गर्भ वाढवावा ही नाही, हे ठरविण्याचा हक्क स्त्रीला असलाच पाहिजे, म्हणून अमेरिकेत प्रदीर्घ काळ सरकारविरोधी लढा देणाऱ्या सीसिल रिचर्ड्स यांचे सोमवारी कर्करोगाने निधन झाले. त्या ‘प्लान्ड पॅरेन्टहूड फेडरेशन ऑफ अमेरिका’ या संस्थेच्या माजी अध्यक्ष होत्या. गर्भपातबंदीचे समर्थक डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळ सुरू होत असताना आणि असंख्य महिलांमध्ये याविषयी चिंतेचे वातावरण असताना त्यांचा आवाज ठरलेल्या रिचर्ड्स यांचे निधन होणे हा या चळवळीला मोठाच हादरा आहे.
अन्यायाविरोधात आवाज उठविण्याची वृत्ती काहींमध्ये उपजतच असते. सीसिल या अशांपैकीच एक होत्या. मूळच्या शिक्षिका आणि पुढे टेक्सासच्या गव्हर्नर झालेल्या अॅन रिचर्ड्स आणि नागरी हक्कांच्या पायमल्लीविरोधात आयुष्यभर लढा देणारे वकील डेव्हिड रिचर्ड्स यांची ही मुलगी. नववीत शिकताना व्हिएतनाम युद्धाच्या निषेधार्थ दंडावर काळी पट्टी बांधून शाळेत गेली, म्हणून तिला सरकारी शाळा सोडून खासगी शाळेत प्रवेश घ्यावा लागला होता. ब्राउन युनिव्हर्सिटीतून तिने इतिहासाची पदवी प्राप्त केली. वयाच्या सोळाव्या वर्षीच तिने तिच्या आईला एका खटल्याप्रकरणी गर्भपाताच्या समर्थनार्थ मोहीम उभारण्यास मदत केली होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या विविध क्षेत्रांतील कामगार आणि मजुरांच्या हक्कांसाठी काम करू लागल्या. काही काळ ‘फोर्ड फाउंडेशन’च्या विश्वस्त मंडळावर होत्या. डेमॉक्रॅटिक नेत्या नॅन्सी पेलोसी यांच्या डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ पदाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली.
हेही वाचा : तर्कतीर्थ विचार : अस्पृश्यता निर्मूलन कार्य
‘प्लान्ड पॅरेन्टहूड’ ही महिलांना आरोग्यविषयक सेवा पुरविणारी आणि लैंगिक शिक्षण देणारी अमेरिकेतील महत्त्वाची संस्था आहे. २००६ ते २०१८ या १२ वर्षांच्या काळात त्यांनी या संस्थेचे अध्यक्षपद भूषविले. जॉर्ज बुश आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या (पहिल्या) काळात त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. रिपब्लिकन पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांत गर्भपाताच्या हक्कांवर गदा आणण्याचे प्रयत्न त्यांच्या संस्थेने हाणून पाडले. रिचर्ड्स यांच्या कार्यकाळात संस्थेच्या समर्थकांची संख्या २० लाख ५० हजारांवरून एक कोटी १० लाखांपर्यंत वाढली. त्यांच्या देणगीदारांत सात लाखांची भर पडली. मात्र एकीकडे कार्य नवी उंची गाठत असताना सरकार मात्र पंख छाटण्यासाठी सर्व प्रयत्न करत होते. त्यांच्या स्वत:च्या टेक्सास राज्यातच सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक साहाय्यापासून संस्थेला वंचित ठेवले गेले. गर्भरोधक, एचआयव्ही प्रतिबंधक औषधे आणि साहित्य देणारे, स्तनांच्या कर्करोगाच्या चाचण्या करणारे शेकडो दवाखाने बंद करण्यात आले. मात्र सीसिल रिचर्ड्स यांनी आपला लढा नेटाने सुरू ठेवला. २०२४मध्ये त्यांना मानाच्या ‘प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम’ने गौरविण्यात आले.
२०१८ साली ‘प्लान्ड पॅरेंटहूड’च्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर त्यांनी अन्य दोन सहकाऱ्यांसह ‘सुपरमेजॉरिटी’ ही संस्था स्थापन केली. मतदानाचा हक्क, शस्त्र बाळगण्यावर नियंत्रण, भरपगारी रजा, समान वेतन असे अतिसामान्य समजले जाणारे मुद्दे किती महत्त्वाचे आहेत, हे अधोरेखित करणे, हे या संस्थेचे उद्दिष्ट होते.
हेही वाचा : पहिली बाजू : समर्पित कार्यकर्त्यांना दंडवत!
‘प्लॅन्ड पॅरेन्टहूडमधील माझ्या कार्यकाळाबद्दल एक खंत नेहमी वाटत आली. आम्हाला महिलांच्या हक्कांविषयी सरकार किती उदासीन असू शकते आणि राजकीय स्वार्थासाठी सामान्यांचे हक्क पायदळी तुडविण्यास किती उत्सुक असू शकते, याचा पुरेसा अंदाज आला नाही,’ असे त्यांनी २०२२मध्ये ‘न्यू यॉर्क टाइम्स’मधील लेखात नमूद केले होते. ‘मेक ट्रबल : स्टँडिंग अप, स्पीकिंग आउट अँड फाइंडिंग द करेज टू लीड’ या त्यांच्या पुस्तकात त्यांनी स्वत:च्या जडणघडणीची कारणमीमांसा स्पष्ट केली आहे. आज अमेरिकेतील महिलांना अशा धाडाडीच्या नेतृत्वाची नितांत गरज असताना, रिचर्ड्स यांचा ‘आवाज’ नक्कीच प्रेरक ठरेल.