सहा दिवस, ९० विमाने, सुमारे १८ हजार प्रवाशांचा खोळंबा, त्यांचे कामाचे अनेक उत्पादक तास वाया आणि विमाने बराच काळ जमिनीवर ठेवावी लागल्याने झालेले कोट्यवधी रुपयांचे नुकसान! भारतीय विमान वाहतूक क्षेत्रास गेल्या आठवडाभरात बसलेल्या या फटक्याचे कारण काय, तर या सर्व ९० विमानांना बॉम्ब ठेवल्याच्या मिळालेल्या धमक्या. धमकी मिळाली, तेव्हा काही विमाने हवेत होती, काही नुकतीच धावपट्टीवर उतरली होती, तर काही उड्डाण करण्याच्या बेतात होती. आठवडाभर भारतातच हे धमक्यांचे सत्र का सुरू आहे, याबाबत अजून ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही. साहजिकच विमान वाहतूक क्षेत्रात सध्या गोंधळाचे वातावरण आहे. वर्षभरात १५ कोटी भारतीय विमानप्रवास करतात, ३००० विमानांचे रोज उड्डाण होते, हे लक्षात घेतले, तर हा गोंधळ चिंता वाढविणारा का आहे, हे उमजेल.

गेल्या सोमवारपासून धमक्यांचे हे सत्र सुरू आहे. गेल्या बुधवारी या संदर्भात मुंबई पोलिसांनी छत्तीसगडच्या राजनंदगावचा रहिवासी असलेल्या एका १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले. त्याने मित्राशी झालेल्या भांडणाच्या रागातून ‘एक्स’ या समाज माध्यमावरून या धमक्या प्रसारित केल्याचे चौकशीअंती सांगण्यात आले. मात्र, त्याला ताब्यात घेतल्यानंतरही धमक्या थांबलेल्या नाहीत. ‘एक्स’वर ‘अॅडॅम लान्झा ११११’ या नावाने असलेल्या खात्यावरून काही धमक्या आल्या आहेत. विशेष म्हणजे, अॅडॅम लान्झा नावाची ही व्यक्ती सध्या मृत आहे. याने २०१२ मध्ये अमेरिकेतील एका प्राथमिक शाळेत गोळीबार करून २० विद्यार्थ्यांचा जीव घेऊन स्वत:लाही गोळी मारली. तत्पूर्वी त्याने आईलाही गोळ्या घालून ठार केले होते. असा गडद भूतकाळ असलेल्या मृत आरोपीच्या नावाचा वापर करून विमानांत बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या येत असल्याने या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. हे खाते ‘एक्स’ने गेल्या शनिवारी बंद केले आणि तरीही, रविवारी आणखी काही विमानांना अन्य स्रोतांतून धमक्या आल्या.

हेही वाचा >>> पहिली बाजू : राष्ट्रहित, शेतकरीहित सर्वोपरी!

धमक्या पोकळच ठरल्या तरी, धमकी आल्यावर नियमानुसार राबवावी लागणारी सर्व प्रक्रिया विमान वाहतूक सेवेवर मोठा परिणाम करणारी ठरते. उडत्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्यास विमानतळावर बॉम्ब धोका मूल्यमापन समितीची तातडीची बैठक होते. धमकी कोठून आली, याची माहिती घेऊन जवळच्या विमानतळावर विमान उतरवण्याच्या सूचना देण्यात येतात. त्यापायी हवाई नियंत्रण कक्षाला संदेश, धावपट्टीवर जागा करून देणे, ही प्रक्रिया जिकिरीचीच. इतर विमानांची उड्डाणे थांबवावी लागल्याने प्रवाशांची गैरसोय तर होतेच; पण ज्या विमानाला धमकी मिळाली त्यातील प्रवाशांची, त्यांच्या सामानाची आणि विमानाच्या कानाकोपऱ्याची झडती होते. या प्रवाशांना या काळात जेवणाखाण्यासह इतर सुविधा देण्याची जबाबदारी विमान कंपनीला पार पाडावी लागते. दरम्यानच्या काळात विमानातील कर्मचाऱ्यांची कामाची वेळ संपली, तर नवा कर्मचारीवर्ग आणण्याचीही कसरत करावी लागते. हे नमूद करण्याचे कारण असे की, हे सोपस्कार आठवडाभरात ९० विमानांच्या बाबतीत पार पाडावे लागले, तर खर्च होणारा वेळ आणि पैसा याची व्याप्ती लक्षात यावी. अर्थात, विमानांना धमक्या मिळणे नवे नाही. गेल्या जूनमध्ये एकाच दिवसात ४१ विमानांना ई-मेलद्वारे बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या आल्या होत्या, तर २०१४ ते २०१७ दरम्यान अशा १२० धमक्या आल्या, त्यापैकी निम्म्या मुंबई आणि दिल्ली या दोनच विमानतळांना होत्या हे विशेष. यातील चिंतेची बाब अशी की, अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असूनही धमकीचे संदेश कोण पाठवते आहे, याचा छडा तपास यंत्रणांना लावता आलेला नाही. नुसत्या अफवा पेरून भारताची विमान वाहतूक व्यवस्था कोलमडविण्याचा कट असल्याचा कारस्थान सिद्धान्त आता मांडला जात असला, तरी त्याने काही मूळ प्रश्न सुटत नाही. धमक्या देणाऱ्यांना विमान प्रवासास बंदी घालण्याचा आणि दंडासह कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्याचा मनोदय विमान वाहतूकमंत्री के. राममोहन नायडू यांनी आता बोलून दाखवला आहे. पण त्यासाठी आधी धमक्या देणारा पकडला तर जायला हवा. कुणी तरी गंमत म्हणून किंवा व्यक्तिगत सूडभावनेने हे करत असेल, तरी तो आपल्या यंत्रणांना सलग सात दिवस गुंगारा देण्यात यशस्वी झाला आहे, हे एकूणच विमान वाहतूक क्षेत्रासाठी फार काही चांगले लक्षण नाही.