कालयंत्रातून प्रवास करणाऱ्या ओटीटी फलाटांवरल्या मालिकांनी सांप्रतकाळी अनेकांवर भुरळ घातली असली, तरी कथांमधून इतिहास रचणाऱ्या पुस्तकांमध्ये कालप्रवास करण्याची क्षमता आद्य मानावी लागेल. जर्मनीची ‘डार्क’, ब्रिटनमधील ‘बॉडीज’ या कालप्रवासी मालिकांसारखे कथानक मरहट्ट वाचक भूमीवर घडवायचे झाल्यास पटकथाकारांना नारायण हरी आपटे यांच्या न पटणारी गोष्ट, सुखाचा मूलमंत्र, पहाटेपूर्वीचा काळोख या कादंबऱ्या, गो. ना. दातारांच्या ‘अध:पात’, ‘प्रवाळदीप’, किंवा काशीबाई कानिटकर यांच्या ‘चांदण्यातील गप्पा’, ‘रंगराव’ आदी कथा-कादंबऱ्यांची पारायणे शतकापूर्वीचा समाज जाणून घेण्यासाठी करावी लागतील. पण शतकानंतर या कथा-कादंबऱ्यांचे वाचन (या दशकातील मराठी पुस्तकांबाबतही वाचनअनास्था अजरामर असताना) भाषाबदल, संस्कृतीबदल आणि जगण्यातील बदलांमुळे अवघड बनून जाते. दातारांच्या कादंबऱ्यांच्या स्वस्त आवृत्त्या फडताळात मिरविण्यासाठी किंवा रद्दी दुकानांत जिरवण्यासाठी तयार होतात का, असा प्रश्न आहे. पण तिकडे नॉर्वेमध्ये ‘फ्युचर लायब्ररी’ हा प्रकल्प दहा वर्षांपूर्वी सुरू झाला आहे. त्यांना आज लिहिणाऱ्या निवडक दहा लेखक-लेखिकांची पुस्तके १०० वर्षांनंतर प्रकाशित करायची आहेत. म्हणजे दर वर्षी निवडलेल्या एका लेखकाने हस्तलिखित आज द्यायचे, ते पुस्तकरूपाने १०० वर्षांनी तयार होणार. तोवर वाचनभाषा-संस्कृती आणि जगणे बदलण्याची तमा त्यांना बिलकूल नाही!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा