एकविसाव्या शतकात हाय-टेक क्षेत्रातील कोणत्या कंपनीनं अमेरिकी शासन व डिजिटल कंपन्यांची झोप सर्वांत जास्त उडवली, याचा शोध निर्विवादपणे केवळ एका कंपनीपाशी येऊन थांबेल. दूरसंचार क्षेत्र, ५-जी तंत्रज्ञान, स्मार्टफोन उत्पादन व अशा पायाभूत स्वरूपाच्या डिजिटल सुविधा पुरवण्यासाठी लागणाऱ्या सेमीकंडक्टर चिपची निर्मिती करणारी व चीनची खऱ्या अर्थाने ‘ग्लोबल’- बहुराष्ट्रीय कंपनी म्हणता येईल अशी ही कंपनी म्हणजे हुआवे ( Huawei)! ऐंशी आणि नव्वदच्या दशकात दूरध्वनी केंद्रांमध्ये लागणारे ‘स्विच’ हाँगकाँगमधून आयात करून (तेव्हा हाँगकाँग ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होते) ते चीनमध्ये विकण्याचं काम करणाऱ्या हुआवेनं एकविसाव्या शतकात दूरसंचार व नेटवर्किंग तंत्रज्ञानात जी गरुडझेप घेतली तिला तोड नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हुआवेबद्दलच्या या विधानांना पुढील आकडेवारीतून (ती काहीशी जुनी असली तरीही) काही प्रमाणात पुष्टी मिळू शकेल. २०१९-२० मध्ये हुआवे चीनच्या हाय-टेक कंपन्यांमधली सर्वात मोठी निर्यातदार होती. २०२० पर्यंत तरी चिपनिर्मितीमध्ये (फॅब्रिकेशन प्रक्रिया) टीएसएमसीसाठी अॅपलनंतरचा सर्वात मोठी खरेदीदार हुआवे होती आणि निव्वळ संख्येच्या दृष्टीनं विचार केला तर मोबाइल संचांच्या विक्रीत हुआवे सॅमसंगनंतर दुसऱ्या स्थानावर होती. विशेष म्हणजे ५-जी तंत्रज्ञानाच्या परिचालनासाठी लागणारी उपकरणं किंवा ५-जी तंत्रज्ञानाचा सक्षमपणे वापर करू शकणारे स्मार्टफोन यांची निर्मिती हुआवे करतच होती; पण त्यामध्ये लागणाऱ्या अनेक प्रकारच्या चिपचं आरेखनही ती स्वत:च करत होती. निव्वळ संशोधनावर हुआवे करत असलेला खर्च मायक्रोसॉफ्ट, इंटेल किंवा गूगललाही लाजवणारा होता. डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्राचा विचार केल्यास एकविसाव्या शतकाचं तिसरं दशक हे हुआवेचं असेल, याबद्दल बहुतेकांच्या मनात तिळमात्रही शंका नव्हती.
हेही वाचा : समोरच्या बाकावरून : अर्थव्यवस्था तारेल त्यालाच मत
२०१९च्या उत्तरार्धात अमेरिकेचे तत्कालीन (आणि आता भावी) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली तेथील प्रशासनानं घेतलेल्या एका निर्णयानं मात्र हुआवेच्या अफाट वेगाने सुरू असलेल्या घोडदौडीला पुरता लगाम घातला. काय होता हा निर्णय आणि तो का घेतला गेला? जाहीरपणे दिलेलं कारण काहीही असलं तरीही असा निर्णय घेण्यामागचं ‘खरं’ कारण काय होतं? सेमीकंडक्टर पुरवठा साखळीवर याचा काय परिणाम झाला? अमेरिका – चीनमधलं व्यापारयुद्ध वाढत असताना हे घडल्यानं, भूराजकीय परिप्रेक्ष्यात यामुळे काय परिणाम झाले? या सर्व प्रश्नांच्या अंतरंगात शिरण्यापूर्वी २०२० पर्यंत हुआवेला अॅपलनंतरची सर्वात महत्त्वाची हाय-टेक कंपनी असं का मानलं जात होतं याचा धांडोळा घेऊ… कारण त्यातूनच वरच्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळत जातील.
हुआवेखेरीज अलिबाबा, टेन्सन्ट, पिनडोडो, बायदू या चीनमधल्या यशस्वी हाय-टेक किंवा डिजिटल कंपन्या. पण या सर्वांत आणि हुआवेमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. अलिबाबासकट चीनच्या सर्व डिजिटल कंपन्यांना आपला ९९ टक्के महसूल स्थानिकांकडून मिळतो. या कंपन्या चीननं विविध अमेरिकी डिजिटल कंपन्यांवर (उदा. गूगल, फेसबुक, अॅमेझॉन) लादलेल्या नियमन आणि निर्बंधांच्या प्रमुख लाभार्थी आहेत. सरकारी कुबड्यांवर ‘घर में शेर’ बनलेल्या अशा कंपन्या जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करायला निघतात तेव्हा त्यांचं अपयश हे डोळ्यात भरणारं असतं. चिनी डिजिटल कंपन्या याला जराही अपवाद नाहीत.
या पार्श्वभूमीवर हुआवेचं वेगळेपण उठून दिसतं. रेन झेंगफेई या चिनी अभियंत्यानं १९८७ मध्ये कंपनीची स्थापना केल्यापासून हुआवेनं इतर चिनी कंपन्यांप्रमाणे केवळ सरकारी मदतीवर अवलंबून राहून विदेशी कंपन्यांच्या स्पर्धेला अव्हेरलं नाही. हुआवेच्या व्यावसायिक धोरणाचं विश्लेषण केल्यास तीन बाबी ठळकपणे समोर येतात. (१) अमेरिका, युरोप किंवा आग्नेय आशियाई देशांतील यशस्वी हाय-टेक कंपन्यांच्या उत्पादनांचा आणि ते उत्पादन- प्रक्रियांचा निरंतर अभ्यास करत राहणं आणि तेवढ्याच किंवा अधिक उच्च दर्जाच्या उत्पादनांची किफायतशीर पद्धतीनं निर्मिती करणं. (२) हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारी धोरणकर्त्यांशी संधान बांधून स्वत:ला अनुकूल ठरतील असे नियम किंवा धोरणं आखणं, तसंच शासनाच्या मदतीनं कवडीमोल दरानं कारखान्यांसाठी जमीन व इतर भांडवल उभं करणं. (३) आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख तयार करण्यासाठी जागतिकीकरणाला खुलेपणानं अंगीकारणं व त्यानुसार कंपनीमधील प्रत्येक प्रक्रिया राबवणं.
हेही वाचा : बुकमार्क : जातीय जनगणना की जातिव्यवस्थेचे निर्मूलन?
कंपनीच्या स्थापनेपासूनच या त्रिसूत्रीचं काटेकोरपणे पालन करून हुआवेनं स्वत:ची जगभरात वाखाणली जाईल अशी नाममुद्रा तयार केली. चिनी शासन असो वा कंपन्या, त्यांनी केलेल्या प्रत्येक कृतीमागच्या हेतूंबद्दल एक संशयाचं धुकं नेहमीच तयार झालेलं असतं. त्यामुळेच त्यांची यशस्विताही संशयातीत नसते. हुआवेही त्याला अपवाद नाही. २०२० पर्यंत अत्यंत जोमानं होत असलेली कंपनीची वाढ चिनी शासनाच्या भरभक्कम पाठिंब्याशिवाय होणं शक्यच नव्हतं. सरकारी अनुदान, करात प्रचंड सवलत, कवडीमोल दरात उपलब्ध केलेली जमीन, चिनी बँकांकडून नाममात्र व्याजदरात होणारा वित्तपुरवठा – अशी प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष शासकीय मदत हुआवेला पुष्कळ मिळाली; जी एका अंदाजानुसार साडेसात हजार कोटी डॉलरच्या घरात आहे. या मदतीचा हुआवेला फायदा झाला हे नि:संशय. पण आजच्या स्पर्धात्मक युगात जागतिक स्तरावर यशस्वी होण्यासाठी एवढंच पुरेसं नाही. चीनप्रमाणे जपान, दक्षिण कोरिया, तैवान या पूर्व व आग्नेय आशियाई देशांनीही आपापल्या सेमीकंडक्टर किंवा डिजिटल कंपन्यांना अशाच स्वरूपाचं अर्थसाहाय्य त्यांच्या जडणघडणीच्या काळात पुरवलं होतं.
हुआवेवर होणारा दुसरा आरोप हा बौद्धिक संपदेच्या चौर्यकर्माचा आहे, ज्यात तथ्य नक्कीच आहे आणि काही प्रकरणांत कंपनीनं ते मान्यही केलं आहे. सिस्को, नॉर्टल या दूरसंचार क्षेत्रातील हुआवेच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांनी तिच्यावर आपल्या उपकरणांच्या आरेखनासंदर्भातील दस्तावेज, त्यांच्या परिचालनासाठी लिहिल्या गेलेल्या आज्ञावली चोरल्याचा थेट आरोप अनेकदा केला आहे. मोबाइल फोन आणि सेमीकंडक्टर चिप आरेखनाबाबतीतही हुआवेची कामगिरी धुतल्या तांदळासारखी स्वच्छ अजिबात नाही. पण बौद्धिक संपदा किंवा ट्रेड सीक्रेटची चोरी, तसेच कॉपीराइटच्या नियमांचं उल्लंघन हे कोणत्याही कंपनीच्या यशस्वितेचं प्रमुख कारण होऊ शकत नाही. चिपनिर्मिती क्षेत्रात तत्कालीन सोव्हिएत रशियानेही अमेरिकी कंपन्यांचे चिप संदर्भातील दस्तावेज वाममार्गानं मिळवून त्यांची हुबेहूब नक्कल करण्याचा प्रयत्न केला होता. तो किती असफल ठरला याची साक्ष निव्वळ कागदोपत्रीच राहिलेलं ‘झेलेनोग्राड’ शहर देईल.
हेही वाचा : बुकबातमी : इथं जाऊ की तिथं जाऊ?
संशोधनावर निरंतरपणे दिला जाणारा भर, आपल्या किंवा इतर क्षेत्रांतील बहुराष्ट्रीय कंपन्यांनी राबवलेल्या यशस्वी धोरणांना आत्मसात करण्याची तयारी, त्यातून तयार झालेल्या कार्यक्षम उत्पादन प्रक्रियांची अंमलबजावणी आणि या सर्वांतून निर्मिलेली नावीन्यपूर्ण, उच्च दर्जाची पण तरीही किफायतशीर उत्पादनं, याशिवाय कोणतीही कंपनी जागतिक स्तरावर यशस्वी ठरू शकणार नाही. हुआवेच्या यशामागेही असाच सर्वोत्तमाचा ध्यास आणि एक प्रकारचं झपाटलेपण होतं, हे तिचे कडवे टीकाकारही मान्य करतील. याबाबतीत हुआवेचा ‘डीएनए’ सिलिकॉन व्हॅलीतल्या कंपन्यांशी मिळताजुळता होता.
महसूल कमी मिळाला तरीही संशोधनावरील गुंतवणूक कमी न करणं, आंतरराष्ट्रीय दर्जाची डिजिटल पुरवठा साखळी उभारण्यासाठी आयबीएमसारख्या अमेरिकी दिग्गजाची मदत घेणं, २०११ साली जपानमध्ये आलेल्या सुनामीनंतर मोबाइल फोन किंवा सेमीकंडक्टर चिपसाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी जपानवरील अवलंबित्व कमी करणं, मोबाइल फोनच्या उत्पादनात चिप तुटवड्यामुळे कोणताही अडथळा येऊ नये म्हणून फोनमधील अधिकतम चिपचं आरेखनही स्वत:च करणं… अशी अनेक उदाहरणं हुआवेची व्यावसायिक शिस्त आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन स्पष्ट करतात.
हेही वाचा : दखल : मानवी भविष्यासाठी…
पीसी आणि मायक्रोसॉफ्ट (विंडोज व ऑफिस प्रणाली), किंवा इंटरनेट आणि गूगल, हे जसे एकमेकांपासून विलग केले जाऊ शकत नाहीत, तसंच काहीसं २०२०च्या सुमारास दूरसंचार क्षेत्र आणि हुआवेच्या बाबतीत व्हायला लागलं होतं. मोबाइल स्मार्टफोन आणि ते एकमेकांशी जोडून त्यातून होत असलेल्या विविध प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी लागणारी यंत्रणा, अशा दोन्ही उपकरणांची निर्मिती हुआवेच करत असल्यामुळे एकविसाव्या शतकाचं दुसरं दशक संपताना अशी परिस्थिती निर्माण झाली होती की हुआवेचं कोणतं तरी उपकरण वापरल्याशिवाय फोनचा उपयोग करणं हे अशक्यप्राय बनलं होतं. विशेषत: ५-जी तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर हुआवेचा या क्षेत्रावरील प्रभाव प्रचंड प्रमाणात वाढला होता.
एकविसाव्या शतकातील डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात महत्त्वाची कंपनी बनायला निघालेल्या हुआवेचे पंख कोणी, कसे व का छाटले आणि त्याचा सेमीकंडक्टर क्षेत्रावर काय परिणाम होईल याचं विश्लेषण पुढल्या सोमवारी!
(लेखक ‘चिप’ उद्योगात कार्यरत असलेले तज्ज्ञ आहेत.)
amrutaunshu@gmail.com