सिद्धार्थ खांडेकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जर्मन अर्थव्यवस्थेतील मरगळ आणि त्या देशाच्या पुरुष फुटबॉल संघाच्या घसरणीची तुलना करण्याचा मोह बऱ्याचदा इंग्लिश माध्यमांना (म्हणजे प्राधान्याने ब्रिटिश, काही अमेरिकन) आवरत नाही. ‘सिक मॅन ऑफ युरो’ असा जर्मनीचा उल्लेख ‘दि इकॉनॉमिस्ट’ने गतशतकाच्या अखेरीस केला होता. त्या वेळी जर्मन फुटबॉल संघाची कामगिरीही उदासीन बनली होती. पाठोपाठच्या दोन विश्वचषक स्पर्धामध्ये उपान्त्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागणे ही बाब तेव्हाच्या जर्मन संघाबाबत तिथल्या फुटबॉलरसिकांच्या पचनी पडण्यासारखी नव्हती. कारण त्याआधीच्या तीन स्पर्धामध्ये जर्मनीचा फुटबॉल संघ अंतिम फेरीत पोहोचला होता नि १९९०मध्ये जगज्जेताही ठरला होता. युरोपमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि युरोपातील सर्वात यशस्वी फुटबॉल संघ असलेल्या जर्मनीसाठी दोन पायऱ्या खाली येणे म्हणजे २० पायऱ्या घसरल्यासारखे असते. अर्थव्यवस्था मंदावण्याची कारणे अनेक आहेत, त्यांतील काही (उदा. कोविड, रशियन आक्रमण, चीनसारख्या आणखी एका मोठय़ा अर्थव्यवस्थेशी असलेल्या संलग्नतेचा फटका) बाह्यघटकांवर आधारित असून, ती सर्वस्वी जर्मन धोरणकर्त्यांच्या हातात नाहीत. पण जर्मन फुटबॉलच्या बाबतीत तेथील संघटनेला अशी पळवाट शोधता येणार नाही.
२५ वर्षांपूर्वीची घसरण उदात्त भासावी, अशी सध्या त्यांच्या फुटबॉल संघाची दशा आहे. पुढील वर्षी युरो चषक फुटबॉल स्पर्धा जर्मनीत आहे. त्यामुळे यजमान म्हणून या स्पर्धेत जर्मनीला थेट प्रवेश मिळेल. अन्यथा काही खरे नव्हते. ही स्पर्धा जर्मनीऐवजी इतर कुठे असती, तर जर्मनीला पात्रता फेऱ्या खेळाव्या लागल्या असत्या. त्यांची सध्याची कामगिरी पाहता, त्या फेऱ्यांमध्ये काहीतरी बरेवाईट होऊन, युरोचे तिकीटच हुकण्याची शक्यता नाकारता आली नसती. हान्सी फ्लिक या त्यांच्या प्रशिक्षकांना नुकताच नारळ देण्यात आला. जर्मन फुटबॉलच्या इतिहासात राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकाच्या हकालपट्टीची ही पहिलीच वेळ. हा संघ आणखी किती खाली जाऊ शकतो याविषयी अंदाज बांधणेही जर्मन फुटबॉलच्या चाहत्यांनी सोडून दिले आहे. जर्मनीचा बास्केटबॉल संघ फिलिपिन्समध्ये बास्केटबॉल विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सर्बियाविरुद्ध झुंजत होता, तो सामना संपायच्या काही क्षण आधी जर्मन फुटबॉल संघटनेने इकडे जर्मनीमध्ये फ्लिक यांच्या हकालपट्टीची घोषणा केली. जर्मन बास्केटबॉलपटू अंतिम सामना जिंकून जगज्जेते ठरले, पण इकडे चर्चा सुरू झाली फ्लिक यांच्या हकालपट्टीची. अनेक जर्मनांना या मुजोरीचा राग आला. फुटबॉलने आपले मनोविश्व किती विषम प्रमाणात व्यापले आहे याची जाणीव यांतील काहींना झाली. जर्मन फुटबॉलचा ऱ्हास झालेला आहे, हे वास्तव स्वीकारण्याची वेळ आली असल्याची जाणीव त्यांना झाली.
पण हे वास्तव अलीकडचे नाही. २५ वर्षांपूर्वी विशेषत: नव्या दमाच्या पूर्व युरोपीय संघांसमोर जर्मन संघ हतबल ठरू लागला होता. विश्वचषक १९९८ मध्ये त्यांना त्या वेळी नव्यानेच स्वतंत्र झालेल्या क्रोएशियाने हादरवले. पुढे युरो स्पर्धेत रोमानिया, चेक प्रजासत्ताक हे संघही जर्मनीला हरवू लागले. सध्या पूर्व युरोपीय संघांची जागा आशियाई संघांनी घेतली आहे. विश्वचषक २०१८ मध्ये दक्षिण कोरिया (या स्पर्धेत जर्मनी मेक्सिकोशीदेखील हरले) आणि विश्वचषक २०२२ मध्ये जपान या आशियाई संघांविरुद्ध झालेले पराभव जर्मन संघ साखळीतच गारद होण्यास कारणीभूत ठरले. अशा प्रकारे सलग दोन स्पर्धामध्ये नामुष्की जर्मन संघावर इतिहासात कधीही ओढवली नव्हती. २०१४ मध्ये जर्मन संघ जगज्जेता ठरला होता, पण यानंतर घसरण सुरूच आहे. २०२१ पर्यंत जोकीम ल्योव यांच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी होती. ते जवळजवळ १५ वर्षे जर्मनीचे प्रशिक्षक होते. २५ वर्षांपूर्वीच्या जर्मन संघात ऊर्जा फुंकण्याचे श्रेय युर्गन क्लिन्समान यांना दिले जाते. ल्योव हे क्लिन्समान यांचे सहायक. ल्योव यांच्या कारकीर्दीत जर्मनीने अभूतपूर्व प्रगती केली होती. त्याला समांतर कामगिरी स्पेनची झाली नसती, तर एकापेक्षा अधिक जगज्जेतेपदे जर्मनीच्या पारडय़ात नक्की आली असती. पण ल्योव यांची एक शैली होती. त्या शैलीचा ताजेपणा काही वर्षांनी सरला.
ल्योव यांनी क्लिन्समान यांच्या शैलीत सुधारणा केली. ल्योव यांचे सहायक फ्लिक यांना तसे करून दाखवता आले नाही. २००८ ते २०१४ या काळात फ्लिक ल्योव यांचे सहायक होते. मध्यंतरी म्हणजे २०१९च्या आसपास ते बायर्न म्युनिचचे प्रशिक्षक होते आणि त्यांनी बायर्नला चॅम्पियन्स लीगसह तीन अजिंक्यपदे मिळवून दिली. त्यामुळे २०२१ मध्ये त्यांनी ल्योव यांच्याकडून जर्मन संघाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा त्यांच्याकडून मोठय़ा अपेक्षा होत्या. प्रत्यक्षात फ्लिक यांच्या कार्यकाळात जर्मन संघ अधिक गर्तेत गेल्यासारखा झाला. याची कारणे खरे तर अनेक. ल्योव यांच्या व्यूहरचनेत ‘हाय डिफेन्स लाइन’ म्हणजे बचावपटूही प्रतिस्पध्र्याच्या हाफमध्ये शिरकाव करण्याची योजना होती. अशा परिस्थितीत प्रतिहल्ला थोपवण्यासाठी उच्च दर्जाचे बचावपटू आणि तितक्याच ताकदीचा गोलरक्षक या शर्ती अनिवार्य असतात. जर्मनीच्या बाबतीत बचावपटूंचा ढिसाळपणा हा त्या संघाच्या ऱ्हासाचे एक प्रमुख कारण. जेरोम बोआतेंग आणि मॅट हुमेल्स हे दोघे २०१४ मधील संघातले खंदे बचावपटू होते. त्यांच्या मागे गोलरक्षक मॅन्युएल नॉयर होता. बचावपटूंना फिलिप लाम आणि जोशुआ किमिच या चपळ विंगर्सची साथ मिळायची. बचावफळीच्या पुढे सॅमी खेदिरा खेळायचा. त्याच्या बरोबरीने बास्टियन श्वाइनस्टायगर. त्यापुढील फळीत थॉमस म्युलर आणि मेसुट ओयझिल. स्ट्रायकर म्हणून मिरोस्लाव क्लोसा.
ही ‘ड्रीम टीम’ दशकातून एकदा उभी राहणारी. जर्मन फुटबॉल तत्त्वज्ञानात स्ट्रायकर ही संकल्पना फारशी जुळून येत नाही. कोण्या एका वलयांकितामुळे आमची ओळख नसते, कारण आम्ही टीम म्हणून (दी मानशाफ्त) खेळतो, हे ठसवले जाते. या हट्टाग्रहापायी क्लोसाचा वारसदारच त्यांना मिळू शकलेला नाही. शिवाय वर्षांनुवर्षे जर्मनीच्या व्यूहरचनेचा अभ्यास प्रतिस्पर्धी संघांनी केलेला आहे. म्युलरने २००६ मधील स्पर्धेत पदार्पण केले आणि आजही तो जर्मन संघातून खेळतो हे जर्मन फुटबॉल व्यवस्थेचे अपयश आहे. पुन्हा बायर्न म्युनिच म्हणजेच जर्मनी हे समीकरण या व्यवस्थेला बदलता आलेले नाही. त्यामुळे हा क्लब म्हणजे जर्मनीच्या राष्ट्रीय संघाचा प्रधान स्रोत. या क्लबकडून हल्ली बरेच जुनेजरठ (म्युलर इथेही) खेळाडू खेळतात. इतर अनेक संघांतील तरुण खेळाडूंसमोर त्यांचा निभाव लागत नाही. म्हणजे जुने खेळाडू, जुनीच व्यूहरचना, जुनीच मानसिकता आणि स्मरणरंजनाची जुनीच खोड. २००६ मधील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा जर्मनीत झाली. त्या वेळी क्लिन्समान यांनी जर्मन संघाची ‘धसमुसळा’ अशी ओळख पुसून टाकण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि यात ते यशस्वीही झाले. ब्राझीलच्या संघाप्रमाणे हा संघही आकर्षक, प्रवाही फुटबॉल खेळू लागला. याच काळात मूळ गोऱ्या, प्रशियन जर्मनांसोबत स्थलांतरितांचा अंतर्भाव जर्मन संघात आग्रहाने होऊ लागला आणि या संघाचा ‘रंग’ बदलू लागला. चॅन्सेलर अँगेला मर्केलबाई जर्मनीच्या उभारणीबरोबरच जर्मन फुटबॉल संघाच्या प्रगतीमध्येही लक्ष घालू लागल्या होत्या. मर्केल आणि ल्योव यांची आपापल्या क्षेत्रातली १५ वर्षांची झळाळती कारकीर्द सहज अनुकरणीय ठरू शकत नाही. जर्मन अर्थव्यवस्था आणि फुटबॉल संघ यांच्या बाबतीत एक वर्तुळ पूर्ण झाले असून नव्याने सुरुवात करण्याची वेळ आली आहे. त्याची सुरुवात आता व्हावीच लागेल.