल्या प्रचाराचे ‘अमृत’ बऱ्यापैकी भिनले आहेच. आता विभाग व राज्यस्तरावरच्या कर्त्यांचा प्रवाससुद्धा त्याच दिशेने सुरू झालेला. प्रश्न उरला तो दिल्लीचा. येत्या एकदोन वर्षांत तिथेही असेच चित्र असेल. पण त्याआधी ‘नवी न्याय संहिता’ तयार ठेवायला हवी असा विचार करून ते शाईची दौत व टाक घेऊन भराभर लिहू लागले. ‘नव्या न्यायदान प्रक्रियेत कायद्यासोबतच धर्मशास्त्र, मनुस्मृती, भविष्यशास्त्र, पौराणिक कथा यांचा अभ्यास करणे अनिवार्य असेल. न्यायिक इमारतीत प्रवेश करणाऱ्या सर्वाना केशरी किंवा लाल टिळा कपाळभर लावणे बंधनकारक असेल. न्यायिक परिसरात वर उल्लेख केलेल्या शास्त्रांच्या पुस्तकांचे ग्रंथालय उभारणे अनिवार्य! न्यायदानकर्त्यांची नेमणूक तसेच शपथविधीची वेळ मुहूर्त पाहूनच निश्चित केली जाईल. त्यांनी या पौराणिक ग्रंथांना स्मरून शपथ घेतली तर सरकारदरबारी त्याची विशेष नोंद घेतली जाईल. विधि शिक्षण संस्थांमध्ये मनुस्मृती व भविष्यशास्त्र शिकणे बंधनकारक केले जाईल. नवी संहिता अंगवळणी पडेपर्यंत प्रत्येक न्यायिक दालनात या विषयाचे तज्ज्ञ नेमले जातील व ते न्यायदानाच्या वेळी मदत करतील. आरोपीला शिक्षा देण्याआधी त्याच्या कुंडलीत राज, लक्ष्मी, प्रवास व मृत्युयोग यापैकी काय आहे हे तपासले जाईल व त्यानुसारच निवाडा दिला जाईल.
न्यायदेवेश्वरांना कुंडलीच्या इच्छेविरुद्ध वागता येणार नाही. मंगळ असलेल्या स्त्रीचे प्रकरण सुनावणीला घेण्यापूर्वी तिला रुईच्या झाडाशी विवाह करून मंगळमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल. वादी व प्रतिवादीची कुंडली बघूनच सुनावणीच्या तारखा निश्चित केल्या जातील. अनेकदा प्रतिवादी सरकार असते. अशा वेळी ज्या खात्याशी संबंधित प्रकरण आहे त्या खात्याची कुंडली काढून तारखेचा निर्णय घेतला जाईल. पाश्चात्त्यांचा प्रभाव असलेल्या कायद्यांमुळे न्यायदानास उशीर होतो. हे लक्षात घेऊन सत्वर न्याय देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या वकिलांनी युक्तिवाद करताना पौराणिक कथा, मनुस्मृतीचे दाखले देणे बंधनकारक ठरवले जाईल. समाजावर अनिष्ट परिणाम करणाऱ्या गुन्ह्यात निकाल देताना धर्म व समाज यात योग्य संतुलन राखले जाईल याचे भान न्यायकर्त्यांला ठेवावे लागेल. मनुस्मृतीत स्त्रीला देवी ठरवतानाच तिच्या शिक्षणाला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे स्त्रीविषयक प्रकरणे हाताळताना ती कितीही शिक्षित असली तरी पुरुषांचे प्रतिपादन महत्त्वाचे मानून निकाल द्यावा लागेल. काळा रंग अशुभाचे निदर्शक असल्याने न्यायदान प्रक्रियेत सहभागी प्रत्येकाला नव्या वस्त्रसंहितेचे पालन करावे लागेल. तो डगला कोणत्या रंगाचा याचा निर्णय विचारविमर्श करून घेतला जाईल’ एवढे लिहून झाल्यावर न्यायिक सेलचे प्रमुख थकले. मग त्यांनी अमृतकलशातील मंतरलेल्या पाण्याचे दोन घोट घेतले व डोळे मिटून यात आणखी कशाचा समावेश करता येईल यावर विचार करू लागले.