गुन्ह्याचे स्वरूप न पाहाता कायद्यात तरतूद असलेली तीव्रतम शिक्षा ठोठावून राजकीय प्रतिस्पर्ध्याचा काटा काढण्याची परंपरा राजकारणात तशी जुनीच. पाकिस्तानसारख्या पूर्वापार भुसभुशीत लोकशाही देशात तर तिचा वापर नेहमीच बिनतोड शस्त्रासारखा केला जातो. लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार असलेला तेथील एखादा राजकारणी त्या जोरावर स्वत:च्या सामर्थ्यांविषयी गैरसमजात वावरू लागतो. मग तेथील खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान असलेली एकमेव संस्था म्हणजे अर्थातच पाकिस्तानी लष्कर त्यांच्यासाठी डोईजड झालेल्या नेत्याला कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात अडकवून राजकारणातून हद्दपार करण्याचा प्रयत्न करते. झुल्फिकार अली भुत्तो आणि त्यांची कन्या बेनझीर भुत्तो यांना तर जिवाची किंमत चुकवावी लागली. पाकिस्तानातील राजकारणाचे हे प्रारूप वर्षांनुवर्षे दिसून येते. तेथील लष्करशहांना लोकशाहीविषयी अजिबात ममत्व नसते आणि लोकशाही मार्गाने निवडून आलेले नेतेही तिचे पालन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत नाहीत. इम्रान खान यांना तोशाखानाप्रकरणी एका स्थानिक न्यायालयाने ठोठावलेली तीन वर्षे कारावासाची शिक्षा आणि त्यामुळे त्यांचे पाच वर्षांसाठी कोणतीही निवडणूक लढवण्यास अपात्र ठरणे, यातून इम्रान यांच्यापेक्षा पाकिस्तानी व्यवस्थेचीच शोभा झाली. काही माध्यमांनी या घटनेचा उल्लेख पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असिम मुनीर यांची वर्चस्वस्थापना असा केला आहे. त्यात काही अंशी तथ्य आहे. कारण मुनीर यांचे पूर्वसुरी जनरल कमर जावेद बाजवा यांनी इम्रान खान यांना २०१८ मधील निवडणुकीनंतर सत्तेवर आणण्यात मदत केली होती. बाजवा यांना त्यामुळेच इम्रान यांनी लष्करप्रमुख म्हणून मुदतवाढही दिली. मात्र या कार्यकाळाच्या अखेरीस, इम्रान आणि बाजवा यांचे खटके उडाले. रस्त्यावर झुंडीने उतरणाऱ्या समर्थकांच्या संख्येला भुलून स्वत:च्या सामर्थ्यांविषयी गैरसमज झालेले इम्रान पुढे पाकिस्तानी लष्करापासून अमेरिकेपर्यंत सर्वावर बेताल प्रहार करू लागले. गतवर्षी त्यांच्या विरोधात पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी हे दोन परस्परांचे कट्टर दुश्मन पक्ष एकत्र आले आणि त्यांनी नॅशनल असेम्ब्लीत इम्रान यांचा पराभव केला. त्या वेळी खरे तर इम्रान यांना जनतेतून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे नवे पंतप्रधान शाहबाझ शरीफही भेदरले होते. परंतु जिहादींना जवळ करण्याच्या प्रयत्नात इम्रान यांनी एकाच वेळी सर्वच यंत्रणांना शिंगावर घेतले आणि आज यातूनच त्यांच्यावर तुरुंगवासाची वेळ ओढवली.
अन्वयार्थ : तोशाखान्यातून कैदखान्यात..
पाकिस्तानी निवडणूक आयोगासमोर संपत्तीचा तपशील सादर करताना, या भेटवस्तूंच्या विक्रीचा उल्लेख केला नाही असा आरोप आहे.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-08-2023 at 04:01 IST
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former pakistan pm imran khan arrested imran khan sentenced to three years in prison zws