सिद्धार्थ खांडेकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रशियन, अरब आणि अमेरिकन धनदांडग्यांनी इंग्लिश क्लब फुटबॉलमध्ये धुमाकूळ घातला म्हणून परदेशी गुंतवणूकच त्याज्य समजण्याचे काय कारण आहे, असा प्रश्न जर्मनीत विचारला जाऊ लागला आहे.
युएफा चॅम्पियन्स लीगमध्ये परवा उपान्त्यपूर्व फेरीत पहिल्या टप्प्यात जर्मनीचा दादा क्लब बायर्न म्युनिकला इंग्लंडच्या सळसळत्या मँचेस्टर सिटीकडून ०-३ असा पराभव पत्करावा लागला. बायर्नसाठी अजूनही वेळ गेलेली नाही, असे या क्लबच्या आणि जर्मन फुटबॉलच्या चाहत्यांना वाटते. कारण चॅम्पियन्स लीगमध्ये बाद फेरीचे सामने घरच्या आणि दूरच्या मैदानांवर होतात. मँचेस्टरमधील सामना बायर्नने गमावला, म्युनिकच्या अलियान्झ एरेनामध्ये आमची टीम भल्याभल्यांना धूळ चारते, तेव्हा मँचेस्टर सिटीचे आव्हानही परतवून लावू, असा यांना विश्वास. बायर्न म्युनिक हा जर्मनी आणि युरोपमधला मातब्बर क्लब आहे हे खरेच. पण सध्याच्या मँचेस्टर सिटीला सध्याचा बायर्न म्युनिकचा संघ तीन गोलांपेक्षा अधिक फरकाने (हे झाले तरच बायर्नला पुढील फेरीत जाता येईल, अन्यथा नाही) हरवेल, हे संभवत नाही. या क्लबच्या आणि स्पर्धेच्या इतिहासात काही धक्कादायक निकालांची नोंद नक्कीच झालेली आहे. तसा धक्कादायक निकाल नोंदवला जाण्याची या वेळी मात्र शक्यता फार दिसत नाही. एकतर मँचेस्टर सिटीचे प्रशिक्षक पेप गार्डिओला यांनी पूर्वी बायर्नलाही मार्गदर्शन केलेले असल्यामुळे त्यांना बायर्नची फुटबॉल संस्कृती आणि डावपेच पुरेसे ज्ञात आहेत. शिवाय त्यांच्या सध्याच्या संघाचा समतोल बायर्नच्या तुलनेत उजवा आहे. बार्सिलोना, बायर्न म्युनिक अशा मोठय़ा संघांना युएफा चॅम्पियन्स लीग, संबंधित क्लबच्या राष्ट्रीय लीगचे अजिंक्यपद पटकावून देण्यात गार्डिओला यांचा वाटा मोठा आहे. मोठय़ा संघांना मार्गदर्शन करताना व्यक्तिमत्त्वांचे नियोजनही महत्त्वाचे ठरते. गार्डिओला त्यातही माहीर मानले जातात. बायर्न म्युनिकची धुरा सध्या थॉमस टुकेल यांच्याकडे आहे. हे टुकेल दोन वर्षांपूर्वी चेल्सीचे प्रशिक्षक असताना, त्या क्लबने गार्डिओला यांच्या मँचेस्टर सिटीचा चॅम्पियन्स लीग अंतिम सामन्यात पराभव करून अजिंक्यपद पटकावले होते. पण नंतर त्यांचे चेल्सीच्या व्यवस्थापनाशी विविध कारणांवरून फिसकटले आणि त्यांना या हंगामाच्या ऐन मध्यावर प्रशिक्षकपद सोडावे लागले. काही दिवसापूंर्वीच बार्यनचे मार्गदर्शक म्हणून ते रुजू झाले. कारण त्या क्लबचे आधीचे प्रशिक्षक ज्युलियन नागेल्समान यांनाही हंगामाच्या मध्यावर नारळ मिळाला.
पण बायर्न म्युनिकच्या निमित्ताने जर्मनीत ज्या विषयावर चर्चा-मंथन सुरू झाले आहे, तो वेगळाच आहे. जर्मन क्लब सातत्याने युरोपात पराभूत होताहेत. बायर्न म्युनिक आणि काही प्रमाणात बोरुसिया डॉर्टमुंड सोडल्यास इतर क्लबना म्हणावा इतका प्रभाव पाडता आलेला नाही. इंग्लिश किंवा स्पॅनिश क्लब जितक्या संख्येने आणि सातत्याने युरोपमध्ये क्लब स्पर्धा (युएफा आणि युरोपा) जिंकत आहेत, तशी संख्यात्मक आणि गुणात्मक कामगिरी जर्मन क्लब दाखवत नाहीत, असा एक मतप्रवाह. काहींच्या मते हे जर्मन फुटबॉलच्या एकंदरीत अधोगतीचे निदर्शक आहे. हा मोठा वर्ग जर्मन राष्ट्रीय संघाच्या पाठोपाठच्या विश्वचषकांतील कामगिरी विसरलेला नाही. सलग दोन वेळा गटसाखळीतच गारद होण्याची नामुष्की जर्मनीवर आजवर कधीही ओढवलेली नव्हती. २०१८ आणि २०२२ अशा दोन्ही स्पर्धामध्ये प्रत्येकी केवळ एकेक विजय. नुकतीच आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ अर्थात फिफाची क्रमवारी जाहीर झाली. यात जर्मनीचा संघ १४व्या स्थानावर फेकला गेला. पुढील वर्षी जर्मनीत युरो २०२४ स्पर्धा होतेय. या स्पर्धेत फ्रान्स, इंग्लंड, नेदरलँड्स, बेल्जियम, पोर्तुगाल, क्रोएशिया, इटली अशा संघांसमोर निभाव लागेल का, अशी शंका अजूनही फुटबॉलची महासत्ता म्हणवल्या जाणाऱ्या या देशाचे फुटबॉलप्रेमी विचारत असतात. या सगळय़ातून वेगळय़ाच दिशेने चर्चा सरकते. त्यातून काही प्रश्न उद्भवतात. उदा. जर्मन बुंडेसलिगाचा दर्जा जर्मनीच्या खालावत चाललेल्या कामगिरीला कारणीभूत आहे का? तो उंचावण्यासाठी काही बदल करावेत का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, ५०+१ हे जर्मन फुटबॉल क्लबच्या मालकीचे प्रारूप बदलले जावे का?
५०+१ हे प्रारूप म्हणजे जर्मन क्लब फुटबॉलचा आत्मा आहे. जगात जर्मनीइतकी स्थानिक सामन्यांना गर्दी कोणत्याही लीगमध्ये होत नाही. युरोपातील प्रमुख देशांच्या तुलनेत येथील क्लब सामन्यांची तिकिटेही स्वस्त असतात. याचे कारण निकाल आणि खेळाडूंपेक्षा चाहत्यांना दिले गेलेले महत्त्व. येथील चाहत्यांची एक स्वतंत्र संस्कृती आहे. या भावनेची कदर करण्याची संस्कृती जर्मनीतील क्लब मालक आणि फुटबॉल संघटनेच्या धुरीणांमध्येही रुजलेली आहे. यासाठीच ५०+ १ हे तत्त्व वापरले जाते. क्लबच्या चालक-मालकांकडे नियंत्रणात्मक म्हणजे अध्र्यापेक्षा अधिक भागभांडवल असते. ५०+ १ ही प्रतीकात्मक संज्ञा आहे. क्लबचे पदाधिकारी फुटबॉल चाहत्यांकडून मतदानाद्वारे निवडले जातात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, एखादा मेसी किंवा रोनाल्डो आणण्यासाठी क्लबचे आर्थिक कंबरडे मोडून वाट्टेल ती रक्कम मोजली जात नाही. १९९८ पर्यंत बुंडेसलिगामधील क्लब ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर परिचालित व्हायचे. त्या वर्षी हे प्रारूप बदलले, पण अटी-शर्ती लागू झाल्या. त्यानुसार क्लबची मालकी मूळ चालक-मालक आणि फुटबॉल चाहत्यांकडे राहील. जर्मनीबाहेरील कंपनी, गुंतवणूकदाराला नियंत्रणात्मक भांडवल विकता येणार नाही. जर्मनीतीलच बडय़ा कंपन्यांकडे त्या क्लबचे काही प्रमाणात भांडवल असतेच. उदा. बायर्न म्युनिक क्लबमध्ये प्रत्येकी ८.३ टक्के समभाग अलियान्झ, आदिदास आणि आउडी (अ४्रिं) यांच्या मालकीचे आहे. पण क्लबचे परिचालन करणाऱ्या कंपनीकडे ७५ टक्के समभाग आहेत. जर्मनीबाहेरचे गुंतवणूकदार, भांडवलदारांना प्रवेश नाही. त्यामुळे कर्जे आणि वेतन पूर्णपणे नियंत्रणात राहतात. तिकीट दरही परवडण्याजोगे असतात. कारण क्लबचे सदस्य हे ‘फुटबॉलप्रेमी’ आहेत, ‘ग्राहक’ नव्हेत, हे तत्त्व काटेकोरपणे पाळले जाते. एखादा रोमन अब्रामोविचसारखा रशियन तेलदांडगा येऊन निव्वळ नफ्यासाठी चांगल्यातले चांगले फुटबॉलपटू खरीदणार हे जर्मनीत संभवत नाही.
तत्त्व म्हणून हे ठीक. जर्मन फुटबॉलमध्ये नेहमीच वलयापेक्षा संघभावनेला महत्त्व आहे. येथे ११ जण खेळतात. एकटा-दुकटा महान, बाकीचे सहायकाच्या भूमिकेत वगैरे ‘हिमगौरी नि सात बुटके’ कथा येथे चालत नाहीत. इंग्लिश क्लब तरी कितीसे सातत्याने जिंकतात आणि १९६६ नंतर त्या देशाला काहीही जिंकता आलेले नाही याकडे बोट दाखवले जाते. पण जर्मनीतली नवीन पिढी वेगळा विचार करू लागलेली आहे. या पिढीला २०१४ मधील जगज्जेतेपदापलीकडे भव्यदिव्य असे काही दिसलेले नाही. तसेच, बुंडेसलिगामधील बायर्न म्युनिकची भीषण मक्तेदारी हे कोणत्या आधुनिक आर्थिक विचारधारेत बसते, असा प्रश्न नव्या पिढीतील फुटबॉल चाहते विचारत आहेत. इंग्लंडमध्ये रशियन, अरब आणि अमेरिकन धनदांडग्यांनी तेथील क्लब फुटबॉलमध्ये धुमाकूळ घातला म्हणून परदेशी गुंतवणूकच त्याज्य समजण्याचे काय कारण आहे, असाही सूर आहे. बायर्न म्युनिकशी जर्मनीत दोन हात करायचे असतील, तर गुंतवणूक आवश्यक आहे. बहुतेक क्लबमधील उत्तमोत्तम खेळाडू कधी ना कधी बायर्नकडून खेळू लागतातच. तसेच जर्मन क्लबचा निभाव युरोपात लागत नाही. त्या तुलनेत स्पॅनिश, इटालियन आणि इंग्लिश क्लब अधिक संख्येने युरोपात जिंकतात. तेव्हा फुटबॉलमधील मातब्बरी केवळ नावातच वागवायची का, असे प्रश्न जर्मनीतील फुटबॉल प्रस्थापितांना हादरवू लागले आहेत. अजून तरी ५०+१ हे तत्त्व रेटणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु पुढील वर्षी युरो स्पर्धेत जर्मनीची कामगिरी सुमार झाली, किंवा जर्मनीच्या प्रतिमेला साजेशी झाली नाही तर जर्मन क्लब फुटबॉलच्या ‘शुद्धीकरणा’चा प्रस्ताव मांडणारे अधिक प्रभावी होऊ शकतात. जर्मन फुटबॉलची दशा तेथील संस्कृतीला कदाचित वेगळी दिशा देऊ शकते.