चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी
मोदींनी जी-२० परिषदेच्या मंचावर मांडलेल्या विचारांचा वारसा आता जगभरातील अनेक राष्ट्रांपर्यंत पोहोचला आहे. भारताला जगातील महाशक्ती करण्याचे या सरकारचे काम येत्या २५ वर्षांत प्रत्यक्षात येईल.
जी-२० शिखर परिषदेच्या यजमानपदामुळे भारताची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा जगाच्या पटलावर ठळकपणे अधोरेखित झाल्यामुळे जगाचे सांस्कृतिक नेतृत्व करण्याच्या पंतप्रधानांच्या स्वप्नाची कवाडे खुली झाली आहेत. नरेंद्र मोदी यांच्या गेल्या नऊ वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतील यशाचे शिखर जी-२० परिषदेच्या यजमानपदामुळे पादाक्रांत झाले. मानवकेंद्रित विकासाचा वाटाडय़ा म्हणून जगभरातील महासत्तांनी भारतास स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व केवळ राजनैतिक मुत्सद्देगिरीतूनच प्रकट होते असे नाही. या देशाची संपन्न परंपरा, समृद्ध संस्कृती आणि सुसंस्कृत लोकजीवनाचा आदर्श जगासमोर उभा करणे, ही पंतप्रधानपदाची मोठी जबाबदारी आहे, असे मानून त्या दिशेने वाटचालीस दिशा प्राप्त झाली आहे. भारत हा केवळ जगाच्या पाठीवरील भौगोलिक सीमांनी आखलेला एक भूभाग नाही, ‘वसुधैव कुटुम्बकम्’ ही येथील संस्कृतीची शिकवण आहे.
जी-२० परिषद हा कालपरवापर्यंत जगभरातील आर्थिक समस्यांवर सामूहिक सहकार्याने तोडगा काढण्याकरिता एकत्र आलेल्या राष्ट्रांचा मंच होता. भारताकडे या परिषदेचे यजमानपद आले आणि जी-२० परिषदेचा वैचारिक पाया विस्तारला. जगातील ‘नाही रे’ वर्गासही विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे आणि विकासनीती केवळ उत्पन्नाधारित न राहता, मानवकेंद्रित असावी, अशी आग्रही भूमिका घेऊन मोदींनी जी-२० परिषदेच्या मंचावर मांडलेल्या विचारांचा वारसा आता जगभरातील अनेक राष्ट्रांपर्यंत पोहोचला आहे.
भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन
आपण ज्यामध्ये स्वत:स पाहातो, तेवढीच आपली संस्कृती आणि परंपरा नाही. तर, जगाला आपल्यामध्ये जे काही दिसते, ती आपली संस्कृती आणि परंपरा असते. यापूर्वी भारतातील अनेक नेते, या परदेशी पाहुण्यांना भारतीय मंदिरे, संस्कृती आणि परंपरांचा परिचय करून देण्याबाबत काहीसे उदासीनच असत. काहींनी लाजेस्तव थोडीफार ओळख करून दिली. पण, इतिहासापासून फारकत घेतल्याचाच आव आणत, भारताची आधुनिकतेकडे वाटचाल सुरू असल्याचे दाखविण्याचाच प्रयत्न त्यांनी केला. आधुनिकता गरजेची आहेच, पण भूतकाळाविषयी अनादर दाखविणे आणि परंपरा नाकारणे म्हणजे आधुनिकता नव्हे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या संस्कृतीची चिन्हे अभिमानाने मिरवतात, हे या परिषदेच्या निमित्ताने भारताने अनुभवले.
याआधीही मोदी यांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांकरिता अमृतसर येथील सुवर्ण मंदिराची भेट आयोजित केली, तर जपान, इस्रायलचे पंतप्रधान आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना गंगा आरतीची अनुभूती घडविली. चिनी अध्यक्षांना महाबलीपुरमचे दर्शन घडविले आणि प्राचीन काळातील जगाच्या बहुतांश भागांत भारताचे व्यापारी संबंध असल्याची बाबही अधोरेखित केली. २०१९ मधील प्रयागराज कुंभमेळय़ाचा एक अनोखा अनुभव ‘आयसीसीआर’च्या खास आयोजनामुळे प्रवासी भारतीय दिनाच्या निमित्ताने जगभरातील अधिकाऱ्यांना आणि विदेशी राजदूतांना घेता आला.
योगाभ्यासाची जागतिक चळवळ
शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक कल्याणासाठी योगसाधनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पाश्चिमात्य जगताला, याचे महत्त्व हळूहळू पटू लागले आहे, पण जेथे त्याची मुळे रुजली, तेथेच त्याचा संबंध तोडला गेला. जागतिक योग दिन साजरा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मंचावर जोरदार पाठपुरावा करून मोदी सरकारने प्रातिनिधिक स्वरूपात योगसाधनेवरील भारताचा हक्क सिद्ध केला. २१ जून रोजी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय योग दिन हे या चळवळीचे यश ठरले आहे. गेली दहा वर्षे जगभर हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. योग ही जगाला एकत्र आणणारी एक शक्ती ठरली आहे.
धर्म आणि संस्कृती
स्वातंत्र्यानंतर देशाची सांस्कृतिक परंपराच नाकारण्याची मानसिकता राजकारणात बळावली. सुशिक्षित भारतीयांना आपल्या प्राचीन आचारविचारांपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न सुरू झाले. परंपरांच्या आठवणी पुसट झाल्याने ते अस्वस्थ होत गेले. ही अस्वस्थता पंतप्रधान मोदी यांनी नेमकी ओळखली. प्राचीन काळापासूनचे मानवकेंद्रित समाजजीवन, आपल्या परंपरा आणि संस्कृतीचा विसर पडता कामा नये, असा स्पष्ट संदेश ते देत राहिले. आज तो बहुसंख्य सामान्य भारतीयांच्या मनात रुजला आहे. एका संपन्न संस्कृतीचे आपण वारस आहोत, ही भावना जिवंत होत आहे. कोणताही देश संघटित आणि बलवान होण्यासाठी, धर्माचे संस्थात्मक पुनरुज्जीवन केलेच पाहिजे.
शासनव्यवस्थेने आणि समाजातील अभिजन वर्गाने आपल्या परंपरा आणि संस्कृतीचा स्वीकार केलाच पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही गरज ओळखली. धर्माच्या धाग्याने संस्कृतीच्या गंगेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अत्यंत संथपणे आणि कोणताही गाजावाजा न करता त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. भव्य राम मंदिराची उभारणी ही संस्कृतीच्या आणि संघटित भावनेच्या पुनरुज्जीवनाची एक पायरी आहे. काशी विश्वनाथ मंदिर संकुलाचा व परिसराचा नेत्रदीपक कायापालट घडविणारा कॉरिडॉरदेखील मोदी सरकारने बांधला आहे. विश्वनाथ मंदिर संकुलातील नव्या अत्याधुनिक सुविधांमुळे तीर्थयात्रा सुकर झाली. वाराणसीचा चेहरामोहरा झपाटय़ाने बदलत आहे. केदारनाथ धामच्या पुनरुज्जीवनाची योजना आणि गिरिस्थानाचा विकास, प्रासाद योजना हे आता पुढचे पाऊल आहे. याच योजनेतून बद्रीनाथ धामदेखील विकसित करण्यात येणार आहे. देवभूमी उत्तराखंडची यात्रा करणाऱ्या भाविकांच्या यात्रेचा अनुभव यातून अधिक सुखद होईल.
नव्या सुधारणांची सुरुवात
भारताची सांस्कृतिक ओळख पुसण्याचे जेवढे प्रयत्न झाले, त्यासाठी आपली शिक्षणपद्धती बव्हंशी जबाबदार आहे. २०२० मध्ये अखेर नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अमलात आले. त्यामुळे घडलेला सर्वात मोठा बदल म्हणजे, मातृभाषेतून शिक्षण घेण्याची संधी इंग्रजीइतक्याच समानतेने उपलब्ध करून देण्यात आली. लाजिरवाणी बाब म्हणजे, भारतातील अनेक विद्यापीठांमध्ये हिंदू धर्माव्यतिरिक्त अन्य अनेक धर्माच्या अभ्यासाकरिता पदवी अभ्यासक्रम उपलब्ध होते आणि हिंदू तत्त्वज्ञानाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑक्सफर्डसारख्या विदेशी विद्यापीठांची दारे ठोठवावी लागत होती. आता बनारस हिंदू विश्वविद्यालयात देशातील पहिला हिंदू धर्मज्ञान पदवी अभ्यासक्रम सुरू झाला आहे. या विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागातर्फे दोन वर्षांच्या या पदवी अभ्यासक्रमात हिंदू परंपरांमधील धर्मग्रंथ, स्थापत्य, कला आणि धर्माचा इतिहास शिकविला जातो. अन्य विद्यापीठांमधूनही कालांतराने हा अभ्यासक्रम सुरू होईल. संस्कृतच्या प्रसार आणि पुनरुज्जीवनाच्या हेतूने २०१९ मध्ये केंद्रीय संस्कृत विद्यापीठ विधेयक संसदेत संमत झाले होते. मोदी सरकारने २०१८ मध्ये ‘स्टडी इन इंडिया’ उपक्रम सुरू केला. भारतीय पाककला, वनस्पती आणि वन्यजीवशास्त्र, स्वातंत्र्यलढा आदींचे ऑनलाइन प्रशिक्षण देणारा ‘युटिक्स’ (युनिव्हर्सिटीज ऑफ ट्रॅडिशनल नॉलेज सिस्टम) नावाचा एक अभ्यास मंचदेखील आयसीसीआरने सुरू केला आहे.
क्रीडा क्षेत्राचा विकास
मोदी सरकारने क्रीडासंस्कृतीच्या संवर्धनासाठी २०१४ च्या तुलनेत जवळपास तिपटीहून अधिक वाढ केली. २०१८ मध्ये पंतप्रधानांनी ‘खेलो इंडिया’ शालेय क्रीडा स्पर्धा सुरू केल्या. ‘फिट इंडिया’ चळवळ सुरू केली. ही चळवळ क्रीडाविश्वाच्याही पुढचा वेध घेणारी ठरणार आहे. ‘तंदुरुस्ती हा केवळ एक शब्द नाही, तर आरोग्यपूर्ण आणि संपन्न जीवनशैलीसाठी ती एक अत्यावश्यक बाब आहे’, असा संदेश त्यांनी ही चळवळ जाहीर करताना दिला होता. कदाचित प्रत्येक भारतीय व्यक्ती क्रीडापटू होणार नाही, पण त्यांच्या शारीरिक क्षमतेतून त्यांची आनंदी जीवन जगण्याची क्षमता निश्चितच वाढेल, हा मोदीजींचा विश्वास वास्तवात उतरलेला दिसू लागला आहे.
कोविडकाळात मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने मानववंशाला वाचविण्यासाठी केलेल्या भरीव कामगिरीचे संपूर्ण जग साक्षीदार ठरले आहे. येत्या पंचवीस वर्षांत भारत ही जगाची तिसऱ्या क्रमांकाची बलवान अर्थव्यवस्था व्हावी हे मोदीजींचे केवळ स्वप्न नाही, तर त्या दृष्टीने भारताने सुरू केलेल्या वाटचालीतील प्रत्येक पावलागणिक त्याचा पुरावा मिळत आहे. येत्या २५ वर्षांत जगातील महाशक्ती आणि जागतिक मानवकल्याणाचा विश्वगुरू म्हणून मोदी सरकारचे नाव इतिहासात नोंदले जाईल.