पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहिलेल्या नवाझ शरीफ यांची ‘पाकिस्तान वापसी’ जगभरातील अनेक संघर्षांच्या कल्लोळात फारशी लक्षात आली नाही. पण पाकिस्तानातील या जुन्या-जाणत्या नेत्याचे पुन्हा पाकिस्तानात परतणे आणि राजकारणात सक्रिय होणे हे भारतासाठी निश्चितच दखलपात्र ठरते. पाकिस्तानमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीस सार्वत्रिक निवडणुका आहेत. त्यामध्ये इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-इ-इन्साफ (पीटीआय) पक्षासमोर आव्हान उभे करण्यासाठी शरीफमियाँना पाकिस्तानी लष्करानेच पुन्हा त्या देशात येऊ दिले आहे, असे काही विश्लेषक सांगतात. सन २०१८ मध्ये शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) पक्षाच्या विरोधात इम्रान खान यांना निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेवर ‘बसवले’. परंतु पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात उत्तरार्धात इम्रान हेच पाकिस्तानी लष्कराला डोईजड होऊ लागले. पाकिस्तानी लष्करावर राजकीय हस्तक्षेपाचा थेट आरोप करणे किंवा लष्करी आस्थापनांवर कार्यकर्त्यांनी चालून जाणे असले प्रकार इम्रान यांचे पूर्वसुरी करू धजले नव्हते. त्यामुळे विद्यामान लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पाकिस्तानातील दोन प्रमुख राजकीय पक्ष – पीएमएल (एन) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांना हाताशी धरून कायदेमंडळामध्ये, तसेच विविध खटल्यांच्या आधारे न्याययंत्रणेमार्फत इम्रान यांची कोंडी केली. इम्रान खान आगामी निवडणूक लढवण्याची शक्यता जवळपास नाही. तरी त्यांचे आणि त्यांच्या पक्षाचे उपद्रवमूल्य जराही कमी झालेले नाही. त्यामुळेच पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावर तीन वेगवेगळ्या कार्यकाळांमध्ये मिळून नऊ वर्षे राहिलेले नवाझ शरीफ यांच्यासाठी पायघड्या अंथरल्या जात आहेत.
हेही वाचा >>> अन्वयार्थ: कारखानदार तुपाशी, शेतकरी कायम उपाशी
अर्थात पाकिस्तानी लष्कराची धारणा काहीही असली, तरी शरीफ यांचे पाकिस्तानच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होणे हे भारतासाठी महत्त्वाचे ठरते. याचे एक कारण म्हणजे नवाझ शरीफ हे अलीकडच्या काळातील सर्व भारतीय पंतप्रधानांना भेटलेले आहेत. त्यातही अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीगाठी अधिक लक्षणीय ठरल्या होत्या. वाजपेयींची लाहोर मैत्री बसयात्रा शरीफ दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले त्या काळातली. तर नरेंद्र मोदी पंतप्रधान बनण्याच्या जरा आधी शरीफ तिसऱ्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान बनले. ते आणि मोदी यांच्या भेटीगाठी उल्लेखनीय ठरल्या होत्या. २०१५ मध्ये रशियातील युफा परिषदेच्या निमित्ताने दोन नेत्यांच्या वतीने प्रसृत झालेल्या संयुक्त जाहीरनाम्यात काश्मीरचा उल्लेख टाळण्यात आला होता. तत्पूर्वी २०१४ मध्ये मोदींच्या शपथविधी सोहळ्यास नवाझ शरीफ तेथील लष्कराचा विरोध झुगारून उपस्थित राहिले होते. तीन वेळा तीन वेगवेगळ्या सत्ताकेंद्रांकडून शरीफ यांना पदच्युत करण्यात आले होते. यातील दुसऱ्या खेपेस तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी त्यांचे सरकार उलथून टाकले, त्या वेळी कारगिल संघर्षात भारतासमोर नमते घेतल्याचा आणि त्या संघर्षाची जबाबदारी पाकिस्तानी लष्करावर ढकलल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. पण फेब्रुवारीमध्ये बसयात्रा आणि पुढे जून-जुलैमध्ये कारगिलमध्ये घुसखोरी हा धोरणात्मक विरोधाभास शरीफ यांना अमान्य होता हेही कारण होते. भारताबरोबर काश्मीरसह सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याची तयारी ठेवलेले ते दुर्मीळ पाकिस्तानी नेते ठरतात. त्यामुळे पाकिस्तानशी चर्चेची शक्यता शरीफ यांच्या परतण्यामुळे बळावली आहे.
हेही वाचा >>> अन्वयार्थ : पॅलेस्टाईन मैत्रीचा जागर
अर्थात यासाठी भारताने ठेवलेली काश्मीर खोऱ्यात दहशतवादास खतपाणी आणि घुसखोरी समाप्तीची अट शरीफ यांच्या पाकिस्तानला प्रथम मान्य करावी लागेल. पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर आज त्यांचे स्वागत करतील. पण हा दोस्ताना किती दिवस टिकून राहील, यावर बरेच काही अवलंबून आहे. कारण भारताशी चर्चा करण्याविषयी आग्रही राहणारे शरीफमियाँ भ्रष्टाचारातही अव्वल नंबरी आहेत! त्यामुळेच त्यांच्यावर जेव्हा-जेव्हा कारवाई झाली, त्या वेळी फारच थोड्यांनी सहानुभूती, कणव वगैरे व्यक्त केली होती. पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कार्यकाळात त्यांनी पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला रुळांवर आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, परंतु स्वत:, स्वत:चे कुटुंबीय आणि स्वत:च्याच नावे असलेल्या पक्षातील सदस्यांच्या नावे बेहिशेबी संपत्ती देशात आणि परदेशात उभी करण्याची त्यांची सवय अलीकडेपर्यंत सुटलेली नव्हती. त्यांच्या अशाच भ्रष्टाचाराकडे बोट दाखवत पाकिस्तानी लष्करशहांनी त्या देशातील लोकशाही व्यवस्थेतला फोलपणा अधोरेखित केला होता. शरीफमियाँ भ्रष्टही आहेत नि भारताशीही नमते घेतात, असे दाखवत त्यांना सत्ताच्युत करण्याचे प्रारूप पाकिस्तानी लष्करशहांना पुरेसे ठाऊक आहे. त्यांच्यामागे आजही अनेक न्यायालयीन चौकशांचा ससेमिरा लागलेला आहे. त्यापासून सुटका करून घ्यावी लागेल. सूडबुद्धीने वागणार नाही, असे त्यांनी आल्यावर जाहीर केले आहे. ते पाकिस्तानात आले त्या भाडोत्री विमानाचे नाव होते ‘उम्मीद-ए-पाकिस्तान’. त्यांच्याविषयी पाकिस्तानबरोबरच भारतालाही सध्या ‘उम्मीद-ए-शराफत’ (शहाणपणाची अपेक्षा) आहे.