…त्या देशात मोबदला मिळत असेल तर स्वत:च्या आयुष्यातील चमचमीत क्षणही सार्वजनिक करायला अनेक जण तयार असतात. त्यामुळे आपल्या सगळ्या उद्योगांची झाडाझडती होणार, हे अमेरिकेतल्या सर्वात बलाढ्य पदाचे दावेदार बनू पाहणाऱ्या ट्रम्प यांच्या अर्थातच लक्षात आलं.
न्यायमंडळाच्या एक नाही, दोन नाही, तीन नाही, चारही नाही… तर बाराच्या बारा सदस्यांनी एकमुखानं अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ‘हश मनी’ प्रकरणात दोषी ठरवलं. हश मनी म्हणजे आपलं चौर्यकर्म लपवण्यासाठी त्यांनी चोरून काही खर्च केला. हे चौर्यकर्म म्हणजे स्टिफनी ग्रेगरी क्लिफर्ड या महिलेशी दाम मोजून केलेली शय्यासोबत. स्टिफनी पॉर्नस्टार होती वा आहे. ‘या’ व्यवसायात टोपणनावं प्रचलित असतात. नाइट क्वीन, बर्स्टिंग ब्युटी छाप काही. तसं हिचं नाव ‘स्टॉर्मी डॅनियल’. तर या ‘वादळी’ बाईला आपल्या घरी बोलवून ट्रम्प यांनी बरंच काय काय केलं.
मुद्दा तो नव्हता. लैंगिकता, शरीरसंबंध वगैरे मुद्द्यांवर कमालीचं औदार्य दाखवणाऱ्या समाजात एका लोकप्रिय (लोकप्रिय कारण ट्रम्प स्वत: एक टीव्ही शो करत. त्यासाठी ते ओळखले जात.) अशा धनाढ्यानं एका शरीरसेवा देणाऱ्या महिलेशी संबंध ठेवले यामुळे काही कोणाला झिणझिण्या येण्याचा प्रश्न नव्हता. ट्रम्प यांच्या नावानं लगेच कोणी अब्रह्मण्यम म्हणून नाकं मुरडत होतं असंही नाही. मामला दोघांचा होता. यांनी दिलं तिनं घेतलं. तिनं दिलं यांनी घेतलं. अशी ही उभयपक्षी सरळ सोपी स्वखुशीनं झालेली देवाणघेवाण. त्यात अन्य कोणी नाक खुपसण्याचं काहीही कारण नव्हतं. तसं कोणी खुपसतही नव्हतं. मग प्रश्न कुठे आला?
तर अशा या स्वच्छंदी ट्रम्प यांना २०१६ साली अध्यक्षीय निवडणुकीत उतरण्याची इच्छा झाली तेव्हा. त्या देशात एकदा का एखाद्या व्यक्तीनं सार्वजनिक क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला की लगेच माध्यमं, राजकीय हितशत्रू त्या व्यक्तीचं पूर्वायुष्य भिंगाखालून घालू लागतात. त्या व्यक्तीचं शिक्षण, अभ्यासात काय दिवे लावले ते, महाविद्यालयात काय काय उद्याोग केले, प्रेमप्रकरणं, कमाई, ती कोणत्या मार्गानं किती होते हे तर असतेच. पण सदर गृहस्थ ही रक्कम खर्च कशी करतो याचीही चिरफाड होते. या व्यक्तीची जीवनमूल्यं, पती/पत्नी संबंधांतली मतं, घरी बायकोला कामात मदत करतो का, रविवारी नुसता टीव्ही बघत लोळत बसतो की काही धर्मार्थ, सामाजिक कामं वगैरे करतो, पाळीव प्राण्यांची आवड की नावड, त्यातही कुत्रा की मांजर… अशा एक ना दोन मुद्द्यांवर सदर व्यक्तीच्या गुणावगुणांचा हिशेब मांडला जातो. अगदी सर्व चारचौघांत.
हेही वाचा >>> भूगोलाचा इतिहास : रेल्वेने दिली आपल्याला प्रमाणवेळ…
आणि इथे तर ट्रम्प अमेरिकेतल्याच नव्हे तर जगातल्या सर्वात बलाढ्य पदाचे दावेदार बनू पाहत होते. तेव्हा आपल्या सगळ्या उद्याोगांची झाडाझडती होणार, हे ट्रम्प यांना अर्थातच लक्षात आलं. वैयक्तिक आयुष्यात ट्रम्प ‘दक्षिण गोलार्धा’त चांगलेच उद्याोगी, उपद्व्यापी होते. तेव्हा ही आपली प्रकरणं बाहेर येतील याची चिंता त्यांना लागली. त्यातही या ‘स्टॉर्मी डॅनियल’बाबत तर जरा अधिकच! त्या देशात मोबदला मिळत असेल तर स्वत:च्या आयुष्यातील चमचमीत क्षणही सार्वजनिक करायला अनेक जण तयार असतात. सणसणीखोर माध्यमं आणि काही पुस्तक प्रकाशक या ‘अशा’ लोकांना बरोबर गाठतात. ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी असाव्यात तसे ट्रम्पही त्याच समाजातले. त्यांच्या लक्षात आलं स्टॉर्मी डॅनियल आपली ‘रंगल्या रात्री अशा’ छापाची कहाणी विकून बख्खळ कमाई करू शकेल! इतके दिवस ती शक्यता नव्हती. कारण ट्रम्प यांचं आयुष्य खासगी होतं. पण आता अध्यक्षीय निवडणुकीला ते उभे राहतायत म्हटल्यावर त्यांच्या याच खासगी आयुष्याविषयी अनेकांना कुतूहल असणार. आणि ते शमवण्याच्या नादात स्टॉर्मीबाईंनी आपली वादळी कहाणी कोणा प्रकाशकाला आपली अर्थगरज शमवण्यासाठी विकली तर ऐन निवडणुकीत अनवस्था प्रसंग ओढवायचा. ते ट्रम्प यांना टाळायचं होतं.
म्हणून त्यांनी आपल्या वकिलामार्फत स्टॉर्मीबाईंनी गप्प राहावं यासाठी एक करार केला. बाई तयार झाल्या. गप्प राहण्याची किंमत १.३० लाख डॉलर्स. (रुपयात धर्मांतर केल्यास साधारण १ कोटी १० लाख रुपये) ती त्यांनी आपल्या वकिलामार्फत स्टॉर्मीबाईंना दिली. या वकिलाचं नाव मायकेल कोहेन. या व्यवहाराबाबतही कोणाचा आक्षेप असायचं कारण नाही. पण मग प्रश्न कुठे आला?
तर ट्रम्प यांनी ही रक्कम वकिलाला वळती करताना स्वत:च्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या खात्यातनं दिली आणि ती देताना ‘वकिलाचा मोबदला’ असा त्याचा तपशील दिला, तेव्हा. न्यूयॉर्कचे ॲटर्नी ऑल्विन ब्रॅग यांनी या प्रकरणाचा शोध सुरू केला तेव्हा अधिकाधिक तपशील समोर येत गेला. हा चोरटा खर्च दाखवण्यासाठी ट्रम्प यांनी आपल्या कंॲपन्यांची वेगवेगळी ३४ खाती वापरली. म्हणजे खर्च केला एकीकडे आणि तो दाखवला दुसऱ्याच खात्यात असा उद्याोग. अमेरिकेत हे ॲटर्नी हे एक भारी प्रकरण असतं. ते स्वतंत्रपणे चौकशी करू शकतात. ‘मॅकेंझी’ या जगद्विख्यात बड्या वित्त कंपनीचे तत्कालीन प्रमुख, मॅनेजमेंट गुरू वगैरे होते ते रजत गुप्ता यांना तुरुंगात पाठवणारे ‘इनसायडर ट्रेडिंग’ प्रकरण अशाच माजी न्यूयॉर्क अॅटर्नीने- प्रीत भरारा हे त्यांचं नावं- धसास लावलं होतं. (त्यांच्यावर याच स्तंभात ‘भरारा दरारा’ (२९ ऑक्टोबर २०११) या शीर्षकाचा लेख प्रसिद्ध झाला होता.) तर ब्रॅग यांनी या प्रकरणी चौकशी केली आणि सर्व विरोध, व्यक्तिगत टीका, ट्रम्प समर्थक उजव्या विचारसरणीच्या जल्पकांकडून होणारं ट्रोलिंग अशा सगळ्याला तोंड देत देत हा खटला तडीस नेला.
हेही वाचा >>> बुकमार्क : भाषेच्या चाकूला कथनाची धार…
यासाठी या १२ जणांच्या न्यायमंडळांत विविध क्षेत्रातले सदस्य निवडले गेले. त्यात पाच महिला होत्या. त्यांची नावं गोपनीय ठेवली गेली. या १२ च्या १२ जणांनी सर्व ३४ मुद्द्यांवर ट्रम्प यांना दोषी ठरवलं. या खटल्याचा साद्यांत तपशील सादर केला जात होता. इतका की नावापुरते वस्त्रांकित ट्रम्प आपल्याला कसे बिलगू पाहत होते असा ‘स्टॉर्मी’ तपशीलही या डॅनियल बाईंनी न्यायालयात दिला. त्यांना पैसे देणारे कोहेनही उलटले. हे इतके सगळे तपशील समोर येत असताना हे असं काहीही घडलं नाही आणि मी निरपराधच आहे असं फक्त एक व्यक्ती म्हणत होती.
ती म्हणजे अर्थातच खुद्द ट्रम्प. त्यांना हे सर्व अमान्य होतं आणि आहेही. ट्रम्प म्हणतात जनतेच्या न्यायालयात- म्हणजे ५ नोव्हेंबरच्या अध्यक्षीय निवडणुकीत- खरा न्याय होईल. पण या निवडणुकीत ट्रम्प हे अधिकृतपणे ‘अपराधी’, ‘गुन्हेगार’ म्हणून सामोरे जातील. कारण ते काहीही म्हणोत ट्रम्प हे गुन्हेगार असल्याचं न्यायालयात सिद्ध झालं. असे ‘गुन्हेगार’ ठरलेले पहिले अध्यक्ष ट्रम्प. याआधी ‘अशाच’ एका प्रकरणात अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यावर ठपका ठेवला गेला. त्यांच्यावर महाभियोग चालवला गेला. असा महाभियोग चालवला गेलेले क्लिंटन जवळपास सव्वाशे वर्षातले पहिले अध्यक्ष.
या दोन्ही ‘पहिलटकर’ अध्यक्षांना झालेल्या शिक्षांमध्ये स्त्री आणि संबंध हे एक साम्य आहे. पण लक्षात घ्यायलाच हवी अशी बाब म्हणजे या दोघांनाही शासन झालं ते या संबंधांसाठी नाही. तर हे दोघेही शपथेवर खोटं बोलले/ खोटे हिशेब दिले यासाठी. स्खलनशीलता हा गुन्हा नाही. तरी उच्चपदस्थांनी, सरकारी सेवकांनी सत्यवचनाची शपथ घेऊन खोटं बोलणं हा मोठा गुन्हा आहे.
…तरी बरं अमेरिकेत ‘सत्यमेव जयते’ वगैरे असं काही राष्ट्रीय बोधवाक्य नाही.
girish.kuber@expressindia.com
@girishkuber