‘काटकसर’ हा शब्द ओसामू सुझुकी यांच्यासाठीचा परवलीचा होता. त्यामुळेच सुझुकी मोटर कॉर्पोरेशनसारख्या बड्या जपानी कंपनीच्या अध्यक्षपदी राहूनही हे ‘सुझुकीसान’ इकॉनॉमी क्लासमधून विमान प्रवास करत. वातानुकूलनाचा खर्च कमी असावा यासाठी कारखान्यांच्या छपराची उंची कमी करण्याकडे त्यांचा कटाक्ष असे. जपानी मध्यमवर्गाला परवडतील अशा किफायती, छोट्या आणि कमी किमतीच्या मोटारी बनवण्याचे त्यांचे धोरण, पुढे त्या देशाची सीमा ओलांडून ज्या देशात स्थिरावले नि प्रचंड यशस्वी झाले, तो देश म्हणजे भारत. आज मारुती सुझुकी म्हणून सुपरिचित आणि अतिदर्शित असलेल्या मोटारी भारतात धावण्यामागे तत्कालीन भारत सरकारइतकेच ओसामू सुझुकींचे प्रयत्नही कारणीभूत ठरले.
हेही वाचा : अन्यथा : ‘जीन’थेरपी!
भारतात मोटार संस्कृतीच्या आद्या काळात म्हणजे साधारण १९७०-८०च्या दशकांत मोटारी बनवण्यासाठी सरकारच उत्सुक होते. १९७१मध्ये ‘मारुती’ कंपनीची स्थापना झाली. त्या काळातील एक प्रभावी राजकीय व्यक्तिमत्त्व ‘इंदिरापुत्र’ संजय गांधी यांनी परवडणाऱ्या मोटारींच्या निर्मितीचा प्रकल्प प्रतिष्ठेचा बनवला होता. केवळ इच्छा आणि प्रतिष्ठेतून काही भागणार नव्हते. एखाद्या सुस्थापित परदेशी भागीदाराची नितांत गरज होती. रेनॉ, सुबारू, फियाट अशा अनेकांशी बोलणी झाली नि फिस्कटली. त्यात आणखी एक नाव सुझुकीचेही जोडले गेले. सुझुकीचा प्रस्ताव सरकारच्या पसंतीस उतरला नाही. पण ‘जगात कोणत्या तरी देशात क्रमांक एकवर असावे’ ही ओसामू सुझुकी यांची इच्छा प्रबळ होती. पुढे योगायोगाने किंवा अपघातानेच प्रस्तावाचा फेरविचार करण्याची विनंती भारत सरकारला करण्यात आली. ती मान्य झाली नि एका प्रदीर्घ, विशाल आणि यशस्वी मोटारपर्वाला सुरुवात झाली. सुझुकी यांचा तो निर्णय नि:संशय धाडसी होता. कारण १९८०च्या दशकात तरी भारतीय अर्थव्यवस्था पुरेशी बंदिस्त होती आणि ‘हमारा बजाज’च्या जमान्यात मोटार ही चैनच मानली जायची. पण मूळ जपानी आल्टोला नवीन साज चढवून मारुती सुझुकी – ८०० ही नवी चिमुकली मोटार भारतीय बाजारपेठेत दाखल झाली आणि तिने अनेक विक्रम मोडले. तिचे अनेक ‘वंशज’ आजही आपापल्या विभागांत अग्रक्रमावर आहेत. प्रवासी मोटार बाजारपेठेत आज मारुती सुझुकीचा वाटा ४० टक्के इतका आहे. जगात एखाद्या मोटार कंपनीने पूर्णपणे नवीन बाजारपेठेत अशा प्रकारे स्थान प्रस्थापित केल्याचे दुसरे उदाहरण आढळत नाही. हे सारे ओसामू सुझुकी यांच्या द्रष्टेपणातून शक्य झाले. ते विलक्षण व्यवहारवादी होते. सुझुकीला टिकवण्यासाठी त्यांनी सुरुवातीच्या काळात टोयोटासारख्या प्रतिस्पर्धी कंपनीचे इंजिन वापरण्याचा निर्णय घेतला आणि टोयोटानेही तो प्रस्ताव मान्य केला. आपण मरेपर्यंत सुझुकीची सूत्रे सांभाळणार, असे ते गमतीने सांगत; पण आठ वर्षांपूर्वी त्यांनी ती आपल्या मुलाकडे सोपवली. नुकतेच ते वयाच्या ९४व्या वर्षी निवर्तले. तरी त्यांनी भारतीय बाजारपेठेवर उमटवलेला ठसा अमीटच ठरेल.