भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविड जाऊन त्याच्या जागी गौतम गंभीरची निवड करण्यात आली आहे. दोघांच्या क्रिकेट गुणवत्तेविषयी शंका घ्यायला जागा नव्हतीच. नवीन सहस्राकामध्ये भारतीय संघाच्या बहुभराऱ्यांमागे जशी सचिन तेंडुलकरची गुणवत्ता आणि सौरव गांगुलीचे नेतृत्व होते, तितकाच राहुल द्रविडच्या फलंदाजीचा भक्कम आधारही होता. परदेशात आणि विशेषत: ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये काही संस्मरणीय कसोटी विजयांमध्ये राहुलच्या फलंदाजीचे अमूल्य योगदान होते. गुणवत्ता आणि नेतृत्व निसर्गदत्त असू शकते. राहुल द्रविडकडे दोन्ही होते. पण अधिक प्रतिभावानांच्या गर्दीत स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी, ठसवण्यासाठी त्याला इतरांपेक्षा अधिक कष्ट करून दाखवावे लागले. आकर्षक फटके आणि आक्रमक फलंदाजी यांना फाटा द्यावा लागला. कधी एकदिवसीय संघाचा समतोल राखण्यासाठी यष्टिरक्षणही करावे लागले. दिलेली प्रत्येक जबाबदारी त्याने पार पाडली – विनातक्रार आणि यशस्वीरीत्या. भरवशाचा फलंदाज आणि भरवशाचा कर्णधार म्हणून निवृत्त झाल्यानंतर प्रशिक्षक म्हणून त्याने तितकीच चांगली चमक दाखवली. थेट सिनियर संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारण्यापेक्षा प्रशिक्षक म्हणून आपलाही विकास झाला पाहिजे या भावनेतून क्रिकेट अकादमी, युवा संघ, ‘अ’ संघ अशा चढत्या भाजणीत त्याने प्रशिक्षणाचा अनुभव घेतला. अखेरीस सिनियर संघाची धुरा सांभाळताना कसोटी आणि एकदिवसीय विश्वचषकांची अंतिम फेरी आणि ट्वेंटी-ट्वेंटी जगज्जेतेपद अशी कामगिरी करून प्रशिक्षकपदावरून तो सन्मानाने निवृत्त झाला. नुकत्याच एका वृत्तानुसार, ट्वेंटी-ट्वेंटी जगज्जेतेपद मिळवलेल्या संघातील प्रत्येक खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक यांच्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जाहीर केलेले प्रत्येकी पाच कोटी रुपयांचे बक्षीस राहुलने नाकारले. त्याऐवजी इतर प्रशिक्षक वर्गाप्रमाणेच आपल्यालाही २.५ कोटी रुपये दिले जावे, असे त्याने म्हटले आहे. अशा अनेक प्रसंगांतून राहुल द्रविडचे ऋजू आणि नि:स्वार्थी व्यक्तिमत्त्व उलगडत जाते. खेळाडू म्हणून त्याला विश्वचषक जिंकता आला नाही, तरी प्रशिक्षक म्हणून त्याच्या नावावर विश्वविजेतेपदाची नोंद झाली, याचा आनंद त्याच्यापेक्षा अधिक त्याच्या चाहत्यांना झाला असेल. क्रिकटे हा ‘जंटलमन्स गेम’ वगैरे अजिबात राहिलेला नाही या समजाला राहुलसारखे मोजके अपवाद आजही दिसून येतात.
हेही वाचा >>> उलटा चष्मा : अचूक अंदाज नकोतच!
द्रविड जाऊन आता गौतम गंभीरकडे २०२७ पर्यंत भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी राहील. ही नियुक्ती राजकीय नाही हे त्याला कृतीतून आणि वृत्तीतून सिद्ध करावे लागेल. यातील पहिला आक्षेप स्वाभाविक आहे, कारण गंभीर हा गेल्या लोकसभेत भाजपचा खासदार होता. शिवाय ‘सूर्यापेक्षा वाळू गरम’ असेच वर्णन ज्यांचे करता येईल, त्या भाजपच्या हिंदुत्वालाही अधिक भगवा रंग देणाऱ्या तोंडाळ नामदारांमध्ये गंभीरचा समावेश व्हायचा. समाजमाध्यमांवरून विखार प्रसृत करणाऱ्यांमध्ये तो आघाडीवर होता. पाकिस्तानचा विषय निघाला की त्याच्या ‘पोष्टीं’ना अधिक धार चढायची. राजकारणात रस राहिला नसल्यामुळे पुन्हा क्रिकेटकडे वळलो, हे गंभीरचे मत. पण दिल्लीतून पुन्हा निवडून येण्याची क्षमता नसल्यामुळे भाजपकडून त्याला नारळ मिळाला हे अघोषित वास्तव. प्रशिक्षक गौतम गंभीरला त्याच्यातील राजकारणी गौतम गंभीर आवरता येईल का, यावर त्याचे यश अवलंबून राहील. तसे न झाल्यास, बीसीसीआय सचिव देशातील शक्तिशाली नेत्याचा पुत्र नि क्रिकेट प्रशिक्षक सत्तारूढ पक्षाचा लाभार्थी/कार्यकर्ता असे भारतीय क्रिकेट व्यवस्थेचे बटबटीत राजकीयीकरण होईल. दुसरी महत्त्वाची बाब गंभीरच्या स्वभावाची. तो स्वत: उत्तम क्रिकेटपटू होता, कर्णधार होता आणि प्रशिक्षणातही त्याने संधी मिळाली तेव्हा नैपुण्य दाखवले. त्यामुळे त्याच्या गुणवत्तेविषयी शंका नाही. परंतु आक्रमक, एककल्ली प्रशिक्षक भारतीय क्रिकेटमध्ये यशस्वी होत नाहीत हा इतिहास आहे. किंबहुना, खेळाडूंच्या कलाने घेणारे प्रशिक्षक अधिक यशस्वी ठरले हेच दिसून आले. ग्रेग चॅपेल अपयशी ठरले, तेथे जॉन राइट आणि गॅरी कर्स्टन कमालीचे यशस्वी ठरले. राहुल द्रविडला साधले, ते रवी शास्त्रींना करून दाखवता आले नाही. कर्णधारांबाबतही हेच म्हणता येईल. सौरव-विराटला जमले नाही, ते धोनी-रोहितने करून दाखवले. मनमानीपणा आणि मनस्वीपणा गुणवत्तेबद्दल सबब ठरू शकत नाही. राहुल द्रविडने प्रक्रियेवर विश्वास ठेवला, गंभीर हा प्रवृत्तीला धरून चालतो. हा फरक आहेच.