सिद्धार्थ खांडेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आता अंतिम टप्प्यावर पोहोचली असून, रविवारी मेलबर्नमध्ये इंग्लंड आणि स्पेन यांच्यात अंतिम लढत होईल. या लढतीचे नावीन्य तसे विविधांगी. कुणीही जिंकले, तरी फुटबॉल विश्वाला नवीन जगज्जेत्या मिळणार. २००३ नंतर प्रथमच दोन युरोपीय संघांमध्ये अंतिम लढत होते आहे. या स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद भरभरून आहे. आजवरची ही सर्वात यशस्वी महिला विश्वचषक स्पर्धा मानली जाते. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या या स्पर्धेतील सामन्यांची जवळपास १८ लाख तिकिटे विकली गेली. जवळपास २०० कोटी फुटबॉलरसिकांनी ही स्पर्धा दूरचित्रवाणीवर पाहिली असावी, असा अंदाज आहे. मोरोक्को, नायजेरिया, कोलंबिया, जपान, दक्षिण कोरिया, यजमान ऑस्ट्रेलिया यांनी अनेक धक्कादायक निकालांची नोंद केली. जर्मनीसारखे मातब्बर संघ साखळी टप्प्यातच गारद झाले. माजी विजेत्या अमेरिकेला फार मोठी मजल मारता आली नाही. ही झाली आतापर्यंतच्या विश्वचषक स्पर्धेची काही ठळक वैशिष्टय़े. पण या स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा सुरू झालेली चर्चा अधिक व्यापक आणि खोलवर जाणारी आहे. तिचा परामर्श बहुधा मैदानावरील खेळाइतकाच रंजक ठरू शकतो.

‘दि इकॉनॉमिस्ट’ आणि ‘द गार्डियन’ या मान्यवर ब्रिटिश विचारपत्रांनी मांडलेले मुद्दे महत्त्वाचे आहेत. इंग्लंडचा संघ अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे त्या देशात ‘वर्ल्डकप कम्स होम’ या नव्याने उठलेल्या वेडाची जराही दखल न घेता ही टिपणे प्रकाशित झाली आहेत. महिला फुटबॉलपटूंसाठी वेगळय़ा आकाराची मैदाने आणि इतर क्रीडासाहित्य असावे काय, याची चिकित्सा ‘दि इकॉनॉमिस्ट’च्या लेखात आढळते. त्यांनी नॉर्वेतील नॉर्वेजियन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या एका संशोधनाचा दाखला दिला आहे. हे संशोधन २०१९ मधील आहे. आर्वे वोरलँड पेडरसन हे न्युरो व स्पोर्ट्स सायन्स संशोधक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुरुष आणि महिला खेळाडूंच्या चणीतील फरकाचा अभ्यास केला. हा फरक सार्वत्रिक असतो आणि तो आघाडीच्या खेळाडूंच्या शरीरांबाबतही दिसून येतो. नॉर्वेजियन स्त्रियांची सरासरी उंची पुरुषांपेक्षा कमी (१६८ सेंमी वि. १८२ सेंमी) आहे. वजनात (६५ किलो वि. ७६ किलो) फरक आहे. ३० मीटपर्यंत धावण्याचा वेग (४.८४ सेकंद वि. ४.२५ सेकंद) कमी आढळला. उंच उसळीमध्ये (३६ सेंमी वि. ५७ सेंमी) फरक आढळला.

आणि तरीही फुटबॉलच्या मैदानात (१०५ मी लांब व ६८ मी रुंद) त्यांना पुरुषांइतकीच धावपळ करावी लागते. ७.३२ मी रुंद आणि २.४४ मी उंच असलेल्या गोलमध्ये पुरुषांप्रमाणे महिला गोलकीपरनाही गोलबचाव करावा लागतो. ४३० ग्रॅम वजनाचा फुटबॉल वापरावा लागतो. नॉर्वेजियन विद्यापीठाने या विरोधाभासावर बोट ठेवले आहे. उपरोल्लेखित त्यांचे संशोधन महिला फुटबॉलपटूंमधील ‘कमी’पणा दाखवण्यासाठी नव्हतेच. पण या संशोधनाच्या मते, चण लहान असूनही फुटबॉलसारख्या खेळामध्ये स्टँडर्ड म्हणजे खरे तर ‘पुरुषी’ आकारमानाच्या मैदानांमध्ये खेळत राहणे हे महिला फुटबॉलपटूंसाठी शारीरिक दृष्टय़ा कष्टप्रदच नव्हे, तर अन्यायकारक ठरते! त्यांनी महिला फुटबॉलसाठी मैदानाचा आकार (९३ मी लांब व ६१ मीटर रुंद) कमी करण्याची शिफारस केली. गोलचा आकार ६.७६ मी. रुंद आणि २.२५ मी. उंच असावा, असे सुचवले. फुटबॉलचे वजनही २८७ ग्रॅम असावे, असे सुचवले. या बदलांचे महत्त्वाचे कारण म्हणजे, महिला फुटबॉलपटूंमध्ये गुडघ्याच्या दुखापतींचे प्रमाण पुरुषांपेक्षा कितीतरी अधिक असते. याशिवाय हेडरमुळे डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाणही महिलांमध्ये अधिक आहे. खास महिलांसाठी स्पोर्ट्सशूज बनवण्यास अगदी अलीकडे सुरुवात झाली आहे. फुटबॉलच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, पुरुषी डिझाइनचे शूज महिलांच्या पावलांचा आकार गृहीत धरून बनवले जात नव्हते. परंतु आता काही कंपन्या खास महिलांसाठी बनवत असलेले शूज बोटांच्या भागात अधिक रुंद आहेत. टाचांच्या भागात ते निमुळते होतात आणि पावलाच्या बाकाला (आर्क) खालून अधिक आधार पुरवला जातो. बुटांच्या तळव्याला असलेले रबरी खिळे (स्टड्स) छोटे आणि अधिक संख्येने असतात. यामागे गुडघ्यांच्या दुखापती कमी करण्याचा उद्देश आहे. नॉर्वेजियन विद्यापीठाने केलेल्या शिफारशींचा विचार अद्याप आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ अर्थात फिफाने केलेला नाही. परंतु या शिफारशी विचारप्रवर्तक नक्कीच आहेत.

खेळांमध्ये समानतेच्या आघाडीवर महिला खेळाडू आणि संघटनांचा, तसेच हितचिंतकांचा लढा सुरू आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत पुरुष फुटबॉलपटूंच्या २५ टक्के मानधन महिला फुटबॉलपटूंना मिळते. विशेष म्हणजे यंदाची ही रक्कम गेल्या स्पर्धेच्या रकमेपेक्षा तिप्पट करूनही दोहोंत इतकी मोठी दरी आहे. पण ती लढाई समान मानधनाची आहे आणि हा मुद्दा समन्यायी कार्यपरिस्थितीचा (वर्किंग कन्डिशन) आहे. दोन्हींची सरमिसळ होणे योग्य नाही. इतर काही खेळांमध्ये नियम व आकारमानात लिंगभेदाधारित बदल झालेले दिसतात. अ‍ॅथलेटिक्समध्ये गोळाफेक आणि थाळीफेक प्रकारात गोळा आणि थाळीचे वजन कमी असते. अडथळय़ांच्या शर्यतीत हर्डलची उंची कमी असते. बास्केटबॉल हलक्या वजनाचा असतो आणि व्हॉलिबॉल नेटची उंची कमी असते. टेनिसमध्ये पाचऐवजी तीन सेट्स असतात. मग फुटबॉलमध्ये त्या प्रकारचे बदल का अंगीकारू नयेत, याविषयी मंथन सुरू झाले आहे.

ही वाट निसरडी आहे. वैज्ञानिक बाजूने युक्तिवाद करताना, त्याचा सांस्कृतिक बाजूने प्रतिवाद होऊ शकतो. महिलांना ‘कमी’ लेखण्याच्या मानसिकतेविरोधात इतकी मोठी, प्रदीर्घ लढाई सुरू असताना स्वत:हूनच ‘कमी’पणा घेणे आत्मघातकी ठरणार नाही का, हा एक विचार. मध्यंतरी वर्ल्ड रग्बी युनियनने प्रायोगिक तत्त्वावर महिलांच्या सामन्यांमध्ये हलके रग्बीबॉल वापरले. पण असे केल्याने महिला रग्बीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू शकतो, असे मत काही खेळाडूंनीच व्यक्त केले. परंतु फुटबॉलसारख्या खेळामध्ये पुरुष शरीरयष्टीस प्रमाण मानून निर्धारित केलेली मानके अंगीकारल्यास दीर्घकालीन नुकसान महिला फुटबॉलपटूंचेच होणार हा विचार झिरपू लागला आहे.

इंग्लंडसारख्या फुटबॉलवेडय़ा देशातही १९२१ ते १९७१ अशी पन्नास वर्षे त्यांच्या अधिकृत राष्ट्रीय संघटनेशी (एफए) संलग्न मैदानांवर खेळण्याची परवानगी महिला फुटबॉलपटूंना दिली जात नव्हती. फुटबॉल हा खेळ महिलांसाठी नाहीच, असा अजब समज त्या संघटनेने करून घेतला होता. याविरोधात आर्थर हेन्री हॉब्ज यांनी आवाज उठवला. मुली आणि महिलांचे फुटबॉलचे संघ बनवले. प्रसंगी खाणकामगारांच्या मुलींना घेऊन स्पर्धा आयोजित केल्या, याविषयीचा रंजक वृत्तांत ‘द गार्डियन’ने प्रसृत केला आहे. याच हॉब्जसाहेबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ इंग्लंडमध्ये शनिवारी एक मुलींची स्पर्धा खेळवली जात आहे. त्यानंतर रविवारी विश्वचषकाची फायनल खेळवली जाईल. ती महिला फुटबॉलला वेगळय़ा वळणावर आणि उंचीवर घेऊन जाईल हे नक्की. पण यानिमित्ताने फुटबॉलचा खेळ महिलांसाठी केवळ समान नव्हे, तर समन्यायी ठरण्याच्या दिशेने प्रगती झाली तर ते अधिक योग्य ठरेल.