भारत-पाकिस्तान यांच्यातील १९७१ च्या युद्धात पूर्व पाकिस्तानची कोंडी करण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे आणि कालपरत्वे दोन अण्वस्त्रधारी शेजाऱ्यांत शांततामय सहजीवनासाठी आग्रह धरणारे माजी नौदलप्रमुख अॅडमिरल लक्ष्मीनारायण रामदास (निवृत्त) यांचे ९० व्या वर्षी निधन झाले. निवृत्तीपश्चात साधेपणाने जीवन जगणाऱ्या रामदास यांनी सैन्यदलाशी संबंधित विषयावर कुणाचीही पत्रास बाळगली नाही. पुलवामा हल्ला आणि बालाकोटवरील हवाई कारवाई, यांच्या राजकीय वापरास त्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. अनेक सामाजिक उपक्रम, आंदोलनात ते हिरिरीने सहभागी होत. अॅडमिरल रामदास हे महाराष्ट्राचे! त्यांचा जन्म पाच सप्टेंबर १९३३ रोजी मुंबईतील माटुंगा येथे झाला.
हेही वाचा >>> अन्वयार्थ : मुंबई क्रिकेटचा रण(जी) विजय!
निवृत्तीपश्चात ते अलिबागमध्ये स्थायिक झाले होते. त्यांचे शिक्षण मात्र दिल्लीतील प्रेझेन्टेशन कॉन्व्हेंट शाळा व रामजस महाविद्यालयात झाले. १९४९ मध्ये डेहराडूनच्या भारतीय लष्करी प्रबोधिनीत संयुक्त सेवा प्रशिक्षणात सहभागी होऊन, सप्टेंबर १९५३ मध्ये नौदल अधिकारी म्हणून भारतीय नौदलात ते रुजू झाले. नौदलातील ४० वर्षांच्या कारकीर्दीत वेगवेगळया जबाबदाऱ्या सांभाळताना, १९७१ मध्ये पाकिस्तानशी झालेल्या युद्धात ‘आयएनएस बियास’चे ते कमांडिग अधिकारी होते. या युद्धनौकेने पूर्व पाकिस्तानची नाकेबंदी केली होती. या कामगिरीबद्दल रामदास यांना देशातील तिसऱ्या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने (वीर चक्र) सन्मानित करण्यात आले होते. जर्मनीत नौदलाचे प्रतिनिधी, भारतीय नौदलाच्या पश्चिमी मुख्यालयाचे प्रमुख, युद्धनौका उत्पादन व अधिग्रहण विभागाचे नियंत्रक, नौदल उपप्रमुख अशा महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले. कोचीन येथे नौदल प्रबोधिनीची स्थापना हेदेखील त्यांचे यश. १९९० मध्ये भारतीय नौदलाचे १३ वे प्रमुख म्हणून त्यांना नेतृत्वाची संधी मिळाली. याच दरम्यान त्यांनी महिलांना दलात सेवेची संधी उपलब्ध केली. १९९३ मध्ये ते निवृत्त झाले. आयुष्यभर स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांची पाठराखण करणारे रामदास हे निवृत्तीनंतर सामाजिक कार्यातील सहभागाने चर्चेत राहिले. पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अॅण्ड डेमॉक्रसी, अण्वस्त्र विरोधी शांतता चळवळ, अण्वस्त्र निशस्त्रीकरण व शांततेवर काम करणाऱ्या संघटनांच्या कार्यात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. रायगडमधील विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) विरोधी आंदोलन, स्त्री-पुरुष समानता, मच्छीमार आणि शेतकऱ्यांचे हक्क आदींवर त्यांनी निर्भयपणे मते मांडली. भारतीय सेनादलांत धर्मनिरपेक्षता, सांविधानिक मूल्यांची बांधिलकी राखण्यासाठी ते प्रयत्नरत राहिले. दोन अण्वस्त्रधारी शेजारी देशांमध्ये शांततेचा पुरस्कार केल्याबद्दल २००४ मध्ये रामदास यांना ‘मॅगसेसे पुरस्कारा’ने गौरविण्यात आले होते.