कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न बाळगता आदिवासी आणि जल, जंगल, जमीन यासाठी रचनात्मक लढा तळमळीने उभारणारे कार्यकर्ते म्हणजे मोहन हिराबाई हिरालाल. खरे तर एखाद्या लढ्यात यश मिळाल्यानंतर प्रसिद्धीच्या मागे धावणारे अनेक जण असतात. मोहन हिराबाई हिरालाल त्यांच्या जिंकलेल्या प्रत्येक लढ्याचे श्रेय आपल्या कार्यकर्त्यांच्या पदरात टाकून मोकळे होत. इतकी नि:स्वार्थ माणसे, कार्यकर्ते आजच्या काळात बोटावर मोजण्याएवढेच. इतके नि:स्वार्थ असायला साधना असावी लागते आणि ती मोहन हिराबाई हिरालाल यांना साधली होती.
‘मोहनभाई’ या नावाने ते परिचित होते आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि आयुष्य हीच मोठी चळवळ होती. गडचिरोली जिल्ह्यातील लेखा-मेंढा गावातील ‘मावा नाटे मावा राज’ या चळवळीचे ते आधारस्तंभ होते. गांधीजी-विनोबाजींच्या जनशक्तीच्या कल्पनेवर त्यांचा विश्वास होता. त्यांनी गांधी-विनोबांचे परिवर्तनाचे सिद्धांत प्रत्यक्षात आणले आणि लेखा-मेंढा हे त्याचे उदाहरण. या गावातील ग्रामसभेला त्यांच्या भोवतालच्या जंगलाचे वनहक्क मिळाले. त्यासाठी त्यांनी तब्बल तीन दशके सर्वोच्च न्यायालयात लढा दिला. जयप्रकाश नारायण यांच्या छात्र युवा संघर्ष वाहिनीचे ते सक्रिय सदस्य होते. मोहनभाई म्हणजे नि:स्वार्थ सहयोगी, आणि ग्रामस्वराज्य संकल्पनेचा प्रसार करणारे एक जाणकार कार्यकर्ते होते. त्यांच्या ज्ञानाने आणि दिग्दर्शनामुळे लेखा-मेंढा येथील लोकांना ग्रामसभा अधिक सर्वसमावेशक, सहभागी आणि सक्रिय करण्यात मदत झाली. त्यांनी गावकऱ्यांना महिलांचा सहभाग, दारूबंदी, वन आणि हक्क, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा, सांस्कृतिक हक्क, युवा सक्षमीकरण, शाश्वतता, समानता आणि सुरक्षा यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत केली. मोहनभाईंनी गावकऱ्यांमध्ये जंगलावरील त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत जागरूकता निर्माण केली. त्यामुळे स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सहभागी वनव्यवस्थापन लोकप्रिय करण्यात मदत झाली. यामुळे २००९ मध्ये सरकारने वनहक्क कायदा २००६ अंतर्गत लेखा-मेंढा आणि मर्दा या गावांना सामूहिक वनहक्क प्रदान केले. लेखा-मेंढाचे एक क्रांतिकारी घोषवाक्य आहे. ‘दिल्ली आणि मुंबईत आमचे सरकार, पण गावात आम्हीच सरकार आहोत’. २०१३ मध्ये मोहनभाई आणि ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांनंतर लेखा-मेंढाच्या ग्रामदानाच्या सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण झाल्या आणि गावाला महाराष्ट्र ग्रामदान अधिनियम १९६४ अंतर्गत ग्रामदान गाव म्हणून घोषित करण्यात आले. हे देशातील पहिले असे गाव आहे.
हेही वाचा :तर्कतीर्थ विचार : मानवतावादी मूल्यांचा साक्षात्कार
या देशात जे आधी कोणालाही जमले नव्हते, ते या गावाने करून दाखवले. ५०० लोकवस्तीच्या गावाने दीड कोटींचे वार्षिक उत्पन्न घेऊन दाखविले. आज देशातल्या कित्येक गावखेड्यांसाठी लेखा-मेंढ्याचा संघर्ष पथदर्शी ठरला आहे. त्यात मोहनभाईंचे योगदान मोलाचे आहे. त्यांना त्यांच्या कामाबद्दल जमनालाल बजाज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हेही वाचा :लोकमानस : वृक्ष, रस्ते, कचरा सारे काही गायब
मोहन हिराबाई हिरालाल मूळचे विदर्भातील चंद्रपूरचे, पण सत्तरीच्या दशकात तरुण मोहनभाईंना त्यांच्या आयुष्याची दिशा मिळाली. जयप्रकाश नारायण यांनी ‘संपूर्ण क्रांती’ची हाक दिली. मोहनभाईसारख्या अनेक तरुणांना ती आपलीशी वाटली. त्यांना मग ती गांधी, विनोबा या मार्गाने गडचिरोली जिल्ह्यातील लेखा-मेंढा या गावात घेऊन आली. मात्र, अलीकडच्या काही दिवसात त्यांची प्रकृती सातत्याने खालावत गेली. अलीकडेच नागपुरात पंचाहत्तरीनिमित्त त्यांचा गौरव सोहोळा आयोजित करण्यात आला होता, पण प्रकृतीमुळे ते हजर राहू शकले नाहीत. त्यावेळी गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातून झालेली गर्दी, हीच त्यांच्या कामाची पोचपावती होती. त्यांच्या निधनाने एका सच्चा कार्यकर्त्याला राज्य मुकले आहे. त्यांच्या निधनाने आदिवासींचा सच्चा पाठीराखा हरपला.