एल. के. कुलकर्णी
आल्फ्रेड वेजेनर यांनी त्यांच्या ‘भूखंड निर्मितीच्या सिद्धांतां’त प्राचीन संयुक्त महाखंडाची कल्पना मांडली. त्यामुळे सव्वाशे वर्षांपूर्वीपर्यंत फारसे कुणाला माहीतही नसलेले गोंडवन जगाच्या नजरेत आले.
‘गोंडवाना भुईया है महान’ हे अनिल सलाम यांचे एक लोकप्रिय गोंडी गीत आहे. ‘गोंडवन’ हा मध्य भारतातील गोंडबहुल वनप्रदेश. योगायोगाने वरील गीतातील ‘महान’ या शब्दाला एक भौगोलिक संशोधन संदर्भही आहे. १९१५ मध्ये जर्मनीच्या आल्फ्रेड वेजेनर यांनी ‘गोंडवना’ हे नाव त्यांच्या सिद्धांतात घेतले आणि भारतातील या दुर्लक्षित भूभागाचे नाव जागतिक पटलावर आले. सव्वाशे वर्षांपूर्वी तर हा भाग अगदीच दुर्गम व प्रसिद्धीच्या झोतापासून दूर होता. मग त्याचे नाव जर्मनीतल्या वेजेनर यांच्यापर्यंत कसे पोहोचले आणि त्यांनी ते का स्वीकारले, याबद्दलचा रंजक तपशील पुढीलप्रमाणे आहे.
तेलगू भाषेतील ‘गोंड’ किंवा ‘कोंड’ (म्हणजे डोंगर) यापासून गोंड – अशी या शब्दाची व्युत्पत्ती असावी, असे मानले जाते. अकराव्या व बाराव्या शतकातील अरबी व्यापाऱ्यांनी हा शब्द वापरात आणला याबद्दल बहुतेक इतिहासकारांचे एकमत आहे.
भौगोलिकदृष्टया मध्य भारतातील िवध्य व गोदावरी यांच्यामधल्या भागाला गोंडवन मानले जाते. यात महाराष्ट्रातील चंद्रपूर, छत्तीसगडमधील बस्तर, िछदवाडा व मंडला हे जिल्हे आणि आंध्र प्रदेशातील वरंगल तसेच आदिलाबाद या जिल्ह्यांचा समावेश होतो. एकेकाळी घनदाट अरण्यांनी भरलेल्या या भागात गोंड, माडिया व इतर आदिवासी जमाती राहतात. निसर्गसंवादी जीवन हे त्यांचे वैशिष्टय.
हेही वाचा >>> अन्यथा : लक्ष्मीचा ‘पार्किंग लॉट’!
१४ व्या ते १७ व्या शतकात मध्य भारतात गोंडांची अनेक राज्ये स्थापन झाली. या काळात या भागात काही मुख्य ठिकाणी राजवाडे, किल्ले, महाल उभे राहिले. पण हा बदल मर्यादित असून त्याचे स्वरूप सार्वत्रिक नव्हते. त्यामुळे तेथील वैशिष्टयपूर्ण लोककलेसह हा परिसर तसा दुर्लक्षितच राहिला.
जेम्स फोर्साइथ या ब्रिटिश सैन्यातील कॅप्टनने भारतात बराच प्रवास करून त्यावर पुस्तके लिहिली. त्यांच्या ‘हायलँड्स ऑफ सेंट्रल इंडिया’ या १८७१ मधील ग्रंथातून ‘गोंडवन’ हा शब्द प्रथम जगाला ज्ञात झाला. कोटयवधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर ‘ग्लोसोप्टेरिस’ ही बीजधारी वनस्पती विपुल प्रमाणात नांदून गेली. आज ती विलुप्त आहे. पण तिचे जिवाश्म विशिष्ट प्रकारच्या खडकात मोठया प्रमाणात आढळतात. असे खडक जगात सर्वप्रथम गोंडवन प्रदेशात नोंदवले गेल्यामुळे त्यांना ‘गोंडवन खडक’ असे नाव पडले. जिओलॉजिकल सव्र्हे ऑफ इंडियाचे एच. बी. मेडलिकॉट यांनी एका अहवालात अशा विशिष्ट खडक प्रकारासाठी ‘गोंडवन सिरीज’ हे नाव १८७२ मध्ये प्रस्तावित केले. पण त्यांचा अहवाल अप्रकाशित राहिला. मुद्रित स्वरूपात ‘गोंडवन खडक’ हे नाव प्रथम प्रकाशित करण्याचे श्रेय त्याच खात्यातील ओट्टोकार फिस्टमाँटेल यांना दिले जाते. त्यांच्या १८७६ मधील प्रकाशित एका शोधनिबंधात त्यांनी हे नाव प्रस्तावित केले.
नंतर असे आढळून आले की या प्रकारचे खडक भारतच नव्हे तर आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका व अंटार्क्र्टिका या खंडातही आढळतात. या खडकावरून हे सिद्ध झाले की भूतकाळातील एका विशिष्ट कालखंडात ही वनस्पती या दूरदूरच्या भूप्रदेशात अस्तित्वात होती. असे का असावे, याचे स्पष्टीकरण मात्र कुणी देऊ शकत नव्हते.
पुढे १८८५ मध्ये ऑस्ट्रियन भूवैज्ञानिक एडवर्ड सुएस यांनी ‘फेस ऑफ दि अर्थ’ हा ग्रंथ प्रकाशित केला. या ग्रंथात गोंडवनी खडक असणाऱ्या भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, इ. प्रदेशासाठी त्यांनी ‘गोंडवन संघ’ हा शब्द प्रचारात आणला. हा प्रसिद्ध ग्रंथ आल्फ्रेड वेजेनर यांच्या पाहण्यात होता. त्यांनी १९१२ ते १९१५ मध्ये जो ‘भूखंड निर्मितीचा सिद्धांत’ मांडला, त्यात प्राचीन संयुक्त महाखंडाची कल्पना मांडली. १९१५ मध्ये ‘खंडांची निर्मिती’ या आपल्या पुस्तकात त्यांनी व एडवर्ड सुएस यांचा संदर्भ देऊन त्या महाखंडाला ‘गोंडवन लँड’ हे नाव दिले. अशा प्रकारे पुरातन संयुक्त खंडासाठी ‘गोंडवन’ हे नाव अधिकृतरीत्या वैज्ञानिक जगतात प्रविष्ट झाले. पण त्याला लगेच सार्वत्रिक मान्यता मिळाली नाही.
वेजेनर यांच्या हयातीत त्यांचा भूखंडनिर्मितीचा सिद्धांत स्वीकारला न जाता उपेक्षितच राहिला. पुढे त्यांच्या मृत्यूनंतर तीस वर्षांनी, १९६० च्या दशकात त्यांचे मत खरे असल्याचे सिद्ध होऊ लागले. मग मात्र त्यांचा भूखंडनिर्मितीचा सिद्धांत स्वीकारला गेला. त्यासोबत वेजेनर यांनी सुचवलेली पँजिया, टेथिस, लॉरेशिया, गोंडवन ही नावेही प्रचलित झाली. ६०-७० वर्षांपूर्वी गोंड व इतर आदिवासी जमाती व त्यांचा प्रदेश तसा पूर्ण दुर्लक्षित व अविकसित होता. पण त्याच वेळी त्यांच्या भूमीचे नाव मात्र जगप्रसिद्ध झाले होते.
हेही वाचा >>> बुकमार्क : ती वीसेक आणि आताची दहा वर्षे!
एकदा वेजेनर यांच्या सिद्धांताद्वारे जागतिक पटलावर पदार्पण केल्यानंतर ‘गोंडवन’ या शब्दाने लोकांना जणू मोहित केले. भूविज्ञानच नव्हे तर कला व इतर क्षेत्रातही गोंडवन हे नाव जगभर वापरले जाऊ लागले.
दक्षिण आफ्रिकेतील एका प्रसिद्ध वनक्रीडा व पर्यटन केंद्रास ‘गोंडवन गेम रिझव्र्ह’ असे नाव देण्यात आले आहे. खासगी मालकीच्या या संरक्षित वनात असंख्य दुर्मीळ प्राण्यांचा अधिवास आहे. ऑस्ट्रेलिया व ‘न्यू कॅलाडोनिया’ या पॅसिफिक महासागरातील फ्रेंच वसाहतीला जोडणाऱ्या समुद्राखालील ऑप्टिक केबल तारेचे नावही ‘गोंडवन १’ असे ठेवण्यात आले आहे. २००७ मध्ये टाकलेल्या या केबलची लांबी १२०० कि. मी. आहे. ऑस्ट्रेलिया व इतर दूरच्या भूप्रदेशाला जोडत असल्याने तिला ‘गोंडवना’ हे प्राचीन संयुक्त भूखंडाचे अन्वर्थक नाव देण्यात आले.
ट्रिस्टन म्युरेल हे फ्रेंच संगीतकार, ‘स्प्रेक्ट्रल’ या प्रायोगिक संगीत रचनांचे प्रवर्तक. ‘गोंडवन’ ही त्यांची सर्वात मोठी व प्रसिद्ध वाद्यवृंद रचना आहे. १८८० मधील ही संगीत रचना म्हणजे विविध वाद्ये, त्यांचे प्रतिध्वनी आणि स्तब्धावकाश (pauses) यांचा संयुक्त व मंद लयीतला आविष्कार आहे. ती ऐकताना खंडांचे अपवहन व मंद भौगोलिक घडामोडींची अनुभूती येते. त्यामुळे त्यास ‘गोंडवन’ हे प्रतीकात्मक नाव देण्यात आले. याचप्रमाणे माईल्स डेव्हीस या प्रख्यात जॅझ संगीतकाराच्या १९७५ मधील ‘पँजिया’ या अल्बममधील एका ट्रॅकचे नावही ‘गोंडवन’ आहे. जे. सी. थर्लवेल या ऑस्ट्रेलियन संगीतकाराच्या ‘स्टिरॉइड मॅक्सिमस’ या वाद्यसंगीत प्रकल्पातील १९९२ मधील एका अल्बमचे नावही ‘गोंडवन लँड’ असे आहे.
पण गोंडवनला लाभलेली ही जागतिक प्रसिद्धी ‘नाममात्र’ म्हणावी लागते. कारण जगात गाजणारे ‘गोंडवन’ हे नाव खुद्द भारतात मात्र, त्या प्रकारे गाजले नाही. फक्त काही मध्ययुगीन ऐतिहासिक संदर्भात हे नाव येते. साहित्यात श्री. व्यं. केतकर यांच्या १९३६ च्या ‘गोंडवनातील प्रियंवदा’ या मराठी कादंबरीत तेवढे हे नाव आढळते.
दुर्दैवाने या जागतिक प्रसिद्धीचा स्वत: गोंडवन प्रदेशासाठी काहीच उपयोग झालेला नाही. ‘बस्तर आर्ट’च्या रूपात या भागातील कलेची कीर्ती दूर दूर पसरली आहे. पण बाकी हा परिसर आपल्याच देशात आजही सर्वांगीण विकासाच्या प्रतीक्षेतच आहे.
‘गोंडवाना के भुईया मा बोले सोन चिरैय्या’ हेही एक प्रसिद्ध गोंडी गीत आहे. अर्थातच सोनचिमणी हे समृद्धीचे प्रतीक आहे. अशा समृद्धीची चाहूल या भागाला लाभली, तरच त्याच्या जागतिक प्रसिद्धीला लोकजीवनात अर्थ प्राप्त होईल.
‘भूगोलकोशा’चे लेखक आणि भूगोलाचे निवृत्त शिक्षक
lkkulkarni.nanded@gmail.com