स्लोअर नव्या शतकात शिरताना ‘आधुनिक’तेकडे वाटचाल करू लागला होता, पण पाव शतक संपेपर्यंत बुद्धीही कृत्रिम होईलसे त्याला वाटले नव्हते. त्याला अंदाजच आला नव्हता, की थांबणे या क्रियापदाला व्याकरणाने नाकारले नसले, तरी जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने कधी स्वीकारलेलेच नाही…
स्लोअर शहाणे जसा नोकरीला लागला, तेव्हा विसाव्या शतकाचा उंबरठा ओलांडून काळाने एकविसाव्या शतकाच्या दारातून आत प्रवेश केला होता. स्लोअरला याचे खूप बरे वाटले होते. भूतकाळाचे ओझे आता उतरेल आणि आता इथून पुढे फक्त भविष्याविषयीच बोलले जाईल, अशी आशा त्याला वाटू लागली. ‘आशावाद चिरंतन असतो,’ अशी त्याच्या रोजदिनीतील नोंद ३१ डिसेंबर १९९९ लाच त्याने करून ठेवली होती. इतकेच नाही, तर पंचविसाव्या वाढदिवसाला स्वत:लाच एक पत्र लिहायचे त्याने ठरवले, ते याच शतक बदलाच्या उंबरठ्यावर. इंटरनेट नावाच्या माहितीच्या जाळ्यात आपल्याला हवी ती माहिती शोधण्यासाठीचे साधन, अर्थात ‘सर्च इंजिन’चा जन्म व्हायच्या आधीच त्याने स्वत:ला पत्र लिहून स्वत:चा शोध घेऊ, अशी कल्पना मांडली होती. पण, ती तेवढीच टिकली, जेवढी सध्या ‘व्हायरल’ म्हणून पसरणारी माहितीची साथ टिकते! स्लोअरला बिचाऱ्याला मात्र पत्राचा मायना आणि सर्च इंजिनचे ‘की-वर्ड’ यांतील फरक नीट समजून घेण्यासाठी एकविसाव्या शतकातील पहिले दशक संपावे लागले. स्लोअरच तो; शहाणपण जरा उशिरानेच येणार होते. ‘शोधाच्या आंधळ्या वाटेवर चाचपडणाऱ्या वाटसरूला सर्च इंजिनचा हात धरून फार तर माहिती शोधण्याची युक्ती मिळू शकते, प्रश्न सुटण्यातली मुक्ती नाही,’ हे वाक्य स्लोअरच्या रोजदिनीत अलीकडेच आले, ते म्हणूनच. गूगल नावाच्या सर्च इंजिनने त्याच्या नावाला बातम्या, प्रतिमा, चित्रफिती, नकाशे आणि अगदी खरेदीच्या रकान्यांतही व्यवस्थित ‘बसवले’, तेही याच वाक्याच्या उगमाअलीकडे-पलीकडे…
तर मुद्दा होता, तो स्लोअरला आता भविष्याबद्दलच बोलले जाईल, असे वाटू लागण्याचा. २००० सालात ई-मेल जात असल्या, तरी पत्रे त्यापेक्षा बरी वाटण्याचा काळ टिकून होता. प्रश्नपत्रिकांतही पत्रलेखन विषयाला चांगले १० गुण टिकून होते. स्लोअरच्या भाषेला मात्र ई-मेलचे आकर्षण खेचू लागले होते. त्यात सगळ्यात आवडती गोष्ट होती, ती संबोधनातील अनौपचारिकतेची. ‘सानविवि’ कधी, कुणाला आणि ‘सनविवि’ केव्हा, कुणासाठी, असे रूक्ष प्रश्न इलेक्ट्रॉनिक पत्राला पडत नाहीत, याने स्लोअरला खूप हायसे वाटले होते. पत्रलेखनाचा प्रश्न शाळेत असतानाही त्याला अवघडच जायचा, तो केवळ यामुळे. या औपचारिकतेत मायना मरतो, असे त्याला वाटायचे. मध्यमवर्गीय संस्कारांनी पत्रलेखनातही कसे मोकळेपणाला ठरावीक संबोधनांचे कुंपण घातले आहे, यावर एकदा त्याने घरातल्या गॅलरीतून सूर्यास्त दिशेला पाहत दीर्घ विचार केला होता. तेव्हा हाती काहीच लागले नव्हते, कारण नेमून दिलेली गोष्ट करण्यावाचून पर्याय नाही, असे त्याच्या संस्कारांनीच त्याला शिकवले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर, इलेक्ट्रॉनिक पत्राने आपसूकच संबोधनांचे नियम गाळून टाकल्यासारखे वाटल्याने स्लोअरला आनंद झाला होता. ई-मेल सुरू करताना, ज्याला लिहायची, त्याच्या फक्त नावाची नोंद किंवा कधीकधी तीही न करता, त्याऐवजी हाय, हॅलो, नमस्कार किंवा आपल्याला हवे ते लिहायचे आणि शेवटी ‘आपला नम्र’, ‘आपला विश्वासू’ वगैरे काहीही न लिहिता आपल्या अगदी टोपण नावाने पत्र संपवायचे, याचे स्लोअरला अप्रूप वाटले होते. त्याचे हे अप्रूप तोवरच टिकले, जोवर नोकरीच्या निमित्ताने लिहायला लागणाऱ्या ई-मेलचे नियम तयार होऊन संबोधनांबरोबरच प्रत कुणाला, कशी पाठवायची त्याचेही संकेत पाळणे गरजेचे होऊ लागले. लिहिलेल्या ई-मेलवर उत्तर पाठविण्याचा अधिकार न देण्याचा संकेत असलेली केवळ माहितीसाठी केलेली ‘सीसी’ आणि माहितीसाठीच, पण पाठविणाऱ्याला न कळण्यासाठी ‘बीसीसी’ असा चलाखपणा न जमल्याने म्हणा, स्लोअरचा ई-मेलमधला रस संपला.
एकूणच स्लोअर नव्या शतकात किंवा सहस्राकात म्हणू या, किंवा कसंही – शिरताना ‘आधुनिक’तेकडे वाटचाल करू लागला होता. जागतिकीकरणाने त्याला हात धरून तिकडे नेले होते, असे म्हणू हवे तर. आधुनिकतेचे शतक/सहस्राक सुरू होऊन पाव शतक संपेपर्यंत बुद्धीही कृत्रिम होईलसे स्लोअरला वाटले नव्हते. त्याला अंदाजच आला नव्हता, की थांबणे या क्रियापदाला व्याकरणाने नाकारले नसले, तरी जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने कधी स्वीकारलेलेच नाही. गणितात शिकलेली ‘इन्फिनिटी’ किंवा अनंताची संकल्पना – त्याच्या दोन जिलब्या एकत्र तळल्यासारख्या चिन्हासारखी सुरुवात आणि अंत नसलेली आहे, हे स्लोअरला कळायला अंमळ उशीरच झाला. त्याचे महत्त्वाचे कारण स्लोअरला जिलबी हा पदार्थ न आवडण्यात होते. स्लोअरला एकूणच वेटोळ्यांची भीती वाटे. त्यातून कोणत्या जिलबीचे वेटोळे कुठे संपतील, हे सांगता येत नाही. ‘रस्ता शोधा’ वगैरेसारखी कोडी सोडवताना अशा वेटोळ्यांत तो अनेकदा वाट पूर्ण बंद होण्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचायचा, म्हणून त्याला वेटोळ्यांची भीती बसली होती. त्याचा परिणाम मात्र झाला जिलबी न आवडण्यात. अवघड कोड्यांची धास्ती अशी कधी कधी सोप्या वाटणाऱ्या पदार्थांच्या नावडीत असते. ‘अभी न जाओ छोडकर’ या संगीतकार जयदेव यांच्या गाण्यातील रूढार्थाने कडवी नसलेल्या ओळींची चाल अशी जिलबीसारखी गोल गोल फिरत, श्वास घ्यायची जागाही सोडत नाही, तेव्हा कळते ही चाल किती अवघड आहे, असे एका संगीतकाराने एका कार्यक्रमात समजावून सांगितल्याचे स्लोअरने ऐकले, तेव्हा त्याला जिलबी न आवडण्याचे समाधान वाटले. म्हणजे गाणे आवडले नाही, असे झाले नाही, तर अभिजाततेतील सौंदर्य सुगम नसते, हे तरी किमान आपल्याला समजले, याची सुभग जाणीव त्याला सुखावून गेली.
काळ बदलला, असे वाटणे म्हणजे आधुनिकतेकडे वाटचाल करणे, ही जागतिकीकरणाची व्याख्या स्लोअर आताशा पाठ करू लागला. भविष्याकडे जाणे, म्हणजे भूतकाळाचे ओझे उतरविणे हे मात्र होत नसल्याची तीव्र जाणीव मध्ये-मध्ये त्याला होत असे. आधुनिक साधनांनी भूतकाळाची उजळणी करताना त्यात पुराव्यांऐवजी वर्तमानातील समजुती का पेरल्या जात असाव्यात, असे प्रश्न त्याला छळत असत. पण, मग या सगळ्याचा विचार करण्याचा कंटाळा येऊन आणि याने आपले वैयक्तिक भविष्य घडणे काही शक्य नाही, याची झडझडून जाणीव होऊन त्याने स्वत:च्या भविष्यावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. ‘भविष्य म्हणजे करिअर’ अशीच जागतिकीकरणाची नवी व्याख्या असल्याचे कुणी तरी त्याला सांगितल्याने आणि उत्तम करिअर करायचे, तर परकीय भाषा शिकली पाहिजे, असाही सल्ला कुणी तरी दिल्याने स्लोअर जपानी भाषा शिकू लागला. त्यात तीन लिप्या असल्याची त्याला मौज वाटली. एक लिपी मूळ शब्दांसाठी, एक परकीय भाषांतील शब्दांसाठी आणि एक चित्रलिपी. जपानी शिकायला सुरुवात करताना त्याला कुणी तरी सांगितले, की या भाषेचे व्याकरण मराठीसारखेच आहे. पण, तसे असूनही मराठीत जेवढी मुळाक्षरे आहेत, तेवढी त्या भाषेत का नाहीत, या प्रश्नाचे उत्तर स्लोअरला कधीच कुणी दिले नाही. शिक्षकांचे म्हणणे असे, की भाषा, त्याचा इतिहास, संस्कृती नंतर, आत्ता जागतिकीकरणाच्या परिप्रेक्ष्यात त्याकडे रोजगाराची संधी म्हणूनच पाहा. स्लोअरने तसे शिकून पाहिले, पण हळूहळू त्याला अधिकाधिक पडणारे भाषाविषयक प्रश्न आणि त्याला न मिळणारी उत्तरे, यामुळे त्याचा त्यातील रस संपला. एक फक्त चांगले झाले, की कांजी ही चित्रलिपी घोटवावी लागत असल्यामुळे रेषांचा सराव चांगला झाला. यातीलच एक रेषा आडवी पाडून एक दिवस स्लोअरने जपानी भाषेचा आणि त्यातील करिअरचा रस्ता वेटोळ्यांच्या कोड्यात येणाऱ्या ‘डेडएंड’सारखा बंद करून टाकला. जिलबी त्याला आवडत नव्हतीच, आणि जपानी आवडण्याआधीच मेंदूतून नाहीशी झाली…
ता.क. : नुकताच घिबली शैलीचा ट्रेंड सुरू झाल्यावर स्लोअरने त्याचा जपानशी असलेल्या संबंधाचा शोध घेतल्यावर त्याला लक्षात आले, की ‘घ’ आणि ‘ल’ ही अक्षरेच लिपीला फारशी जवळची नसल्याने जपान्यांनी या शब्दाला त्यांच्या परकीय भाषांसाठीच्या लिपीत टाकून त्याचे ‘जिबुरी’ असे जपानीकरण केले आहे. जपानी शिकताना आपल्याला असे काही सुचले असते, तर? असा प्रश्न आता स्लोअरला पडला असून, त्यावर त्याने आठवड्याचे ९० तास विचार करायचे ठरवले आहे! त्यासाठी रोजदिनीत नोकरीला लागल्यावरचे वाक्य लिहून पुढे लिहिले आहे, ‘आशावाद हा चिरंतन असतो, पण अस्वस्थता ही सार्वकालिक असते!’