गिरीश कुबेर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांदीकपारीत दडून बसायचं, चावा घ्यायचा आणि पुन्हा लपून बसायचं. पण असे लपून उद्योग करण्यासाठी ढेकूणच असायला हवं असं काही नाही..

ही बातमी पहिल्यांदा वाचली आणि धक्काच बसला. ढेकूण फार झालेत! ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात बहुधा याची पहिली बातमी आली. पॅरिसहून. त्या शहरात कसा ढेकणांचा सुळसुळाट झालाय.. मेट्रोमध्ये.. घराघरांत.. सिनेमागृहांत अशा सगळय़ा ठिकाणी ढेकणांच्या वसाहतीच्या वसाहती उभ्या राहताहेत आणि पॅरिसियन्स हवालदिल झालेत यामुळे.. अशी ती बातमी. पहिल्यांदा फ्रेंच माध्यमांनी ती दिली. आणि मग जगभर याचीच चर्चा सुरू झाली. खरंच ढेकूण फार झालेत..

वास्तविक मे महिन्यात मी सविस्तरपणे पुन्हा एकदा फ्रान्स अनुभवला होता. त्या जवळपास दोन आठवडय़ांच्या वास्तव्यात एकदाही तोंड किंवा त्याच्या विरुद्धचा भाग वर करून एकाही ढेकणानं आमच्याकडे पाहिलं असं झालं नाही. फ्रान्समध्ये इतका दक्षिण-उत्तर असा प्रवास केला. पण ढेकणाचा संबंध काही कधी आला नाही. ढेकणांपासून लांब राहण्यात कसं शहाणपण असतं ही अनेक ज्येष्ठांची शिकवण सतत जागी असते डोक्यात. पण फ्रान्समधे हाहाकार उडालाय ते ढेकूण वेगळे. हे ढेकूण मानवी शरीराचा महत्त्वाचा अवयव गुरुत्वीय बलाचा आदर राखत जमिनीशी समांतर अशा एखाद्या प्रतलास टेकतो तिथे लपून बसलेले असतात. आणि सर्वसाधारणपणे सार्वजनिक ठिकाणी खाजवणे असभ्य दिसेल अशा ठिकाणी मानवांस दंश करतात. पॅरिसमध्ये ढेकणांच्या टोळय़ाच टोळय़ा तयार झाल्यात आणि त्यांनी तिथल्या समस्त मानवजातीच्या दक्षिण गोलार्धावर जोरदार हल्ले चढवलेत. न्यू यॉर्क टाइम्स, बीबीसी, वॉशिंग्टन पोस्ट, द गार्डियन अशा जवळपास सगळय़ा महत्त्वाच्या माध्यमांनी या ढेकूण उत्पाताच्या सविस्तर बातम्या दिल्यात. खरंच ढेकूण फार झालेत..

हेही वाचा >>> ग्रंथस्मरण : इस्रायलसाठी ‘देवदूत’ ठरलेला इजिप्तचा गुप्तहेर ..

त्या वाचून माझ्या काही परदेशी मित्रांनी विचारलं, तुम्हाला नाही का हे जाणवलं. म्हटलं नाही. आम्ही फिरलो फ्रान्समध्ये तेव्हा काही ढेकणांचं अस्तित्व अजिबात जाणवलं नाही. ढेकणांचा त्रास हा कुर्त्यांला होणाऱ्या रेबीज आजाराप्रमाणे असतो. म्हणजे कुर्त्यांला रेबीज कधी आपोआप होत नाही. दुसऱ्या कोणत्या रेबीज झालेल्या कुत्र्याशी संपर्क आलाच तरच कोणत्याही कुर्त्यांला रेबीजची बाधा होते. ढेकणांचं तसंच आहे. ते स्वत:हून आपल्याकडे येत नाहीत. कोणीतरी त्यांना आणतं. कळत आणि बहुधा नकळत कोणाच्या तरी बॅगा वगैरेतून ते आपल्याकडे येतात आणि मग आपल्याकडून शेजारी. नंतर शेजाऱ्यांचे शेजारी वगैरे असं त्यांचं संक्रमण होतं. पॅरिसमध्ये इतके सारे पर्यटक येत असतात. अशाच कोणा पर्यटकाच्या बरोबर आले असतील ते ढेकूण पॅरिसपर्यंत. आणि एकदा का पॅरिसमध्ये यायला मिळालंय म्हटल्यावर कोणाला नाही आवडणार तिथं जमेल तितकं राहायला. शिवाय त्या शहरात चावायला मिळणारे अनेक अवयवही बहुरंगी, बहुढंगी आणि बहुदेशी असणार. तेव्हा वाढली असेल त्यांची प्रजा त्या शहरात. खरं तर फ्रान्स सरकारनं एक समितीच नेमायला हवी. की पॅरिसमध्ये जे ढेकूण आढळतायत ते नक्की आले कोठून? कोणत्या देशातून? ते अफ्रिकी आहेत की आशियाई? की मूळचे युरोपचेच पण अन्य खंडीयांशी संकर झालेले आहेत ते? आपण कशी चर्चा करतो आर्य नक्की आले कोठून? तसंच काही. आणि त्याच्या जोडीला स्थानिक ढेकूण आणि परप्रांतीय/परदेशीय ढेकूण अशीही विभागणी हवी. परप्रांतीयांना परत त्यांच्या त्यांच्या देशात कसं पाठवता येईल याचाही पर्याय हवा. फ्रान्सला या सगळय़ाचा विचार करावा लागेल. कारण सगळय़ांनाच चिंता वाटतीये.. ढेकूण फार झालेत. 

ही कल्पनासुद्धा किती भयंकर गमतीशीर म्हणायची. सगळे जण लूव्रच्या भव्य कलादालनात आ वासून मोनालिसाच्या गूढगंभीर स्मितहास्याकडे बघताहेत आणि मोनालिसा आपले न दिसणारे हात वापरून ढेकणांच्या चाव्यानं उद्दीपित होणाऱ्या भावना शांत करण्यात मग्न आहे आणि तिला पाहणारेही जमेल तसे वाकून वाकून आपल्या हातांनीही तीच भावना शांत करण्याचा प्रयत्न करताहेत. कला क्षेत्रात ढेकणांची बाधा बहुधा जास्त असावी. सगळेच बसून. हालचाल कमी. त्यामुळे ढेकणांनाही कलाक्षेत्रातल्यांचे पार्श्वभाग अधिक पसंत असावेत. तसंही ढेकणांचा स्वभावच असं काही करत राहायचा. स्वत:च्या अंगी स्वत:चं असं काही घडवण्याची त्यांची कुवतच नसते. सतत दिवाभितासारखे अंधारात. समोर येऊन कधी चावलेत.. नाव नाही. ढेकणांच्या काही जमाती तर आपण चावलो हे कळू नये म्हणून टोपण नावं घेतात म्हणे. खरंय ढेकूण फार झालेत..

हेही वाचा >>> बुकरायण: अस्वस्थ काळाची भेदक नोंद!

त्यापेक्षा डास बरे. ढेकणांपेक्षा कितीतरी कर्तृत्ववान म्हणावेत असा त्यांचा लौकिक. हिवताप, यलो फीवर, डेंगी, चिकनगुनिया असे एकापेक्षा एक भारीभारी आजार पसरवू शकतात ते.  प्रसंगी या डासांचं चावणं प्राणघातकही ठरतं. ढेकणांच्या तुलनेत डास तसे आधुनिकही असतात. स्त्रीस्वातंत्र्यांचे ते जाज्वल्य पुरस्कर्ते म्हणता येतील. महिला डासिणींच्या प्रगतीच्या आड पुरुष डास कधीही येत नाहीत. अ‍ॅनोफीलिसचंच पाहा. पुरुष डासाची नसेल अशी या डासिणीची भीती असते. या डासांची कानाभोवती भुणभुण करायची क्षमता लक्षात घेता डासांमध्ये मातृसत्ताक पद्धती असावी असा संशय घेण्यासही बरीच जागा आहे. पण जमात तशी शूर. समोरनं वार करणारी. एक टाळी वाजली तरी आपला खेळ खल्लास हे माहीत असतं. तरी पठ्ठे आणि त्यांच्यातल्या पठ्ठय़ाही अशा समोरनं चाल करून येतात. डास ही कीटकांमधली विकसित जमात. पण रक्त शोषणासाठी त्यांना अविकसित देशच अधिक प्रिय असतात. एकतर अविकसित देशांत वाया घालवायला रक्त मुबलक. आणि विकसित देशांतल्यासारखे पांढरेफटक देह नसतात इकडे. पण इतकी प्रगल्भता ढेकणांकडे कुठली असायला. त्यामुळे त्यांच्यापासून एकही आजार पसरण्याचा धोका नसला- त्यांची कुवतच नसते तितकी- तरी त्यांची वाढती संख्या एक डोकेदुखीच असते, हे मात्र खरं. केवढे वाढलेत ढेकूण हल्ली..

हे ढेकूण सदैव आपले लपून. सांदीकपारीत बसायचं आणि लपूनछपून चावायचं.  चावले नाहीत, कंड सुटला नाही तर त्यांचं अस्तित्व लक्षातही येत नाही कोणाला. कपाटांचे कोने, बेडच्या भेगा वगैरे अंधाऱ्या ठिकाणी लपून असतात हे. आणि इंटरनेटच्या प्रसारामुळे तर अंधाऱ्या जागा इतक्या वाढल्यात लपून बसायला ढेकणांना की सांगता सोय नाही. म्हणून हल्ली प्रसारही वाढलाय ढेकणांचा. पण असे लपून उद्योग करण्यासाठी ढेकूणच असायला हवं असं काही नाही. अन्य अनेक जीवजंतू असे उद्योग करणारे असतात. सांदीकपारीत दडून बसायचं, चावा घ्यायचा आणि पुन्हा लपून बसायचं. हल्ली तर अशी कामं करणारे भाडय़ानंही मिळतात म्हणे. म्हणजे चार आण्याला एक चावा किंवा असं. पण ढेकणांत अशी भाडय़ानं चावायची प्रथा आहे की नाही याची माहिती अद्याप तरी उपलब्ध नाही. संयुक्त राष्ट्रांत प्रयत्न सुरू आहे अशी माहिती उपलब्ध करून देण्यासाठी. खरंच आहे.. ढेकूण खूप वाढलेत हल्ली..!

हेही वाचा >>> अन्वयार्थ : जगणे कठीण करणारी हवा..

पण फ्रान्समध्ये या ढेकणांचा इतका कहर झाला की दूरचित्रवाणीवरच्या बातम्यांच्या चर्चा या ढेकणांभोवती झडल्या. ढेकणांच्या वाढीस कोण जबाबदार, सरकारची धोरणं की आता विरोधात असलेल्यांनी सत्ताकाळात केलेलं लांगुलचालन अशी ती चर्चा. मामला इतका गंभीर की ३ ऑक्टोबरला मातिल्ड पानो (Mathilde Panot) या लोकप्रतिनिधी त्या देशाच्या लोकसभेत ढेकणांनी भरलेली काचेची बाटली घेऊन आल्या. पण त्यावरूनही वाद झाला. कारण या मातिल्डबाई पडल्या डाव्या. त्यांनी आणलेले ढेकूण नेमके उजव्यांना चावलेले निघाले. त्यामुळे त्यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोपही झाला. त्यावर त्यांनी उजव्यांवर ढेकणांना पाठीशी घातल्याचा आरोप केला. ‘‘तुम्हाला बरे नाही चावत ढेकूण.. कारण तुमचं त्यांचं साटंलोटं आहे’’, अशीही खडाजंगी झाली म्हणतात. यावरनं लक्षात येईल ढेकूण किती वाढलेत हल्ली.. 

हे प्रकरण किती गंभीर असावं? तर साक्षात ‘द इकॉनॉमिस्ट’ला महिनाभरात दुसऱ्यांदा लिहावं लागलं ढेकणांवर. दहा वर्षांपूर्वी न्यू यॉर्क, नंतर चक्क स्वित्झर्लंडमधल्या झुरीकमध्ये, आणखी कुठे कुठे ढेकूण कसे वाढलेत यावर या साप्ताहिकानं अभ्यासपूर्ण लेख लिहिलाय. ढेकणांच्या वाढीची कारणमीमांसा आहे त्यात. युरोपची, विकसित देशांची कीटकनाशकांवरची बंदी यामागे आहे असा या साप्ताहिकाचा निष्कर्ष. तेव्हा नवी परिणामकारक कीटकनाशकं विकसित करावी लागतील विकसित देशांना. त्यांनी ती केली की आपल्याकडेही ती येतीलच. इतकी मोठी बाजारपेठ आपली. ती लवकर यावीत. फारच झालेत ढेकूण हल्ली..!

girish.kuber@expressindia.com      

@girishkuber

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girish kuber about the bed bug outbreak in france zws
Show comments