सिद्धार्थ खांडेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्पॅनिश ला लिगामधील बडा क्लब रेआल माद्रिदचा स्टार फुटबॉलपटू विनिशियस ज्युनियरला गेल्या आठवडय़ात भर सामन्यात वर्णद्वेषी टोमणेबाजीला सामोरे जावे लागले. भरीस भर म्हणजे, त्या सामन्याच्या अखेरीस विनिशियसलाच (वेगळय़ा कारणासाठी) लाल कार्ड दाखवले गेले, जे नंतर मागे घेण्यात आले. विनिशियसने सामना संपल्यावर इन्स्टाग्रामवर आपल्या दु:खाचे प्रकटीकरण केले. स्पेन हा वर्णद्वेषी देशच असल्याची आम्हा ब्राझिलियनांची भावना आहे हा त्याचा टोला अनेकांना झोंबला असेलही. पण ला लिगाचे प्रमुख हावियेर तेबास यांनी हद्द केली. ‘स्पॅनिश ला लिगा काय आहे याची तुला पूर्ण कल्पना आहे. आरोप करण्याआधी आमच्याशी बोलायचे होतेस. वर्णद्वेषाविरोधात आपण बोलत आहोतच ना. इतरांना स्वत:चा वापर करू देऊ नकोस..’ वगैरे वगैरे. म्हणजे चूक विनिशयसची, हिणकस शेरेबाजी करणाऱ्यांची नव्हे! विनिशियस ज्युनियरच्या निमित्ताने स्पेन आणि युरोपिय फुटबॉलमधील वर्णद्वेषी मानसिकतेचे वास्तव पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आले. पण ही पहिलीच वेळ नक्कीच नव्हे. त्याचबरोबर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा नव्याने अधोरेखित होतो. तरी याची फारशी चर्चा तेथील माध्यमांमध्ये फारशी होताना दिसत नाही. वर्णद्वेष, वंशद्वेष, धर्मद्वेष, पंथद्वेष, आपल्याकडे प्राधान्याने जातिद्वेष हे स्वभावदोष जगात सर्व देशांमध्ये मुरलेले आहेत. त्याची तीव्रता कमीअधिक करण्याचे काम राष्ट्रीय संस्कृती आणि कायदे संरचना आणि मुख्य म्हणजे सामूहिक शहाणिवा करत असतात. स्पेन, इटली, पूर्व युरोपीय देश या भागांतच फुटबॉल किंवा इतर सामन्यांदरम्यान वर्णद्वेषी टोमणेबाजीचे प्रकार वारंवार का घडतात अशी सालाबादनुसार चर्चा करण्यापेक्षा तेथील अशा घटनांच्या संगतीचा विचार आणि अभ्यास करणे गरजेचे आहे. तर कदाचित, हे प्रकार थांबवण्यासाठी काही नुस्के सापडू शकतील.

दुसरी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे, कॉर्पोरेटीकरणामुळे खेळांत आलेला अवाढव्य पैसा आणि नफेखोरीची संस्कृती वर्णद्वेषासारख्या सामाजिक समस्यांचा अभ्यास करण्यासाठी किंवा त्यावर तोडगा शोधून काढण्यासाठी फारशी पोषक नसते. पीआरीकरणाच्या या दुनियेत, इमेज ‘सादरीकरणा’ला महत्त्व आले आहे. इमेज ‘घडवण्या’च्या फंदात पडण्यासाठी कोणालाच वेळ वा इच्छाशक्ती नाही. तेव्हा जगातील बहुधा सर्वाधिक प्रतिभावान खेळाडूंचा समावेश असलेली आणि अतिशय श्रीमंत अशी स्पॅनिश ला लिगा ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेसी (दोघेही आता या लीगमध्ये खेळत नाही, तरी), झिदान, रोनाल्डिन्यो, रोनाल्डो अशा तारांकित खेळाडूंसाठी ओळखली गेली पाहिजे, तिचे तस्सेच मार्केटिंग झाले पाहिजे. अशा विशाल, सुंदर नि यशस्वी कॅनव्हासवर विनिशियस ज्युनियरसारख्या मोजक्या गौरेतर खेळाडूंच्या वाटय़ाला येणारे वर्णद्वेषाचे भोग दुर्लक्षित नव्हे, तरी अल्पलक्षितच ठेवले गेले पाहिजेत हा जणू अव्यक्त संदेश. पण, आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (फिफा) आणि युरोपीय फुटबॉल महासंघ (युएफा) यांनी गेली कित्येक वर्षे फुटबॉल सामन्यापूर्वी ‘झिरो टॉलरन्स फॉर रेसिझम’ असा संदेश मैदानात झळकवण्याची सक्ती केली आहे, त्याचे काय? स्पेनच्या बाबतीत विनिशियसला नव्हे, तर इतरही अनेक गौरेतर खेळाडूंना प्रेक्षकांच्या वर्णद्वेषी हुल्लडबाजीला सामोरे जावे लागते. ज्या वॅलेन्सिया क्लबच्या मैदानावर परवा हा प्रकार घडला, त्या क्लबचे व्यवस्थापन तसेच वॅलेन्सिया नगरपालिका हा अत्यंत अपवादात्मक प्रकार असल्याचे सांगू लागले आहेत. हाही एक ठरलेला बचाव किंवा पळवाट. या दाव्याची लक्तरे रेआल माद्रिदचे प्रशिक्षक कार्लोस आन्चेलोटी यांनीच काढली. ‘एक-दोन हुल्लडबाज नव्हे, त्या भागातील प्रेक्षकांच्या मोठय़ा समूहाकडून विनिशियसचा छळ सुरू होता. हे अत्यंत आक्षेपार्ह आहे.’ फुटबॉलविश्वातील अत्यंत प्रथितयश आणि मातब्बर प्रशिक्षकांपैकी हे एक. एक हजार २८५ सामन्यांमध्ये प्रशिक्षक म्हणून राहिलेल्या आन्चेलोटींना सामनापश्चात पत्रकार परिषदेत नित्याचा पहिला प्रश्न विचारला गेला.. ‘रेआल माद्रिद या सामन्यात पराभूत झाला. काय वाटते?’ आन्चेलोटी तात्काळ उत्तरले, ‘फुटबॉल? तुम्हाला फुटबॉलविषयी बोलायचंय? आपण दुसऱ्या त्या गोष्टीविषयी बोलू या का? ती गोष्ट रेआलच्या पराभवापेक्षाही अधिक महत्त्वाची आहे!’ पुढील पाचेक सामन्यांसाठी वॅलेन्सियाच्या मैदानातील तो भाग रिकामा ठेवला जाईल. हुल्लडबाजांपैकी एक-दोघांना(च) अटक वगैरे करण्याचे सोपस्कार पार पाडले गेले. २००४ मध्ये माद्रिदमध्ये इंग्लंड आणि स्पेनदरम्यान मित्रत्वाचा सामना खेळवला गेला. त्या वेळी इंग्लिश संघातील मिश्र आणि कृष्णवर्णीय फुटबॉलपटूंविरुद्ध प्रेक्षकांतून शेरेबाजी झाली होती. ते प्रकरण टोकाला गेले आणि एक वेळ इंग्लंड आणि स्पेन यांच्यातील राजनैतिक संबंधही ताणले गेले. इटलीमध्ये अनेक कृष्णवर्णीय खेळाडूंना अशा प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे. कधी ‘माकड’ असे संबोधणे, ‘हुप्प हुप्प’ असे सामूहिक आवाज करणे, काही वेळा केळी किंवा केळय़ाच्या साली फेकणे असेही प्रकार घडले. फ्रान्स, इंग्लंड, नेदरलँड्सचे संघ विविध सामन्यांसाठी सर्बिया, क्रोएशिया, हंगेरी, पोलंड अशा देशांमध्ये जातात त्या वेळी त्यांच्या संघातील गौरेतर खेळाडूंनाही वर्णद्वेषी शेरेबाजी ऐकावी लागली आहे. फार तर एखाद्या क्लबवर वर्षभरासाठी बंदी किंवा संबंधित मैदानावर प्रेक्षकांविना सामने खेळवले जाण्याची शिक्षा यापलीकडे उपाय राबवले गेलेले नाहीत.

फ्रान्स, इंग्लंड, नेदरलँड्स, पोर्तुगाल या देशांच्या फुटबॉल संघांमध्ये गौरेतर खेळाडू मोठय़ा संख्येने दिसून येतात. कारण या देशांमध्ये निर्वासितांची संख्या लक्षणीय आहे. जर्मनीच्या संघात गेल्या काही वर्षांमध्ये असे खेळाडू दिसू लागले आहेत. या देशांमध्ये वर्णद्वेष, वंशद्वेषाच्या विरोधात काहीएक ठसठशीत कायदेशीर, सांस्कृतिक चौकट आहे. येथील फुटबॉल सामन्यांमध्ये इतर प्रकारची हुल्लडबाजी, दारूबाजी दिसून येते. पण वर्णद्वेषी शेरेबाजीला थारा नाही. तशी संस्कृती अद्याप स्पेन आणि इटली या देशांमध्ये म्हणावी त्या प्रमाणात मुरलेली नाही असे दिसते. विनिशियसला त्या सामन्यात सुरुवातीपासूनच सतावले जात होते. ला लिगामध्ये त्याने आतापर्यंत नऊ वेळा वर्णद्वेषी शेरेबाजीविरोधात तक्रार केलेली आहे. २२ वर्षीय ब्राझीलचा हा फुटबॉलपटू अत्यंत गुणवान आहे. किलियन एम्बापेच्या बरोबरीने तोही लवकरच मेसी-रोनाल्डोची जागा घेईल असे बोलले जाते. वॅलेन्सियाविरुद्ध सातत्याने होत असलेल्या शेरेबाजीने व्यथित झालेल्या विनिशियसच्या गालांवरून अश्रू ओघळत होते. त्याने एक वेळ प्रेक्षकातील एकाकडे अंगुलिनिर्देश करून त्याला बडबड करण्यास थांबवण्याचा इशारा दिला. तो अंगाशी आला, कारण बाकीच्या इतरांनाही त्यामुळे चेव चढला. तशात विनिशियसने आणखी एक चूक केली. वॅलेन्सिया क्लबला बहुधा पुढील वर्षी दुय्यम लीगमध्ये खेळावे लागेल इतकी त्यांची कामगिरी यंदा खराब झालेली आहे. अंगठा खाली करून विनिशियसने त्यांना डिवचले, मात्र.. ‘तो नेहमीच अशा प्रकारे वागतो, इतर काळय़ा खेळाडूंना लक्ष्य कसे केले जात नाही’ वगैरे सांगत काही स्पॅनिश माध्यमांनीही त्याला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. अशी मैदाने आणि असे प्रेक्षक, त्यांचे असे आक्षेपार्ह वर्तन स्पेनमध्ये कमी झालेले नाही. पोलिसी कारवाई होण्याच्या आधीच प्रेक्षकांतील काहींनी अशा वेडगळांना कानफटवायला हवे होते. पण हे घडत नाही. कोण ते लोक, नावे सांगा आम्हाला, पुरावे द्या वगैरे जुजबी प्रश्न-चौकश्यांच्या पलीकडे स्पेनमधील क्लब व्यवस्थापन, पोलीस, नगर प्रशासन या समस्येच्या मुळाशी जात नाही. कारण अशी प्रवृत्ती केवळ एका मैदानातील एका स्टँडमध्ये एका प्रेक्षकाच्या डोक्यात नसते. ती झुंडीने अस्तित्वात असते आणि झुंडीने व्यक्त होते. कारण अशा एखाद्या कृतीवरून संपूर्ण शहराची, प्रांताची, राज्याची, संस्कृतीची बदनामी होते हे ठाऊक असूनही अशा प्रवृत्तींना अटकाव होत नाही. कारण कुठे तरी असे प्रकार घडावेत हे आपल्यापैकीही अनेकांना मनातून वाटत-पटत असते. विकार तेथेच सुरू होतो आणि फोफावतो. विनिशियसला हे समजायला हवे होते. पण त्याने समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. तेव्हा.. चूक विनिशियसचीच!