निखिल बेल्लारीकर 

पानिपतच्या लढाईबद्दल युरोपीय साधने सापडतात, पण प्रा. मॅथ्यू मोस्का यांच्या पुस्तकात एक चिनी संदर्भ सापडला, त्याची ही कहाणी, आजच्या ‘पानिपत दिना’निमित्त..

मराठी माणसाला पानिपतच्या तिसऱ्या लढाईबद्दल नव्याने सांगण्याची गरज नाही. पानिपतच्या अपयशाचा मराठय़ांना जबर फटका बसला, इतका की त्याची स्मृती आजही मराठी भाषेत कैक वाक्प्रचारांच्या माध्यमातून जिवंत आहे. मात्र त्यातून सावरण्यातही त्यांना यश आले. थोरले माधवराव पेशवे, महादजी शिंदे, नाना फडणवीस, यशवंतराव होळकर, इत्यादी अनेक कर्तबगार मराठा सत्ताधीशांनी त्यानंतर आपले पाणी दाखवले. प्लासीनंतर बळजोर झालेल्या इंग्रजांसोबतही कैक लढायांमध्ये मराठय़ांनी मोठे शौर्य गाजवले. पानिपतापूर्वी अनेक वर्षे मुघलांशी व इंग्रज, पोर्तुगीज इ. युरोपीय सत्तांशी यशस्वीपणे संघर्ष केल्यामुळे भारतात आणि भारताबाहेरही गाजलेल्या मराठय़ांनी पानिपतानंतरही स्वत:चा दबदबा भारतभर टिकवून ठेवला. परिणामी तत्कालीन भारताचा उल्लेख करताना समकालीन साधनांत मराठय़ांचा उल्लेख येणे क्रमप्राप्तच होते. याचे प्रत्यंतर तत्कालीन साधने वाचताना नेहमीच येते.

पानिपताच्या लढाईचा उल्लेख मराठी, फारसी, इंग्रजी, पोर्तुगीज, फ्रेंच व डच भाषांमधील साधनांत येणे तितकेसे आश्चर्यकारक नाहीच. मराठे व अफगाण हे आपापसात पानिपताची लढाई लढल्यामुळे त्यांच्या पत्रव्यवहारात, तसेच युरोपीय सत्तांच्या व्यापारी नजरेने लिहिलेल्या अहवालांमध्ये या लढाईचा उल्लेख येणे हे आश्चर्यकारक नाही. हे तत्कालीन व्यापारी अहवाल आज सटीकपणे अभ्यासले जातात. या प्रकारचे अभ्यास केवळ भारतीय इतिहासाचेच नव्हेत तर आशियातील अन्य देशांच्या इतिहासाचेही झालेले आहेत.

मात्र ‘फ्रॉम फ्रंटियर पॉलिसी टु फॉरेन पॉलिसी : द क्वेश्चन ऑफ इंडिया अ‍ॅण्ड द ट्रान्स्फॉर्मेशन ऑफ जिओपॉलिटिक्स इन चिंग चायना’ या पुस्तकात, पानिपताच्या लढाईचा उल्लेख एका चिनी ऐतिहासिक पुस्तकात आल्याचे वाचनात आले आणि मी अवाक् झालो. ते चिनी बखरवजा पुस्तक  इ.स. १८०७ मध्ये प्रकाशित झालेले होते. कुठे चीन आणि कुठे पानिपत? प्राचीन काळी प्रामुख्याने बौद्ध धर्म आणि व्यापार या दोन माध्यमांतून भारत आणि चीनचा संपर्क होता खरा, परंतु साधारण चौदाव्या शतकापासून दोन्ही देशांमध्ये एकमेकांबाबतची उत्सुकता किंवा प्रत्यक्ष संपर्क विशेष दिसत नाही. त्यामुळे या उल्लेखाबाबत एकाच वेळी प्रचंड आश्चर्यही वाटले आणि उत्सुकताही! त्यामुळे मी तत्काळ, हा संदर्भ देणाऱ्या इंग्रजी पुस्तकाचे लेखक आणि युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन येथील इतिहासाचे प्राध्यापक डॉ. मॅथ्यू मोस्का यांच्याशी संपर्क साधला व याबद्दल अधिक माहिती देण्याची विनंती केली. त्यांनीही मोठय़ा मनाने संबंधित उताऱ्याचा मूळ चिनी भाषेतील मजकूर व त्याचे इंग्रजी भाषांतर पाठवले.

प्रो. मोस्का यांच्या पुस्तकावरून आणि त्यांनी दिलेल्या उताऱ्याच्या भाषांतरावरून चिनी ऐतिहासिक साधनामधील पानिपताच्या उल्लेखामागील पार्श्वभूमी समजण्यास मदत होते. मुळात हा उल्लेख येतो तो तत्कालीन अफगाण-चीन संबंधांच्या परिप्रेक्ष्यात. तेव्हा चीनवर  द्रल्लॠ (उच्चारी चिंग) साम्राज्याची सत्ता होती. इ.स. १७५०-६० च्या दरम्यान चिंग साम्राज्याने शिंजियांग प्रांतातील जुंघार सत्तेचा पराभव करून त्या प्रांतावर कब्जा केला व जुंघार समाजातील लोकांचे जवळपास पूर्णत: शिरकाण केले. इकडे मराठय़ांशी पानिपतची लढाई झाल्यावर अहमदशाह अब्दालीने काश्मीरवर कब्जा केला व मध्य आशियातही चिंग साम्राज्याविरुद्ध आघाडी करायचा प्रयत्न केला, परंतु त्यात त्याला अपयश आले. आता अब्दालीचे प्रभावक्षेत्र हे चिंग साम्राज्याच्या वायव्य सीमेलगतच होते कारण अफगाणिस्तानचा ईशान्य भाग आणि शिंजियांग प्रांत हे एकमेकांपासून तितकेसे लांब नाहीत. शिवाय अब्दालीच्या काश्मीरमधील आणि मध्य आशियातील हालचालींच्या बातम्या चिंग दरबारात पोहोचतच होत्या.

अब्दालीने आता थेट चिंग साम्राज्याशी राजकीय वाटाघाटी सुरू केल्या. इ.स. १७६२ मध्येच त्याने बीजिंगला एक शिष्टमंडळ पाठवले. त्यांनी तत्कालीन चिनी सम्राट  द्रंल्ल’ल्लॠ (उच्चारी चानलाँग) याला चार उत्तम घोडे भेट दिले, मात्र चानलाँगवर त्याचा विशेष परिणाम झालेला दिसत नाही. अब्दालीला उत्तरादाखल पाठवलेल्या पत्रात चानलाँग पानिपताच्या लढाईचा उल्लेख करून युद्धाच्या निरर्थकतेबद्दल बोलून स्वत:च्या सर्वशक्तिमानतेची प्रौढी मिरवताना आढळतो! हा उतारा मुळातूनच पाहण्यासारखा आहे. त्यातून चिनी सम्राटाची एकूणच या घटनेकडे पाहण्याची भूमिका स्पष्ट होते.

मूळ चिनी लिपीत उताऱ्याचे मराठी भाषांतर असे –

‘तुम्ही लिहिल्यानुसार, मराठय़ांचा खान (नेता) नाबालाजी (नानासाहेब पेशवे) तुम्ही (अब्दाली) जहानाबादचा किल्ला घेतल्याचे ऐकून अनेकांसोबत लाखोंचे सैन्य घेऊन लढण्यासाठी आला. तो कर्नाल इथे असताना तुम्ही त्याच्याशी लढाई करण्यास येत असल्याचे त्याने ऐकले. त्यानंतर त्यासकट अनेकांनी पानिपत येथील किल्ल्यात आश्रय घेतला. व त्यानंतर सहा महिने तुम्ही त्याला वेढा घालून त्याचे अनेक मोठमोठे सरदार, तसेच लाखभर सैनिक ठार मारले व मोठय़ा प्रमाणात सोने, चांदी व खजिना ताब्यात घेतलात. आता, नाबालाजीकडे इतके मोठे सैन्य होते तर लढाई करायची सोडून तो त्याच्या मरणाची वाट पाहत किल्ल्याच्या आश्रयाने का राहिला? ही गोष्ट समजण्याच्या पलीकडची आहे.’ 

वरील उताऱ्यातून अनेक रोचक गोष्टी लक्षात येतात. खान हा शब्द आज प्रामुख्याने मुस्लीमधर्मीय आडनाव म्हणून प्रचलित असला तरी मुळात त्याचा अर्थ नेता असा आहे. इथे सुरुवातीला चानलाँग अब्दालीचे पत्र उद्धृत करत असल्यामुळे अब्दालीचा दृष्टिकोनही दिसून येतो. प्रत्यक्ष लढाईत मराठय़ांच्या बाजूने मुख्य म्हणून जरी सदाशिवरावभाऊ असले तरी पत्रात उल्लेख नानासाहेब पेशव्यांचा आहे. यात चिनी दरबाराचा गोंधळ झालेला दिसून येतो. शिवाय, मराठय़ांच्या बाजूने पानिपतात लाखोंचे सैन्यच नव्हते. पन्नासेक हजार लढाऊ सैन्यापलीकडे मराठय़ांकडे त्या दिवशी सैन्य नव्हते. पानिपताच्या किल्ल्यात मराठे बराच काळ राहिले हे खरे, परंतु सहा महिने नक्कीच नाही- फारतर शेवटचे तीनेक महिने. आणि लढाईत मराठय़ांच्या बाजूचे अनेक मोठमोठे सरदार धारातीर्थी पडले हे खरेच- पण लाखो सैनिक नक्कीच मरण पावले नाहीत. विश्वासरावांना गोळी लागल्यावर बहुतांश मराठय़ांनी मैदान सोडल्यामुळे शेवटच्या लढाईत थोडेच सैनिक उरले होते. आणि अफगाणांना युद्धोत्तर मोठी लूटही मिळाली नाही. तेव्हा अब्दालीने लढाईचे वर्णन बरेच अतिशयोक्त केलेले दिसते हे उघड आहे.

त्यावरची चानलाँगची टिप्पणीही रोचक आहे. त्याला मुळात या घटनेविषयी विशेष माहिती नसावी हे उघड आहे. तो फक्त साधारण तर्काच्या आधाराने बोलताना दिसतो. सर्वसाधारणपणे मोठी सेना सोबत असताना किल्ल्याच्या आश्रयाने राहण्यापेक्षा कोणताही सेनापती युद्धाचा मार्गच पत्करेल हे उघड आहे, मात्र पानिपत मोहिमेत बरोबर याच्या उलट घटना घडली. त्यामुळे याबद्दल आश्चर्य व्यक्त करून, त्याने त्यापुढील वाक्यात युद्ध कसे निरर्थक आहे आणि तो स्वत: कसा सर्वज्ञ व सर्वशक्तिमान आहे याची प्रौढी मिरवलेली दिसते. चिनी सम्राट स्वत:ला थेट देवाकडून राज्याची सनद मिळालेली आहे असे मानत. त्यामुळे इतर सत्ता या आपल्या खालच्या दर्जाच्या, ही त्यांची मूलभूत धारणा असे. चानलाँग इथे त्याच्या उत्तरातून तेच अधोरेखित करू पाहतो आहे.  

यानंतर उभयपक्षी या दिशेने विशेष प्रयत्न झालेले दिसत नाहीत. पंजाबात शिखांचा उदय झाल्यावर त्यांच्याशी लढण्यात अब्दाली व त्याचा मुलगा तैमूरशाह या दोघांचेही बरेच सामर्थ्य खर्ची पडले. परिणामी लडाखच्या पूर्वेला अफगाणांचा प्रभाव उरला नाही व त्यामुळे चिंग साम्राज्याची भारतातील घटनांप्रतिची उत्सुकताही मावळली.

अशी ही पानिपताची चीनमधील लहानशी कहाणी. चिंग शी लू (Qing Shi Lu) नामक चिंग साम्राज्याची तपशीलवार हकीकत सांगणारा दरबारी अधिकृत इतिहासग्रंथ आहे. चिंग साम्राज्यातील प्रत्येक राजाच्या कारकीर्दीवर यात अनेक खंड आहेत. चानलाँगच्या कारकीर्दीशी संबंधित भाग त्याच्या मरणोत्तर काहीच वर्षांत प्रकाशित झाला. त्यातील हा उल्लेख आहे. आजवर मराठेशाहीचा समकालीन चिनी साधनांतील हा पहिला व एकमेव ज्ञात उल्लेख आहे. याखेरीज इतरही उल्लेख असू शकतील, मात्र त्यासाठी शेकडो खंडांचा हा ग्रंथ चिनी भाषा शिकून

धुंडाळला पाहिजे. पानिपताचा उल्लेख जसा पश्चिमेला हजारो किलोमीटर दूरवरच्या युरोपातील साधनांत आढळतो तसाच पूर्वेला हजारो किमी दूरवरच्या चीनमधील साधनांतही आता आढळला आहे हे या निमित्ताने लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

nikhil.bellarykar@gmail.com