तारक काटे (गांधीवाद)

विज्ञान- तंत्रज्ञानाचे विरोधक अशीच गांधीजींची प्रतिमा बहुतेकांच्या डोळ्यासमोर असते. पण प्रत्येक लहानसहान गोष्टीचा तर्कनिष्ठ पद्धतीने, अत्यंत बारकाईने आणि तपशीलवार विचार करणारे गांधीजी खरोखरच विज्ञान- तंत्रज्ञानविरोधी असतील?

kerala schools separate syllabus
अन्वयार्थ : मूल्यमापनाची ‘परीक्षा’
loksatta readers response
लोकमानस : दिल्लीवरील भाराच्या विकेंद्रीकरणाची गरज
effects of national emergency loksatta
संविधानभान : आणीबाणीचे परिणाम
ulta chashma president
उलटा चष्मा : तंत्रस्नेही कुंभकर्ण
Jharkhand vidhan sabha election 2024
अन्वयार्थ : झारखंडी राजकारणास भाजपची ‘कलाटणी’
sureshchandra ogale
व्यक्तिवेध : प्रा. सतीशचंद्र ओगले
first national emergency in india
संविधानभान : भारतातील पहिली आणीबाणी
loksatta readers comments
लोकमानस : अपरिहार्य आहे, म्हणून निवडणुका
peoples representatives
चतु:सूत्र : प्रतिनिधित्वाचे प्रश्नोपनिषद

गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वात लहान मुलाचे औत्सुक्य आणि वैज्ञानिकाची प्रयोगशीलता दडलेली होती. म्हणूनच ते सतत प्रयोग करीत राहून त्यातील निष्कर्षांच्या आधारे आपले विचार बदलत वा घडवीत राहिलेले दिसतात. वैज्ञानिकांबद्दल त्यांना नितांत आदर होता. यामुळेच ‘नई तालीम’ या पर्यायी शिक्षण पद्धतीमध्ये त्यांना मानवतेच्या भल्यासाठी सेवावृत्तीने काम करणाऱ्या वैज्ञानिकांची फौज निर्माण करणे आणि असे शास्त्रज्ञ घडविण्यासाठी सुसज्ज प्रयोगशाळा आणि वाचनालये उभी करणे हे अभिप्रेत होते. जगदीशचंद्र बोस आणि प्रफुल्लचंद्र रे या तत्कालीन भारतातील नावाजलेल्या शास्त्रज्ञांशी त्यांचे जवळीकीचे संबंध होते. सत्याचा मागोवा घेणाऱ्या कोणत्याही देशातील, क्षेत्रातील शास्त्रज्ञांबद्दल त्यांना अपार प्रेम व आदर असे. असे असले तरी विज्ञान व तंत्रज्ञानाचे विरोधक अशीच त्यांची प्रतिमा त्या काळी आणि आताही दिसून येते. ती कशामुळे आणि गांधींचा या संदर्भात मूळ विचार काय होता हे समजून घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा >>> “महात्मा गांधींचा जातीभेदावर विश्वास होता”; रणजीत सावरकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, “सावरकर जेव्हा…”

उच्च शिक्षण घेण्यासाठीच्या इंग्लंडमधील वास्तव्याच्या काळात त्यांना चंगळवादी तंत्रज्ञानाच्या वापरावर आधारित पाश्चात्त्य संस्कृतीचे आणि नंतरच्या काळात गोलमेज परिषदेसाठी जाणे झाले असता मिल कामगारांच्या भयावह राहणीमानाचे दर्शन झाले. त्यामुळे कामगारांच्या आणि निसर्गाच्या शोषणावर आधारित व समाजातील केवळ मूठभर श्रीमंतांचेच जीवनमान उंचावणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाला आणि त्याच्या केंद्रिभूत वापराला त्यांनी विरोध केला. त्या काळातील प्राथमिक अवस्थेतील विज्ञान व तंत्रज्ञानाचा विध्वंसक शस्त्रास्त्रे निर्मितीसाठी होत असलेला वापर, तंत्रज्ञानाच्या आधारे कामगारांचे शोषण आणि वैज्ञानिक संशोधनाच्या नावाखाली निष्पाप प्राण्यांची  हत्या यामुळे त्यांचे मत आधुनिक तंत्रज्ञानाच्या विरोधात गेले. विज्ञान व तंत्रज्ञान मुळात ननैतिक असल्यामुळे त्यावर कोणाचा ताबा असतो यावर त्याचे स्वरूप अवलंबून असते. गांधीजींनी वैयक्तिक व सार्वजनिक जीवनामध्ये नीतिमत्तेला महत्त्व दिल्यामुळे विज्ञान व नीतिमत्ता यांची तपासणी करणे त्यांना गरजेचे वाटले असल्यास नवल नाही. ‘वैज्ञानिक संशोधनामुळे आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे युरोपियन लोकांच्या नीतिमत्तेत तसूभरही भर पडली नाही’ या आल्फ्रेड वालेस या शास्त्रज्ञाच्या मताशी ते सहमत होते. विज्ञानाचे उपयोजन म्हणजे तंत्रज्ञान; त्यामुळे तंत्रज्ञानाच्या निर्मिती आणि वापरामागे मानवी चेहरा असावा ही त्यांची भूमिका होती. ‘मानवतेविना विज्ञान’ याला गांधींनी जगातील सात पापांपैकी एक मानले होते. या कारणाने मानवी हातांना रिकामे ठेवू पाहणाऱ्या केंद्रिभूत आणि प्रचंड यंत्रांच्या वापरातून मोठी उत्पादन व्यवस्था उभी करणाऱ्या तंत्रज्ञानाला त्यांनी विरोध केला. यंत्रांवर मर्यादा असावी, ती माणसाच्या कह्यात असावी, ती त्याला साहाय्यक असावीत, उत्पादन विकेंद्रित असावे आणि तंत्रज्ञानाने सर्वसामान्य माणसाला श्रमप्रतिष्ठा प्राप्त करून द्यावी ही गांधीजींची त्याच्या वापरामागील स्वच्छ भूमिका होती. मुख्य म्हणजे गांधींच्या आधी १९८५ मध्ये स्वामी विवेकानंदांनीदेखील नव्या वैज्ञानिक संशोधनावर आधारित तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या चंगळवादावर आणि त्यामुळे पुढे येऊ घातलेल्या भयावह स्थितीवर भाष्य करताना असेच विचार प्रकट केले आहेत. ‘‘बुद्धीवर संस्कार करून अनेक शास्त्रांचा आणि तंत्रज्ञानांचा शोध लावण्यात आला आहे. त्यामुळे काही थोडय़ा माणसांनी बऱ्याच माणसांना गुलाम करून टाकले आहे’’, ‘‘ यंत्रांच्या वापराचा अतिरेक झाला की स्वत:ची बुद्धी चालविण्याच्या माणसाच्या वृत्तीला आळा बसतो आणि तोपण एक निर्जीव यंत्र बनतो. यंत्र माणसाच्या बुद्धीनेच तयार होते हे खरे. पण यंत्र कमी श्रमात अधिक उत्पादन करते. हे उत्पादन संपावे म्हणून कृत्रिम गरजा निर्माण करण्यात येतात. त्या पुऱ्या व्हाव्यात म्हणून माणूस धडपडतो आणि ती हाव पुरी न झाल्याने दु:खी होतो. यंत्राच्या साहाय्याने एकजण संपत्तीत लोळतो तर हजारो अधिक दु:खी बनत जातात. सामान्य जनता गुलामांच्या पायरीला आणून बसविली जाते’’ (शोध स्वामी विवेकानंदांचा – डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर: पृष्ठे १८८-१८९).

हेही वाचा >>> अग्रलेख : रक्तरंजित रस्ते!

गांधींच्या काळात ८० टक्के जनता खेडय़ांमध्ये राहात होती. त्यामुळे खेडी समृद्ध झाली तर देश समृद्ध होईल ही त्यांची धारणा होती. खेडय़ांमधील बकालपणा, अस्वच्छता, निरक्षरता, दारिद्रय़ आणि निष्क्रियता दूर होण्यासाठी सुयोग्य तंत्रज्ञानाचा वापर व्हावा आणि यासाठी लोकांना सहज वापरता येईल असे त्याचे स्वरूप हवे असे हे त्यांचे मत होते. हे तंत्रज्ञान परिसरातील साधनांच्या वापरावर, निसर्गस्नेही, स्थानिक लोकांचे कौशल्य वाढविणारे आणि त्यांच्या हाताला काम देणारे असावे असे त्यांना वाटत होते. खेडय़ांमध्ये वीजवापर व्हावा आणि विजेची  निर्मितीही तिथेच अथवा पंचक्रोशीत व्हावी हे त्यांचे त्या काळचे मत समजून घेताना आपल्याला आज आश्चर्य वाटू शकते. लहान यंत्रे तयार करण्यासाठी मोठय़ा यंत्राची गरज राहील याला त्यांची मान्यता होती. मिलच्या कापडाच्या तुलनेत खादी टिकण्यासाठी चरख्याला अधिक कार्यक्षम बनविले पाहिजे या हेतूने त्याचे सर्वोत्तम डिझाइन करण्यासाठी त्यांनी २४ जुलै १९२४ मध्ये ‘अखिल भारतीय चरखा संघाच्या’ वतीने एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. महिलांना हा चरखा सहज हाताळता यावा, ८ ते १९ तासांच्या काळात जवळपास १६ हजार फूट सुताचे १२ ते २० पेळू कातून व्हावेत, सतत २० वर्षे तो वापरता यावा, त्याची रखरखाव व दुरुस्ती गावातच करता यावी, इत्यादी अटी त्यात घातल्या होत्या. १९३६ ला सेवाग्राममध्ये वास्तव्याला आल्यावर त्यांच्यासाठी घर बांधण्यासाठी त्यांचे मानसपुत्र जमनालाल बजाज यांनी त्यांच्याकडे वास्तुविशारद पाठविला. त्याला गांधीजींनी पाच मैलांच्या परिसरातीलच साहित्याचा वापर व्हावा, घरबांधणी घरखर्च ५०० रुपयांच्या आत असावा आणि मला आकाश दिसण्याची सोय असावी या सूचना केल्या. यावरून त्यांची तंत्रज्ञानाच्या वापरातील दृष्टी दिसून येते. १९२४  साली नव्या भारतातील ग्रामीण भागाची योग्य उभारणी व्हावी म्हणून त्यांनी २८ ऑक्टोबर १९३४ मध्ये वर्ध्याला ‘अखिल भारतीय ग्रामोद्योग संघा’ची स्थापना केली. स्वत: मार्गदर्शक, कृष्णदासजी जाजू अध्यक्ष आणि जे. सी. कुमारप्पा आयोजक व सचिव अशी योजना केली. या संघाचे सदस्य म्हणून काम करण्यासाठी जगदीशचंद्र बोस, डॉ. चंद्रशेखर व्यंकटरमण आणि सर प्रफुल्लचंद्र रे यांनी आनंदाने संमती दिली. ग्रामीण पुनर्रचना, ग्रामोद्योगाचे पुनरुज्जीवन, प्रसार व सुधारणा ही या संघाची उद्दिष्टे होती. गांधींना योग्य माणसांची पारख होती. म्हणून ग्रामोद्योग उभारणीच्या या कामासाठी त्यांनी जे. सी. कुमारप्पांची निवड केली. कुमारप्पा स्वत: अर्थशास्त्री होते व ग्रामीण भागातील आर्थिक व सामाजिक परिस्थितीची त्यांना योग्य जाण होती. तसेच ‘शाश्वत अर्थशास्त्र’ (इकॉनॉमी ऑफ पर्मनन्स) या त्यांच्या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे चिरस्थायी, सर्वसमावेशक आणि विकेंद्रित विकासाबद्दलची त्यांची धारणा अगदी स्पष्ट होती. त्यामुळे ग्रामोद्योग संघाचे नेतृत्व करताना या क्षेत्रात नवे संशोधन, स्थानिक कारागिरांचे कौशल्य वाढविण्यासाठी योग्य प्रशिक्षण, ग्रामीण नवतरुणांना या क्षेत्रात येण्यासाठीची प्रेरणा आणि ग्रामोद्योगाचा प्रसार या संदर्भात त्यांनी मूलभूत काम केले आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : नोटांवर महात्मा गांधींचा फोटो कधी आणि का छापला? वाचा इतिहास…

गांधी-कुमारप्पांनी समाजातील तळच्या वर्गाचा विकास प्राधान्याने डोळय़ासमोर ठेवून मांडलेली विकेंद्रित तंत्रज्ञानावर आधारलेली पर्यायी ग्रामविकासाची कल्पना स्वातंत्र्यानंतर मागे पडली. गांधींचे राजकीय वारस जवाहरलाल नेहरू, त्या काळातील समाजधुरीण, शास्त्रज्ञ, नोकरशहा यांच्यासमोर जागतिक स्तरावर दृश्यमान असलेल्या मोठय़ा तंत्रज्ञानाचे व केंद्रिभूत अर्थव्यवस्थेचे डोळे दिपविणारे प्रतिमान असल्यामुळे गांधी-कुमारप्पांचे विचार अडगळीत गेले आणि जास्त खर्चीक संशोधन व मोठमोठे प्रकल्प यांना प्राधान्य देण्यात आले. खादी व ग्रामोद्योग मंडळाची स्थापना करून गांधीविचाराला काही प्रमाणात आधार देण्याचे काम झाले. परंतु नेहमीच्या सरकारी खाक्याप्रमाणे नोकरशाही प्रबळ झाली आणि ग्रामोद्योगात शास्त्रीय संशोधनाचे काम नावापुरतेच राहिले. तरीही ग्रामीण रचनात्मक कामात गुंतलेल्या व्यक्ती  व संस्था शासकीय मदतीने वा त्याशिवाय आपले कार्य करीत राहिल्या आहेत.

सत्तर-ऐंशीच्या दशकात जगभर ‘समुचित तंत्रज्ञान’ (अ‍ॅप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी) हा विचार पुढे आला. इंग्लंडमधील एक अर्थकारणी ई. एफ. शुमाकर यांनी ‘स्मॉल इज ब्युटीफुल’ ही संकल्पना याच काळात मांडली. या दोन्ही विचारसरणी गांधी-कुमारप्पा प्रणीत पर्यायी तंत्रज्ञान व विकासाशी जुळणाऱ्याच आहेत. यालाच अनुसरून भारत सरकारच्या ‘विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे’ ग्रामीण भागासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग यावर संशोधन व प्रसार करण्यासाठी १९८० पासून संस्थांना प्रोत्साहन दिले जाते. याअंतर्गत ग्रामीण भागासाठी उपयुक्त असे कितीतरी महत्त्वाचे उपाय व तंत्रे शोधली गेली आहेत. परंतु तीही या विभागाच्या कार्यालयातच धूळ खात आहेत. 

स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या ७५ वर्षांच्या काळात मागे वळून पाहताना आपण जे अर्थव्यवस्थेचे आणि तंत्रज्ञान विकासाचे प्रारूप स्वीकारले, त्यामुळे भौतिक स्वरूपात बऱ्याच बाबतींमध्ये आपण डोळय़ात भरणारी प्रगती केली असली तरी सामान्य माणसांच्या जगण्याच्या गुणवत्तेत फार कमी बदल झालेला दिसतो. आज आपण आपली अर्थव्यवस्था जगातील पाचव्या स्तरावर पोचली म्हणून पाठ थोपटून घेत असताना जगाच्या तुलनेत भूक निर्देशांक, मानव विकास निर्देशांक, कुपोषण, दारिद्रय़, बेरोजगारी, ग्रामीण आरोग्य या बाबतीत खूप खालच्या पातळीवर आहोत हेही लक्षात घेतले पाहिजे.

कधी असे वाटते की गांधीजी आणखी काही काळ जगले असते तर ते आणि नेहरू मिळून काही समन्वयाचा मार्ग निघाला असता का व त्यामुळे देशाची व विशेषत: ग्रामीण भागाच्या विकासाची दिशा बदलली असती का?  लेखक जैवशास्त्रज्ञ असून शाश्वत विकास व शाश्वत शेती या विषयांचे अभ्यासक आहेत.

vernal.tarak@gmail.com