जोसेफ बॉइस यांनी जिवंत झाडांचीच कलाकृती केली, ओटो हुडेक यांनी झाडांचा जीवनसंघर्ष पाहिला. या कलाकृतींमधून, झाडाकडे कसं पाहायचं याचंही उत्तर मिळतं…

एखादे गाव राजधानी होण्यासाठी केवळ राज्यकर्त्यांची इच्छा नव्हे तर भौगोलिक घटक कसे महत्त्वाचे ठरतात याचे ठळक उदाहरण म्हणजे दिल्ली. भारतातील पहिले मोठे साम्राज्य मौर्यांचे. त्यामुळे त्यांची राजधानी पाटलीपुत्र ही खऱ्या अर्थाने भारताची पहिली राजधानी म्हणता येईल. त्यांच्यानंतर शुंग व गुप्त साम्राज्यातही तीच राजधानी होती. मात्र काही काळ शुंगांनी विदिशा आणि गुप्तांनी उज्जैन तसेच अल्पकाळ अयोध्या ही राजधानी केली. वर्धन घराण्याच्या काळात कनोज तर पुढे तोमर काळात दिल्ली भारताची राजधानी बनली. तिथून पुढे हजार-बाराशे वर्षांत दिल्ली अनेक वेळा विविध नावांनी वसवली गेली, नामशेष झाली आणि पुन्हा ऊर्जितावस्थेस आली.

pune metropolis have lack of basic facilities and infrastructure
बकालीकरणाकडे…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
p chidambaram article analysis maharashtra economy
समोरच्या बाकावरून : अर्थव्यवस्था तारेल त्यालाच मत
wall-painted calendar in the Roman Republic
भूगोलाचा इतिहास : एका खेळियाने…
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
लोकसभेतील अपयशानंतर ‘भारत जोडो’सारख्या शक्तींवर मात; विधानसभेत प्रभाव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
maharshtra electoral history
महाराष्ट्राची निर्मिती, काँग्रेसचे वर्चस्व, हिंदुत्वाचा उदय; महाराष्ट्र निवडणुकीचा इतिहास काय सांगतो?
Mumbai Metropolitan Region Development Authority Still waiting for Mogharpada car shed site Mumbai print news
मोघरपाडा कारशेडच्या जागेची प्रतीक्षा कायम; हस्तांतरणाबाबत शासन निर्णय प्रसिद्ध होऊन वर्ष उलटले तरी जागेचा ताबा नाही

महाभारतातील पांडवांची राजधानी इंद्रप्रस्थ ही दिल्लीच्या पुराना किल्ला परिसरात असावी, असे मानले जाते. येथे उत्खननातून पुरातन संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. पुढे हजारो वर्षांनी आठव्या शतकात तोमर वंशातील राजा अनंगपाल याने दिल्लीच्या दक्षिणेस ‘सूरजकुंड’ येथे आपली राजधानी केली. अरवली पर्वताचे एक टोक दिल्लीच्या जवळ पोहोचले आहे. त्याच्या पायथ्याशी ही राजधानी होती. पुढे तिच्या पश्चिमेस बांधलेल्या ‘लालकोट’ या किल्ल्यातून तोमरांनी अकराव्या शतकापर्यंत कारभार केला. बाराव्या शतकात अजमेरच्या चाहमान ऊर्फ चौहान घराण्याने लालकोटच्या जवळच ‘किल्ला रायपिठोरा’ बांधला. पृथ्वीराज चौहान यांनी येथूनच राज्य केले. दिल्लीच्या मेहरौली भागात अजूनही या किल्ल्याच्या भिंतीचे अवशेष दिसतात.

तेराव्या शतकात तुर्की राजवटीत या भागात कुतुबमिनारसह अनेक इमारती उभारण्यात आल्या. चौदाव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीने लालकोटच्या उत्तरेस ‘सिरी’, तर तुघलकांनी ‘तुघलकाबाद’ ही नवी राजधानी वसवली. १३२६ मध्ये महंमद तुघलकाने आपली राजधानी दक्षिणेत देवगिरी येथे हलवली. पण नंतर हा निर्णय बदलून त्याने पुन्हा दिल्ली परिसरात लालकोट व सिरी यांना जोडून ‘जहाँपनाह’ ही नवी राजधानी वसवली. त्याच्यानंतर फिरोजशहा तुघलकाने अधिक पूर्वेला ‘फिरोजाबाद’ वसवून अनेक महाल बांधले. १५२६ मध्ये पहिल्या पानिपतच्या युद्धात दिल्लीच्या इब्राहिम लोधीचा पराभव होऊन मोगलांचा अंमल सुरू झाला. हुमायूनने दिल्ली येथे ‘दीनपनाह’ ही राजधानी वसवून किल्ला बांधण्यास सुरुवात केली. पण प्रत्यक्षात ते काम शेरशहा सुरीच्या काळात पूर्ण झाले. तोच दिल्लीचा ‘पुराना किला’.

अकबराने दिल्ली सोडून आर्ग्याजवळ फत्तेपूर सिक्री येथे नवी राजधानी वसवली. पण पाण्याअभावी लवकरच त्याला आपली राजधानी आग्रा येथे हलवावी लागली. पण नंतर शाहजहानने दिल्ली येथे यमुनेकाठी किल्ला बांधून त्याच्या आजूबाजूस ‘शाहजहानाबाद’ या नावाने नवी राजधानी वसवली. तोच आजचा प्रसिद्ध ‘लाल किल्ला’ व ‘जुनी दिल्ली’. इंग्रजांच्या काळात सुरुवातीस भारताचा कारभार कलकत्ता येथून चाले. ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार संपून इंग्लंडच्या राणीचा अंमल सुरू झाल्यावर दिल्लीला पुन्हा महत्त्व आले. १९११ मध्ये इंग्रजांनी थोडी पश्चिमेकडे नवी भव्य व सुंदर राजधानी उभारली. तीच भारताची राजधानी – नवी दिल्ली. मात्र दिल्लीसाठी ‘नवी’ आणि ‘जुनी’ हे शब्द कालसापेक्ष आहेत. एक नवी राजधानी उभी राहिली की त्या आधीच्या राजधानीचा परिसर ‘जुनी दिल्ली’ म्हणून ओळखला जाई.

एकूणच पूर्ण भारताचे सत्ताकेंद्र शेवटी दिल्लीला स्थिरावण्याची कारणे केवळ राजकीय नव्हे तर भौगोलिक होती. खरे तर एकूण भौगोलिक विस्तार पाहता भारताची राजधानी मध्य भारतात असायला हवी. दक्षिण भारतातील चोल, पांड्य, चालुक्य, पल्लव, राष्ट्रकूट इ. राजवटींना नर्मदेच्या पलीकडे उत्तर भारतात विस्तार करण्याची महत्त्वाकांक्षा नव्हती. मात्र भारतावर खैबर खिंड मार्गे वायव्येकडून होणारी परकीय आक्रमणे हे एक नेहमीचे गंभीर संकट होते. मोर्यांचे साम्राज्य स्थापन झाले, तेव्हा नुकतेच अलेक्झांडरचे आक्रमण होऊन गेले होते. त्यानंतर शक, हूण व पुढे अफगाण, तुर्क इ. ची आक्रमणे, तसेच मंगोल टोळ्यांची, तैमूरलंगाचे व मोगलांचे आक्रमणही याच दिशेने झाले.

या पार्श्वभूमीवर दिल्लीचे भौगोलिक स्थान महत्त्वाचे ठरले. ती प्राचीन अशा उत्तरापथावर आणि मैदानी प्रदेशात होती. वायव्येकडून येणाऱ्या आक्रमणाला थोपवण्यास जाण्यासाठी सोयीची पण पुरेशी आत असल्याने ती सुरक्षितही होती.

दिल्ली व यमुनेचे अतूट नाते आहे. यमुनाप्रवाहाच्या उजव्या बाजूस तिचा गाळ साचून तयार झालेले सपाट मैदानी पट्टे आहेत. त्यांना ‘प्रस्थ’ म्हणत. उदा. पण्यप्रस्थ ( पानिपत), सुवर्णप्रस्थ (सोनपत) इ. यांच्या पश्चिमेकडे पंजाबचे सुपीक मैदान व पूर्वेस यमुनेचे सान्निध्य व तिचे नैसर्गिक संरक्षण होते. यामुळे अशा जागांची भुरळ अनेक राजवटींना पडली. त्यापैकीच खांडवप्रस्थच्या जागी निर्माण झालेली इंद्रप्रस्थ किंवा दिल्ली ही एक.

सोबतचा नकाशा पाहा. दिल्लीतील राजधानीची सर्व ठिकाणे यमुनेच्या उजव्या म्हणजे पश्चिम बाजूस आहेत. तिच्या डाव्या बाजूस एकदाही राजधानी वसवली गेलेली नाही. कारण यमुना नदीचे एक वैशिष्ट्य हे की तिचा उजवा (इथे पश्चिम) काठ उंचावर तर डावा म्हणजे पूर्व काठ खोल आहे. यमुनेला पावसाळ्यात व उन्हाळ्यात असा दोन वेळा पूर येतो तेव्हा तिच्या पुराचे पाणी डाव्या बाजूस दूरपर्यंत पसरते. त्यामुळे यमुनेच्या काठावरील दिल्ली, आग्रा, मथुरा, काल्पी इ. बहुतेक सर्व मोठी शहरे तिच्या सुरक्षित अशा उजव्या काठावर आहेत. दिल्लीतील सर्व राजधान्यांसाठी पाणी हा घटक महत्त्वाचा होता. सूरजकुंड यमुनेपासून थोडे दूर अरवली पर्वताच्या पायथ्याशी असल्याने तोमरांनी तिथे धरण बांधले व ‘सूर्यकुंड’ निर्माण केले. ‘सिरी’देखील यमुनेपासून दूर असल्याने अल्लाउद्दीन खिलजीला प्रचंड असा ‘हौझ खास’ उभारावा लागला. तात्पर्य सध्याच्या नवी दिल्लीचा अपवाद वगळता सर्व राजधान्या कालौघात पाण्यासाठी क्रमश: यमुनेच्या जवळ सरकत गेल्या. खरे तर पूर्वी ही सर्व ठिकाणे आजच्याएवढी यमुनेपासून फार लांब नव्हती. कारण पूर्वी यमुना सध्यापेक्षा अधिक पश्चिमेला असून १८५७ पर्यंत ती लाल किल्ल्याला लगटून वाहत असे. नंतरच्या शंभर-दीडशे वर्षांत ती पूर्वेकडे सरकली. एकेकाळी बरेचदा यमुनेच्या पात्रात जाणारा दिल्लीतील ‘दर्यागंज’ परिसर आता वस्तीखाली आला आहे. स्वातंत्र्यानंतर दिल्लीचा झपाट्याने विकास होऊन ती यमुनेच्या दोन्ही बाजूस पसरली. तरी मुख्य प्रशासकीय व महत्त्वाचा भाग यमुनेच्या पश्चिमेलाच आहे. पण प्रचंड इमारती, रस्ते, उद्याोग इ. विकास साधताना दिल्ली हे भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर झाले आणि तेथील यमुना ही भारतातील सर्वाधिक दूषित प्रवाह बनत गेला.

जगात असंख्य राजवटी व त्यांच्या राजधान्या उत्कर्षाला आल्या व लोप पावल्या. हजारो वर्षांच्या कालप्रवाहात राजधानी म्हणून टिकून राहिलेली दिल्ली या बाबतीत जागतिक अपवाद आहे. या हजारो वर्षांत युद्धे, रक्तपात, विनाश आणि उत्कर्षाची कितीक चक्रे तिने पाहिली. ते सर्व भोगून, पचवून आज संसद भवन, राजघाट आणि लाल किल्ला इत्यादीतून ती भारताचा इतिहास, वर्तमान, स्वप्ने आणि मूल्ये यांचे प्रतीक ठरली आहे.

अल्तमशला लाहोरवरून, महंमद तुघलकाला देवगिरीहून, मोगलांना आर्ग्यावरून आणि इंग्रजांना कलकत्त्यावरून आपली राजधानी दिल्लीलाच हलवावी लागली. या बाबतीत तिची विशिष्ट भौगोलिक परिस्थिती निर्णायक ठरली. तात्पर्य, इतिहासाला आणि राजधानीलाही अस्तित्व व आकार देणारी शक्ती भूगोल ही आहे, हा दिल्लीच्या कहाणीतून मिळणारा धडा आहे.