अभिजित ताम्हणे

चित्रकारांची शताब्दी-वर्षं साजरी करायची असतात, याचं भान भारतात एकविसाव्या शतकामध्येच आलेलं दिसतं. विसाव्या शतकात कदाचित कोल्हापुरातच आबालाल रहिमान किंवा बाबुराव पेंटर यांची आठवण जन्मशताब्दीनिमित्त प्रेमादरानं काढली गेली असेल, मुंबईतल्या थोड्याथोडक्यांनी हेच रावबहादूर धुरंधर किंवा चित्रकार केतकर यांच्या जन्मशताब्दीला केलं असेल… एस. एल हळदणकरांच्या जन्मशताब्दीला म्हैसूरच्या संग्रहालयातल्या त्यांच्या ‘दीपधारी स्त्री’ या चित्रासह मराठी वृत्तपत्रात लेख आला होता हे आठवतंय… पण एकविसाव्या शतकात, २००६ मध्ये राजा रविवर्मा यांची स्मृती-शताब्दी मात्र दिल्ली, मुंबई, बडोदे, तिरुवनंतपुरम अशा ठिकठिकाणी या ना त्या प्रकारे साजरी झाली- मुंबई वा दिल्लीत तर जणू काही या चित्रकाराचा नव्यानंच शोध लागलाय अशा थाटात व्याख्यानं झडली. मग के. के. हेब्बर (२०११), एम. एफ. हुसेन (२०१५), एस. एच. रझा (२०२२), अशा आधुनिक भारतीय चित्रकारांच्या जन्मशताब्द्या बऱ्यापैकी जोरात साजऱ्या झाल्या. यापैकी सर्वांत लक्षणीय ठरलेली जन्मशताब्दी रझांची. भोपाळचं ‘रझा फाउंडेशन’ यात अग्रेसर होतंच, पण दिल्लीच्या वढेरा आर्ट गॅलरीनं रझांचा ‘कॅटलॉग रेझोने’ छापण्याचा प्रकल्प हाती घेतला. ‘कॅटलॉग रेझोने’ म्हणजे, चित्रकाराच्या सर्व चित्रांचा सटीक संग्रह. रझा यांच्या चित्रांच्या मोठ्या आकारातल्या छापील प्रती आता अधिक प्रमाणात दिसू लागल्या. त्याला ‘कॅटलॉग रेझोने’मुळे अधिकृततेचं वलय मिळालं. यंदाच्या वर्षी एप्रिलमध्ये एफ. एन. सूझांची जन्मशताब्दी असल्यानं अनेक शहरांत प्रदर्शनं भरली, त्यापैकी पुण्याच्या एका प्रदर्शनाचा सन्माननीय अपवाद वगळता बहुतेक सारी विक्रीपर प्रदर्शनंच होती. त्यात काही गैर आहे असं नाही; पण हुसेन/ रझा/ सूझांइतकेच के. इच. आरा (जन्म १९१४), हरि अंबादास गाडे (जन्म १९१७) आणि सदानंद बाकरे (जन्म १९२०) हेही ‘प्रोग्रेसिव्ह ग्रूप’चे सदस्य होते. त्यांच्या जन्मशताब्द्या साजऱ्या न झाल्यामुळे उघड झालं ते असं की, कलेचा इतिहास आणि कलाबाजार एकमेकांच्या जवळ आलेले असण्याच्या पुढली – बाजारानंच इतिहास ठरवण्याची पायरी आपण गाठलेली आहे. हेच १९२५ साली जन्मलेल्या आणि अद्याप हयात असलेल्या क्रिशन खन्ना यांच्या यंदाच्या ९९ व्या वाढदिवसानिमित्त भरलेल्या प्रदर्शनाच्या प्रसिद्धीतूनही दिसलं. मग, २ नोव्हेंबर १९२४ रोजी साजरी झालेली अव्वल अमूर्त चित्रकार वासुदेव (व्ही. एस.) गायतोंडे यांची जन्मशताब्दी याला अपवाद होती का?

Loksatta editorial on Donald Trump unique campaign in us presidential election
अग्रलेख: ‘तो’ आणि ‘त्या’!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta editorial Donald Trump victory in the US presidential election
अग्रलेख: अनर्थामागील अर्थ!
History of Geographyn History of the Earth Geological timescale
भूगोलाचा इतिहास: खडकातील पाऊलखुणा!
india s economy slowing down
अग्रलेख : मध्यमवर्ग मेला तरी…
loksatta editorial on aliens
अग्रलेख : ‘तारे’ तोडण्याचे तर्कट!
loksatta editorial on inflation
अग्रलेख: थाली बचाव…!

‘होय, गायतोंडे यांच्या चित्रांच्या किमती विशेषत: त्यांच्या मृत्यूनंतर प्रचंड वाढलेल्या असल्या तरीही, जन्मशताब्दीनिमित्त ज्या प्रकारे रझा यांचं वस्तूकरण झालं तसं गायतोंडे यांचं झालेलं दिसत नाही’ हे उत्तर सुखावणारं आहे. पण गायतोंडे यांच्या चित्रांना मिळणाऱ्या अफाट किमतींचे आकडे त्यांच्यावरल्या प्रत्येक लेखात असतातच! इथं ते टाळायचे असं ठरवलं तरीसुद्धा, आधुनिक भारतीय चित्रांचे जे अनेक लिलाव गेल्या २० ते २५ वर्षांत झाले, त्यांत गायतोंडे यांचं चित्र जर असेल तर त्यालाच सर्वाधिक बोली मिळाली होती, हा इतिहास टाळता कसा येणार? कलेचा इतिहास बाजारावरच ‘अवलंबून’ असू नये, हे खरं. पण, कलेचा इतिहास आणि कलेचा बाजार हे एकमेकांच्या जवळ आलेले आहेत’ ही वस्तुस्थिती मान्य करावी लागते.

ती मान्य केल्यावर पुढला प्रश्न : असं का झालं? गायतोंडे यांच्या बाबतीतला त्याहीपुढला प्रश्न : त्यांचं वस्तूकरण कसं काय नाही झालं? अन्य सर्व चित्रकारांपेक्षा गायतोंडे निराळे कशामुळे ठरतात?

आधी पहिल्या दोन प्रश्नांबद्दल. कलेचा इतिहास आणि बाजार यांचं साहचर्य हे दृश्यकलावंताला जेव्हापासून व्यक्ती म्हणून ओळख आणि सन्मान मिळू लागला तेव्हापासूनचंच आहे. राजाश्रय किंवा धर्मपीठांच्या आश्रयानं हे एकेकटे कलावंत आपापल्या सहकारी/ साथीदारांनिशी वाढले, तेव्हापासून याची सुरुवात झाली. म्हणजे युरोपात पंधराव्या शतकापासून. तोवर भारतीय उपखंडात मात्र शिल्पी/ स्थपती हे अनामिकच राहिले होते. राजा रविवर्मा यांना कलेतिहासकार पार्थ मित्तर हे ‘पहिला उद्यामशील भारतीय चित्रकार’ ठरवतात, ते रविवर्मा यांनी स्वत:चं ‘मार्केट’ निर्माण केलं म्हणून! हे इंग्लंडमध्ये अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात जे. एम. डब्ल्यू. टर्नर, जॉन कॉन्स्टेबल यांनी केलं होतं. त्याहीनंतरचा आधुनिकतावादी काळ हा तर व्यक्तिस्वातंत्र्यालाच महत्त्व देणारा. त्यामुळे तोवरच्या कलाशैलींशी फटकून, स्वतंत्र अभिव्यक्ती करणाऱ्या ब्राक, सेझां, मतीस, पिकासो, व्हॅन गॉ आदी चित्रकरांच्या कोणत्याही चरित्रांमध्ये हमखास त्यांना मदत करणाऱ्या चित्रविक्री- दलालांचाही उल्लेख येतोच. हे दलाल स्वतंत्र अभिव्यक्तीचं मोल ओळखणारे होते, हे पश्चातबुद्धीनं तरी कबूल करावंच लागेल. या प्रकारचा- म्हणजे ‘मॉडर्निस्ट’ अभिव्यक्तीचं मोल ओळखून बाजारातही चित्रकारांना स्थान मिळवून देऊ पाहणारा- काळ भारतीय संदर्भात १९४५ च्या नंतरच सुरू झाल्याचं दिसतं. त्यामुळेच ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूप’चा इतिहास हा त्या गटातल्या सहा चित्रकारांना मदत करणाऱ्या रूडी व्हॉन लायडन, इमॅन्युइल श्लेसिंजर यांचीही नावं घेतली जातातच; शिवाय नंतरच्या काळात या चित्रकारांना आपल्या कलादालनात स्थान देणारे केकू गांधी आणि काली पंडोल (पुढे त्यांचे सुपुत्र दादीबा पंडोल) यांचीही नावं महत्त्वाची ठरतात. ही स्थिती १९८० च्या दशकापर्यंत आपल्याकडे होती. मात्र १९८४ चा ‘टाइम्स- सदबीज’ चित्रलिलाव, १९९१ मध्ये ६० भारतीय चित्रकारांच्या कलाकृतींनिशी जपानमध्ये सुरू झालेला ‘ग्लेनबरा’ संग्रह, यांनंतर दिल्लीचे धनिक कलादालन-मालक भलत्याच जोमानं कार्यरत झाले आणि १९९१ नंतरच्या ‘खाउजा’ धोरणानं कलाबाजाराला खतपाणीच मिळालं. आज परिस्थिती अशी की, भारतीय कलेचा ‘भावी इतिहास’ घडवणारे तरुण कोण आहेत/ असतील हे शोधण्यासाठी या दालनांच्या पलीकडे मुद्दाम पाहावं लागतंय. तसं न केल्यास, ही दालनं ‘आम्ही विकतो तोच इतिहास’ अशा थाटात वावरत आहेत.

या संदर्भात गायतोंडे यांच्या जन्मशताब्दीकडे पाहावं लागेल. गायतोंडे वर्षाला फारतर सहासात चित्रं करत. त्यांची उपलब्ध चित्रं ‘फारतर ४००’ असल्याचा दिल्लीच्या एका कलादालन-मालकानं सांगितलेला आकडाही फुगीरच वाटावा, अशी स्थिती. दादीबा पंडोल हे आता कलादालनाऐवजी लिलावगृह चालवतात; पण त्यांचं दालन होतं तेव्हा तिथं प्रदर्शित झालेली गायतोंडे-चित्रं आजही अर्थातच अस्सल मानली जातात. चित्रांच्या किमती अधिक असण्यासाठी ‘कमी उपलब्धता’ हेही कारण महत्त्वाचं ठरतं. युरोपीय आणि विशेषत: फ्रेंच आधुनिक चित्रशैलींचा प्रभाव भारताततले अनेकजण मान्य करत असतानाचा काळ एका टप्प्यावर आलेला असताना, गायतोंडे १९६०/७० च्या दशकात अमेरिकी ‘अॅबस्ट्रॅक्ट एक्सप्रेशनिझम’मुळे प्रभावित झाले, हे आपण भारतीय कलाप्रेमींनी कितीही नाकारलं तरी जगानं मान्य केलंय. गायतोंडे यांना अमेरिकेस जाण्यासाठी मिळालेली शिष्यवृत्ती यासाठी कारक ठरली, गायतोंडे मार्क रॉथ्कोला भेटले, हा कागदोपत्री इतिहासही आहे. किंबहुना म्हणूनच न्यू यॉर्कच्या ‘गुगेनहाइम संग्रहालया’त गायतोंडे यांचं सिंहावलोकनी प्रदर्शन (मरणोत्तर) भरलं. या प्रख्यात अमेरिकी संग्रहालयात प्रदर्शन होणारे गायतोंडे हे एकमेव भारतीय चित्रकार.

आता अखेरच्या परिच्छेदात, यातून उरणारे – बाजाराच्या पलीकडचे गायतोंडे. ते उरतात, याचं सरळ कारण म्हणजे, विशेषत: दिल्लीतल्या त्यांच्या अपघातानंतरच्या वास्तव्यात त्यांनी कलाबाजाराकडे ढुंकूनही पाहिलं नाही. ते आपल्या गतीनंच चित्रं करत राहिले. स्वत:च्या कोशात जगले ते कसे, हे सुनील काळदाते यांनी ‘पंडोल’साठी बनवलेल्या फिल्ममुळे साऱ्यांना दिसलंही आहे. निसर्गदत्त महाराजांशी संवादांतून अद्वैत तत्त्वज्ञानाची महत्ता सांगणारं ‘आय अॅम दॅट’ हे पुस्तक, झेन तत्त्वज्ञानातली शून्यता आणि चित्रांमधले केवलाकार असे गायतोंडे यांच्या अमूर्त चित्रांच्या परिभाषेचा आधार सांगणारे पुरावेही सर्वांसाठी उपलब्ध आहेत. अमूर्त चित्रं आणि आध्यात्म यांच्या नात्याचं अवडंबर भारतात बाजाराच्या हेतूंनीसुद्धा माजवलं जातं हे खरं मानलं तरीसुद्धा, त्यापासून गायतोंडे यांची चित्रं अलिप्त राहू शकतात, ती या थेट पुराव्यांमुळे. ‘माझे जीवनच माझी वाणी’ या पातळीला जे फार थोडे कलावंत गेलेले असतात, तिथे गायतोंडे त्यांच्या हयातीत पोहोचलेले होते हे सांगणारे त्यांचे चित्रकार मित्र, मनोमन त्यांचं शिष्यत्व स्वीकारणारे अनेकजण आपल्या आसपास असतात… गायतोंडेवर निघालेले ‘चिन्ह’चे विशेषांक असोत की ‘बोधना. या संस्थेनं काढलेलं पुस्तक असो, त्यातून गायतोंडे यांच्या स्वीकाराचं आणि त्यांच्या अद्वितीयतेचं वलय वाढत गेलेलं आहे.

यातून गायतोंडे यांचं दैवतीकरण झालं असं नाही म्हणता येणार; पण त्यांच्या अलौकिकपणाला मान्यता नक्की मिळाली आहे. हे अलौकिकत्व बाजारावर कधीही अवलंबून नव्हतं आणि नसेल. त्यामुळे जन्मशताब्द्या अनेकांच्या साजऱ्या झाल्या असल्या तरी, गायतोंडे यांच्या जन्मशताब्दीचं स्मरण महत्त्वाचं ठरतं.