निकाल लागल्यापासून नाथाभाऊ अस्वस्थच होते. मन रमवण्यासाठी त्यांनी रोज केळीच्या बागेत फेरफटका मारण्यास सुरुवात केली, पण विचारांचा कल्लोळ पाठ सोडेना. भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली म्हणून रागाच्या भरात पवारांच्या पक्षात गेलो तर नेमकी त्यांचीच सत्ता गेली. पंगतीत जेवायला बसलो व लाडूच संपले अशी तेव्हा अवस्था झाली. नंतर लोकसभेच्या वेळी सुनेसाठी पवारांपासून अंतर राखावे लागले. ती विजयी झाल्यावर चला झाले गेले विसरून जाऊ म्हणत भाजपत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर तिथेही तो पिस्तुल्या व त्याची टोळी आडवी आली. मीच खरा राष्ट्रप्रेमी हे सिद्ध करण्यासाठी कधी दाऊद तर कधी पाकिस्तानमधून धमक्या आल्याचा प्रयोगसुद्धा फसला. विधानसभेत थोरल्या पवारांचे नशीब उजळेल ही आशासुद्धा या निकालाने संपुष्टात आणली. आता पराभूतांच्या कळपात सामील होण्यातही काही हशील नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयुष्याचा अखेरचा टप्पा सुखकर करायचा असेल तर आता काही तरी निर्णय घ्यावाच लागेल असा विचार करत नाथाभाऊ उठले व थेट माजघरात गेले. कोपऱ्यातील मोठ्या संदुकीचे कुलूप उघडून कागद उपसण्यास सुरुवात केली. मन भूतकाळात गेले. काय जलवा होता त्याकाळी आपला. अख्खे विधिमंडळ दणाणून सोडायचो आपण. सोबतीला गोपीनाथराव. देवेंद्र छोटा होता तेव्हा. बच्चाच! वडीलकीच्या नात्याने सारे शिकवले त्याला. नेमका हाच ग्रह करणे नडले आपल्याला. राजकारणात चढउतार येत असतात. त्याच्याशी जुळवून घेतले असते तर अशी अवस्था झाली नसती आपली. आताही वेळ गेलेली नाही. एक प्रयत्न करून बघायचा असे मनाशी ठरवत ते संदुकीच्या तळापर्यंत गेले तेव्हा त्यांच्या हाताला भरजरी वस्त्रात लपेटलेला एक मोठा लिफाफा लागला. त्याच्याच बाजूला एक पांढरे निशाण होते. आर या पार करायचे असेल तर या दोन्ही वस्तू बाहेर काढण्याशिवाय पर्याय नाही, असे म्हणत त्यांनी लिफाफा व निशाण हातात घेतले.

हेही वाचा : अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!

लिफाफ्यावरचे भरजरी वस्त्र मोकळे केल्यावर त्यातून बाहेर काढलेल्या दोन सीडींवर त्यांनी प्रेमाने हात फिरवला. सीडी खलबत्त्यात कुटून नष्ट करायची की हाताने तुकडे करायचे यावर निर्णय होईना. कुठल्याही निष्कर्षाप्रत येण्याआधी त्या एकदा बघून तर घेऊ म्हणत त्यांनी त्या अद्यायावत संगणकाला जोडल्या. नंतर खूप प्रयत्न केले पण त्यात ठिपक्या ठिपक्यांशिवाय काहीच दिसेना. त्यात कसलेही स्फोटक फुटेज नाही हे स्पष्ट झाल्यावर ज्याने त्या दिल्या त्याच्या नावाने भरपूर खानदेशी शिव्या हासडून ते दमले. आपण तेव्हाच त्या बघायला हव्या होत्या. इथेही अतिआत्मविश्वास नडला, असे म्हणत ते हळहळले. मग त्यांचे लक्ष पांढऱ्या निशाणाकडे गेले. आता हे हातात घेण्याशिवाय पर्याय नाही, असे म्हणत बाहेर आल्यावर बोलवा त्या पत्रकारांना असा आदेश त्यांनी सहायकांना दिला. कॅमेऱ्यासमोर बरीच बडबड केल्यावर माझ्यात व देवाभाऊत कोणतीही दुश्मनी नाही असे बोलून ते पांढरे निशाण हातात घेऊनच पुन्हा बागेकडे रवाना झाले. रक्तदाब मोजला तेव्हा तो ‘नॉर्मल’ निघाला.